Reading Time: 3 minutes

विमा हा विमा कंपनी आणि ग्राहक यांच्यातील करार आहे आणि जोखीम व्यवस्थापन या मागील उद्दिष्ट आहे. करारातील अटीशर्तीनुसार त्याची आर्थिक भरपाई केली जाते. जीवनाविमा आणि सर्वसाधारण विमा असे इयाचे मुख्य प्रकार आहेत. स्वातंत्र्यापूर्वी अनेक खाजगी विमा कंपन्या होत्या यानंतर विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण होऊन सरकारी कंपन्यांची मक्तेदारी निर्माण झाली. आर्थिक उदारीकरणाच्या काळात हे क्षेत्र खुले करून यात थेट परकीय गुंतवणूक आली. सुरुवातीला हे प्रमाण 26% होते असून अलीकडे हे प्रमाण 74% पर्यंत वाढवले आहे त्याचप्रमाणे उपकंपनीच्या माध्यमातून 100% परकीय गुंतवणूक करण्यास परवानगी आहे. यामुळे याक्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. सध्या 57 वेगवेगळ्या कंपन्या हा व्यवसाय करीत असून हे क्षेत्र झपाट्यानं वाढत आहे. याचे नियमन करण्यासाठी आयआरडीए हे स्वतंत्र नियामक आहेत. पूर्वी पर्यटन या दृष्टीने प्रवास सहसा केला जात नसे आता पर्यटन करणे हा अन्न वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन हयाप्रमाणे मानवी जीवनाचा भाग झाले आहेत. यातील मनोरंजनाच्या विविध उपप्रकारात पर्यटनाचा समावेश करता येईल.

हेही वाचा- आरोग्यविमा देणारी कंपनी बदलावी का?

आपल्या साचेबद्ध व्यस्त जीवनातून थोडा मोकळा वेळ काढून पर्यटन केल्याने व्यक्ती ताजीतवानी होऊन त्याला आपले नियमित कार्य करण्यासाठी सकारात्मक उर्जा मिळते. अशा प्रकारे प्रवास करत असताना काही अनपेक्षित संकटे येऊ शकतात. उदा पैशांचे पाकीट हरवणे, कपड्याची बॅग हरवणे, पासपोर्ट हरवणे, अचानक गंभीर आजारी पडणे यासारखी, संकटे सांगून येत नाहीत अशावेळी प्रवासविमा घेतला असता थोडा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे अशा कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यास प्रवास विमा उपयोगी पडतो. आता आपल्या देशातील अनेक सर्वसाधारण विमा कंपन्यानी अशा प्रकारच्या प्रवासविमा योजना सर्वाना उपलब्ध करून दिल्या आहेत.

★प्रवासविमा -प्रवासविमा म्हणजे अशी विमा योजना जी आपल्या प्रवासात येऊ शकतील अशा संभाव्य अडचणींवर मात करण्यास अथवा त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई करून देण्याची हमी ग्राहकास देते.

या अडचणी खालील प्रकारच्या असू शकतात
*प्रवासात तातडीने उपचार करण्याची गरज जसे अपघात होणे, पक्षाघात, हृदयविकार याचा झटका येणे,
*चेक इन करण्यात उशीर होणे, बॅग हरवणे,
*पासपोर्ट हरवणे,
*प्रवास किंवा सहल रद्द होणे

याची भरपाई पैशांच्या स्वरूपात केली जाते.
या योजनेत कोणत्या परिस्थितीत कशी भरपाई केली जाईल याचा करारात स्पष्ट उल्लेख असतो. अशा योजना देशांतर्गत प्रवास किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी उपलब्ध आहेत आंतरराष्ट्रीय प्रवासातही जगातील विशिष्ट भागासाठी खास योजना उपलब्ध आहेत. खास ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या योजना असून त्यातही आंतरदेशीय आंतरराष्ट्रीय किंवा विशिष्ठ विभाग यासाठी स्वतंत्र योजना आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आणताना त्यात त्यांच्या वयानुसार दावे वाढण्याची शक्यता विचारात घेता वैयक्तिक ग्राहकांसाठी कमी पर्याय उपलब्ध आहेत.

कधीतरी पर्यटनास जाणारे आणि वारंवार जाणारे अशी वेगळी विभागणी असून दोघांनाही विशिष्ट प्रवासापुरते मर्यादित अथवा सर्वच प्रवासासाठी असे गरजेनुसार पर्याय उपलब्ध आहेत. वारंवार प्रवासाच्या विमा योजना एक वर्ष मुदतीच्या आहेत. एकच ट्रिप च्या योजना त्या विशिष्ट दिवसाच्यासाठीच सुरक्षा कवच देतात.

या योजना ज्याप्रमाणे व्यक्तीला घेता येतात त्याचप्रमाणे व्यक्तींच्या गटासही मिळतात.
सर्वसाधारणपणे एकाच ठिकाणी पर्यटनास जाणाऱ्या व्यक्तीच्यासाठी पर्यटन कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी खरेदी करतात किंवा काही मोठ्या कंपन्या त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने वारंवार प्रवास कराव्या लागणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्त्यांच्या मालकाकडून घेतल्या जातात.
उच्च शिक्षणासाठी सध्या अनेक विद्यार्थी परदेशात जातात तेथे वैद्यकीय उपचार प्रचंड महागडे असल्याने खास त्यांच्यासाठी वेगळ्या योजना आहेत. ज्या त्यांना परवडू शकतील असा प्रीमियम देऊन उपलब्ध आहेत. होणाऱ्या मनस्तापाची देखील काही कंपन्या भरपाई देतात.

प्रवासविमा देणाऱ्या भारतातील आघाडीच्या खाजगी कंपन्या अशा-

1. Tata AIG Travel Insurance
2. Apollo Munich Travel
Insurance
3. Religare Travel Insurance
4. Bajaj Allianz Travel Insurance
5. HDFC ERGO Travel Insurance

सर्वसाधारणपणे वर दिलेल्या संभाव्य अडचणी या योजनेत कव्हर होतात याशिवाय अपघात आणि काही कायदेशीर देयता निर्माण होत असतील तर त्यापासून योजनेतून संरक्षण मिळते. विमा कंपन्या त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी अधिकाधिक ग्राहकाभिमुख होऊन योजनेत थोडेफार बदल करून ग्राहकांच्या सोयीसाठी कल्पक योजना बाजारात आणीत आहेत.

असे असले तरी-
काही परिस्थितीत आपले दावे नाकारले जाऊ शकतात, उदाहरणार्थ
*डॉक्टरांनी मनाई केली असताना प्रवास करीत असताना निर्माण झालेले दावे.
*मुद्दामहून केलेला धोकादायक प्रवास त्यातून निर्माण झालेले दावे.
*युद्धजन्य परिस्थिती नैसर्गिक आपत्ती यातून निर्माण झालेले दावे नाकारले जाऊ शकतात.

पॉलिसीद्वारे मिळणारे सुरक्षा कवच हे त्यात उल्लेख केलेल्या परिस्थितीस अनुरूप असते. यासाठी निश्चित केलेली रक्कम ही आंतरदेशीय प्रवासासाठी रुपयात तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी डॉलर या चलनात असते. एकाच घरातील सर्वजण एकत्रित प्रवास करणार असल्यास त्यांना प्रत्येकाची वेगळी पॉलिसी न घेता पूर्ण कुटूंबासाठी एकच पॉलिसी घेता येऊ शकते.

पर्यटन करणे जितके आनंददायी आहे तितकेच ते जोखमीचेही आहे याची जाणीव ठेवून ग्राहकांनी आपली गरज आणि आर्थिक क्षमता ओळखून आपल्याला योग्य आणि आवश्यक अश्याच योजनेचा स्वीकार करावा. यात उल्लेख केलेल्या कंपन्या / योजना संदर्भ म्हणून आहेत त्या शिफारस म्हणून न समजता अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करून यासंबंधात निर्णय घ्यावा.

©उदय पिंगळे

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारी मंडळात पदाधिकारी असून लेखातील मते वैयक्तिक समजावीत)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

आरोग्य विम्याची निवड

Reading Time: 3 minutes विकसित देशातील आरोग्य सुविधा तिथल्या नागरिकांचे स्वास्थ्य राखून तेथील नागरिक अशी सेवा…