मार्चएंड पूर्वी आयकरासंबंधित करायच्या १५ महत्त्वाच्या गोष्टी

Reading Time: 2 minutes

अर्जुन: कृष्णा, हा आर्थिक वर्ष २०१७-१८ चा शेवटचा महिना चालू आहे. सगळीकडे मार्चएंडची लगबग सुरु झाली आहे. तर ३१ मार्च पूर्वी करदात्याने काय करायला हवे?

कृष्णा: अर्जुना, सर्व करदात्यांसाठी मार्च महिना महत्वाचा आहे. आपल्या देशात एप्रिल ते मार्च हे आर्थिक वर्ष सर्व कर कायद्यांसाठी लागू होते. त्यामुळे लेखापुस्तके देखील एप्रिल ते मार्च याच कालावधीसाठी बनवली असतात. वर्षाखेर सर्व  समायोजन करावे लागते.

अर्जुन: कृष्णा, मार्चएंड पूर्वी करायच्या आयकराच्या १५ महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या?

कृष्णा: अर्जुना, मार्चएंड पूवी करायाच्या आयकराच्या १५ महत्त्वाच्या गोष्टी पुढीलप्रमाणे:

१. आर्थिक वर्ष २०१५-१६ आर्ण २०१६-१७ चे रिटर्न भरण्याची शेवटची संधी –जर करदात्याने आतापर्यंत आर्थिक वर्ष २०१५-१६ आणि २०१६-१७ चे आयकर रिटर्न भरले नसेल तर ते दाखल करण्याची शेवटची संधी ३१ मार्च पर्यंत आहे. त्यानंतर सदर रिटर्न दाखल करता येणार नाही.

२. नियोक्त्याला योग्य माहिती – पगारदार व्यक्तींनी गुंतवणुकीची व वजावटीची माहिती नियोक्त्याला द्यावी, ज्यामुळे मार्च महिन्याची करकपात कमी होईल.

३. अॅडव्हान्स टॅक्स पेमेंट – जर करदात्यांनी अडव्हान्स टॅक्स १५ मार्च पूर्वी भरला नसेल तर त्यांनी तो ३१ मार्च पूर्वी भरावा. त्यामुळे व्याज कमी लागेल.

४. फॉर्म २६ ए.एस. – प्रत्येक करदात्याने आयकराच्या साईट वरून फॉर्म २६ ए.एस. डाऊनलोड करून त्यातील झालेली करकपात तपासणे गरजेचे आहे. त्याचबरोबर एस.एफ.टी. व्यवहार जसे की रु. २ लाख पेक्षा जास्त म्युच्युअल फंड खरेदी, रु. १० लाखांपेक्षा जास्त रकमेची चारचाकी वाहनांची खरेदी, रु.५० लाखांपेक्षा जास्त रकमेची मालमत्तेची खरेदी विक्री, इ. व्यवहार २६ ए.एस. मध्ये परावर्तीत होत आहेत की नाही हे तपासून घ्यावे.

५. वजावटीसाठी गुंतवणूक – आयकरामध्ये कलम ८० अंतर्गत वजावट घ्यायची असेल तर प्रत्येक करदात्याने आयकरातील मर्यादा व त्याला लागणारा कर याची तपासणी करून ३१ मार्चपूर्वीच गुंतवणूक करावी.

६. ३१ मार्चपूर्वी एप्रिल ते फेब्रुवारीचे खर्चाच्या वरील टी.डी.एस. करावे नाहीतर ३०% खर्चाची वजावट मिळणार नाही.

७.प्रोजेक्टेड व कम्पॅरेटीव बॅलेन्सशीट व प्रॉफीट अँड लॉस अकाऊन्ट – करदात्याने व्यापाराची प्रोजेक्टेड व कम्पॅरेटीव बॅलेन्सशीट व प्रॉफीट अँड लॉस अकाऊन्ट तयार करावे, ज्यामुळे करदात्याला मागील वर्षात झालेली उलाढाल,  नफा–तोटा,  खर्च इ. समजेल. त्याचबरोबर रेशिओ सुद्धा तपासून घ्यावे.

८. रिकन्सिलिएशन – करदात्याने सर्व बँकांचे व लोन खात्यांचे मार्चअखेर रिकन्सिलिएशन करणे खूप महत्वाचे आहे.

९. स्टॉक तपासणी – सर्व करदात्यांनी मार्चअखेर स्टॉकची तपासणी करावी. त्याचबरोबर स्थावर मालमत्तेचीही तपासणी करावी आणि त्यांच्या पुस्तकी मूल्याबरोबर जुळणी करावी. जुळणी होत नसेल तर रिकन्सिलिएशन बनवावे.

१०. व्यापाऱ्यांसाठी प्रिझम्पटीव कराचा पर्याय – व्यापारी करदात्यांनी ३१ मार्चला एकूण उलाढाल मोजावी. जर उलाढाल रु. २ कोटी पेक्षा कमी असेल तर त्यांना ८% कर दराचा प्रिझम्पटीव कराचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु जर उलाढाल रु. २ कोटींपेक्षा जास्त असेल तर ऑडीट अनिवार्य आहे.

११. व्यावसायिकांसाठी प्रिझम्पटीव कराचा पर्याय – व्यावसायिकांनी देखील ३१ मार्चला एकूण प्राप्ती मोजावी. जर ती रु.५० लाखंपेक्षा कमी असेल तर त्यांना ५०% कर दराचा प्रिझम्पटीव कराचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु  जर एकूण प्राप्ती रु.५० लाखांपेक्षा जास्त असेल तर ऑडीट अनिवार्य आहे.

१२. वैधानिक देय ची वजावट – ज्या करदात्यांची कॅश बेसिसवर अकाऊंटिंग आहे व त्यांना वैधानिक देय ची वजावट घ्यायची असेल तर ३१ मार्च पूवी पेमेंट करून टाकावे.

१३.तोटा असल्यास देय तारखेपूर्वी रिटर्न – या आर्थिक वर्षात जर करदात्याला व्यापारामध्ये तोटा असेल तर त्याने रिटर्न देय तारखेपुर्वीच भरावे.

१४.शेअर्सवरील करपात्र एल.टी.सी.जी. – शेअर्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंडवरील एल.टी.सी.जी. हा १ एप्रिल पासून १० टक्क्याने करपात्र आहे. त्यामुळे जर करदात्यांना शेअर्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंडची विक्री करायची असेल, तर ३१ मार्च पूर्वी करावी.

१५. फॉर्म १५ जी/ एच – ज्या करदात्यांना फक्त व्याजाचे उत्पन्न आहे व ते करपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल, तर ते फॉर्म १५ जी/ एच मध्ये मॅन्युअली किंवा ऑनलाइन दाखल करू शकतात.

अर्जुन: कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा ?

कृष्ण: अर्जुना, करदात्याला वर्षाअखेरीस विविध करकायद्याचे पालन करावे लागते. त्याचबरोबर विविध करांसाठी लेखापुस्तकामध्ये तरतुदी कराव्या लागतात. अगोदरच टॅक्स प्लॅनिंग केल्याचा फायदाच होतो. म्हणून सर्व करदात्यांनी मार्चएंडची कामेसुरळीत पार पाडावीत.

(चित्र सौजन्य- https://goo.gl/n58LZ9 )

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!