आपल्या भारत देशात सण समारंभांना फार महत्व आहे. सण म्हटले की खरेदी आलीच. एरवी गर्दीचा कंटाळा करणारे लोक सणाच्या खरेदीसाठी मात्र ‘शॉपिंगच्या’ पिशव्या सांभाळत, गर्दीतून अनेक दुकाने पालथी घालत, उन्हातून तासन् तास फिरत असतात. कपडे, गॅझेट्स, अप्लायन्सेस ही सारी खरेदी तर असतेच पण सर्वात महत्वाची असते ती सोने खरेदी. सणांना व लग्नकार्यात भेट देण्यासाठी अथवा शुभमुहूर्त म्हणून सोने खरेदी केली जाते.
सणवार आणि सोनं खरेदी
- सणावाराला सोने खरेदी करण्याची प्रथा शतकानुशतके चालत आली आहे. या वर्षीही दिवाळीमध्ये खास करून धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडेल. काही ठराविक मुहूर्तावर म्हणजेच अक्षय तृतीया, धनत्रयोदशी आणि गुरु- पुष्यांमृत योगावर सोनं खरेदी करणं शुभ समजलं जातं. त्यामुळे सोनं कितीही महाग झालं तरी या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते.
- गेल्या काही वर्षात सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. ऑक्टोबर २०१४ रोजी सोन्याचा दर २७३८४/- रुपये (प्रति १० ग्रॅम) होता तर चालू वर्षात म्हणजेच ऑक्टोबर २०१८मध्ये हाच भाव वाढून ३१९१५/- रुपये झाला आहे. तरीही हौस म्हणून किंवा प्रथा म्हणून सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्या मात्र फारशी कमी झालेली नाही.
- भारत देश हा जगातील सर्वात जास्त सोनं आयात करणारा देश आहे. एकूण जगभरातील सोनं आयातीच्या एक तृतीयांश सोनं एकटा भारत देश आयात करतो. पर्यायाने भारतातील भारतीयांच्या सोनं खरेदीच्या या वेडाचा परिणाम नकळतपणे देशाच्या अर्थव्यवस्थेवर पर्यायाने देशाच्या GDP वर होत आहे.
- अनेकांच्या मते सोनं हा गुंतवणुकीचा एक सुयोग्य पर्याय आहे त्यामुळे सोन्याचे दार वाढूनही ते खरेदी करणाऱ्यांच्या संख्येवर फारसा परिणाम होत नाही.
सोनं खरेदी आणि गुंतवणूक:
- सणांच्या निमित्याने सोने खरेदी करून खरेदी आणि गुंतवणूक दोन्ही गोष्टी एकत्र साध्य करता येतात म्हणूनच बहुदा सणावारांना सोने खरेदी करण्याची प्रथा चालू झाली असावी. पूर्वी गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध नव्हते त्यामुळे स्थावर मालमत्ता (जमीन) किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक केली जात असे. लग्न समारंभातही सोन्याचे दागिने देण्या-घेण्यामागेही अथवा भेट देण्यामागे हाच मुख उद्देश असावा.
- आजही आपण हाच रिवाज पुढे चालू ठेवला आहे. जवळपास प्रत्येक सणांना सोनं खरेदी केली जातं. दिवाळीमध्ये तर धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर सोने करण्यासाठी सोनारांच्या दुकानाबाहेर रांग लागलेली असते. दिवाळीत मिळालेला ‘बोनस’ खर्च करताना हौस आणि गुंतवणूक दोन्ही गोष्टी एकत्रित साध्य करणारा हा एक उत्तम पर्याय आहे असं अनेकजण मानतात.
- आज गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असूनही गुंतवणुकीचा पारंपरिक पर्याय असणारी ‘गोल्ड इन्व्हेस्टमेंट’ मात्र इतर सर्व पर्यायांशी स्पर्धा करत दिमाखाने उभी आहे. आजच्या ‘डिजिटलायझेशनच्या’ काळात सोने खरेदीसाठी पारंपरिक पर्यायांबरोबरच अनेक आधुनिक पर्यायही उपलब्ध आहेत.
सोनं खरेदीचे पारंपरिक पर्याय
१. दागिने:
- समस्त महिलावर्गाचा ‘वीक पॉंईंट’ आणि पुरुषवर्गासाठी त्रासदायक असणारा घटक म्हणजे दागिने. भारतात जन्मापासून, वाढदिवस, लग्न, सण, इत्यादी अशा अनेक प्रसंगी दागिने खरेदी करतात.
- दागिन्यांमधील गुंतवणूक हौस, खरेदी आणि गुंतवणूक यांचा त्रिवेणी संगम आहे. परंतु तरीही दागिने खरेदी करताना मात्र योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
- दागिने शक्यतो खात्रीच्या किंवा नामांकित पेढीमधून खरेदी करावेत. दागिन्यांवर ‘हॉलमार्क चिन्ह’ आहे का ते तपासून पाहावे. तसेच घडवणावळ (Making Charges) बद्दल व सोन्याच्या शुद्धतेबद्दल खात्री करून घ्यावी. तसेच बिलाची पावती घेताना ती योग्य त्या फॉरमॅट मध्ये असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
२. गोल्ड बार व गोल्ड कॉईन्स:
- गोल्ड बार किंवा गोल्ड कॉइन खरेदी ही दागिने खरेदीपेक्षा लाभदायक ठरते. कारण यामध्ये मेकिंग चार्जेस दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसपेक्षा तुलनेने कमी असतात.
- दागिन्यांसाठी साधारणतः ८% ते १०% मेकिंग चार्जेस लागतात तर गोल्ड कॉइन अथवा गोल्ड बारसाठी ४% ते ११% मेकिंग चार्जेस आकारले जातात.
- स्थानिक पेढीव्यतिरिक्त, बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एमएमटीसी (सोने आणि चांदी विक्रीसाठी सरकारी-अधिकृत सार्वजनिक क्षेत्रातील युनिट) आणि मुथूट ग्रुप सारख्या नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या, इ. ठिकाणाहून गोल्ड बार किंवा गोल्ड कॉइन खरेदी करता येतात.
- ०.५ ग्रॅम पासून गोल्ड कॉइन उपलब्ध आहेत. तसेच खास सणावाराठी लक्ष्मी, गणपती यांची प्रतिमा असणारी नाणीही उपलब्ध आहेत.
- सोन्याची नाणी आणि दागदागिने यांना प्रमाणित करणारी बीआयएस (BIS) शुद्धतेचे प्रमाण म्हणून दागिने आणि नाणी चिन्हांकित करून ते प्रमाणित करते.
- गोल्ड कॉइन किंवा गोल्ड बार खरेदी करताना महत्वाचे घटक अर्थात शुद्ध सोन्याचे चिन्ह असलेले बीआयएस लोगो, तसेच हॉलमार्किंग सेंटरचा लोगो (२२, १८,व १४ कॅरेटसाठी), इत्यादी गोष्टींची खात्री करूनच खरेदी करावी.
या झाल्या सोनं खरेदी करण्याच्या पारंपरिक पद्धती. या पद्धतींमधील महत्वाच्या त्रुटी म्हणजे चोरीचा धोका व विक्रीची म्हणजेच ‘रिसेल व्हॅल्यू’ कमी मिळणे. चोरांपासून संरक्षण करण्यासाठी बँकांनी लॉकर्सची सुविधा दिली. ही सुविधा अनेकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून स्वीकारली परंतु लॉकरचा खर्च व काहीशी किचकट कार्यपद्धती यामुळे मनापासून हा पर्याय स्वीकारणारे क्वचितच कोणी असेल.
लॉकरच्या पर्यायामुळे दागिन्यांची ‘सुरक्षितता’ हा प्रश्न जरी मिटला असला तरीही कमी होणाऱ्या ‘रिसेल व्हॅल्यू’ला मात्र योग्य पर्याय उपलब्ध होत नव्हता. बदलत्या काळानुसार सोने खरेदी पद्धतीमध्येही अनेक बदल होत गेले. आजच्या डिजिटलायझेशनच्या जमान्यात तर सोने खरेदीच्या पारंपरिक पद्धतीमधील जोखीम व त्रुटी दूर करणारे विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्याचा विचार ग्राहकांनी जरूर करावा.
(चित्रसौजन्य: https://bit.ly/2qqKXmG )