Reading Time: 4 minutes

भांडवली बाजारात व्यवहार करताना अनेक छोट्या मोठ्या संकल्पनांचा उल्लेख होतो, यातील सर्वच संकल्पना सर्वानाच माहीत असतात असे नाही. तरीही जुजबी ज्ञान म्हणून काही संकल्पना आपल्याला माहित असणं  गरजेचं आहे. म्हणून त्यातील काही महत्वाच्या संकल्पना थोडक्यात समजून घेऊ.

मालमत्ता (Asset)- 

  • मालमत्ता हे केवळ कंपनीच्या मालकीचं आर्थिक मूल्य असलेलं साधन आहे. ज्याचा कंपनीच्या कार्यात उपयोग होतो आणि  त्यातून महसूल निर्माण होतो. 
  • यामधे जमीन, इमारत, इन्व्हेंटरी यासारख्या भौतिक वस्तू अथवा पेटंट-ट्रेडमार्क, बौद्धिक संपत्ती यासारख्या अमूर्त गोष्टींचा समावेश होतो. 
  • कंपनीचं मूल्य वाढवण्यासाठी म्हणजे कंपनीच्या कार्यचालनासाठी रोखता प्रवाह आवश्यक असून त्यासाठी मालमत्ता तयार केली जाते अथवा विकत घेतली जाते. 
  • एखादी गोष्ट मालमत्ता आहे की नाही हे ठरवण्याची सोपी पद्धत म्हणजे ती संस्थेच्या मालकीची किंवा नियंत्रणात असावी. तिचं ठरावीक असं  मूल्य असायला हवं आणि भविष्यात त्यातून उत्पन्न निर्माण करण्याची क्षमता असली पाहिजे. त्यामुळे विक्रीत वाढ होईल अथवा उत्पादन खर्चही कमी होऊ शकेल. 
  • मालमत्तेची ओळख आणि प्रभावी व्यवस्थापन हे समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे  कंपनीच्या आर्थिक आरोग्याचं मूल्यांकन म्हणजेच भविष्यातील वाढ आणि स्थिरता समजण्यास मदत होते. 

आयपीओ : जावे आयपीओच्या गावा – स्विगी 

ढोबळमानाने मालमत्तेचे तीन प्रकारात वर्गीकरण करता येईल.

  1. परिवर्तनीयता – 
  • मालमत्तेचे रोख रकमेत तात्काळ रूपांतर करता येण्याच्या क्षमतेवरून त्याचे “परिवर्तनीय मालमत्ता आणि अपरिवर्तनीय मालमत्ता” असे वर्गीकरण होते. 
  • कच्चा माल, पक्का माल, खात्यातील शिल्लक, रोखे यासारख्या मालमत्ता परिवर्तनीय आहेत. तर जागा, मशिनरी यांना अपरिवर्तनीय मालमत्ता आहेत. कारण त्यांचे सहजासहजी पैशांत रूपांतरण करता येत नाही.
  1. भौतिक अस्तीत्व– 
  • मालमत्तेच्या भौतिक अस्तित्वावरून  त्याचे “मूर्त मालमत्ता आणि अमूर्त मालमत्ता” असे वर्गीकरण करतात. एकाधिकार (पेटंट), व्यापार चिन्ह (ट्रेडमार्क) यांना अमूर्त मालमत्ता असे म्हणतात.
  1. वापरानुसार– यामधे मालमत्तेचे वर्गीकरण त्याच्या कार्यानुसार अथवा व्यवसायाच्या उद्देशानुसार केले जाते.

कंपनीचा लेखाजोखा समजण्यासाठी मालमत्ता नेहमी सकारात्मक योगदान देत असते. कंपनीच्या मालमत्तेचा अहवाल आर्थिक विवरणपत्रात दिला जातो. हा अहवाल  भागधारकांना पाठवून सर्वसाधारण जनतेच्या माहितीसाठी कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध केला जातो. 

या अहवालात मालमत्ता दोन प्रकारात विभागली जाते.

  • चालू मालमत्ता-यामधे वर्षभराच्या आत वापरात येणाऱ्या किंवा रोखीत सहज रूपांतर होऊ शकणाऱ्या सर्व मालमत्तांचा समावेश असतो.  उदाहरणार्थ –  रोख रक्कम, आधीच केलेले काही खर्च, इनव्हेंटरी, धारण केलेल्या सिक्युरिटीज इत्यादी.
  • चालू नसलेल्या मालमत्ता-यामधे दीर्घकालीन आर्थिक संसाधने येतात. उदाहरणार्थ –  इमारत, जमीन, पेटंट, कॉपीराईट, गुडविल, दीर्घकालीन गुंतवणूक इत्यादी.

गुंतवणूक: थीमॅटिक फंड

वार्षिक अहवाल (Annual Report) –

  • वार्षिक अहवाल म्हणजे कंपनीची सर्वसमावेशक माहिती देणारा दस्त आहे. गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी संदर्भ म्हणून याचा उपयोग होतो. 
  • वार्षिक अहवालाचा हेतू, कंपनीच्या वर्षभरातील स्थितीचे सार्वजनिक प्रकटीकरण हा असून त्यामुळे हितसंबंधितांना पारदर्शक पद्धतीने कंपनीची स्थिती समजू शकते.

  वार्षिक अहवालात सर्वसाधारणपणे खालील माहिती असते.

  • कंपनीचे अध्यक्ष किंवा कार्यकारी संचालक यांच्याविषयी सर्वसाधारण माहिती देणारे पत्र वार्षिक अहवालात असते.
  • वार्षिक अहवालात कंपनीच्या सर्वसामान्य स्थितीबद्दल माहिती असते.
  • वार्षिक अहवालात कंपनीची आर्थिक विषयावरील ठळक माहिती नमूद केलेली असते.
  • वर्षभरात कंपनीसमोर असणारी आव्हाने आणि त्यावर योजलेले किंवा प्रस्तावित उपाय नमूद केलेले असतात.
  • या अहवालात व्यवस्थापनाविषयी झालेली चर्चा आणि त्यांचे विश्लेषण असते. तसेच भविष्यातील ध्येय आणि धोरणं असतात. 
  • वार्षिक अहवालात कंपनीचे नफा तोटा पत्रक असते.

आर्थिक बाबींचा सारांश आणि मागील वर्षाशी तुलना: हा अहवाल कर्मचारी आणि ग्राहक या सर्वांसाठी उपलब्ध असतो.

ताळेबंद (Balance sheet) –

  • यामधे कंपनीच्या एकूण मालमत्तेची तुलना ही भागधारकांचा फंड आणि कंपनीच्या दायित्वाशी करून दाखवली जाते. अर्थात हे  थोडेसे गुंतागुंतीचे आहे. 
  • ताळेबंद शिलकीचा नसेल तर काहीतरी गडबड असू शकते, त्यातुन कंपनीच्या मालकीची मालमत्ता आणि देणी समजतात. त्यावरून कंपनीचे आंतरिक मूल्य काय असेल ते समजते. त्याची बाजारभावाशी तुलना करून गुंतवणूकदारांना गुंतवणूकीच्या संबंधित योग्य निर्णय घेण्यास मदत होते.

उच्च गुणवत्ता असलेली कंपनी (BlueChip Company)-

  • सातत्यानं चांगली आर्थिक कामगिरी करण्याचा प्रदीर्घ इतिहास असणाऱ्या कंपनीस ब्लु चिप कंपनी म्हंटले जाते. या कंपन्यांच्या शेअर्समधे केलेली गुंतवणूक कमी जोखमीची समजली जाते. 
  • कोणत्याही कारणाने बाजारात येणारे तीव्र उतार-चढाव ब्लु चिप कंपनी झेलू शकतात. तर बाजार चांगल्या स्थितीत असल्यास उच्च परतावा देऊ शकतात. 
  • यामधे केलेली गुंतवणूक, संयमी गुंतवणूकदारांची दीर्घकालीन उद्दिष्ट लवकर पूर्ण करण्यात मदत करतात. बाजार खूप खाली गेला तर त्या तुलनेत यांच्या बाजार भावातील घसरण कमी असते. एका विशिष्ट पातळीवर त्यांचे भाव स्थिर होऊन नंतर  वाढतात.

रोखे (Bonds) – 

  • रोखे म्हणजे एक प्रकारचे कर्ज आहे. अनेकदा सर्वच प्रकारच्या कंपन्या भांडवल उभारताना भारत सरकारकडून कर्ज घेतात. 
  • यावरचा व्याजदर सर्वसामान्य गुंतवणूकीच्या व्याजदरापेक्षा अधिक असतो. सरकारी आणि ब्लु चिप कंपन्यांना निधीची आवश्यकता असेल, तर भांडवल बाजारातून रोख्यांच्या माध्यमातून स्पर्धात्मक दराने कर्ज मिळवता येते. 
  • हे रोखे विनिमय योग्य असल्याने, गुंतवणूकदार दुय्यम बाजारात त्यांची खरेदी विक्री करू शकतात. 
  • स्टॉकपेक्षा कमी जोखीम, स्थिर परतावा, विनिमयता आणि करलाभ ही यांची  वैशिष्ट्ये आहे. तर शेअर्सच्या तुलनेत कमी तरलता, चलन वाढीचा धोका आणि क्रेडिट जोखीम हे तोटेही आहे. 
  • तसेच कंपनीने व्याज अथवा मूळ रकमेचा परतावा न दिल्यास त्याविरुद्ध दाद मागण्याची सुलभ तरतूद सध्यातरी अस्तित्वात नाही.

भांडवली नफा /तोटा (Capital Gain /Loss )-

  • भांडवली मालमत्तेची विक्री केल्यावर मिळालेल्या रकमेतून गुंतवणूक रक्कम वजा केली असता पडणारा फरक म्हणजे भांडवली नफा/तोटा असतो.
  • मालमत्ता प्रकार, मालमत्ता धारण करण्याचा कालावधी तसेच मालमत्ता प्रकार भांडवल बाजारात नोंदणी केलेला आहे किंवा नाही यावरून त्यावरील नफा-तोट्याचे गणित ठरते.
  • झालेला नफा-तोटा हा उत्पन्न समजायचा ? की अल्पकालीन अथवा दीर्घकालीन भांडवली नफा तोटा समजायचा ते अवलंबून आहे. त्याच दिवशी पडणारा भावातील फरक हा इतर उत्पन्न म्हणून मोजणी करून त्यावर नियमित दराने कर घ्यावा लागतो.
  •  तर साधनानुसार भांडवली नफा तोटा साधारण 1 ते 2 वर्षामधला असेल तर अल्पकालीन अन्यथा  दीर्घकालीन समजण्यात येतो. 
  • अल्पकालीन नफ्यावर सरसकट 20% दराने कर आकारणी केली जाते, तर दीर्घकालीन भांडवली नफ्यावर 12.5% दराने कर द्यावा लागतो.
  •  शेअर बाजारात नोंदणीकृत आणि दीर्घकालीन मालमत्तेवर  एक लाख पंचवीस हजारावरच्या गुंतवणुकीला दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कोणताही कर लागत नाही.

पैशाचा प्रवाह (Cash Flow) –

  • नावाप्रमाणेच याचा संबंध खेळत्या पैशाशी आहे. उद्योगात अनेकदा पैशांची देवाण घेवाण करावी लागते. विविध ठिकाणांहून कच्चा माल खरेदी करावा लागतो. तो उत्पादन ठिकाणापर्यंत पोहोचवणं, त्यावर प्रक्रिया करणं, उत्पादन बनवणं, त्याची वर्गवारी करणं, त्यासाठी ग्राहक शोधणं, त्याच्याकडे माल पोहोचवणं  यामधे  निश्चित कालावधीत व्यवहार पूर्ण करावा लागतो. 
  • संबंधिताना, ठरलेल्या वेळी त्यांची रक्कम द्यावी लागते, कामगारांचे पगार , वीज बिल यासारखे नियमित खर्च करावे लागतात. विक्री केलेल्या मालाच्या पैशांची वेळेत वसुली करावी लागते. 
  •  उधारी लांबल्यास पर्यायी व्यवस्था करावी लागते, असं न केल्यास उद्योग पूर्ण कार्यक्षमतेने चालू शकत नाही. 
  • रोखता प्रवाह हा उद्योगात कुठून, कोणत्या कालावधीत, कसे पैसे आले आणि कसे खर्च झाले याचा आरसा असतो. यावरून कंपनीचं आर्थिक आरोग्य समजतं. 
  •  सकारात्मक रोखता प्रवाह तुमच्या मालमत्तेतील वाढ दर्शवतो आणि निश्चित ध्येयाकडे वाटचाल करीत असल्याचं सुचवतो.

बाजारातील पत (Credit)-

  • आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात क्रेडिट हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. परंतु  हा सावकार आणि कर्जदार यांच्यातील कराराच्या तरतुदीचा भाग आहे.
  • यात कर्ज घेतलेल्या रकमेवरच्या व्याजाचा समावेश असू शकतो किंवा नसू शकतो. व्यवसायात अनेकदा क्रेडिट घ्यावे लागते, तसेच द्यावेही लागते. त्याची नियमानुसार परतफेड होत असेल, तर आपोआपच तुमची विश्वासार्हता वाढते .
  • तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी सहज उपलब्ध होऊ शकतात. त्याचे पैसे कालांतराने दिले तरी चालतात. तसेच तुम्हालाही तुमच्या ग्राहकांवर विश्वास ठेवून उत्पादित माल द्यावा लागतो. यातून व्यवसाय वृद्धी होऊन स्नेह वाढू शकतो. 
  • अनेक वित्तीय संस्था तुमच्या या कर्जाचा लेखाजोखा ठेवतात. त्यातून व्यक्ती, संस्था यांची बाजारातील पत (क्रेडिट स्कोर) तयार होत असतो. (अपूर्ण)

 

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत ह्या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत. याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.