Reading Time: 3 minutes

गेले अनेक दिवस चर्चेत असलेले एचडीएफसी या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण पूर्ण झाले आहे यासाठी आवश्यक अशा सर्व भागधारक आणि नियमकांच्या परवानग्या मिळाल्या असून आता 1 जुलै पासून हे विलीनीकरण झाले असे समजण्यात येईल. यामुळे गेल्यावर्षी कंपनीने येत्या 15 ते 18 महिन्यात विलीनीकरण होईल असे जाहीर केल्याप्रमाणे उद्दिष्टाची पूर्तता होईल.वास्तविक कंपनी कायद्यात विलीनीकरण अथवा विभाजन  याचा स्पष्ट उल्लेख नाही. तर त्यातील खंड पाच विभाग सहामध्ये 390 ते 396 ए मध्ये

तडजोड, व्यवस्था आणि पुनर्बांधणी यासंबंधी तरतुदी आहेत. त्यामुळे अगदी सोप्या भाषेत एकत्रीकरण अथवा विलीनीकरण ही एक कायदेशीर तडजोड असून त्यानुसार-

*विलीन झालेल्या कंपनीची मालमत्ता ही विलीनीकरण झालेल्या कंपनीची मालमत्ता होईल.

*विलीन झालेल्या कंपनीची देणी ही विलीनीकरण झालेल्या कंपनीची देणी होतील.

*विलीन झालेल्या कंपनीचे भागधारक हे विलीनीकरण झालेल्या कंपनीचे मान्य पद्धतीने आपोआपच भागधारक होतील.

*विलीनीकरण प्रक्रियेत एक शेअरपेक्षा कमी शेअर द्यावा लागत असल्यास त्याची भरपाई पैशात केली जाईल.

*विलीन झालेल्या कंपनीचा व्यवसाय हा विलीनीकरण झालेल्या कंपनीचा व्यवसाय असेल.

*कंपनीचे मूल्यांकन करताना मालमत्ता आणि देणी यांत कोणताही फेरफार केला जाणार नाही. एकाच पद्धतीने दोन्ही कंपन्यांच्या मालमत्तेची मोजणी करण्यात येईल.

याप्रमाणे-

12 जुलै ही एचडीएफसीच्या भागधारकांसाठी रेकॉर्ड डेट असून यादिवशी असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात एचडीएफसी बँकेचे शेअर्स मिळतील आणि शेअरबाजारातील कंपनीचे अस्तीत्व संपेल. कायदेशीर दृष्टीने हे विलीनीकरण 1 जुलै या पूर्वलक्षी प्रभावाने झाले असे समजले जाईल. एचडीएफसीच्या दोन रुपये दर्शनी मूल्याच्या 25 शेअर्सच्या बदल्यात एचडीएफसी बँकेचे एक रुपया दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 42 शेअर्स मिळतील. या प्रमाणातच एचडीएफसी भागधारकांना शेअर्स मिळतील. यात शिल्लक राहणारे अर्धवट भाग एकत्रित करून विकले जातील आणि भागाच्या प्रमाणात त्याचे वाटप अंशतः भागधारकांना होईल. बँक अधिक सशक्त होऊन देशातील दुसरी सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी बनेल याशिवाय जगातील दहावी मोठी बँक होईल. एखादी सर्वात मोठी नॉन बँकिंग कंपनी बँकेत विलीन होण्याची ही महत्त्वाची घटना असून याच एचडीएफसीने काही वर्षांपूर्वी एचडीएफसी बँकेची स्थापना केली होती. या दृष्टीने ती त्यांची पालक कंपनी होते. या निमित्ताने एचडीएफसी संबंधात अनेक आठवणी जाग्या झाल्या.

*सन 1977 साली तेव्हाच्या आयसीआयसीआयने ही कंपनी स्थापन केली. हसमुखलाल पारेख यांचा त्यातील महत्वाचा सहभाग होता. घरासाठी कर्ज आणि त्यासाठी तारण घेतलेले घर अशी त्यांची कर्जरचना होती. भारतातील सर्वच शहरात अगदी छोट्या शहरातही एचडीएफसीचे ऑफिस नाही असे होणार नाही. पूर्वी निवृत्तीनंतर घराचा विचार केला जाई पण पुरेसे कर्ज उपलब्ध झाल्याने अनेकांनी नोकरीत असताना घर घेण्यास प्राधान्य दिले. आज गृहनिर्माण क्षेत्रात झालेल्या प्रगतीत एचडीएफसीचा महत्वाचा वाटा आहे.

*अगदी सुरुवातीला कर्जदारांनाही एचडीएफसी चे शेअर्स सक्तीने दिले जात असत.

*सन 1984 साली जेव्हा भाग प्रमाणपत्र कागदी स्वरूपात होती त्यावेळी मी सर्वात प्रथम गुंतवणूक ही एचडीएफसीच्या शेअर्स मध्ये केली होती. त्यावेळी त्याचे दर्शनी मूल्य शंभर रुपये होते. माझा मासिक पगार त्यावेळी ₹ 800/-च्या आसपास होता त्यावेळी दहा शेअरसाठी ₹ 1000/- गुंतवणूक करणे हे मोठे धाडस होते.

*हे 1000/- रुपये मला दोन टप्यात म्हणजे ₹ 500 आणि 500 असे भरण्याची सवलत मिळाली.

*चार महिन्यात त्याचा भाव चारपट वाढला आणि माझ्या उत्पनाच्या तुलनेत भरपूर फायदा झाला. मी शेअरबाजारात पदार्पण करण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे.

*यानंतर प्रीमयम घेऊन जाहीर विक्री आणि हक्कभाग विक्री यांमधून उभे झालेल्या भांडवलाच्या जोरावर कंपनीची चौफेर प्रगती झाली. एक ब्रँड म्हणून एचडीएफसी या काळात ओळखली जाऊ लागली.

*अगदी सुरवातीला कंपनी चांगला डिव्हिडंड देत असे परंतु त्या तुलनेत बाजारभाव एका मर्यादेत राहत असल्याने एचडीएफसी बरोबरच तत्कालीन आयडीआयसीआय, आयडीबीआय या कंपन्या बाजारात नोंदलेल्या होत्या यांचे शेअर विधवांनी बाळगायचे शेअर्स असा उपहासपूर्ण उल्लेख केला जात असे.

*आर्थिक सुधारणांच्या काळात एचडीएफसीने आश्चर्यकारक प्रगती केली. हा शेअर्स निर्देशांकाचा भाग बनला. त्यांनी अनेक नवनवी क्षितिजे पादाक्रांत केली. बँकिंग, विमा, एसेट मॅनेजमेंट त्यासाठी  उपकंपन्या निर्माण केल्या यथावकाश त्या स्वतंत्र कंपन्या म्हणून शेअरबाजारात नोंदल्या गेल्या.

*भांडवल बाजारात नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या कंपन्यांनी प्रीमयम किती घ्यावा त्याची मुभा सेबीने दिल्याचा पुरेपुर फायदा घेऊन अल्प मोबदल्यात मोठे भांडवल उपलब्ध झाले. त्याचा योग्य वापर केल्याने त्या कंपन्यांची भरभराट झाली शेअरहोल्डर्सही मालामाल झाले.

हेही वाचा – 15 बिझनेस आयडिया ज्या कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवून देतील !

  एचडीएफसी बँक भांडवल बाजारात येण्यापूर्वी त्यांनी एचडीएफसी च्या शेअर्होल्डरना प्रत्येक फोलिओवर  रुपये 10 दर्शनी मूल्य किमान 100 ते कमाल 400 शेअर्स सममूल्याने देऊ केले होते तर त्यानंतर आलेल्या पब्लिक ऑफरमध्ये हे शेअर्स 25 रुपये अधिमूल्याने दिले होते त्यातील काही भागही एचडीएफसीच्या भागधारकांसाठी राखीव ठेवले होते. यानंतर आलेल्या एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, एचडीएफसी एसेट मॅनेजमेंट कंपनी यांच्या पब्लिक ऑफरमध्ये काही भाग प्राधान्यक्रमाने देण्यासाठी ठेवला होता. यातील अनेक कंपन्या आज निर्देशांकाचा भाग बनल्या आहेत. सुरुवातीला एचडीएफसीच्या भागधारकांना दर्शनी मूल्याने दिलेले 100 शेअर्स आज विभाजित होऊन 1000 झाले आहेत ज्याची किंमत आज 1000 रुपयांहून 17 लाख झाली आहे. याशिवाय दरवर्षी सातत्याने वाढता लाभांश मिळाला तो वेगळाच.

         या दोन्ही कंपन्या निर्देशांकाचा भाग आहेत, त्याचे एकत्रित भारमूल्य 15% हुन अधिक आहे. सेबीच्या म्युच्युअल फंड योजनांना जे निर्देश दिले आहेत त्याप्रमाणे एका कंपनीत 10% हुन अधिक गुंतवणूक न करण्याचे सुचवले आहे. याचे समायोजन 30 दिवसात करावे लागते त्यामुळे नजीकच्या काळात विक्री करतील त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात विक्री वाढेल त्यामुळे काही काळ भाव आहे तेवढाच किंवा थोडा खाली येण्याची शक्यता आहे. भविष्यात हा भाव नक्की वाढेल. याउलट त्याची जागा घेणाऱ्या एल अँड टी माईंडत्ट्री ही सध्या मंदी असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी यातील गुंतवणूक वाढली गेल्याने त्याचे भाव वाढायची शक्यता आहे.  सध्याचा एचडीएफसी बँकेचा भाव त्याच्या प्रतिशेअर कमाईच्या 13.5 पट पुस्तकी मूल्याच्या 2.2पट आहे. गेले 5 वर्ष तो सरासरी प्रतिशेअर 20 पट आणि पुस्तकी मूल्याच्या 3.5 पट होता याचा विचार करता तो भविष्यात वाढत राहण्याची शक्यता जास्त आहे. ब्लु चिप शेअर्समध्ये त्याची गणना होत असल्याने यातील गुंतवणूक नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत. यात केलेली शिफारस हा सल्ला नसल्याची नोंद घ्यावी)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.