‘Men are from Mars, Women are from Venus’ हे जॉन ग्रे या अमेरिकन लेखकाने लिहिलेले इ स 1992 चे पुस्तक आहे. “पुरुष मंगळ ग्रहाचे तर स्त्रिया शुक्र ग्रहाच्या” याचा अर्थ पुरुष आणि स्त्रियांमध्ये संवाद, भावनिक गरजा, समस्या सोडवण्यात मूलभूत, अंतर्निहित फरक आहेत, ज्यामुळे नातेसंबंधात गैरसमज निर्माण होतात. जॉन ग्रे यांच्या पुस्तकातील रूपक असे सूचित करते की दोघांची मानसिकता हे वेगळ्या ग्रहावरील व्यक्तींसारखी आहे. त्यांच्यात सौधार्य निर्माण होण्यासाठी दोघांनीही (उदा. पुरुष झटकन उपाय सुचवतात तर स्त्रिया सहानुभूती शोधतात) एक दुसऱ्याची भाषा शिकण्याची आवश्यकता आहे. अर्थसाक्षरता म्हणजे आर्थिक संकल्पना समजून घेऊन योग्य निर्णय घेण्याची क्षमता, तर लिंगभाव म्हणजे समाज आणि संस्कृतीने ठरवलेल्या स्त्री-पुरुषांच्या भूमिका आणि अपेक्षा. यातील मुख्य फरक म्हणजे अर्थसाक्षरता हे एक कौशल्य आहे जे शिकता येते, तर लिंगभाव ही सामाजिक रचना आहे, जी रूढिवादी विचार आणि वागणुकीतून तयार होते.
स्त्री आणि पुरुष यांच्या वर्तणुकीतील मुख्य फरक असे-
●संवाद: स्त्रिया बऱ्याचदा भावना व्यक्त करण्यासाठी आणि ऐकल्यासारखे वाटण्यासाठी बोलतात, तर पुरुष सहसा उपाय सांगण्यासाठी किंवा तथ्ये सांगण्यासाठी बोलतात. त्यामुळे होणाऱ्या गैरसमजातून महिलांना नाकारल्यासारखे वाटते तर पुरुषांना टीका झाल्यासारखे वाटते.
●भावनिक गरजा: भावनिक संबंधातून प्रेम आणि समजून घेतल्याची भावना महिलांना प्रेरित करते, तर पुरुष बहुतेकदा उपयुक्त आणि सक्षम गोष्टींतून प्रेरित होतात.
●ताण प्रतिसाद: पुरुष अनेकदा ताणतणाव आतून हाताळण्यासाठी त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, तर महिलांना अनेकदा ताणतणावावर बोलण्याची आवश्यकता असते.
●समस्या सोडवणे: जेव्हा एखादी स्त्री समस्या घेऊन येते तेव्हा एक सामान्य संघर्ष निर्माण होतो आणि पुरूष लगेचच त्यावर उपाय सुचवतात. स्त्रीला फक्त त्याने सहानुभूतीने ऐकावे असे वाटत असते. याउलट, महिलांनी अनावधानाने सल्ला दिल्याने पुरुषांना ते हस्तक्षेप वाटू शकते.
असं असलं तरी, पुस्तकाचा सारांश असा आहे की हे फरक श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठतेचे लक्षण नाहीत, तर नैसर्गिक प्रवृत्ती आहेत. त्या समजून घेतल्यास आणि त्यांचा आदर केल्यास संघर्ष सोडवता येतो आणि नातेसंबंध अधिक मजबूत, अधिक प्रेमळ होऊ शकतात.
आजच्या आर्थिक जगात आर्थिक साक्षरता ही एक अत्यंत महत्त्वाचे जीवनकौशल्य बनले आहे. पैसे कमावणे जितकं महत्वाचं आहे तितकंच किंवा त्याहून थोडं अधिक महत्वाचं तो सांभाळणं आणि त्यात वाढ करणं त्यासाठी योग्य गुंतवणूक करणं महत्वाचं आहे पुरुष आणि स्त्रियांच्या आर्थिक साक्षरतेतील फरक आजही जगभरात आढळून येतो. जरी शिक्षण आणि कामाच्या संधींमध्ये गेल्या ३० वर्षांमध्ये कितीही प्रगती झाली तरीही हे अंतर कायम आहे. स्त्रिया पुरुषांप्रमाणे सक्षम नसल्यामुळे नव्हे, तर योग्य ती माहिती कमी मिळत असल्यामुळे जोखीम घेण्याची क्षमता कमी असते. आर्थिक व्यवहार ही केवळ पुरुषांच्ची जबाबदारी या त्यांच्या पारंपरिक अभिव्यक्तीतील तफावतीमुळे जागृती आणि आत्मविश्वास कमी पडतो. त्यांना त्याचा कमी लाभ मिळतो म्हणून हा फरक दिसतो.
सध्या परिस्थिती अशी आहे की, अनेक आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणांनी वारंवार दाखवले आहे की, महिलांची मूलभूत आर्थिक साक्षरतादायित्वता ही पुरुषांपेक्षा कमी आहे. उदाहरणार्थ, ‘आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य आणि विकास’ (OECD) च्या अलीकडील सर्वेक्षणात केवळ 30% महिलांनी आर्थिक साक्षरतेशी संबंधित प्राथमिक प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली याच प्रश्नांची 50% अधिक पुरुषांनी बरोबर उत्तरे दिली. 20% अधिक असलेले अंतर लवकरच अधिकाधिक कमी होण्याची आवश्यकता आहे. भारतासारख्या विकसनशील देशाची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. राष्ट्रीय वित्तीय शिक्षण केंद्राच्या आकडेवारीनुसार केवळ सुमारे 27% भारतीय स्त्रिया आर्थिकदृष्ट्या साक्षर आहेत, तर पुरुषांमध्ये हे प्रमाण साधारण 44% आहे. या भेदामगिल मुख्य कारणे अशी आहेत,
●सामाजिक पूर्वग्रह आणि भूमिका: अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक निर्णय घेण्याचे काम पुरुषांचे मानले गेले आहे. त्यामुळे कायमच महिला आर्थिक चर्चेत किंवा निर्णय प्रक्रियेत भाग घेणे टाळतात.
●व्यावसायिक आणि आर्थिक संस्थांशी अभाव: अनेक देशांतील स्त्रियांना बँक खाते, गुंतवणूक साधने किंवा इतर वित्तीय उत्पादने यांच्याशी कमी संबंध येतो. जनधन योजनेमुळे अनेक महिलांची खाती उघडली गेली त्याला अनेक दिवस होऊनही त्यांच्यामध्ये असलेला आत्मविश्वास कमी पडत असल्याने आजही त्या स्वतंत्रपणे व्यवहार करू शकत नाहीत.
●जोखमीबद्दल धोकादायक वृत्ती: आर्थिक शिक्षणाचा अभाव, सुरक्षितता महत्वाची वाटत असल्याने स्त्रिया सामान्यतः अधिक जोखीम टाळणाऱ्या गुंतवणूक पर्यायाकडे वळतात (जसे की बचत, फिक्स्ड डिपॉझिट, सोनं, स्थावर मालमत्ता) आणि उच्च जोखमीच्या साधनांकडे (जसे की शेअर्स, म्युच्युअल फंड) कमी आकर्षित होतात.
●उपेक्षित उत्पन्न आणि करिअर अंतर: लिंगभेदामुळे कमी वेतनामुळे उत्पन्नातील फरक आणि करियरमध्ये घ्यावा लागणारा ब्रेक त्यामुळे रोजगाराच्या संधींमध्ये तफावत निर्माण झाल्याने त्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध पैसा कमी असतो.
●गुंतवणूकातील फरक: आधी उल्लेख केल्याप्रमाणे पुरुष साधारणत उच्च जोखमीचे गुंतवणुक साधन स्वीकारतात तर स्त्रिया सुरक्षित गुंतवणुकीकडे अधिक वळतात. हा धोक्यापासून वळण्याचा चांगला मानस असला तरी, अत्यंत सुरक्षित गुंतवणूकीमुळे दीर्घकालीन मुदतीत महागाईवर मात करणारा परतावा मिळवू न शकल्याने त्यातून संपत्ती निर्माण होऊ शकत नाही.
●आत्मविश्वासाच्या अभाव: पुरुषांच्या तुलनेत महिला “मला हे कळत नाही” हे चटकन मान्य करतात.
आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल करताना स्त्री आणि पुरुष यांच्यातील मूलभूत भेद कमी करण्याचे काही प्रभावी उपाय असे आहेत
●लिंग-निष्पक्ष आर्थिक शिक्षण: शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुरुवातीपासून लिंगनिरपेक्ष आर्थिक शिक्षण अनिवार्य करणे, ज्यामुळे मुलींसह सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल.
●आर्थिक साक्षरतेच्या प्रशिक्षण कार्यक्रम:
★कामाच्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे.
★महिला गुंतवणूकदारांना समर्थन देणाऱ्या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास उत्तेजन देणे.
फिनटेक आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून सहज, सोपी व महिला गरजेनुसार डिझाइन केलेली उपकरणे उपलब्ध करणे.
★नीतीगत हस्तक्षेप: धोरणकर्त्यांकडून जसे
सरकारी संस्था बँका आणि अन्य वित्तीय संस्थांकडून स्त्रियांसाठी लक्ष केंद्रित धोरणे राबवणे जसे करात सवलती, सुलभ वित्त पुरवठा, युवती आणि महिलानी उभारलेल्या उद्योगधंद्यांना मदत करणारे कार्यक्रम राबवणे.
आर्थिक साक्षरता ही फक्त स्त्रियांची समस्या नाही, तर संपूर्ण सामाजिक आणि आर्थिक गरज आहे. महिला जेव्हा आर्थिक ज्ञान प्राप्त करतात आणि आर्थिक निर्णय घेतात, तेव्हा ते केवळ त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात सुधारणा करत नाहीत, तर कुटुंब, समाज आणि एकूण अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम करतात.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत, याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत.
लेखातील मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत)