भारतीय शेअर बाजारानं गेले काही दिवस सर्वाधिक वेगाने वाटचाल केली आहे. त्यामुळे कंपन्यांचे मूल्य वाढले असून आता बाजार महाग झाल्याची भावना निर्माण झाली आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात बाजार खाली येण्याचे तेच कारण मानले जाते आहे. बाजार खाली येतो तेव्हाच चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावयाची असते. त्यातही भविष्यात ज्या क्षेत्राची वाटचाल वेगाने होणार आहे, त्या क्षेत्रातील चांगल्या कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरते.
सोलर किंवा सौर उर्जा हे क्षेत्र सध्या चर्चेत असून सरकारने सौर उर्जा निर्मीतीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवले आहे. गेले वर्षभर संरक्षण क्षेत्रात जशी प्रचंड वाढ दिसली, तशी ती यावर्षी सोलर कंपन्यांमध्ये दिसेल, असे मानले जात आहे.
2023-2024 च्या अर्थसंकल्पातील तरतुदी :
- नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी वीज निर्मितीसाठी 68 हजार 769 कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी 10,000 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत .
- चोवीस तास ऊर्जा प्रदान करण्यासाठी पंप स्टोरेज प्रकल्पांना समर्थन देणारे धोरण आणले जाईल असे ही सांगितले आहे, त्यानुसार एनटीपीसी आणि भेल यांच्या संयुक्त उद्यमातील 800 मेगावॅट सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर उच्च कार्यक्षमतेसह स्थापित करणार आहेत,असे सांगितले आहे.
- ऑक्टोबरपासून सौर काचेच्या आयातीवर 10% सीमाशुल्क लागू होईल.
- सोलर सेल आणि पॅनेलच्या उत्पादनासाठी सूट देण्यात आलेल्या उपकरणांची यादी वाढवण्यात आली आहे.
अपारंपरिक उर्जा क्षेत्र मंत्रालयाने गेल्या एक एप्रिल २०२४ रोजी एक निर्णय घेतला होता, त्यात घरांवर सोलर उर्जा पॅनेल बसविण्यास सवलत जाहीर केली होती. हे पॅनेल तयार करणाऱ्या अनेक कंपन्या भारतात आहेत, मात्र त्यातील काही कंपन्यांना सरकारने अधिकृतपणे मान्यता दिली आहे. याचा अर्थ सरकारच्या या धोरणाचा अशा मान्यताप्राप्त कंपन्यांना अधिक फायदा होणार आहे.
- सध्या सुमारे सात लाख घरांवर सोलर पॅनेल बसविले गेले आहेत. सरकारच्या नव्या धोरणानुसार सुमारे एक कोटी घरांवर सोलर पॅनेल बसविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. याचा अर्थ सोलर पॅनेल बनविणाऱ्या कंपन्यांना यातून मोठा व्यवसाय मिळणार आहे.
- २०२२ पर्यंत सोलर पॅनेल चीनमधून येत होते. पण चीनमधून होणारी आयात कमी करण्याच्या ‘मेक इन इंडिया’ या सरकारच्या धोरणामुळे देशी कंपन्यांना हा व्यवसाय मिळू लागला आहे.
- २०२२ मध्ये सरकारने सोलर मोड्युलरच्या आयातीवर ४०% तर सोलर सेल्सच्या आयातीवर २५% कस्टम ड्युटी वाढविली होती.
- त्यामुळे चीनकडून होणारी ही आयात गेल्या दोन वर्षात कमी झालेला भारत हा एकमेव देश आहे.
- सोलर पीएलआय स्कीमचा भारतीय कंपन्यानी फायदा घेत सोलर मोड्युलर आणि सेल्सची निर्मिती मोठ्या प्रमाणावर सुरु केली आहे. पुढील दोन वर्षे त्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहेत.
सोलर मोड्युलर आणि इतर साधनांचे उत्पादन करणाऱ्या चार भारतीय कंपन्यांना पुढील दोन वर्षे फायदा होणार आहे. त्या अशा –
- टाटा पॉवर
टाटा पॉवर ही टाटा ग्रुपमधील प्रमुख कंपनी असून टाटा पॉवर सोलर ही तिची उपकंपनी आहे. सोलर उर्जा निर्मितीसाठी लागणारी साधने ही कंपनी तयार करते. अलीकडेच या कंपनीने युएस डेव्हलपमेंट फायनान्स कार्पोरेशन कडून ४२५ दशलक्ष डॉलरचे कर्ज घेऊन तामिळनाडूमध्ये प्रकल्प उभारला आहे. २०३० पर्यंत ग्रीन एनर्जी निर्मितीची क्षमता सध्याच्या ३८ टक्क्यावरून ७० टक्के करण्याचे उद्दिष्ट टाटा पॉवरने घेतले आहे, यावरून भविष्यात या कंपनीतील गुंतवणुकीचे महत्व लक्षात येते.
- बोरोसिल रिनेवेबल
बोरोसिल रिनेवेबल या कंपनीने सोलर ग्लास निर्मितीचे महत्व २०१० मध्येच ओळखले होते. ती सध्या देशातील ४० टक्के गरज भागविते. ६५० टन ग्लासची निर्मिती ती सध्या ती दररोज करते. त्यात्तील २० टक्के ग्लास युरोपीय देशांना निर्यात केला जातो. सोलर ग्लासची वाढती गरज लक्षात घेवून कंपनीने प्रतिदिन ही क्षमता १००० टन करण्याचे ठरविले आहे. सरकारी पीएलआय योजनेचाही कंपनीला फायदा झाला आहे.
- स्टर्लिंग अँड विल्सन सोलर
स्टर्लिंग अँड विल्सन सोलर ही या क्षेत्रातील जागतिक कंपनी आहे. सोलर प्रकल्पाची संपूर्ण उभारणी ती करते. याशिवाय ती सध्या हायब्रीड एनर्जी पॉवर प्रकल्प, उर्जा साठा आणि कचऱ्यापासून वीज निर्मिती क्षेत्रात प्रवेश करते आहे.
- वेबसोल एनर्जी सिस्टीम
सोलर क्षेत्रात लागणारी साधने निर्माण करणरी ही एक आघाडीची कंपनी. युरोप आणि अमेरिकेला सोलर एनर्जीसाठी लागणारी साधने निर्यात करणे, यावर तिने भर दिलेला आहे. कोलकाताजवळच्या फालटा एसईझेडमध्ये तिचा उत्पादन प्रकल्प आहे. दोन दशके या क्षेत्रात असलेल्या या कंपनीने घरांवरील आणि कार्यालयांवरील सोलर प्रकल्पांवर आता अधिक लक्ष केंद्रित केले आहे. सोलर उर्जेसंबंधी संशोधनावरही कंपनी सध्या खर्च करते आहे.
सोलर क्षेत्रातील चार प्रमुख कंपन्या आणि गुंतवणूक
कंपनीचे नाव | किंमत
(11 July 2014) |
मार्केट कॅप
(कोटी रुपये) |
वर्षभराचा परतावा | पीई रेशो |
टाटा पॉवर | 440 | 1,40,738 | 95 % | 38 |
बोरोसिल रिनेवेबल | 515 | 6755 | 7 % | -144 |
स्टर्लिंग अँड विल्सन सोलर | 706 | 16455 | 145 % | -78.12 |
वेबसोल एनर्जी सिस्टीम | 565 | 2363 | 563% | -19 |
– यमाजी मालकर
#सोलर पॅनेल
#टाटा पॉवर
#वेबसोल एनर्जी सिस्टीम
#स्टर्लिंग अँड विल्सन सोलर
#बोरोसिल रिनेवेबल
#सौर उर्जा क्षेत्र