Reading Time: 3 minutes

आपल्या सर्वांच्याच नवे घर, मुलांचे शिक्षण, पर्यटन, निवृत्ती नियोजन यासारख्या आशाआकांक्षा असतात. त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी, महागाईवर मात करण्यासाठी गुंतवणूक केली जाते. गुंतवणुकीत असलेल्या संभाव्य घोक्यांचा आपण जाणीवपूर्वक स्वीकार केलेला असतो. अलीकडील काळात अपेक्षित अधिक वाढ व्हावी म्हणून सर्वाधिक गुंतवणूक प्रत्यक्ष /अप्रत्यक्षपणे शेअर्समध्ये  केली जाते. अधिकाधिक लोक शेअरबाजारात गुंतवणूक करत असल्याने  त्यांच्याशी संबंधित काही महत्वाच्या संज्ञा प्राथमिक माहिती म्हणून माहीत असणे जरुरीचे आहे. शेअरबाजाराचे लोकप्रिय निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी हे आपल्याला माहिती असतील. शेअरबाजारातील विविध क्षेत्रातील शेअर्सची एका विशिष्ट दिवसाची किंमत ही त्यांची मूळ किंमत ठरवून त्या सापेक्ष आजची किंमत यावरून निर्देशांक समजतो. त्यामुळे बाजाराची सर्वसाधारण दिशा समजायला मदत होते. निर्देशांक कोणत्या शेअर्सवरून ठरवायचा, त्यांचा आढावा कधी घ्यायचा, त्यातील शेअर्सची बदली कशी आणि कधी करायची, याबाबत सेबीचे निश्चित नियम असून त्यानुसार शेअरबाजाराची कार्यकारी समिती त्यासंबंधी निर्णय घेते. सेन्सेक्स हा मुंबई शेअरबाजारातील 30 शेअर्सवर आधारित निर्देशांक असून निफ्टी हा राष्ट्रीय शेअरबाजारातील 50 शेअर्सवर आधारित निर्देशांक आहे.

        वेगवेगळ्या गुंतवणूकदारांना त्यांच्या गरजेनुसार आणि जोखीम घेण्याच्या प्रवृत्तीनुसार

अनेक कल्पक गुंतवणूक प्रकार बाजारात येत असतात. देशी विदेशी वित्तसंस्था मोठे गुंतवणूकदार यांना जोखीम व्यवस्थापन करणे सोपे जावे म्हणून हेजिंग करण्यासाठी बाजारात डिरिव्हेटिव व्यवहार होण्यास सुरुवात झाली यात व्यवहार करण्यास भांडवल कमी लागून अधिक फायदा मिळवता येतो हे लक्षात आल्यावर अनेकजण त्यात उतरले. सध्या बाजारात होणाऱ्या ट्रेंडिंग ऍक्टिव्हिटीमध्ये सर्वाधिक व्यवहार या प्रकारात होतात. हे व्यवहार शेअर, निर्देशांक, कमोडिटीमध्ये करता येतात. सध्या भारतात होणारे सर्वाधिक व्यवहार हे डिरिव्हेटिव पद्धतीचे असून यातील सर्वाधिक व्यवहार राष्ट्रीय शेअरबाजारात होतात.

       खुल्या अर्थव्यवस्थेचा आपण स्वीकार केल्याने जगभरातील गुंतवणूकदार भारतीय शेअरबाजाराकडे आकर्षित झाले असून त्यांची  डिरिव्हेटिव व्यवहार करण्याची प्रथम पसंती  सिंगापूर येथील आंतराष्ट्रीय शेअरबाजारास आहे. कारण –

*तेथील व्यवहाराचे चार्जेस कमी आहेत.

* हा बाजार दिवसभरात 16 तास चालू असल्याने सर्व गुंतवणूकदारांना सोयीचा आहे. *तेथे दिवसभरात मोठ्या प्रमाणात होणारे व्यवहार आणि त्यातून निश्चित होणारी किंमत यावरून भारतातील ट्रेडर्सना आज बाजारात काय होईल याचा अंदाज बांधता येतो.

        भारतीय निफ्टी आणि सिंगापूर निफ्टी या दोन्हींचे व्यवहार जोखीम व्यवस्थापनासाठी असले तरी त्यात काही फरक आहेत.

*भारतीय निफ्टी चे व्यवहार 75 च्या संचात (lot) होतात. तर सिंगापूर बाजारात अशी लॉट साईज नाही. भारतातील व्यवहारांचा संच हा जेव्हा चालू होईल तेव्हा किमान पाच लाख रुपयांचा असतो.

*भारतीय बाजार सव्वासहा तास चालू असतो सिंगापूर बाजारात हे सौदे 16 तास चालू असतात.  सिंगापूर बाजारातील सर्वाधिक म्हणजे एकूण व्यवहारांच्या 10% उलाढाल SGX Nifty मध्ये  होते. भारतीय रुपयात ही दैनिक उलाढाल ₹ 82000 कोटीच्या आसपास आहे. या बाजारात सर्वसामान्य भारतीयांना गुंतवणूक करता येत नाही.

ब्रोकिंग फर्म त्यांचे प्रोप्रायटर्री व्यवहार करू शकतात याशिवाय त्यामुळेच विदेशी वित्तसंस्था आणि पी नोट्स द्वारे व्यवहार करणाऱ्या कंपन्या तेथे उलाढाल करून अंदाज घेऊन भारतीय  बाजारात उतरतात कारण –

*सिंगापूर शेअरबाजार आपला बाजार सुरू होण्यापूर्वी चालू झालेला असतो आणि आपला बाजार बंद झाला तरी चालू असतो.

*जगातील घडामोडीचा तात्काळ परिणाम या बाजारावर दिसून येतो कारण येथील व्यवहारात बाजारभाव मोठ्या प्रमाणात वरखाली होतात. त्यामुळे भावातील फरकाचा फायदा मिळवता येतो.

*सिंगापूर निफ्टी सौदापूर्तीच्या (सेटलमेंट) दिवशी पैशात (डॉलर्समध्ये)  समायोजित केली जाते, तर येथील निफ्टीची सौदापूर्ती डिलिव्हरी मध्ये होते.

        अलीकडेच सिंगापूर शेअरबाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजार यांनी परस्परांच्या संमतीने यापुढे सिंगापूर निफ्टीचे व्यवहार गिफ्ट सिटीतील एनसीइ आयएक्स या आंतरराष्ट्रीय शेअरबाजारात करायचे ठरवले असून त्यासंबंधी एमएसइ आयएक्स आणि सिंगापूर शेअरबाजार यांनी करार केला आहे. त्यानुसार-

*03 जुलै 2023 पासून सिंगापूर आंतरराष्ट्रीय शेसरबाजारात टाकलेले सर्व सौदे एमएसइ आयएक्सकडे वळवले जातील

*भारतीय प्रमाणवेळेनुसार पहिले सत्र सकाळी 06:30 ते दुपारी 03:40 नंतर दुसरे सत्र दुपारी 04:35 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 02:40 पर्यत म्हणजेच जवळपास 19 तासाहून अधिक काळ करता येतील.

* भारतात ते एमएसइ आयएफएसएक्स क्लिअरिंग कॉर्पोरेशनकडून समायोजित केले जातील.

*ते  यापुढे सिंगापूर निफ्टी ऐवजी गिफ्ट निफ्टी या नावाने ओळखले जातील.

       जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपण उदयास येत असताना जागतिक गुंतवणूकदारांना आपण ही सोय उपलब्ध करून देत आहोत.

हेही वाचा – गुंतवणूक : जाणून घ्या इंडेक्स फंड चे फायदे !

 या नव्या वेगळ्या व्यवस्थेचे उद्घाटन काल 29 जुलै 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्याबरोबरच या दिवशी गिफ्ट सिटीमध्ये त्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय सुवर्ण बाजाराचेही (IIBE) उद्घाटन करण्यात आले. हा अशा पद्धतीचा जगातील तिसरा मोठा सुवर्ण बाजार आहे ज्यामुळे सोन्याची खरीखुरी किंमत पारदर्शक पद्धतीने मिळू शकेल. याशिवाय याच दिवशी एमएसइ आयएक्सने जगातील चार भांडवल बाजार नियंत्रकांशी, वित्तीय नियमन देखरेख नियंत्रण यासंबंधातील देवाणघेवाण, नवीन आर्थिक साधनांचा शोध, उपलब्ध आर्थिक साधनांचा विकास या संबंधात करार केला असून या ऐतिहासिक घटनेचे आपण साक्षीदार आहोत.

©उदय पिंगळे

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक असून ती कोणत्याही गुंतवणुकीची शिफारस करीत नाहीत)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…