Reading Time: 4 minutes

37.अनुपम ओळख क्रमांक (UCC): भाग बाजारात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाला ब्रोकरकडून एक ओळख क्रमांक दिला जातो. यामुळे गुंतवणूकदाराची निश्चित ओळख पटते.त्याच्या नावाने व्यवहार नोंदवला जातो त्यावर लक्ष ठेवता येतं. यामुळे

  • व्यवहार पारदर्शक होतात आणि आर्थिक व्यवहारास सुरक्षितता लाभते.
  • नियमबाह्य व्यवहारांना आळा बसतो.
  • व्यवहाराची नोंद ठेवणे आणि त्यावर कर आकारणे सुलभ होते.

जेव्हा ब्रोकरकडे ट्रेडिंग खाते किंवा डिपॉझिटरीकडे डी मॅट खाते उघडण्यात येते तेव्हा हा क्रमांक गुंतवणूकदारास देण्यात येतो.व्यवहार करताना त्या क्रमांकाचा वापर केला जातो आणि त्याचा संदर्भ वापरून त्यांची नोंद केली जाते. याची माहिती बाजारास दिली गेल्याने त्या व्यवहारांवर बाजार नियंत्रकांना आणि नियमकाना लक्ष ठेवता येते. यासाठी बाजार मध्यस्थाना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अनुपम ओळख क्रमांकाचे गुंतवणूकदारांना होणारे फायदे-

  • सुरक्षित आणि पारदर्शक व्यवहार
  • सोपी प्रक्रिया
  • गैरव्यवहारांपासून मुक्तता.

38.ईसोप्स (ESOP) सार्वजनिक मर्यादित कंपनीने तिच्या कर्मचाऱ्यांना शेअर्स देण्यासाठी आणलेली ही योजना आहे. हे शेअर्स ठराविक कालावधीत पूर्वनिर्धारीत दराने कर्मचाऱ्यांना दिले जातात. कर्मचाऱ्यांना शेअर्स म्हणजेच पर्यायाने मालकी दिल्याने त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते, मनोबल उंचावते आणि आपुलकीची भावना वाढते.
ईसोप्स देण्यामागील हेतू:

  • स्टॉक ऑप्शन मिळाल्याचा परिणाम आणि मिळण्याच्या हेतूने कर्मचारी नोकरी सोडत नाहीत.
  • कंपनीची भरभराट होऊन स्टॉक ऑप्शन मधील शेअर्सचे भाव वाढावेत या हेतूने कर्मचारी अधिक आत्मियतेने काम करतात.
  • यामुळे कर्मचाऱ्यांना मालकी मिळते ते अधिक निष्ठावान बनतात आणि अधिक जबाबदारीने कार्य पार पाडतात.
  • नवीन कंपन्यांना कर्मचारी वर्गावर अधिक खर्च न करता स्टॉक ऑप्शन देणे अधिक किफायतशीर वाटते.

स्टॉक ऑप्शन कसे दिले जातात त्याची पद्धत-

  • कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना, विशिष्ट भावाने शेअर्स देण्यात येतील असा पर्याय उपलब्ध करून देते.
  • यासाठी विशिष्ट कालावधीतच ते घ्यावे येतात.
  • या कालावधीत ठरलेल्या भावाने कर्मचारी पूर्वनिर्धारीत किमतीला शेअर्स खरेदी करतात.
  • त्याचा मुदतबंद कालावधी संपल्यावर कर्मचारी ते बाजारात बाजारभावाने विकू शकतात.

स्टॉक ऑप्शन संबंधातील महत्वाचे मुद्दे:

  • स्टॉक ऑप्शन हे पूर्वनिर्धारीत किमतीला दिले जातात.
  • हे निर्धारित केलेल्या कालावधीत (सध्या हा कालावधी एक वर्षाचा आहे) घ्यावे लागतात.
  • ज्या किमतीस ते दिले जातात त्यास स्टाईक प्राईज असे म्हणतात.
  • तर घेण्याच्या कालावधीस एक्सरसाईज पिरियड म्हणतात.
  • कालावधीतील शेवटच्या दिवसास एक्सपायरी डेट म्हणतात.
  • ते देताना सेबी कायदा, कंपनी कायदा आणि आयकर कायदा यांचा संबंध येतो.
  • हे शेअर्स घेण्याचे कर्मचाऱ्यांच्यावर बंधन नसते.

स्टॉक ऑप्शनमधील जोखीम:

  • बाजारात शेअर्सचे भाव घेतलेल्या किमतीपेक्षा कमी असतील तर विकताना तोटा होऊ शकतो.
  • शेअर्सचे पैसे आधीच द्यावे लागतात.
  • विकल्यावर ते आयकर कायद्याच्या कक्षेत येतात.

39. प्राधान्यभाग (Rights share): सर्वसाधारण जनतेला शेअर्स देण्याऐवजी सध्या असलेल्या शेअर्सहोल्डरकडूनच अधिक भागभांडवल उभे करण्याचा प्रकार आहे. यात विद्यमान भागधारकांना अधिकचे समभाग दिले जातात त्यांची किंमत बाजार भावापेक्षा कमी असते. यामुळे कंपनीच्या भागधारकांच्या टक्केवारीत फरक न पडता जास्तीचे भांडवल जमा होते.
कंपनीने प्राधान्यभाग जारी करण्याची कारणे:

  • विस्तार योजनांसाठी लागणारे पैसे उभे करणे अन्य कंपनीचे अधिग्रहण करणे.
  • आधी घेतलेल्या महागड्या कर्जाची परतफेड करणे.
  • कर्ज न घेता खेळत्या भांडवलाची सोय करणे.
  • बाजार अनिश्चिततेवर मात करणे.

प्राधान्यभाग देण्याची कार्यपद्धती:

  • ते मूळ शेअर्सच्या प्रमाणात दिले जातात.
  • एका विशिष्ट दिवशी जे भागधारक आहेत त्यांनाच ते दिले जातात.
  • शेअर होल्डरनी ते घ्यावे या हेतूने त्यांची किंमत बाजारभावापेक्षा कमीच असते.
  • विद्यमान धारक ते खरेदी करू शकतात. खरेदी करण्याचे हक्क दुसऱ्यास देऊ शकतात किंवा त्याकडे दुर्लक्षित करू शकतात.
    प्राधान्यभागांचे नियमन आणि नियंत्रण कंपनी कायदा आणि सेबी कायदा याद्वारे केले जाते.राईट शेअर्समध्ये भागधारकांनी गुंतवणूक करण्याचे टप्पे:
  • गुंतवणूकदराने किती तारखेस किती शेअरमागे किती शेअर्स मिळतील त्याची नोंद तारीख (रेकॉर्ड डेट) घेऊन पात्रता निश्चित होते.
  • यानंतर यासंबंधातील देकार भागधारकांना पाठवला जातो.
  • यातील तपशील पाहून भागधारक,देऊ केलेले सर्व शेअर्स घेतील, सोडून देतील, दुसऱ्याला विकतील.
  • जर गुंतवणूक करणार असेल तर ASBA पध्दतीने मागणी नोंदविला जाईल.
  • वाटप झाल्यावर भागधारक ते शेअर्स स्वतःकडे ठेवू शकतात अथवा बाजारात विकू शकतील.

राईट शेअर्सचे गुंतवणूकदारास होणारे फायदे आणि तोटे:
फायदे-

  • कमी बाजारभावाने शेअर्स मिळण्याची शक्यता.
  • ब्रोकरेज आणि अन्य खरेदी खर्चात बचत होते.
  • भागधारकांची कंपनीतील टक्केवारी तशीच टिकून राहते.

तोटे-

  • कंपनी आर्थिक अडचणीत असेल तर नव्या भाग भांडवलामुळे कंपनीचे बाजारमूल्य कमी होते.
  • विद्यमान धारकांनी राईट शेअर्स न घेतल्यास त्यांची कंपनीतील हिस्सेदारी कमी होते.

40. शेअर्सची पुनर्खरेदी (Buyback of Shares): शेअर्सची पुनर्खरेदी म्हणजे कंपनीने विद्यमान भागधारकाकडून खरेदी करणं. यामुळे बाजारात खरेदी विक्री करण्यासाठी उपलब्ध असलेल्या शेअर्सच्या संख्येत घट झाल्याने मागणी वाढली तर पुरवठा कमी पडतो आणि त्यामुळे बाजारातील भावात वाढ होते. अधिकाधिक भागधारकांनी त्यात भाग घेऊन शेअर्स विकावेत म्हणून त्यांची किंमत बाजारभावाहून अधिक असते.

कंपनीद्वारे शेअर्स पुनर्खरेदी करण्याची कारणे-

  • शेअरचे बाजारमूल्य वाढण्यासाठी,
  • अतिरिक्त रकमेचा योग्य वापर होण्यासाठी,
  • कंपनीचे अधिग्रहण अन्य कोणी करू नये यासाठी.
  • प्रवर्तकांची टक्केवारी वाढवण्यासाठी.

पुनर्खरेदी करण्याची पद्धती: दोन प्रकारे होते

  • टेंडर ऑफर: या पद्धतीत निश्चित दराने भागधारकाकडून निश्चित केलेल्या किमतीस शेअर्स खरेदी केले जातात. खरेदीदर बाजारभावाहून अधिक असतो. यातील 15% भाग छोटे भागधारक ज्यांच्याकडे असलेल्या शेअर्सचे बाजारमूल्य 2 लाखांहून कमी असते त्याच्यासाठी राखीव ठेवला जातो.
  • बुक बिल्डिंग प्रोसेस : या पद्धतीत शेअर्स आधी निश्चित केलेल्या दर मर्यादेत बाजार सुरू असताना केले हातात.बाय बॅक नियमन: या प्रक्रियेचे नियमन सेबीकडून केले जाते. त्यासंबंधीची मार्गदर्शन क तत्वे अशी:
  • कंपनी भांडवलाच्या आणि गंगाजळीची 25 % हून अधिक शेअर पुनर्खरेदी करू शकत नाही.
  • 10% पर्यत खरेदी संचालक मंडळाच्या मान्यतेने आणि त्याहून अधिक खरेदी भागधारकांच्या संमतीने केली जाते.
  • यासंबंधातील माहिती एक इंग्रजी आणि एक स्थानिक वृत्तपत्रातून जाहीर केली जाते.
  • खरेदीसाठी मंजुरी मिळवल्यावर एक वर्षाच्या आत पूर्ण करावी लागते.
  • खरेदी केलेले शेअर्स रद्द होतात.

बाय बॅक मधील महत्वाच्या संकल्पना:

  • टेंडरिंग शेअर्स: खरेदी करण्यासाठी कंपनीस देऊ केलेले शेअर्स.
  • रेकॉर्ड डेट: ही एक अशी तारीख आहे ज्या दिवशी शेअर्स धारण करणाऱ्या सर्वाना खरेदीची ऑफर दिली जाते.
  • किंमत तुलना: खरेदी किंमत आणि बाजारभाव यातील फरक.
  • अकॅसेपनस रेशो: शेअर्स खरेदी होण्याची शक्यता दाखवणारे गुणोत्तर, बाकी शेअर्स धारकास परत केले जातात
  • पेमेंट आणि सेटलमेंट: स्वीकारले गेलेले शेअर्सचे पैसे मिळतील आणि बाकी शेअर्स धारकास परत केले जातील.

बायबॅकमुळे गुंतवणूकदारास मिळणारे फायदे तोटे:
फायदे:

  • शेअर्सची चांगली किंमत मिळते.
  • शेअर्सचा बाजारभाव वाढण्याची शक्यता असते.

तोटे:

  • सर्व शेअर्स स्वीकारले जाण्याची शक्यता नसते.
  • बाजारभाव नंतर कमी होऊ शकतो. (अपूर्ण)

सेबीच्या सारथी या अँपवर उपलब्ध माहितीचा भावानुवाद.
उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत.
लेखातील मते वैयक्तिक असून ती गुंतवणूक शिफारस नाही याची नोंद घ्यावी)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…