Reading Time: 3 minutes

अधिकाधिक लोकांनी आयकर विवरणपत्र भरून सर्व मार्गानी मिळवलेले उत्पन्न जाहीर करावे. आयकर नियमानुसार दिल्या जाणाऱ्या सवलतींचा लाभ घ्याव्या आणि आयकर श्रेणीनुसार योग्य कराचा भरणा करावा अशी सरकारची अपेक्षा आहे. त्यासाठी काही विशिष्ट रकमेच्या व्यवहारांवर मुळातून करकपात केली जाते. ही मुळातून केली जाणारी करकपात दोन पद्धतीनं  होते.

  1. टीडीएस (टॅक्स डिडक्टेड अ‍ॅट सोर्स)
  2. टीसीएस (टॅक्स कलेक्टेड अ‍ॅट सोर्स)

महत्वाचे : एकत्रित निवृत्ती योजना 

  • जरी या दोन्ही पद्धतीने मुळातून करकपात केली जात असली तरी त्यात सूक्ष्म फरक आहे. 
  • टीडीएस हा व्याजाचे उत्पन्न, पगार, डिव्हिडंड, कमिशन, लॉटरी अश्या विविध देयकांवर लावला जातो. टीडीएस कापणाऱ्या व्यक्तीला अथवा संस्थेला कपातकर्ता असे म्हणतात.
  • टीसीएस हा वस्तूंच्या विक्रीवर आणि काही सेवांवर लागू होतो. 

उदाहरणार्थ, मानवी वापरासाठी विकलेलं मद्य, दोन लाखांपेक्षाअधिक रकमेचं सोनं, अथवा दागिने यांची विक्री केली असल्यास टीसीएस लागू होतो, 50 लाखांपेक्षा अधिक रकमेचे स्थावर मालमत्तेचे व्यवहार केल्यास टीसीएस लागू होतो. टीसीएस कापणाऱ्या व्यक्तीस कलेक्टर म्हणतात.

  • दोन्ही कर म्हणजे टीडीएस आणि टीसीएस, करदात्यांच्या वतीने सरकारकडे विहित मुदतीत जमा केले जातात. कापलेल्या टीडीएसबद्दल फॉर्म 16 आणि 16AA या स्वरूपात, कापलेल्या कराचं प्रमाणपत्र कपातकर्त्याकडून करदात्यास दिलं जातं. फॉर्म 15 G किंवा H भरून दिल्यास करदेयतेची जबाबदारी कपातकर्त्यावर न येता करदात्यावर येते.
  • टीसीएस कापणाऱ्या व्यक्तीने फॉर्म 27 D मधे कापलेल्या कराचे प्रमाणपत्र करदात्यास दिले पाहिजे.  टीसीएस कापताना कमी दराने कपात करून घ्यायची असल्यास फॉर्म 13 भरून त्यावर, सक्षम आयकर अधिकाऱ्यांची मान्यता घ्यावी लागते. यामुळे कमी दराने अथवा शून्यदराने कपात करता येते. 
  • अशा रीतीने मुळातून करकपात केली जात असली, तरी त्याचा करदात्यांच्या एकूण करदेयतेशी संबध असेलच असं  नाही. जर व्यक्तीचे एकूण करपात्र उत्पन्न विहित मर्यादेपेक्षा (प्रिस्क्राइब्ड लिमिट) कमी असल्यास विवरणपत्र भरून दिल्यावर, सदर करदात्याला कर परत केला जातो. थोडक्यात करदेयता आणि करकपात या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत.
  • पगारदार व्यक्तींचा कर अन्य ठिकाणी मुळातून कापला गेल्याने त्याची एकंदर करदेयता कमी होत असेल, तर तशी कर सवलत पगारातून मिळायला हवी, अशी करदात्यांची मागणी होती. या मागणीला  प्रतिसाद म्हणून 23 जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पगारदारांच्या अन्य उत्पन्नातून मुळातून कर कपात झाली असल्यास, त्याचा तपशील आपल्या मालकास दिल्यास, त्या उत्पन्नाचा आणि पगाराचा एकत्रित विचार करून कर कपात केली जाईल असे जाहीर केले होते. यामुळे मुळातून कापून घेतलेला कर आपोआपच समायोजित (अ‍ॅडजस्ट) होईल, असा यामागचा हेतू आहे.
  • यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष करनियंत्रण मंडळाने फॉर्म 12BAA चा नमुना 15 ऑक्टोबर 2024 रोजी प्रकाशित केला आहे, सदर फॉर्म भरून दिल्यास त्याचा विचार करून मालकाकडून त्याप्रमाणे कर आकारणी करणं बंधनकारक आहे. या फॉर्ममधे करदात्याचं नाव, पॅन नंबर, कर निर्धारण वर्ष यासह खाली दिलेली माहिती आवश्यक आहे.

टीडीएसच्या संदर्भात आवश्यक असणारी माहिती करदात्याने भरायची आहे.

  • कर आकारताना कोणत्या कलमानुसार कर आकारणी केली गेली आहे, याची माहिती देणं.
  • कपातकर्त्याचे नाव, पत्ता आणि  टॅन क्रमांक (TAN-टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर) नमूद करणं आवश्यक आहे.
  • कापलेला कर किती आहे, त्याची रक्कम आवश्यक आहे.
  • सर्व पद्धतीने मिळालेले उत्पन्न किती आहे, याबद्दल माहिती आवश्यक आहे.

तर,

टीसीएसच्या संदर्भात आवश्यक असणारी माहिती खालीलप्रमाणे आहे.

  • कोणत्या कलमाखाली कर आकारणी केली आहे, त्याची माहिती देणं आवश्यक आहे.
  • कलेक्टरचे नाव, पत्ता आणि टॅन क्रमांक(TAN-टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर)नमूद करणं आवश्यक आहे.
  • कापलेला कर किती आहे, त्याची रक्कम आवश्यक आहे.
  • झालेला व्यवहार अथवा दिलेल्या सेवेचा तपशील देणं आवश्यक आहे.

याशिवाय टीडीएस/ टीसीएसबद्दल इतर आवश्यक तपशील आणि घराच्या संबंधित तोटा म्हणजे गृह कर्जावरील दिलेल्या व्याजाचा तपशील असल्यास द्यायचा आहे.

आजपर्यंत मालकवर्गाने दिलेला पगार, भत्ते आणि नोकराने पगारातून केलेली गुंतवणूक व बाहेरील  गुंतवणूक यांचा विचार करून करकपात करत असत. आता टीडीएस आणि टीसीएसमधल्या फॉर्म नुसार दिलेला तपशील विचारात घेऊन करकपात करणार असल्यानं, अनेकांची एकंदरीत करदेयता कमी होऊ शकते. तरी विहित नमुन्यात आणि निर्धारित कालावधीत नोकरदारांनी फॉर्म 12 BAA भरून देणं, हिताचं आहे.

(शासकीय राजपत्रात प्रकाशित झालेला फॉर्मचा नमुना सोबत जोडला आहे तो पहावा.notification-112-2024)

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक 

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत असून लेखातील मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत.)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.