कर्जदायी संस्था कर्ज देताना एकाच गोष्टीची पुन्हा पुन्हा खात्री करून घेतात, ती म्हणजे अर्जदाराची आर्थिक विश्वासार्हता. कर्ज मान्य केल्यावर त्याची पूर्ण परतफेड होणार आहे का, आणि ती ठराविक वेळेत होणार आहे का ह्या दोन प्रश्नांची खात्रीशीर सकारात्मक उत्तरं मिळाल्याशिवाय कोणतीही संस्था ग्राहकाला कर्ज मान्य करताना दिसत नाही. आता ही उत्तरं बँकांना किंवा कर्जदायी संस्थांना कशी मिळतात? अर्थातच सिबिल कडून.
सिबिल संस्थेकडून त्या त्या ग्राहकाचा क्रेडिट रिपोर्ट आणि क्रोडिट/सिबिल स्कोअर समजला की त्या ग्राहकाची आर्थिक पार्श्वभूमी, शिस्त, आणि विश्वासार्हता स्पष्ट होते. हा स्कोअर कमी असल्यास कर्ज मान्य होण्यात बँकांकडून हात आखडता घेण्यात येऊ शकतो. पण हाच स्कोअर चांगला असेल तर त्याचे अनेक फायदेही आहेत. ते जाणून घेऊया.
-
कमी वेळात कर्ज मंजूर होणे-
साधारण ७५० आणि त्याहून अधिक सिबिल स्कोअर असणाऱ्या व्यक्तींना कर्जदायी संस्था कर्जासाठी इतर कसलाही विचार न करता सरसकट पात्र समजतात. प्रत्येक संस्थेगणिक हा आकडा बदलत असला तरी कर्जमान्यतेसाठी साधारण ७५० हा स्कोअर पुरेसा आहे. तुमचा स्कोअर ७५० व त्यापुढच्या श्रेणीत असेल तर तुम्हाला कमी वेळात कर्ज मंजूर होऊ शकते.
-
कमी व्याजदर-
तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल कर्ज देताना बँक तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज द्यायचा प्रस्ताव मांडू शकते. तुमच्या सिबिल स्कोअरप्रमाणेच तुमची आर्थिक विश्वासार्हताही चांगली असल्याने बँक तुम्हाला देत असलेल्या व्याजदरापेक्षाही कमी व्याजदर मंजूर करून घ्यायला तुम्ही पात्र असता. -
प्रक्रिया शुल्क माफ होणे-
कर्ज मंजूर होताना त्याचे प्रक्रिया शुल्कही (प्रोसेसिंग फी) बँक वसूल करते, जे कर्जाच्या रकमेत ग्राह्य धरलेले नसतात. अर्जदाराचा सिबिल स्कोअर चांगला असल्यास हे प्रकिया शुल्क माफ करण्याचा विचार बँक करू शकते. पण असंच होईल असा काही नियम नाही. माझा सिबिल स्कोअर चांगला आहे, त्यामुळे मला प्रक्रिया शुल्क माफ व्हायला हवं असा पुर्वग्रह किंवा हट्ट असणं चुकीचे आहे.
-
याशिवाय क्रेडिट कार्डचेही व्याजदर कमी होणे, जास्त रकमेचे कर्ज मंजूर होणे, कार लोनही लवकर मंजूर होणे असेही फायदे चांगल्या सिबिल स्कोअरमुळे होतात.
(चित्र सौजन्य- गुगल इमेजेस)