Health Insurance Policy
Reading Time: 4 minutes

आजच्या लेखात आपण आरोग्य विम्याच्या (Health Insurance Policy) सहाय्याने हॉस्पिटल खर्च वाचवण्यासाठी ८ महत्वाच्या टिप्सबद्दल माहिती घेऊया. आर्थिकदृष्ट्या आपण कितीही स्थिर असलो तरीही कुटुंबातील एखाद्या सदस्याला अचानक कुठली आरोग्यविषयक समस्या उद्भवली, तर संपूर्ण कुटुंब अस्थिर होऊन जाते. काळजी आणि रुग्णालयांतील सततच्या फेऱ्यांमुळे मानसिक हतबलता तर येतेच पण त्यासोबतच अचानक आलेल्या या संकटाने आर्थिक अस्थिरताही जाणवू लागते. अशा काळात आरोग्य विमा आपल्या खूप फायद्याचा असतो हे आपणास माहिती जरी असले तरी तो निवडण्यापासून ते त्याचा पुरेपूर वापर करून घेण्याचा काही महत्वाच्या टिप्स येथे देत आहोत. 

Health Insurance Policy: आरोग्य विम्याच्या सहाय्याने हॉस्पिटल खर्च वाचवण्यासाठी ८ महत्वाच्या टिप्स

१. विमा कंपनीच्या ‘फ्री हेल्थ चेकअप’ सुविधांकडे दुर्लक्ष करू नका:

  • अनेक आरोग्यविमा सुविधा पुरवणाऱ्या कंपन्या आपल्या पॉलिसीमध्ये वर्षाला एकदा किंवा दोनदा मोफत आरोग्य तपासण्यांची सुविधा उपलब्ध करत असतात. 
  • यामध्ये विविध प्रकारच्या छोट्या छोट्या तपासण्यांचा समावेश असतो. याकडे लोक सर्रास दुर्लक्ष करतात आणि या सुविधेचा लाभ घेत नाहीत. परंतु असे न करता त्या तपासण्या करून घ्यायला हव्यात. यामुळे आपणास सातत्याने आपल्या शरीरात होणारे बदल कळतात. 
  • काही कमी जास्त असेल तर त्यावर लगेच उपाय करता येतात. अगदी गळ्याशी आल्यानंतर हालचाल करण्याची वेळ येत नाही. त्यामुळे अर्थातच आपला पैसा, वेळ आणि मनस्ताप वाचतो व आपण सुरक्षित राहतो.

२. हॉस्पिटलमध्ये भरती करण्यापूर्वी आणि डिस्चार्जनंतरच्याही खर्चाची जबाबदारी घेणारी विमा कंपनी निवडा:

  • अनेक विमा कंपन्या रुग्णास हॉस्पिटलमध्ये भरती केल्यांनंतरच्याच बिलाचा परतावा देत असतात. परंतु रुग्णास थेट भरती करण्याच्या आधीही अनेक तपासण्यांची गरज असते. 
  • रक्त लघवी तपासणीपासून ते अगदी सिटी स्कॅन, एमआरआय, अँजिओग्राफी अशा महागड्या टेस्ट्सची सुद्धा गरज पडते.
  • त्याचप्रमाणे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही सतत फॉलोअपसाठी रुग्णास बोलावले जाते. त्याहीवेळी विविध टेस्ट्सची गरज पडते, महागडी औषधे अनेक दिवस घ्यावी लागतात. 
  • या सर्व बाबींसाठी लागणाऱ्या पैशाचे काय? म्हणूनच सद्यस्थितीत अशाही अनेक कंपन्या आहेत ज्या आपणास हॉस्पिटलमध्ये भरती करण्यापूर्वी आणि डिस्चार्जनंतरच्याही खर्चाची हमी देत असतात. त्यामुळे आरोग्य विमा निवडताना अशाच कंपन्यांना, अशाच विमा सुविधांना प्राधान्य द्यायला हवे.

३. असा आरोग्यविमा निवडा ज्यामध्ये इतरही ‘पॅथीं’च्या उपचाराचा खर्च समाविष्ट होतो:

  • आधुनिक आरोग्यशास्त्र म्हणजेच ॲलोपॅथी ही सर्रास निवडली जाणारी उपचार पद्धती आहे. परंतु बऱ्याचदा या उपचार पद्धतीनेही अनेक रुग्णांना आराम मिळत नाही, तेव्हा आयुर्वेद किंवा होमिओपॅथी सारख्या इतर आरोग्य शास्त्रांचा आधार घेतला जातो. 
  • ही इतर शास्त्रे काहीशी वेळखाऊ आणि थोडी खर्चिक आहेत. मग अशावेळी या खर्चाचा भार कसा पेलवणार? म्हणूनच असा आरोग्यविमा निवडा ज्यामध्ये इतरही ‘पॅथीं’च्या उपचाराच्या खर्चाचा परतावा मिळतो.

४. तुमचा आरोग्य विमा प्रवासखर्च देत आहे का याची खात्री करा:

  • घरून रुग्णालयापर्यंत किंवा एका रूग्णालयातून दुसरीकडे जेव्हा रुग्णास हलवावे लागते तेव्हा साहजिकच रुग्णवाहिकेची गरज लागते. 
  • त्या रुग्णवाहिकांमध्येही विविध प्रकार आहेत. हृद्यविकाराच्या रुग्णांसाठी शक्यतो साधी रुग्णवाहिका चालत नाही. त्यांच्या प्रकारानुसार, आकारानुसार, सुविधांनुसार त्यांचे शुल्क बदलते.
  • हा खर्च देखील आपल्यासाठी खूप मोठा ठरू शकतो. त्यामुळेच विमा पॉलिसी निवडताना रुग्णवाहिकेच्या शुल्काची ते भरपाई करत आहेत की नाहीत, त्याची मर्यादा किती आहे याची जाणीवपूर्वक खातरजमा करा.

५. रुग्णालयातील बेड/ खोलीवरील खर्चासाठी ‘ऍड-ऑन’ची शक्कल लढवा:

  • रुग्णालयाच्या बिलात सर्वात मोठा आकडा दिसणाऱ्या इतर बाबींपैकी बेड किंवा खोलीचे भाडे देखील एक असते. 
  • जेवढे दिवस रुग्ण त्या रुग्णालयात भरती आहे तेवढ्या दिवसांचे रोजचे भाडे आकारले जाते. मोठ मोठ्या रुग्णालयांत हे भाडे दीड हजार ते अगदी पाच-दहा हजारच्या घरात आहे. परंतु आपल्या आरोग्य विम्यात या भाड्याची एक ठरविक मर्यादा लिहिलेली असते. त्यावर खर्च गेला तर आपल्या खिशातून तो मोजावा लागतो. अशा वेळी ‘ॲड-ऑन’ खूप फायदेशीर ठरतो. 
  • ॲड-ऑन’ म्हणजे आपल्या मूळ विम्याच्या व्यतिरिक्त अधिकची सवलत. विमा रकमेच्या व्यतरिक्त काही अधिकचे पैसे भरल्यानंतर बेड/खोली भाड्याच्या रकमेवरील मर्यादा वाढते. 
  • समजा जर ती दीड हजार होती तर ती आता पाच हजार पर्यंत जाते किंवा काही विमा पॉलिसीजमध्ये ती मर्यादाच काढून टाकली जाते.

६. शक्यतो विमा कंपनीच्या यादीतील रुग्णालयातच उपचार घ्या:

  • विमा कंपन्यांचे रुग्णालयांचे आपले एक नेटवर्क असते. त्या रुग्णालयांत विमा धारकास ‘कॅशलेस’ उपचार मिळतात. 
  • या अशा रुग्णालयांतच थेट गेल्यास अमानत रक्कम म्हणून खूप मोठी रक्कम भरण्याची वेळ येत नाही. तसेच उपचार चालू असताना सातत्याने रुग्णालयाकडून पैशांची मागणी होण्याचा मनस्ताप सहन करावा लागत नाही. 
  • हेच जर आपण त्या विमा कंपनीच्या यादी व्यतिरिक्त इतर कुठल्या रुग्णालयात उपचार घेतले तर अगोदर आपल्याला स्वतः पैसे भरावे लागतात. 
  • त्यानंतर आपली सर्व बिले तपासून कंपनी परतावा करते. या पडताळणीमध्ये नाना तर्हेच्या रिपोर्ट्स, बिलांचा पुरवठा आपल्यालाच करावा लागतो. त्यातही परतावा म्हणून आलेली रक्कम बऱ्याचदा खर्चाच्या रकमेच्या बरीच कमी असते. ही एकूणच खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यामुळे शक्यतो नेटवर्क हॉस्पीटलच निवडावे.

७. दैनंदिन रोख रकमेच्या सुविधेचा लाभ घ्या:

  • आपल्या जवळच्या व्यक्तीला रुग्णालयात भरती केल्यानंतर कुठल्याही छोट्यामोठ्या बाबींसाठी आपल्याला पैशांची गरज भासतेच. 
  • जर तुमच्याकडे आरोग्यविमा असेल तर रुग्णालयाचा किंवा औषधांचा खर्च परस्पर मिटून जातो परंतु इतर किरकोळ बाबींसाठी काय करणार? अशावेळी काही विमा सुविधा आपले नातेवाईक रुग्णालयात भरती आहेत 
  • त्या दिवसांतील मर्यादित दिवसांपर्यंत रोजची काही ठरविक रोख रक्कम आपल्याला देऊ करतात. अशा सुविधा असणाऱ्या विमा कंपन्याना आपण प्राधान्य देऊ शकता.

हे नक्की वाचा: Health Insurance Review: आरोग्य विम्याचे पुनरावलोकन करणे आवश्यक असते का? …

८. आरोग्य विमा वेळच्यावेळी ‘रीन्यू’ करा:

  • आपल्याला दरवर्षी आरोग्य विमा ‘रिन्यू’ करावा लागतो. म्हणजेच एकदा विमा सुविधा निवडली, पैसे भरले म्हणजे आपण निश्चिंत झालो. 
  • आता आयुष्यभरासाठी आपल्याला सर्वच सुविधा मिळणार असे कधीही होत नाही. त्यामुळे विमा कंपनीच्या मेसेज, मेलकडे लक्ष द्यावे. 
  • दिलेल्या वेळेत आपली विमा पॉलिसीचे नुतनीकरण करावे. याचे फायदे म्हणजे नव्या पॉलिसीसाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा नूतनीकरणाचा खर्च शक्यतो कमी असतो. 
  • तसेच जर मागच्या वर्षभरात आपल्याला त्या विमा सुविधेचा लाभ घेण्याची एकदाही गरज भासली नसेल तर काही कंपन्या विमा रकमेची मर्यादा वाढवून देतात. म्हणजेच जर मागच्या वर्षी ३ लाख रुपयांचा विमा असेल तर या वर्षी आपणास ४ लाख रुपये इतका दिला जातो.

महत्वाचा लेख: Health Insurance: योग्य आरोग्य विम्याची निवड

वरील सर्व बाबींचा व्यवस्थित विचार करून त्यांचा योग्य तसा वापर करून घेतल्यास आपल्यावर आलेल्या संकटाचा सक्षमपणे आपण सामना करू शकाल. आर्थिक जुळवाजुळ करण्यात एरवी जाणार असलेला वेळ आपल्या जवळच्या व्यक्तीला आजारपणातून लवकर बरे करण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी वापरू शकाल.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Health Insurance Policy in Marathi, Health Insurance Policy Marathi Mahiti, Health Insurance Policy Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.