Reading Time: 4 minutes

यापूर्वी आपण गृहकर्जाचे उपलब्ध विविध पर्याय पाहिले. जागांच्या वाढत्या किमती पाहता तूर्तास गृहकर्जास पर्याय नाही. हे दीर्घ कालावधीचे आणि घर तारण असल्याने, सर्वात सुरक्षित कर्ज असे समजण्यात येते. त्यामुळेच वित्तीय संस्था त्यास प्राधान्य देतात. त्यामुळे वित्तीयसंस्थेकडे पुढील कित्येक वर्षे सातत्याने आणि नियमितपणे पैसे येत राहतात. 

गृहकर्ज – लवकर परतफेड की गुंतवणूक?

याउलट ग्राहकाला त्याच्या गरजेनुसार कर्ज कोणाकडून घ्यावे, यासंबंधीचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. या कर्जास उपलब्ध असलेल्या करसवलतींचा करदेयतेच्या दृष्टीने कर्जदारास फायदा करून घेता येतो. आपल्यावर कोणाचेही कर्ज असू नये, अगदीच घेण्याची वेळ आलीच तर ते लवकरात लवकर फेडून टाकावे अशा रीतीने आपल्यावर झालेले पिढीजात संस्कार आपली आर्थिक क्षमता वाढल्यावर स्वस्थ बसू देत नाहीत अनेक जण त्यांना उपलब्ध असलेले पर्याय वापरून अंशतः अथवा पूर्णतः लवकरात लवकर  कर्जमुक्त कसे होता येईल याचा प्रयत्न करतात. या शिवाय काही पर्याय आहे का? या संबंधीचा हा वेगळा विचार –

गृहकर्ज परतफेडीचे विविध पर्याय

 • याआधीच सांगितल्याप्रमाणे हे सर्वात स्वस्त आणि दीर्घकालीन कर्ज आहे, त्यामुळे हे कर्ज फेडण्याच्या वाढीव कालावधीनुसार हप्ता कमी कमी होत जातो. म्हणजे कर्ज फेडण्याची मुदत जेवढी अधिक त्याप्रमाणे हप्ता कमी परंतू एकूण देय रकमेत वाढ होईल.
 • सुरुवातीला याचे नियोजन अगदी काटेकोरपणे केले जाते. यात आपली कर्ज घेण्याची जरुरी, हप्ता फेडण्याची पात्रता, किमान मासिक खर्च या साऱ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. कर्ज मुदतीपूर्वी काही प्रमाणात किंवा पूर्णपणे फेडावे का? यासंबंधीचे विचार काही दिवसांनी अकस्मात मिळालेले पैसे किंवा नोकरी बदलल्याने अगर वेतनवाढ झाल्याने उत्पन्नात झालेल्या वाढीमुळे येण्यास सुरुवात होते. 
 • आर्थिक नियोजनकारांच्या मते कोणतेही कर्ज वेळेपूर्वी फेडणे कधीही चांगले. परंतू गृहकर्ज हे त्यास अपवाद आहे. या कर्जाचा सर्वात कमी व्याजदर व करसवलत यांचा विचार करता कोणतेही गृहकर्ज घेताना, आपली त्यावेळची परतफेड क्षमता पाहून जास्तीत जास्त मुदतीचे घ्यावे.  यामुळे काही रक्कम आपल्याकडे अधिक शिल्लक राहिल. 
 • शिल्लक राहणारी रक्कम ‘एसआयपी’ च्या माध्यमातून इक्विटी म्युच्युअल फंडात दीर्घकाळ गुंतवल्यास भांडवल निर्मिती होऊन, अधिक परतावा मिळू शकतो. अशा मोठ्या कालावधीसाठी किमान १२% ते १५% वार्षिक परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते. ते कसे ते उदाहरणासह पाहूयात. 
 • उदा. ८% व्याजदराने १ लाख रुपये गृहकर्ज १० वर्षाच्या मुदतीने घेतल्यास, त्यासाठीचा समान मासिक हप्ता रु. १२१३/- होईल, तर व्याज परतफेड रु. ४५५९३/- म्हणून एकूण परतफेड रु. १४५५९३/- एवढी होईल. याच दराने हे कर्ज २० वर्षं मुदतीचे घेतल्यास, त्याचा हप्ता रु. ८३६/- तर, व्याज परतफेड रु. १००७४६/- म्हणून एकूण परतफेड रु. २००७४६/- एवढी होईल. हेच कर्ज ३० वर्ष मुदतीचे असेल तर, त्याचा मासिक हप्ता रु. ७३४/- एवढा म्हणजे व्याज परतफेड रु. १६४१५५/- एवढी तर, एकूण परतफेड रु. २६४१५५/- एवढी होईल. समान व्याजदराच्या एका रकमेतील फरक हा १० ते २० वर्षांच्या कालावधीत रु. ३७७/- तर, १० ते ३० वर्षांच्या कालावधीत रु. ४७९/- एवढा असेल.
 • वरील उदाहरणातून समान मासिक हप्त्याच्या (EMI) रचनेत वीस वर्षांहून कमी कालावधीसाठी कर्ज घेतल्यास ‘व्याज कमी मुद्दल जास्त’ २०  वर्षाच्या कालावधीत ‘मुद्दल आणि व्याज समप्रमाणात’ तर २० वर्षांहून अधिक काळासाठी घेतलेल्या कर्जास ‘व्याज अधिक व मुद्दल कमी’ अशी रचना असते. त्यामुळेच चक्रावून टाकणारा फरक पडतो. 
 • आईसस्टाईन या शास्त्रज्ञाने चक्रवाढव्याज हे जगातील आठवे आश्चर्य असल्याचे सांगितले ते यामुळेच. समान मासिक हप्त्यात असलेला हा फरक रु. ३७७/- इक्विटी म्युच्युअल फंडांच्या योजनेत २० वर्षासाठी मासिक ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवल्यास १२% परतव्याने रु. ३७६६७९/- एवढे मिळतील. त्यामुळे जास्तीचे व्याज म्हणून दिलेले रु. १००७४६/- पूर्णपणे वसूल होऊन रु. २७५९३३/- एवढे शिल्लक राहतील रु. ४७९/- ३०  वर्षाच्या मासिक एसआयपीच्या माध्यमातून गुंतवल्यास १२% परताव्याने रु. १६९०८२८/- एवढे मिळतील. त्यामुळे व्याज म्हणून देऊ केलेले रु. १६४१५५/- देऊन रु. १४२६६७३/- एवढी रक्कम शिल्लक राहिल. जर हाच परतावा यापेक्षा अधिक मिळाला तर या आकडेवारीत मोठा फरक पडेल. याप्रमाणे वेगवेगळ्या कालावधीसाठी इएमआय (EMI) आणि एसआयपी (SIP) याची मोजदाद करता येईल. यासाठी असे कॅलक्युलेशन करणारी अँप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. ही फक्त १ लाख रुपयासाठी काढलेली आकडेवारी आहे. आपल्या आर्थिक प्रवाहात कोणताही फरक न पडता या पद्धतीने कर्जाच्या हप्त्यातून भांडवलनिर्मिती करता येणे शक्य आहे. 
 • या सर्व कालावधीत आयकरात मिळणारी सवलत किंवा मिळालेल्या अधिकच्या रकमेवर द्यावा लागणारा कर याचा विचार केला नसला, तरी या गोष्टी विचारात घेतल्या तर, मिळणारा अप्रत्यक्ष फायदा याहून अधिकच असेल.
 • सर्वसाधारण गृहकर्ज घेण्याचे प्रमाण रु१५  ते ७० लाख असेल तर, त्याप्रमाणे १५ ते ७० पट फरक पडेल. यावरून या विषयाची व्याप्ती लक्षात येईल.
 • याचप्रमाणे एकरकमी (Onetime) किंवा अंशतः (Part) परतफेड न करता ही रक्कम डेट फंडात एकरकमी गुंतवून नियमितपणे गुंतवणूक मोडून (SWP) त्या रकमेची नियमित इक्विटी फंडात गुंतवणूक एसआयपी केल्यास, मूळ रक्कम शिल्लक राहील त्यात डेट फंडातून ८% व इक्विटी फंडातून १२% परतावा मिळेल अथवा बॅलन्स इक्विटी फंडात एकरकमी गुंतवणूक करावी. सध्या अशा योजनांमधून ११ ते १४% परतावा मिळत आहे. तेव्हा या संधी सोडून कमी व्याजदाराच्या कर्ज फेडण्यात फारसे हित नाही. पूर्ण कर्ज फेडले तर वाचणाऱ्या पूर्ण रकमेची नियमित गुंतवणूक होईल याची खात्री देता येत नाही, तर अंशतः परतफेड केल्यास समान मासिक हप्ता कमी न होता त्यांची संख्या कमी होत असल्याने, भविष्यात होणाऱ्या घटत्या मूल्याची आताच्या दराने किंमत चुकवावी लागेल. तेव्हा कर्जाची फेड पूर्वीप्रमाणे नियमित होत राहील असे पाहावे. 
 • ही सगळीच आकडेवारी समजायला कठीण असली समजून घेणे अगदीच अशक्य नाही. केवळ समजायला सोपे जावे म्हणून अगदी कमी रक्कम उदाहरण म्हणून घेतली आहे.

होम लोन टॉप-अप का वैयक्तिक कर्ज?

थोडक्यात महत्त्वाचे –

 • गृहकर्ज कमी मुदतीच्या ऐवजी जास्तीत जास्त मुदतीचे घेऊन, आपल्याला परवडणाऱ्या हप्त्याची, कर्जफेड आणि इक्विटी म्युच्युअल फंडांच्या योजनेत गुंतवणूक अशी विभागणी करावी. यामुळे गृहकर्ज हा बोजा न वाटता गुंतवणुकीचे साधन बनेल. यातून मिळणारा परतावा खात्रीशीर नसला तरी तो दीर्घकाळात तो १२% हून अधिक मिळेल असा अंदाज आहे.
 • कर्जाची एकरकमी किंवा अंशतः परतफेड न करता ती पूर्वीच्या पद्धतीने नियमितपणे करून जास्तीच्या रकमेची वेगळी गुंतवणूक करावी.
 • यापूर्वी आपण कमी मुदत असलेले कर्ज घेतले असेल आणि त्यापेक्षा कमी दराने जास्त मुदतीचे कर्ज मिळू शकत असेल, तर त्याप्रमाणे बदलून घ्यावे. ज्यामुळे वरील प्रकारे गुंतवणुक करून आपल्याला अधिक फायदा करून घेता येईल.

शेअरबाजार: घर (कर्ज) पहावं ‘न’ फेडून… 

– उदय पिंगळे

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…