गृहकर्ज मान्य करताना बँक प्रत्येक अर्जदाराचा वेगवेगळ्या पातळीवर विचार करते. गृहकर्जाची रक्कम ही काही छोटी रक्कम नसते. आपण एखाद्या ओळखीच्या व्यक्तीलाही पैसे उधार देताना दहा वेळा विचार करतो, तिथे बँक आपल्याला कर्ज म्हणून इतकी मोठी रक्कम विश्वासाने देण्याची जोखीम कशी पत्करते असा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असतो. पण कर्ज देणाऱ्या संस्थांनी या सगळ्याचा विचार केलेला असतो. त्यामुळेच कर्ज मान्य करण्याआधीच ग्राहकाची, त्याच्या आर्थिक क्षमतेची चौकशी व पडताळणी बँकांकडून होते. कर्ज देणाऱ्या संस्थांचे कर्ज मान्य करण्याबद्दल काही नियम व अटी आहेत. ग्राहक जर या सर्व निकषांमध्ये बसत असेल तर त्याला कर्ज मंजूर व्हायला अडचणी येत नाहीत.
गृहकर्ज घेण्यासाठी पात्र असण्याचे निकष संस्थेगणिक बदलत जातात. तरीही सर्व संस्थासाठी असलेले काही मुलभूत निकष खालीलप्रमाणे-
व्यवसाय किंवा रोजगारातील स्थैर्य-
उमेदवार नोकरी करत असेल तर चालू कंपनीत किमान दोन वर्षं तो पगारी नोकरदार असणे आवश्यक आहे. जर उमेदवाराचा स्वतंत्र व्यवसाय असेल, तर त्या व्यवसायातून त्याला किमान ५ वर्षं उत्पन्न मिळत असणे गरजेचे आहे.
वय-
तरुण उमेदवाराला होम लोन मिळणे सोपे जाते. नोकरी करणार्यांसाठी वयोमर्यादा २० ते ६० वर्षे आहे. स्वयंरोजगार असणार्यांसाठी हीच मर्यादा २४ ते ६५ वर्षे अशी आहे.
क्रेडिट रेटिंग-
समाजातील तुमची आर्थिक विश्वासार्हता ही गोष्ट गृहकर्जाबाबतीत अत्यंत महत्त्वाची आहे. तुमची समाजातील चांगली प्रतिमा तुम्हाला जास्त कर्ज मिळवून द्यायला मदतशीर ठरते. याशिवाय मासिक हप्त्यांचा कालावधी आणि व्याजदर हेही काही प्रमाणात शिथील होऊ शकतात. आर्थिक फसवणूक किंवा हप्ते चुकवले तर कर्ज रद्द होऊ शकते किंवा त्याचा परिणाम वाढीव व्याजदरांतही होऊ शकतो.
एम्प्लॉयर-
नोकरदार माणसाच्या बाबतीत, कंपनीचा मालक प्रतिष्ठित असेल आणि कंपनीची वार्षिक उलढाल जास्त असेल, तर अर्जदार कर्ज घेण्यासाठी अधिक विश्वासार्ह ठरतो.
आर्थिक परिस्थिती-
तुम्ही गृहकर्जासाठी पात्र आहात की नाही, तुम्हाला किती कर्ज देण्यात यावे, आणि त्यासाठी व्याजदर काय असावा हे ठरवण्यात मागील काळातील तुमच्या आर्थिक स्थैर्याची भूमिका महत्त्वाची असते.
सिबिल स्कोअर-
गृहकर्जाचा लाभ घेण्यासाठी तुमचा सिबिल स्कोअर कायम ७५० च्या वर असणे आवश्यक आहे.
गृहकर्ज मंजूर होण्यासाठी वरील पात्रतांची पूर्तता होणे गरजेचे आहे.
(चित्रसौजन्य: https://bit.ly/2CKG8gj )