अनेकदा एखादी व्यक्ती आर्थिक वर्षाच्या मध्यात एक नोकरी सोडून दुसरीकडे नोकरी करू लागते. नवीन नोकरीमध्ये अधिक आर्थिक लाभ मिळत असण्याची शक्यता असते. मात्र याच बरोबर कर भरताना ही गोष्ट डोकेदुखी ठरू शकते. आयकर रिटर्न दाखल करताना जर त्या आर्थिक वर्षात आपण नोकरी बदलली असेल, तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून होणारा गोंधळ आणि पैश्याचा अपव्यय टाळता येईल.
नवीन नोकरीच्या ठिकाणी जुन्या नोकरीतून मिळालेल्या उत्पन्नाची माहिती द्या.
टीडीएस आकारताना कर्मचाऱ्याचा वार्षिक पगार लक्षात घेऊन त्यानुसार टीडीएसद्वारे कपात केली जाते. त्याचप्रमाणे सेक्शन 80 आणि अडीच लाख मर्यादेपर्यंतच्या उत्पन्नावरील लाभदेखील दिले जातात. नवीन ठिकाणी जुन्या कामातून मिळालेल्या पगाराची माहिती नसेल, तर दोन्ही ठिकाणी टीडीएस हा वार्षिक पगाराच्या आधारावर कपात केला जाऊ शकतो. दोन्ही ठिकाणी करातून सूट दिली जाऊ शकते. यामुळे चुकीचे कर मुल्यांकन आणि चुकीचा टॅक्स स्लॅब लावला जातो. योग्य आणि अचूक कर कपातीसाठी नवीन ठिकाणी पूर्वीच्या उत्पन्नाची माहिती दिली पाहिजे.
नवीन नोकरीत इतर माहिती आणि कागदपत्र सादर करा.
नवीन ठिकाणी जुन्या नोकरीतील वेतनाच्या माहितीबरोबरच इतर माहिती देखील द्या. जसे कि घरभाडे करार, घरभाडे पावती. जेणेकरून HRA अन्वये मिळणारे लाभ घेता येतील. गृह कर्जावरील व्याज आणि स्थावर मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नाची देखिल माहिती द्या. १५,००० रुपयांपर्यंत घेतलेलं वैद्यकीय खर्च लाभ आणि सेक्शन ८० कपातीशी संबंधित गुंतवणूक, व्यय किंवा वेतनाची देखील माहिती पुरवा. जेवढी अचूक माहिती असेल कर परताव्यात तेवढी जास्त पारदर्शकता असेल.
दोन १६ फॉर्म दाखल करा.
वेतनावर टीडीएस आकारताना कर्मचाऱ्यांना फॉर्म १६ पुरवणे कंपनीसाठी बंधनकारक आहे. शक्यतो आर्थिक वर्षाच्या शेवटी हा फॉर्म दिला जातो. तेव्हा जरी तुम्ही नोकरी बदलली असेल तरी जुन्या मालकाकडून फॉर्म १६ घ्यायला विसरू नका. आर्थिक वर्षाच्या मध्यात नोकरी बदलली असेल तर तुम्हाला त्या वर्षीचा कर परतावा दाखल करताना दोन १६ फॉर्म भरावे लागतील. दोन्ही फॉर्ममुळे कर परतावा दाखल करणे अधिक सोपे होईल.
जॉईनिंग बोनस वरील लाभ लक्षात घ्या.
शक्यतो काहीवेळेस नोकरीवर रुजू होताना कंपनी कर्मचाऱ्याला जॉईनिंग बोनस देते. मात्र जर त्याने हि नोकरी केलेल्या कराराआधी सोडली तर हा जॉईनिंग बोनस कर्मचाऱ्याला परत करावा लागतो. काहीवेळेस या जॉईनिंग बोनसवरील टीडीएस परताव्यासाठी पात्र असू शकतो. आपल्या कर परताव्यात बोनस वरील कर कपात झाली असेल आणि आपण परताव्यासाठी पात्र असाल तर हा लाभ घ्यायला विसरू नका.
नोटीस पिरीयड वेतनावरील लाभ लक्षात घ्या.
जुनी नोकरी सोडताना जर नोटीस पिरीयड पूर्ण केला नाही तर काहीवेळेस कंपनी कर्मचाऱ्याच्या वेतनातून काही रक्कम कपात करते. काही वेळेस नवीन कंपनी कर्मचाऱ्याला या आर्थिक नुकसानीच्या भरपाईदाखल काही रक्कम देते. दोन्ही स्थितीत तुमचे एकूण उत्पन्न वेगळे असू शकते. कर परतावा दाखल करताना या दोन्ही बाबी लक्षात ठेवल्या घ्या.
बदललेला कर स्लॅब लक्षात ठेवा.
नोकरी बदलताना शक्यतो उत्पन्न वाढलेले असते. त्यामुळे जर तुम्हाला बँक व्याजसारख्या इतर स्त्रोतातून उत्पन्न मिळत असेल तर तुम्ही अधिक दक्ष असणे गरजेचे आहे. व्याजातून मिळणारे वार्षिक उत्पन्न हे १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर बँक या व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर दहा टक्के टीडीएस आकारते. नवीन नोकरीतून मिळणाऱ्या जास्त उत्पन्नामुळे तुमचा आयकर स्लब बदलू शकतो. अश्यावेळी व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर तुम्हाला जास्त दराने कर भरावा लागू शकतो.
कर परतावा सादर करताना उत्पन्नातील बारकावे लक्षात घ्या.
-
आर्थिक वर्षाच्या शेवटी कर परतावा दाखल करताना करदाता आपल्या नोकरीतून मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न सादर करतो. त्याच्या वेतनातून कपात केला जाणारा टीडीएस देखील एकूण वार्षिक उत्पन्न लक्षात घेऊनच आकारले जातो.
-
जर एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्षाच्या मध्यात आपली नोकरी बदलली तर त्याचे त्या वर्षीचे एकूण आर्थिक उत्पन्न हे वेगळे असेल. उदा. अ व्यक्ती एका कंपनीमध्ये महिना ४०,००० रुपये वेतनावर नोकरी करत आहे. तर त्याचे एकूण वार्षिक हे ४, ८०,००० उत्पन्न असेल. त्या वर्षीचा कर परतावा दाखल करताना आकारला जाणारा टीडीएस व दिले जाणारे मुलभूत आणि सेक्शन ८०सी कर सूट लाभ हे त्या कर्मचा-याचे एकूण वार्षिक उत्पन्न ४, ८०,००० यावर आधारित असेल.
-
आता याच व्यक्तीने आर्थिक वर्ष संपण्याआधी उदा. ऑगस्टमध्ये नोकरी बदलली आणि नवीन नोकरीत त्याला मिळणारे वेतन हे ५०,००० रुपये प्रतीमाह आहे असू समजू. आता नवीन नोकरीतील वेतनानुसार त्याचे एकूण वार्षिक उत्पन्न हे ६,००,००० इतके असेल. या व्यक्तीने कर परतावा दाखल करताना सर्वसाधारपणे आपले वार्षिक उत्पन्न सहा लाख असे दिले तर ते चुकीचे असेल. त्याला एप्रिल ते जुलै मध्ये मिळालेले ४०००० प्रतिमाह असे उत्पन्न म्हणजे १,६०,००० अधिक ऑगस्ट ते मार्च या आठ महिन्यांत ५०००० रुपये प्रतिमाह मिळालेले उत्पन्न म्हणजे ४,००,००० असे एकूण ५,६०,००० हे त्याचे त्या आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न असेल. त्याला भरावा लागणारा कर हा या उत्पन्नावर आकारला जाईल.
-
नोकरी बदलल्यावर उत्पन्नातील हा बारकावा लक्षात घेऊनच कर परतावा दाखल करावा. मात्र काही करदाते दोन्ही वेळेस करसुटीचालाभ घेण्यासाठी जाणूनबुजून आपल्या जुन्या नोकरीतील उत्पन्न आणि मिळवलेल्या लाभाची माहिती लपवतात. तर काहीवेळेस वाढलेल्या उत्पन्नावरून कर परतावा दाखल केल्याने व्यक्तीला अधिकचा करदेखील भरावा लागू शकतो. एकूणच हिशोबात गफलत होऊ शकते.
नवीन कंपनीमध्ये जुन्या नोकरीतून मिळालेले उत्पन्न माहिती देणे बंधनकारक असते. अचूक करपात्र उत्पन्नाची माहिती देण्याची अंतिम जबाबदारी ही शेवटी करदात्याचीच असते. जरी करदात्याने हि माहिती लपवली तरी फॉर्म 26 एएस मध्ये दोन्ही नोकरीतील दोन TAN माहिती असेल आणि त्यातून करदात्याने चुकीचे उत्पन्न सादर केले आहे हे कर अधिकाऱ्याच्या लक्षात येईल. परिणामी करदात्याला दंड आणि जास्तीचा कर भरावा लागू शकतो. हे सर्व टाळण्यासाठी आधीच योग्य व अचूक उत्पन्न सादर करून होणारे आर्थिक नुकसान टाळणे कधीही श्रेयस्कर असेल.
(चित्र सौजन्य- https://goo.gl/2om2r7 )