म्युल_खाते
नोटबंदी आणि कोविड साथीचे संकट यामुळे कायकाय बरवाईट झालं याबद्दल वाद असू शकतात परंतु डिजिटल अर्थ व्यवस्थेला त्यामुळे गती मिळाली हे कोणीही नाकारू शकणार नाही. यापूर्वी डिजिटल व्यवहार करणारे लोक हे प्रामुख्याने जेन झी (इस 1997 ते 2010) आणि जेन अल्फा (2011 नंतर जन्मलेले) होते. आता जेन वाय आणि जेन एक्स ही मोठ्या प्रमाणात असे व्यवहार सफाईदारपणे करू लागले आहेत. एनसिपीआयची सातत्याने वाढणारी डिजिटल व्यवहाराची आकडेवारी हेच दर्शवत असून आता एकूण व्यवहारातील अर्ध्याहून अधिक व्यवहार ऑनलाइन पद्धतीने होत असावेत असा अंदाज आहे.
तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर त्यातील धोके वाढत आहेत. पूर्वी चोर खिशात असलेले पैशांचे पाकीट मारायचे आता तंत्रज्ञानाच्या मदतीने हेच लोक थेट बँक खात्यावरच डल्ला मारत आहेत. अशी फसवणूक प्रामुख्याने –
●एपिके फ्रॉड- यात प्रामुख्याने फसवण्यासाठी एसएमएस किंवा व्हाट्सअपद्वारे एपिके फाईल पाठवली जाते ती डाउनलोड झाली की फोन अथवा कम्प्युटरमधील आपल्या वैयक्तिक माहितीचा ताबा घेतला जातो.
●इनव्हेस्टमेंट फ्रॉड – यात अवाजवी नफ्याचे आश्वासन देऊन संभाव्य गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येते.
●डिजिटल अर्रेस्ट फ्रॉड – यात कोणत्यातरी कायदेशीर प्रकरणात अडकवून पैसे काढून घेतले जातात.
●जॉब ऑफर फ्रॉड – यात नोकरी देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून पैसे घेतले जातात किंवा त्यांचे बँक तपशील घेतले जातात आणि आर्थिक फसवणूक केली जाते.
●पार्सल डिलिव्हरी फ्रॉड – यामध्ये पार्सलमध्ये बेकायदेशीर वस्तू असल्याचे भासवून कायदेशीर कारवाई थांबविण्यासाठी पैशांची मागणी केली जाते.
●रोमान्स फ्रॉड – यात व्यक्तींशी ऑनलाईन भावनिक जवळीक वाढवून पैशाची मागणी करून आर्थिक फसवणूक केली जाते. बँक तपशील मिळवला जातो.
याशिवाय बोलण्यात गुंतवून ओटीपी मागणे, यूपीआयद्वारे पैसे पाठवतो सांगून ते मागवून घेणे, क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड याचे क्लोनिंग करणे आशा अनेक प्रकारचे फसवणूक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यावर कोणते उपाय योजावेत यासंबंधी जागृती केली जात असली तरी असे धंदे करणाऱ्या व्यक्ती नवनवीन कल्पक उपाय योजत असतात. त्यात केवळ अशिक्षित नव्हे तर उच्चशिक्षित लोकही फसतात. लोकांना कमी कष्टात किंवा काही न करता भरपूर पैसे हवे असतात त्यांच्या याच मानसिकतेचा फायदा घेतला जातो.
आपले सेविंग किंवा करंट खाते काही कालावधीसाठी तात्पुरते वापरण्यास देऊन त्यातील व्यवहारांच्या मोबदल्यात रक्कम देऊ करण्याचे प्रकार अलीकडे उघडकीस आले आहेत. रॅपिडो या ऑनलाइन ट्रान्सपोर्ट सर्व्हिस प्रोवायडरकडे कार्यरत असणाऱ्या एका ड्रायव्हरने उदयपूर येथील लग्नात एक कोटी रुपयांहून अधिक खर्च केला असल्याचे उघडकीस आलं आहे. अंबलबजावणी संचनालयाने दिलेल्या माहितीनुसार गुजरातमधील युवा राजकीय नेते आदित्य झा यांचे हे लग्न गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये झाले होते. या ड्रायव्हरचा वधूवरांशी कोणताही संबंध नव्हता. याच ड्रायव्हरच्या खात्यातून ऑगस्ट 2024 ते एप्रिल 2025 या कालावधीत 231 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार झाले होते. यातील रकमा अनेक संशयास्पद खात्यात वळवण्यात आल्या होत्या. असे गैरउद्योग करणारे लोक विविध पद्धतींचा अवलंब करतात आणि बेकायदेशीर रित्या जमा केलेले काळे पैसे रीतसर व्यवहारात आणून पांढरे करतात. पैशांचा खरा स्रोत लपवण्यासाठी आणि चौकशी टाळण्यासाठी अशा पद्धतीने आपल्या खात्याचा उपयोग कुणाकडून केला जात असेल तर त्याला म्युल अकाउंट किंवा मनी म्युल असे म्हणतात.
म्युल म्हणजे खेचर, गाढव आणि घोड्याच्या संकरातून निर्माण झालेला प्राणी ज्याचे काम ओझी वाहणे आणि चूक झाल्यास मार खाणे. अनेकदा या पद्धतीने व्यवहार करणारे वेगळेच लोक असतात ते लंपास केलेल्या रकमा विविध मध्यस्थातून जाऊन झटपट त्यांना कशा मिळतील यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात आणि स्वतःचे नेटवर्क तयार करतात आणि नामानिराळे राहतात. थोडक्यात दुसऱ्याचे ओझे (येथे पैसे) वाहून नेण्यासाठी या खात्यांचा वापर होतो त्याला कल्पनाही नसते. चुकले तर मालकाला नाही तर खेचारालाच फटके बसतात जवळपास तशीच अवस्था मनी म्युल धारक व्यक्तींची होते. आपले तगडे नेटवर्क करण्यासाठी धोकेबाज व्यक्ती योजित असलेले उपाय आणि त्यांची कार्यपद्धती अशी-
●भरती: घोटाळेबाज इ मेल, जॉब साईट, सोशल मीडिया माध्यमातून नोकरीचे आमिष दाखवून
●पैसे हस्तांतरण कार्य: बळी पडलेल्या व्यक्ती त्याच्या स्वतःच्या खात्यात आलेल्या पैशांचे सांगण्यात आलेल्या खात्यामध्ये हस्तांतरण करण्याचे काम देण्यात येते याबद्दल निश्चित पगार अथवा उलाढालीवर आधारित कमिशन देण्यात येते.
●गुन्हेगारी कारवायांशी संबंध: ऑनलाइन घोटाळे, फिशिंग अथवा अन्य सायबर गुन्ह्यांतून आलेले असतात आणि त्याचा मागोवा घेणे कठीण व्हावे या हेतूने झटपट वेगवेगळ्या खात्यात पाठवले जातात.
●कायदेशीर कारवाईची शक्यता: अशी खाती गुन्हेगारी कारवाया आणि चोरलेले पैसे यातील दुवा म्हणून कार्यरत असल्याने गुन्ह्यास मदत करण्याचा गुन्हा ठरतो. कायदेविषयक अज्ञान दाखवून त्याचे समर्थन करता येत नाही.
यामुळे हे सर्व टाळण्यासाठी सर्वांनीच सतर्क राहावं आणि खबरदारी बाळगावी.
●अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या पैशाच्या ऑफर्स टाळा, जर अशा व्यक्तीस आपण ओळखत असाल तर योजनेच्या कायदेशीरपणाची खात्री करून घ्या. तुमच्या ओळखीचा वापर करण्यासाठी पैसे देऊ करणाऱ्या लोकांपासून सावध रहा.
●नोकरीच्या किंवा अन्य कोणत्याही बहाण्याने तुमचे बँक तपशील, सिव्हीव्हीसह क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड क्रमांक, यूपीआय/ नेटबँकिंग पासवर्ड, पॅन आधार यासारखी वैयक्तिक माहिती कोणी मागत असेल तर ती देऊ नका.
●तरीही अशा घोटाळ्यात तुमचा चुकून सहभाग असल्याची खात्री पटल्यास बँकेस कळवा त्याचप्रमाणे संबंधित व्यक्ती बरोबर चालू असलेले व्यवहार पूर्णपणे थांबवा.
●अज्ञात व्यक्तींसाठी चेक किंवा कोणत्याही आर्थिक करारावर सही करू नका.
●संचारसाथीच्या अँप अथवा पोर्टलवर जाऊन आपल्या आदर तुमच्या नावाने जारी केलेले मोबाईल क्रमांक तपासा जर यातील कोणताही क्रमांक तुमच्या वापरात नसेल तर तो आपण निष्क्रिय करू शकतो.
अनेकदा स्वतःहून बँका एखाद्या खात्यात अचानक व्यवहारांचे प्रमाण वाढल्यास अशी खाती तात्पुरती स्थगित करतात आणि त्यांच्या चौकशीची शिफारस करतात. जर असे व्यवहार खरेखुरे असतील तर ते आपण बँकेस किंवा कोणत्याही तपास यंत्रणेस आपण सहज पटवून देऊ शकतो. कायदेशीरपणा असलेले व्यवहार करणे अधिक व्यवहार करणे हा गुन्हा नाही. तेव्हा कोणत्याही प्रकारे आपल्या खात्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी. “सावध तो सुखी” हे संतवचन लक्षात ठेवावं!
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत, याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत.
लेखातील मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत)