Arthasakshar Important Facts About Foreign exchange reserves in Marathi
https://bit.ly/311bbj6
Reading Time: 5 minutes

भारताकडील परकीय चलनाच्या विक्रमी साठ्याचा अर्थ 

कोरोना साथीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणे अपरिहार्य आहे, मात्र जगाच्या तुलनेने भारतीय अर्थव्यवस्थेकडे पाहिले की ती बरीच स्थिर आहे. सध्या आपल्याकडे असलेला परकीय चलनाचा विक्रमी साठा (Foreign exchange reserves), त्याचीच प्रचीती देतो. अशा या स्थितीत संघटीत होत चाललेल्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसामान्य भारतीयांचा सहभाग वाढला तर त्याचे फायदे सर्व भारतीयांपर्यंत पोहचू शकतात. 

भारतीय अर्थव्यवस्थेची वस्तूस्थिती –

 • कोरोना साथीच्या संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती नजीकच्या भविष्यात किती वाईट होईल, याचे दररोज नवे अंदाज बांधले जात असताना एका आघाडीवर भारत एका नव्या शिखरावर उभा आहे. 
 • हे शिखर गाठल्यामुळे भारतीयांसमोर असलेले दैनंदिन प्रश्न लगेच सुटणार नसले तरी तो सोडविण्यासाठीचा आत्मविश्वास निश्चित मिळणार आहे. 
 • १९९१ आणि २०१२-१३ मध्ये भारत ज्या परकीय चलनाच्या अपुऱ्या साठ्याअभावी गंभीर आर्थिक पेचप्रसंगात सापडला होता, तो परकीय चलनाच्या साठ्याने पाच जून रोजी विक्रमी ५०० अब्ज डॉलर म्हणजे निम्म्या ट्रीलीयन डॉलरला स्पर्श केला आहे. 
 • या चलनाचा एवढा साठा भारतात प्रथमच जमा झाला असून त्यामुळे जगाच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था स्थिर राहू शकणार आहे. 

आर्थिक आणीबाणीची शक्यता अजिबात नाही……

अर्थव्यवस्था आणि परकीय चलनाचा साठा (Foreign exchange reserves) –

 • कोरोनाच्या साथीची सुरवात चीनपासून झाली आणि चीन त्यात काहीतरी लपवाछपवी करतो आहे, याविषयी जगात चीनविरोधात राग आहे. 
 • चीन आर्थिकदृष्ट्या इतका मजबूत देश आहे की तो राग व्यक्त केला गेला तरी चीनचे आर्थिक महत्व अजिबात कमी होणार नाही. 
 • असे होण्याची जी अनेक कारणे आहेत, त्यात चीनकडे असलेला परकीय चलनाचा साठा (तीन ट्रीलीयन डॉलरपेक्षाही अधिक) हे महत्वाचे कारण आहे. 
 • परकीय चलनाच्या साठ्याची जगात क्रमवारी लावायची झाल्यास चीन, जपान, स्वित्झर्लंड या देशांचा नंबर लागतो. 
 • त्यानंतर दक्षिण कोरिया आणि रशियाचा नंबर लागतो, पण आता भारताने ५०० अब्ज डॉलरचा टप्पा पार केल्यामुळे तो जगात चौथ्या क्रमांकावर आला आहे.  
 • त्याचे कारण म्हणजे चीनला पर्याय म्हणून जग भारताकडे पाहू लागले आहे. 
 • याच कारणास्तव कोरोनाच्या संकटात भारतीय शेअर बाजार कोसळला असताना परकीय गुंतवणूकदार भारतात परतू लागले आहेत.
 • तब्बल अडीच महिने उत्पादन आणि सेवा बंद असताना शेअर बाजार गेले महिनाभर सातत्याने वर जातो आहे, त्याचे खरे कारण हे आहे. 
 • जून महिन्यात परकीय गुंतवणूकदारांनी १९ हजार २३९ कोटी रुपये (२.५५ अब्ज डॉलर) गुंतविले आहेत. 
 • याचा दुसरा अर्थ, कोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्था लवकर पूर्वपदावर येईल, असे परकीय गुंतवणूकदारांना वाटते आहे. 
 • भारतात होत असलेले आर्थिक बदल आणि भारतीय बाजारपेठ यावर परकीय गुंतवणूकदारांचा जेवढा विश्वास आहे, तेवढा तो भारतीय गुंतवणूकदार किंवा नागरिकांचा नाही, हा मोठाच प्रश्न आहे.

कोरोना -अभूतपूर्व, अमुलाग्र धोरणात्मक बदलांची अपरिहार्यता आणि संधीही !…

अर्थव्यवस्थेविषयीची नकारात्मक चर्चा – 

 • देशाची लोकसंख्या १३६ कोटी असल्याने विकासापासून दूर राहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे त्यांच्या स्थितीचा दाखला देत अर्थव्यवस्थेविषयीची नकारात्मक चर्चा केली जाते. 
 • विकासाची फळे सर्व नागरिकांपर्यंत पोचलीच पाहिजे, याविषयी दुमत असण्याचे कारण नाही आणि तसे प्रयत्न होत नसतील, तर त्याची चर्चाही झाली पाहिजे, पण म्हणून आपण आपल्या देशाच्या अर्थकारणाविषयी सतत नकारात्मक बोलत राहिले पाहिजे, असा नव्हे. 
 • अशा चर्चेने नुकसान मात्र मोठे होते. उदा. भारतीय शेअरबाजारात एक वेगाने विकसित होणारा देश म्हणून प्रचंड संधी परकीय गुंतवणूकदार शोधतात आणि पैसा कमावून निघून जातात. 
 • त्याच शेअर बाजाराकडे गुंतवणुकीचे एक माध्यम म्हणून पाहण्यास भारतीय नागरीक मात्र तयार होत नाही. कारण, त्यांना अशा नकारात्मक चर्चेने ग्रासलेले असते. 
 • आता हेच पहा. १९९१ मध्ये आपल्याकडे इंधन घेण्यासाठीही परकीय चलनाचा साठा नव्हता. त्यामुळे सोने गहाण ठेवून तो मिळविला गेला आणि अनेक अटी मान्य करून जागतिकीकरणाचा स्वीकार करावा लागला. 
 • २०१२ -१३ मध्ये पुन्हा तशीच वेळ आली होती. त्यावेळी आपल्याकडे २५९ अब्ज डॉलर उरले होते. त्यातून आपण केवळ सात महिन्यांचे आयात बील चुकते करू शकलो असतो. 
 • जगाच्या अर्थशास्त्राच्या भाषेत हे गंभीर मानले जाते. त्यामुळे आर्थिक संस्थानी भारताला सर्वात नाजूक आर्थिक स्थिती असलेल्या पाच देशांच्या रांगेत नेऊन बसविले होते. तेथपासून ५०० अब्ज डॉलर परकीय चलनाचा हा प्रवास अभिमान वाटावा असाच आहे. 
 • याचा अर्थ आयातीचे १७ महिन्यांचे बील आज आपल्याकडे आहे. एप्रिलमध्ये एका डॉलरसाठी आपल्याला ७६.९२ रुपये मोजावे लागत होते, पण आता रुपया सुधारू लागला आहे, तसेच भारतापुढील आर्थिक आव्हाने लक्षात घेता जागतिक आर्थिक संस्था भारताचे पतमानांकन खाली आणत होत्या, पण त्याला ब्रेक लागला, त्याचेही कारण हा साठाच आहे. 

कोरोना – संभ्रम निर्माण करणाऱ्यांनो देशाची माफी मागा !…

जीडीपी का महत्वाचा?

 • आयात निर्यातीच्या भाषेत बोलायचे तर २०१२ १३ मध्ये आयातीचे जीडीपीशी प्रमाण ४.८२ टक्क्यांवर पोचले होते, ते डिसेंबर २०२० मध्ये एक टक्क्यावर आले आहे. हा प्रवास भारताला आर्थिक स्थर्य मिळवून देतो आहे, त्यामुळे त्याला महत्व आहे. 
 • खरे पाहता, जीडीपी हेच सर्वस्व मानले जाणारे अर्थशास्त्राचे असे निकष पाश्चात्य अर्थशास्त्राने आपल्यावर लादले आहेत. 
 • कृषीप्रधान भारताने आपल्या निकषांवर चालले पाहिजे. पण जागतिकीकरणाच्या या काळात हे निकष नाकारण्याइतके आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. कारण बँकिंग, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, पेन्शन योजना, आरोग्य विमा या आधुनिक जगात अत्यावश्यक ठरलेल्या साधनांत सर्व नागरिक भाग घेत नाहीत. 
 • यात भाग घेवून आपले जीवन आर्थिकदृष्ट्या संपन्न करणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. ती जेव्हा वाढेल, तेव्हा आपल्यामध्ये जीडीपीसारखे अतार्किक निकष नाकारण्याचे धाडस येईल. 

कोरोना – आव्हान मोठे, समाजमन संभ्रमित ठेवून कसे चालेल? …

भारत – ग्रोथ इंजिन

 • सर्वात महत्वाचे म्हणजे भारताकडे जग जगाचे ग्रोथ इंजिन म्हणून का पाहते आहे, हेही आपल्याला कळू लागेल. 
 • भारताची लोकसंख्या, त्यात वाढत चाललेला मध्यमवर्ग आणि तरुणवर्ग, पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी चालू असलेले प्रचंड काम, इंग्रजी समजू आणि बोलू शकणाऱ्या भारतीयांची वाढती संख्या, भारतीयांकडे असलेले टॅलेंट आणि त्या जोरावर जगातील उद्योगांतील त्यांचे अग्रस्थान, शेतीला लागणाऱ्या पोषक हवामानामुळे त्या क्षेत्रात असलेल्या प्रचंड संधी.. अशा अनेक गोष्टींचे आर्थिक आकलनच नसल्याने भारतीय नागरिक आपल्या अर्थव्यवस्थेचे नकारात्मक चित्र रंगविण्यात आघाडीवर असतात. 
 • या नकारात्मक मानसिकतेमुळे आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतो आहोत, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. 

परकीय चलनाचा विक्रमी साठा भारताकडे झाला, या घटनेकडे या पार्श्वभूमीवर पाहिले की आपण आपल्या देशाच्या अर्थकारणाविषयी आशावादी झाल्याशिवाय रहात नाही.

परकीय चलनाचा साठा (Foreign exchange reserves) 

Arthasakshar Important Facts About Foreign exchange reserves in Marathi
https://bit.ly/37UXuDW

आमुलाग्र बदलांना रोखणारी दुर्मिळ संधी !…

संघटीत अर्थव्यवस्थेमध्ये भाग कसा घ्यावा ? 

 • संघटीत उत्पादन आणि सेवा क्षेत्राशी कोणत्या ना कोणत्या मार्गाने जोडून घेणे. याचा अर्थ ज्या सेवा आणि उत्पादन मोठ्या कंपन्याही करू लागल्या आहेत, त्याचा वापर वाढत चालल्याने आपणही त्याच्याशी जोडून घेणे. 
 • आपल्याकडे येणारे सर्व उत्पन्न जर बँकेमार्फत येत असेल तर बँकिंगचे सर्व फायदे आपल्याला मिळतात. आपण रोखीने व्यवहार करत असू तर ते थांबविले पाहिजे. जेव्हा कर्ज घेण्याची वेळ येते, तेव्हा आपले बँक स्टेटमेंट पाहिले जाते. त्यावरून आपले उत्पन्न ठरविले जाते आणि आपण आपली क्रेडीट हिस्ट्री काढली जाते. म्हणजे कर्ज घेणे सोपे होते. 
 • शेअर बाजारात फिरणाऱ्या पैशांचे प्रमाण गेले काही वर्षे वाढत चालले आहे. देशातील आघाडीवरील कंपन्यांची नोंद शेअर बाजारात असतेच. त्यांच्या नफ्यात वाटा शेअर बाजारात गुंतवणुकीच्या मार्गानेच मिळू शकतो. त्यामुळे म्युच्युअल फंडाच्या मार्गाने नियमित गुंतवणूक करण्यास सुरवात केली पाहिजे. त्याविषयी आत्मविश्वास निर्माण झाल्यावर डीमॅट खाते काढून चांगल्या कंपन्यात दीर्घकालीन गुंतवणूक करून आपण या संघटीत अर्थव्यवस्थेचा फायदा घेऊ शकतो. 
 • आरोग्य, शिक्षण यावरील खर्च वाढले आहेत. ते आवाक्यात असले पाहिजेत, याविषयी दुमत नाही, त्यात धोरण म्हणून बदल होत नाही तोपर्यंत त्याची काळजी आपली आपल्यालाच घेणे भाग आहे. आरोग्य विमा हा त्यावरील मार्ग आहे. ज्याला आजारपणावर  अचानक मोठा खर्च येतो, त्याला आरोग्य विम्याचा उपयोग होतो. पण याचा अर्थ आपण आरोग्य विमा काढला म्हणजे आपण आजारी पडलो पाहिजे, असे नव्हे. शिक्षणाचा खर्च आपण शैक्षणिक कर्ज काढून करू शकतो. पण त्यासाठी आपली क्रेडीट हिस्ट्री चांगली हवी. (आपण कर्जाचे हप्ते वेळच्या वेळी फेडले नसतील किंवा आपले चेक वटले जात नसतील तर आपल्या क्रेडीट हिस्ट्रीवर परिणाम होतो. 
 • सर्व देणी आणि घेणी जर डिजिटल मार्गाने सुरु केली तर त्यात आपली बचत होते. एकतर त्यामुळे प्रत्येक व्यवहाराची नोंद होते तसेच ते सुरक्षित होते. अर्थात, त्यासाठी डिजिटलचे अनेक मार्ग न अनुसरता एक किंवा दोनच मार्ग निवडले पाहिजेत. म्हणजे पासवर्डचा गोंधळ होणार नाही. 

–  यमाजी मालकर 

[email protected] 

(लेखक अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत.) 

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

web search: Foreign exchange reserves mhnaje kay? Importance of Foreign exchange reserves in Marathi, what is Foreign exchange reserves in Marathi, Foreign exchange reserves chi mahiti marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.