एक वर्षा-दीड वर्षामागील गोष्ट, “साहेबा, दुपारी आहेस का रे ऑफिसांत? चक्कर टाकुन जावी म्हणतो—” वडिलांचे स्नेही श्री. गोखले काकांचा फोन वाजला. आवाजावरुन बहुधा काही तरी गडबड आहे असे वाटल्याने मी “हो, हो नक्की आहे.सहजच येताय ना? की काही काम?? असे विचारले, त्यावर काकांनी “अरे, श्रीरंगने अमेरिकेला जाण्यापुर्वी काही पैसे त्याच्या ओळखीच्या बँकरकडे दिले होते त्याचा फोलियो सांभाळायला, पण बोंब आहे हो सगळी, XXXच्या फक्त जाहिराती बघुन घ्या..” अशी मध्यमातली सुरवात करुन लवकरच षड्ज लावला.
दुपारी काका माझ्या ऑफिसमध्ये येते झाले आणि फोलियो पाहिल्यानंतर खुलासा झाला की 2010 मध्ये श्रीरंग गोखले साहेबांच्या फोलियोत घेतलेले अनेक शेअर्स व बहुतेक सारे म्युचुअल फंड्स हे त्यांच्या खरेदी किंमतीच्या आसपासच आणि काही त्यापेक्षाही खालच्या पातळीवर होते, साधारण तीनेक वर्षे घालवुनही त्यांच्या हाती निराशेव्यतिरिक्त काहीच लागले नव्हते.
मी पुढे काही बोलणार त्या आधीच- “अहो बिगबुल,(हे त्यांचे ठेवणीतले संबोघन, काकांना बहुधा ‘बुल’चे मराठी भाषांतरच अपेक्षित असावे), हे पहा, मला हे सगळे बंद करुन F.D. करायची आहे, त्यादृष्टीने काय ते करा,…. माझ्या सह्या घे. या उपर आता कोणतीही चर्चा नको, आणि तुझ्या त्या शेअर् बाजाराचे गुणगान तर अजिबात नको…. झाले एवढे बस्स” असा निर्वाणीचा इशारा मिळाल्याने मी गप्प राहून त्यांना हवी ती कार्यवाही करुन त्यांची यथोचित संभावना केली; मात्र त्यांना देणार होतो ते स्पष्टीकरण डोक्यांतुन जाईना, नेमका तेवढ्यांतच, शेअरबाजार विषयक प्रख्यात सांख्यिकीतज्ञ एडी एल्फेनबेन यांनी केलेला एक ‘ट्विट’ माझ्या संगणकावर प्रकटला, ज्यात त्यांनी म्ह्टले होते-
“The stock market is net flat 99.7% of the time. The Dow’s entire 117-year gain has come on its 98 best days.’ झाले, एडी साहेबांच्या ह्या प्रसंगोचित खुलाशाने माझ्या विचारांचा खुंटाच जणू हलवून बळकट केला. तेंव्हा आता माझे ‘बाजारातून मिळणार्या परताव्याची अनियमितता’ या बहुचर्चित विषयावरील विचार गोखले काकांना भलेही सांगू शकलो नसलो, तरी आपणा सर्वांसमोर मांडण्याचे धाडस करतो.
गुंतवणुकीच्या मुदत ठेवी, रोखे, सोने वा अन्य पर्यांयाच्या तुलनेत ब्ल्यु-चीप शेअर्स मधली दीर्घकालीन गुंतवणूक ही वारंवार अधिक रिटर्न देत आली आहे ही वस्तुस्थिती आकडेवारी व तर्काच्या आधारे सिद्ध करता येतेच येते. मात्र गमतीचा भाग हा आहे की असा अधिकचा मिळणारा नफा वा परतावा, हा गुंतवणुकीच्या वेळेचा विचार केल्यास आपल्या पारंपारिक फिक्स्ड डिपॉझिट्स वा बॉड्स सारखा कधीच समप्रमाणांत वा एकरेषा पद्ध्तीने मिळालेला आढळत नाही. आपल्या संकल्पनेतल्या ‘खुदा’ प्रमाणेच हा बाजारेश्वर ही कधीतरीच अवचित प्रसन्न होतो आणि देतो तेंव्हा मात्र ‘छप्पर फाडके’ देतो.
‘आयुष्यांत यशस्वी कसं व्हायचं??’ या एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना सर हेनरी फोर्ड उत्तरले.
“काही नाही, तयारीत रहायचे, आलेली संधी ताबडतोबीने पकडायची.”
“पण सर, संधी तर एकदाच येते, आणि ती कधी येणार हे कुठे माहित असते.??” पुढचा बालसुलभ प्रश्न.
“सोपे आहे, म्हणुनच ‘कायम’ तयारीत रहायचे!!!”-फोर्ड.
मला वाटते आचरणांत सातत्य राखणे हे येथे सांगितलेले तत्व बाजारांत यशस्वी होण्यासही तितकेच लागू पडते. Time matters, timing the market doesn’t.!!!
बाजाराविषयीची आकडेवारी अभ्यासून जे वेगवेगळे प्रयोग केले आहेत त्यातून असे दिसून आले आहे की अंतिमतः बाजारातील गुंतवणुकीपासूनचा दीर्घकालीन परतावा जरी उत्तम असला तरी त्याचे कालानुरुप वितरण हे कमालीचे असमान असते. बाजारातील मंदीच्या प्रभावाखालील कालावधी हा तेजीच्या कालावधीपेक्षा जास्त असतो. म्हणजे मंदी ही विकेंद्रित स्वरुपाची असते तर तेजी किंवा त्यामुळे होणारा फायदा हा संहत (concentrated) स्वरुपाचा असतो.
मानसशास्त्रीय दृष्ट्या असे समजण्यात येते की बाजाराचे भवितव्य ठरविणार्या दोन निर्णायक भावनांपैकी भीतीची (fear) तीव्रता लोभापेक्षा (greed) अधिक असते. कदाचित याचाच परिणाम की काय म्हणून भीतीशी संबंधीत मंदीची बाजारस्थिती अधिक काळ रेंगाळते, आणि तेंव्हा व फक्त तेंव्हाच तेजी येते, जेव्हा परिस्थिती पुर्णतः अनुकूल, सुरक्षित व सकारात्मक असल्याची खात्री बाजारांतील गुंतवणूकदारांस होते.
तेजी तुलनेने अल्पकाळच, परिस्थितीचा कब्जा पुन्हा लोभाऐवजी भीतीकडे जाईपर्यंतच असते. तेजीच्या पूर्वतयारीस बराच वेळ लागतो आणि ती ओसरते काहीशी त्वरेने. एखाद्या शुभकार्याचा मंडप उभारावयास लागणारा वेळ आणि त्या कार्यानंतर तो आवरावयास लागणारा वेळ, यांच्या गुणोत्तरासारखेच हे आहे. मंदी बराच वेळ चाचपडत खेळत असलेल्या फलंदाजासारखी असते, या उलट तेजी मात्र ‘सौ सुनारकी ….’ न्यायाने एखाद्या फलंदाजाने काही नेमक्या चेंडूंवर चौकार/षटकारांची आतषबाजी करुन सामना जिंकून द्यावा, तशी गुंतवणुकदारांच्या पदरांत भरभरुन दान टाकल्याशिवाय रहात नाही.
आमच्या लहानपणी एक किर्तनकार ‘या जगात 99 % लोक पापी आहेत (क्षमस्व, सदर बुवा हे ज. काटजुंचे खात्रीने कोणीही लागत नाहीत.) पण उर्वरित 01% संत महात्म्यांच्या पुण्यावर जग तरले आहे’ असे सांगत. खरे खोटे कोणास ठाऊक, पण हे ‘तत्वज्ञान’ निदान गुंतवणुकीच्या कालावधीतले तेजी/मंदीच्या गुणोत्तराबाबत तरी बर्यापैकी खरे आहे असे खालील आकडेवारीवरुन स्पष्ट होईल.
उदाहरणादाखल वर उल्लेख केलेल्या श्रीमान एल्फेनबेन यांनीच याबाबत आणखी रंजक माहिती दिली आहे. ते म्हणतात की गेल्या 20 वर्षांत अमेरिकेच्या S&P 500 या निर्देशंकाने कमावलेला सर्व फायदा हा या कालावधीतील सर्वोत्तम 24 दिवसांत कमावला आहे. उरलेल्या 99.5% दिवसांचाच विचार केला तर या निर्देशंकाचा परतावा ‘उणे’ म्हणजेच शुन्यापेक्षा कमी आहे.
‘ट्रिनिटी इन्व्हेस्ट्मेंट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन’ या अमेरिकेतील संस्थेनेही याच प्रकारचा अभ्यास केला. अमेरिकन बाजारांच्या सन 1946 ते 1987 दरम्यानच्या आकडेवारीवरुन त्यांनी निष्कर्ष काढला की या साधारण 40 वर्षांत ज्याला आपण तेजीचा म्हणू शकू असा कालखंड हा उणापुरा 41 महिन्यांचा होता आणि त्यातही या 40 वर्षांच्या कालखंडादरम्यान निर्देशांकाने नोंदविलेल्या एकुण वाढीपैकी जवळपास 60% वाढ ही 08 महिन्यांत नोंदविली गेली होती. ‘लॉबस्ट्न असोसिएट्स’ आणि ‘व्हॅनगार्ड म्युचुयुअल फंड’ यांचे ही याच प्रकारचे व असेच निष्कर्ष असलेले अभ्यास माझ्या संदर्भ वहीत आहेत, ज्यांचे तपशील पुनरुक्ती नको म्हणुन टाळतो.
थोडक्यांत काय तर एखाद्या याचकास त्याचे पोट लौकिकार्थाने भरावयास हवे असल्यास त्याने खिरापतीच्या वेळी मंदिरात आणि खैरातीच्या वेळी मशीदीजवळ असावयास हवे. अन्यथा बाकीच्या वेळी आजुबाजूला नुसतेच ‘भगवान के/अल्ला के नाम पे —‘ म्हणून काय उपयोग?? फरक इतकाच की येथे बाजारांबाबत ‘ती’ वेळ माहित नाही, कोणासही ती पुर्वनिश्चित करता आलेली नाही.
अर्थात, या विवेचनातून ‘एकदा केलेल्या गुंतवणुकीचा कधीही पुर्नविचार करण्याची गरज नाही’ असे मला अजिबात म्हणावयाचे नाही. ‘करा आणि विसरुन जा’ अशा गुंतवणूक विचारप्रणालीचाही मी विरोध करतो, आपल्या गुंतवणुकीचा वारंवार आढावा घेणे, त्यात छोटे-मोठे बदल करणे हे केवळ योग्यच नव्हे तर गरजेचेही असते. मात्र बाजाराची प्रकृती वा स्वभावधर्म लक्षात न घेता केवळ अल्पकालीक घटना वा घटकांमुळे निराश (वा भयभीत) होऊन भावनेच्या भरांत आततायी निर्णय घेऊ नयेत. व्युहरचना बदलावी जरुर, पण रणांगण सोडू नये, हे सुचविण्याकरिता हा लेखनप्रपंच.
गीतेवरील एका प्रवचनामध्ये स्व. विनोबांनी विचारले आहे “ पाथरवटाच्या घणाच्या आठव्या प्रहाराने पाषाण भंगला, मग आधीचे प्रहार व्यर्थ गेले असे समजायचे का?? ”
मंदीच्या गर्तेत सापडलेल्या आपली स्थिती अनेकदा 07 प्रहारांचे कष्ट उपसलेल्या पाथरवटाची असते. अपयशाचा पाषाण पुढच्या घावागणिक भेगलत जातो, आपण फक्त धीर सोडावयास नको. पहिल्या महायुद्धातील सेनापतीच्या एका प्रसिद्ध वाक्यात थोडासा बदल करुन म्हणता येइल की बाजारांतील गुंतवणूक म्हणजे “Months of boredom punctuated by moments of sheer joy .” आपण फक्त ‘बोअरड्म’ अनुभवले आणि आनंदाचे क्षण मात्र हातातून निसटले असे होऊ नये एवढेच.
शेवटी, सुरुवातीस संगितलेली श्री. गोखले काकांची स्टोरी आणि त्याच बरोबरच हा काथ्याकुटही संपवतो. काका ऑफिसमधून निघाल्यानंतर एके ठिकाणी त्यांची सही घ्यावयाची राहिल्याचे लक्षांत आल्याने मी घाईघाईने जवळच्याच बस-स्टॉपवर गेलो, तेथे आमच्या कामवाल्या मावशींखेरीज कोणीही नव्हते, मी काकांबद्दल चौकशी केली तेव्हा
“लई हैरान दिसत होते, बस का न्हाई येत? का उशीर होतोय?? असे सार्खे बडबडत व्हते, शेवटाला आत्ता मिनीटभर आधीच येकलेच टॅक्सी करुन गेले बघा .” असे त्या मला म्हणाल्या. मी सहजच समोर बघीतले, वळणावरुन काकांना हवी तीच बस येत होती.
प्रसाद भागवत
9850503503