Reading Time: 2 minutes
घरात कन्यारत्नाचं स्वागत तर जोरदार झालं, पण तिच्या भविष्याची काळजी वाटते?
पालक म्हणून तिच्या शिक्षण आणि लग्नासाठीच्या खर्चाची तरतूद काय आहे?
तुमचं तुमच्या मुलीवर असलेलं प्रेम व्यक्त करण्याची सुवर्ण संधी एक सरकारी योजना तुम्हाला देते आहे. जिचं नाव आहे ‘सुकन्या समृद्धी योजना’. तुमची लाडकी लेक सज्ञान होई पर्यंत प्रती महिना गुंतवणूक करा आणि तिच्या भविष्य बद्दल निश्चिंत व्हा!
काय आहे ‘सुकन्या समृद्धी योजना’?
- मुलींच्या जन्माचं घटतं प्रमाण (Imbalanced sex ratio) ही गेले काही वर्ष भारतासाठी चिंतेची बाब आहे.
- स्त्री जन्माचा योग्य तो सन्मान आणि आदर व्हावा यासाठी प्रस्थापित सरकारने अनेक योजना अमलात आणल्या. त्यापैकीच काही म्हणजे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ प्रसिद्ध चळवळी अंतर्गत देशाच्याकानाकोपऱ्यात स्त्री शिक्षणाचा नारा घुमतो आहे. मुलींना शिक्षण देण्याची प्रेरणा यातून मिळते पण त्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ पुरवणारी एक योजनाही सरकारने आता आपल्या साठी उपलब्ध आहे.
- या योजनेमध्ये तुम्ही प्रती महिना २५०/- रुपये ते दीड लाखापर्यंतची रक्कम तुमच्या मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावाने असलेल्या सुकन्या समृद्धी खात्यात जमा करा.
- मॅच्युरिटी काळानंतर ही रक्कम भरभक्कम व्याजासह तिच्या शिक्षण अथवा लग्नासाठी वापरू शकता. थोडक्यात, तुमच्या मुलीच्या भविष्याची तजवीज तिच्या जन्मानंतर लगेचच करा आणि तिच्या शिक्षणाच्या आणि लग्नाच्या सर्व प्रश्नांना सोडवून चिंतामुक्त रहा.
ही योजना कोणासाठी आहे?
- भारतीय नागरिकत्व असलेले कोणतेही पालक आपल्या मुलीच्या जन्मानंतर ही गुंतवणूक करू शकतात.
- एका मुलीच्या नावाने केवळ एकच खाते उघडले जाऊ शकते आणि त्यातून या योजनेचा लाभ घेता येतो.
- एका कुटुंबात एका पेक्षा जास्त मुली जन्माला आल्या असतील तर जास्तीत जास्त २ मुलींच्या नावे हे खाते उघडून योजनेचा लाभ घेता येतो. तसेच दुसऱ्या वेळी जुळ्या अर्थात दोन मुली जन्माला आल्यास जास्तीत जास्त ३ खात्यातून ह्या योजनेचा लाभ घेता येतो.
- पहिल्याच वेळी तिळ्या किंवा तीन मुली जन्माला आल्या असतील तर अश्या तिन्ही मुलींना या योजनेचा लाभ ३ वेगवेगळ्या खात्याद्वारे घेता येतो.
या योजनेचा लाभ कधी घेता येतो?
- परिवारात मुलीच्या जन्मानंतर तिच्या वयाची १० वर्षे पूर्ण होईपर्यंत योग्य त्या कागदपत्रांसोबत तुम्ही कधीही सुकन्या समृद्धी खाते उघडून गुंतवणूक सुरु करू शकता.
- या खात्याची मॅच्युरिटी मात्र खाते उघडलेल्या दिवसापासून २१ वर्षे पूर्ण झाले की होते. असा हा काळ मोठा असल्याने मुलीच्या जन्मानंतर जमेल तितक्या लवकर या योजनेचा लाभ घेतल्यास तुम्हाला योग्य त्या वयात मुलीला या योजनेचे फायदे होतील.
या योजनेचा फायदा काय?
- या योजनेद्वारे खाते उघडल्यापासून २१ वर्ष दर महिन्याला तुम्ही जी रक्कम जमा करता ती रक्कम चांगल्या व्याजासह तुम्हाला परत मिळते.
- २१ व्या वर्षी साधारणपणे पाल्याच्या शिक्षणासाठी मोठ्या रकमेची गरज भासते अश्या वेळी ही रक्कम योग्य वेळी उपयोगी पडते किंवा याच काळात मुलीच्या लग्नासाठी होणारा खर्च या गुंतवणूकीतून भरून निघू शकतो.
- थोडक्यात शिक्षण किवा लग्न या सारख्या मोठ्या खर्चासाठी पालकांना किंवा मुलीला पुढील काही वर्ष कर्जाच्या ओझ्याखाली घालवावी लागत नाही.
- या शिवाय मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतर जर शिक्षणासाठी पैशाच्या निकड असेल तर जमा रकमेच्या ५०% किंवा अर्धी रक्कम मिळू शकते. उर्वरित रक्कम मात्र खात्याच्या २१ वर्षे पूर्ण झाल्यावरच काढता येते.
(चित्रसौजन्य: https://bit.ly/2OWYUSZ )
Share this article on :