Reading Time: 5 minutes

शेअर बाजारातून चांगले रिटर्न्स मिळतील का?

बाजारात गुंतवणुक करावी का? असे प्रश्‍न मला वारंवार विचारले जातात. मी भगवान बुद्धांएवढा स्थितप्रज्ञ व तत्त्वचिंतक नसल्याने कधी हसून तर कधी वैतागून उत्तर देत असतो आणि तेही वेगवेगळे नव्हे, तर एक आणि एकच. ते म्हणजे… होय, दीर्घकालीन गुंतवणुकीकरिता शेअरबाजारास पर्याय नाही!!!

लेखक माल्कम ग्लॅड्वेल यांनी आपल्या ‘Outliers’ पुस्तकांत ‘१०,००० hours rule’ अशी एक संकल्पना मांडली, ज्यानुसार एखाद्याने कोणत्याही गोष्टीकरिता आपले १०,००० तास खर्च केल्याशिवाय त्याला त्या गोष्टीत प्रावीण्य मिळत नाही… या न्यायाने तर मी एव्हाना बाजाराविषयक सर्वज्ञच असावयास हवे, पण एवढे मात्र खरे, की कोणास ज्ञान देणे वा ‘यशोकथा’ सांगणे नाही. पण उपयुक्त ठरावे असे काही अनुभव सांगण्याची माझी पात्रता असावी असे मी मानतो. आणि प्रसंग व्यक्तिगत स्वरूपाचे आहेत हे मान्य करूनही, त्यातील तर्क महत्त्वाचे व आजही लागू असल्याने येथे ते देण्याचे धाडस करतो आहे.

सन १९९१मध्ये महाविद्यालयीन शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत गेल्यावर माझा या जादूई अर्थविश्वाशी संबंध आला. बाजारांत दररोज उलाढाली करणारा, सकाळच्या ९.०१च्या फास्ट गोरेगांव लोकलमधील एक समवयस्क गुजराथी तरुणांचा ग्रुप… त्यांच्यामुळे खरे तर मी या वाटेकडे आकर्षित झालो. अर्थात वातावरणात हर्षद मेहता नावाची तगडी चुंबकीय शक्तीही होतीच. मनाचा हिय्या करून एके दिवशी जीजीभॉय टॉवर्सच्या लिफ्टमध्ये शिरलो. तेव्हा तेराव्या मजल्याच्या क्रमांकाऐवजी फक्त ‘…’ असे लिहिलेले, ही त्या गर्दीमध्येही मनांत नोंदली गेलेली पहिली गोष्ट!! पुढे प्रामुख्याने BSES (आत्ताची रिलायन्स इन्फ्रा), SBI, बिनानी झिंक अशा शेअर्सच्या नवीन इशुजमधून फायदा मिळवला. मात्र ह्या क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून पाहायला लागलो ते पुण्याला सुदर्शन केमिकल्स लि.मध्ये नोकरीला लागल्यावरच. सुरुवातीस तेथेही निवडक IPOमध्ये सहकार्‍यांना अर्ज करायला लावणे, हाच माझा प्राधान्यक्रम होता.

१९९९मध्ये पुण्याच्याच ‘KPIT Infosystems Ltd’ने ९० रु. किमतीने IPO जाहीर केला. मी ही एक चांगली संधी आहे याची खातरी असल्याने सुदर्शनमधील माझ्या वरिष्ठांकडून अर्ज भरून घ्यावे या विचारात होतो. दुपारीच आमच्या कंपनीतील पाचसहा मॅनेजर्स कॉफी मशीनजवळ गप्पा मारताना मला दिसले. कंपनीतील वातावरण तसे खेळीमेळीचे व अगदी अनौपचारिक असे. मी ही संधी साधून तेथे पोहोचलो आणि हळूच विषय काढला. आमच्या EDP विभागाचे प्रमुख आणि तीव्र बौद्धिक क्षमता असलेले एक व्यवस्थापकही तेथे होते. त्यांनी मला प्रश्न विचारला, “साहेब (?), आपल्याला काय माहिती आहे या कंपनीचे कामकाज आणि त्याचा दर्जाबद्दल? मी चाचरत काहीतरी पुटपुटलो. तो जमानाच असा होता की Information technology वा Computers याबद्दल मलाच काय, माझ्या वरिष्ठांनाही क्वचितच माहिती होती. झाले; पुढची १०-१५ मिनिटे झाडाझडती होऊन ही कंपनी कशी दुय्यम आणि सुमार दर्जाची कामे करते हे विस्ताराने सांगितले गेले. मी द्विधा मनाने माझ्या टेबलाशी आलो. मात्र संध्याकाळी सकाळचा प्रसंग आणि माझ्या मनातील घालमेल माझ्या व्यवसायांतील एक जेष्ठ मार्गदर्शक व्यक्तीला सांगितली आणि ‘अर्ज करू की नको?’ असा सल्ला विचारला. ते हसले आणि म्हणाले, “XX सर या विषयांत ‘Last word’ आहेत याबद्दल वाद नाही. सबब, ते म्हणतात हे खरेच असले पाहिजे. पण तुला एक सांगतो, या शेअरला भाव किती मिळायला हवा हे सरांसारखे विद्वान नाही, तर तू, मी, तुझे मित्र यांच्यासारखे सामान्य लोक ठरवणार आहेत. जसे हे बघ ना… मी येथे प्रभात रोडला राहतो, अगदी लिज्जत पापड बनविणार्‍या कारखान्यासमोर, साहजिकच ‘अतिपरिचयामुळे’ म्हणा, किंवा तोच तोच गंध सतत आल्याने म्हणा… आम्ही ते पापड कधीही खात नाही. पण म्हणून कंपनीचा खप कमी झालाय का? तेव्हा खुशाल अर्ज कर…” मी आश्वस्त होऊन अर्ज केले. त्यातही नशिबाचा भाग म्हणजे या इशुला ४० पट अधिक प्रतिसाद मिळूनही मला हे शेअर्स मिळाले आणि ९० रु.ला मिळालेले शेअर्स २०० रु.च्या पलीकडे विकून मी घरांतील फर्निचर केले.

२००३मध्ये जेव्हा ‘मारुती लि.’चा पब्लिक इशु बाजारात आला, तेव्हा आलेला अनुभव मात्र एकदम उलटा होता. ह्या इशुचे फॉर्म्स घेऊन मी काही निवडक क्लायंट्सकडे जायचो आणि ‘बघा… चांगली कंपनी आहे’ वगैरे पोपटपंची करायला सुरुवात करायचो. तोच, ज्या कोणा साहेबांकडे मारुतीची गाडी असायची, ते मलाच उलट ती गाडी किती चांगली चालते, रिलायबल कशी आहे, कोणताही त्रास नाही इ. गोष्टी सांगायचे, ‘…अर्ज करायलाच हवा’ असे म्हणून फॉर्म भरायचे.

हा प्रकार पाहून मीही ओढून ताणून चंद्रबळ आणले आणि चक्क ओव्हरड्राफ्ट वापरून मोठ्या रकमेचा अर्ज भरला. सांगावयास आनंद वाटतो की, मारुती ८०० नव्हे, पण एखादी उत्तम टु-व्हीलर घेता येईल एवढा फायदा महिनाभरातच झाला.

(केवळ माहितीसाठी- त्या वेळी अर्ज केलेल्या जवळपास प्रत्येकाला मारुतीचे शेअर्स फक्त रु. १२५मध्ये मिळाले होते. मध्यंतरीचा भाव रु. ४७००+ होता.)

IPO पुराणामधीलच मला हटकून आठवणारी आणखी एक गोष्ट सांगतो…..

२९ जुलै हा उद्योगक्षेत्रांतील ध्रुवतारा भारतरत्न श्री. जे.आर.डी. टाटांचा जन्मदिवस, आणि माझ्या कन्येचाही… सन २००४मध्ये हा मुहूर्त साधून टाटा समूहातील सर्वांत मोठी कंपनी TCSने आपला बहुचर्चित पब्लिक इशु बाजारात आणला. मी माझी, कुटुंबातील सदस्यांचे वाढदिवशी खरेदी करावयाची पद्धत म्हणून TCSसाठी दोन वेगळे अर्ज भरले. त्याचबरोबर व्यवसायाचा एक भाग म्हणून नामांकित असलेल्या माझ्या ‘एक्स-बॉस’कडेही पोहोचलो. “या… प्रसाद या, इकडे कसे काय? कसे काय चाललेय?” सरांनी मिठ्ठासपणे चौकशी केली. (सर कधीच कोणाचाही उल्लेख एकेरीने करीत नसत, अगदी ज्युनिअरचाही) मी लगेच TCSच्या फॉर्म्सचे भेंडोळे काढून त्यांना अर्ज करण्याची विनंती केली. थोडेसे विचारमग्न झाल्याचे दाखवत साहेबांनी विचारले, “किती रुपयाला आहे हो एक शेअर?”

“९००ला सर” मी म्हणालो.

“१० रु.चा एक शेअर ९०० घ्यायचा?” साहेब.
“नाही सर, शेअर १० रु.चा नाही, एक रु.चा आहे,” मी मध्येच त्यांचा गैरसमज दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. (खरे तर मार्केटिंग कसे करू नये याचा उत्तम नमुनाच सादर केला!) “अहो, काय सांगताय काय? इथे आम्ही नेहमीपेक्षा २-५ रु. जास्त नफा घ्यायला गेलो, तर बाजारात कोलाहाल होतो आणि कोण घेणार हो १ रु.चा शेअर ९००ला? असे सल्ले देताना नीट अभ्यास केला आहे ना तुम्ही? लक्षात ठेवा, नवीनच आहात तुमच्या व्यवसायांत अजून… एवढ्या महाग किमतीला या शेअरसाठी अर्ज करण्याचा माझा बिलकुल विचार नाही. आणि तुम्हीही जरा सावधपणेच करा…” साहेबांनी माझ्याबद्दलच्या काळजीपोटीच सल्ला दिला.

अर्थात मी ‘बाबा वाक्यं.. बॉस वाक्यं प्रमाणम्…’ विचारसरणी मानणारा नसल्याने दोन अर्ज केलेच आणि मला ३५ शेअर्सही मिळाले. ८५० रु.ला मिळालेल्या या शेअरने पहिल्याच दिवशी बाजारांत जवळपास १२००रु.चा भाव दाखवला. नंतर मिळालेला एकास एक बोनस लक्षात घेता २००४ साली गुंतविलेल्या उण्यापुर्‍या ३०,००० रुपयांचे कालचे बाजारमूल्य रु. ३,५०,०००पेक्षा अधिक आहे. आणखी एक सांगावयाची गोष्ट म्हणजे, गेल्या ५ वर्षांत या कंपनीने कधीही २०००%पेक्षा कमी (होय २०००%च) डिव्हिडंड दिलेला नाही.

अर्थात केवळ IPOच्याच माध्यमातून फायदा मिळवता येतो असे मात्र बिलकुलच नाही. किंबहुना ‘वाट पाहीन पण IPOनेच कमवीन’ असे असण्याचे अजिबात कारण नाही.

मध्यंतरी सोशल मिडियात विप्रो कंपनीचे १९८० साली घेतलेले १०० शेअर्स बोनस व स्प्लिट्समुळे ९६,००,००० एवढे वाढून मूळ १०,००० रु. गुंतवणुकीचे मूल्य ३० वर्षांत (२०१० साली) ४५५ कोटी झाले अशी एक पोस्ट फिरत होती. आणि ही अन्य अनेक पोस्टप्रमाणे अफवा वा अतिशयोक्ती नव्हती, तर वस्तुस्थिती होती!

कॅस्ट्रॉल या (आता डीलिस्ट झालेल्या) कंपनीने १९९०-२०१२ दरम्यान तब्बल दहा वेळा बोनस दिले. ‘मदरसन सुमी लि.’ ही अशीच एक कंपनी, जिने १९९७-२०१५ या काळात सात वेळा बोनस शेअर्स वाटले. इन्फोसिसनेही बोनसवाटपाची अशीच चमकदार कामगिरी आजपर्यंत सात वेळा केली आहे. ITCने १९७८पासून सात वेळा, तर कोलगेट(ई)ने १९८२पासून सहा वेळा बोनस शेअरची भेट दिली. आणि या प्रत्येकाने याशिवाय दरवर्षीचा घसघशीत लाभांश दिलाच आहे.

जाता जाता… ‘एशियन पेंट्स’च्या ताज्या वार्षिक अहवालात लिहिल्याप्रमाणे १९८३ साली घेतलेल्या एका शेअरचे १८४ शेअर्स झाले आहेत. आणि या काळात गुंतवलेल्या १०००रु.चे मूल्य ३१ मार्च २०१५ रोजी रुपये ६५,००,०००च्या आसपास आहे. यादी खूप मोठी आहे. विस्तारभयास्तव आटोपतो.

एकदा एका भल्या पहाटे एक निरीश्वरवादी तरुण गौतम बुद्धांची भेट घ्यायला आला. त्याला पाहताक्षणीच बुद्धांनी तो काय विचारणार हे ओळखले होते. त्याने बुद्धांना ‘तो’ नेहमीचा प्रश्‍न विचारला, “ईश्वर खरेच आहे का?” “होय, आहे…” उपासनामग्न बुद्ध शांतपणे उत्तरले. तो निघून गेला. नंतर एके दिवशी एक पापभीरु सज्जन बुद्धांना नेमका हाच प्रश्न विचारते झाले, “खरेच ईश्वर आहे का?” यावेळी मात्र बुद्धांनी तितक्याच तटस्थपणे उत्तर दिले, “नाही…” हे सज्जनही विचारमग्न होऊन निघून गेले. पुढे काही दिवसांनी आणखी एक भाविक बुद्धांना म्हणाला, “महात्मन्, मी गोंधळून गेलो आहे, अनेक जण असे मानतात की परमेश्वर नाहीच मुळी. उलट, बरेच लोक परमेश्वरावरच प्रगाढ विश्वास ठेवतात. आपल्याला काय वाटते? तो आहे की नाही? कृपया मला मार्गदर्शन करावे…”

यावर भगवान बुद्धांनी आपल्या अर्धोन्मीलित डोळ्यांतून त्या साधकाकडे पाहत एक प्रसन्न मंदस्मित केले, आशीर्वाद दिला आणि काहीही न बोलता ते दुसर्‍या भिक्षूकडे वळले. बुद्धांनी उच्चारलेला शब्दन् शब्द लक्षपूर्वक ऐकणार्‍या त्यांचा एका पट्टशिष्याला मात्र राहवले नाही आणि सावकाशीने या तीनही प्रसंगांची आठवण बुद्धांना देत त्याने विचारले, “भगवान, तीन साधकांना तीन वेगळी उत्तरे? आपण असे का केलेत?” यावर हसून भगवान म्हणाले, “अरे, मी काहीही वेगळे केलेले नाही. उत्तरांचे बाह्यस्वरूप वेगळे असेलही; पण हेतू एकच आहे. प्रत्येकाला त्यांच्या कोषांतून बाहेर काढून विचार करण्यास प्रवृत्त करणे, जेणेकरुन ते माझ्यासारख्या त्रयस्थाऐवजी स्वत:च सत्याचा अनुभव घेऊ शकतील.”

सांगावयाचा मुद्दा हा, तुम्ही भगवान बुद्ध असा की माझ्यासारखा सामान्य पामर, काही प्रश्नच असे असतात की जे तुम्हाला वारंवार विचारले जातात. रोज प्रात:समयी अतीव प्रेमाने विचारला जाणार्‍या ‘इतका वेळ त्या पेपरांत डोळे खुपसून काय वाचतोयस?’ अशा केवळ दुर्लक्षिण्यायोग्य प्रश्नांबरोबरच व्यवसायानिमित्ताने ‘शेअर बाजारातून चांगले रिटर्न्स मिळतील का?’, ‘बाजारांत गुंतवणूक करावी का?’ असे प्रश्न मला वारंवार विचारले जातात. मी भगवान बुद्धांएवढा स्थितप्रज्ञ व तत्त्वचिंतक नसल्याने कधी हसून तर कधी वैतागून उत्तर देत असतो आणि तेही वेगवेगळे नव्हे तर एक आणि एकच. ते म्हणजे, ‘होय, दीर्घकालीन गुंतवणुकीकरीता शेअरबाजारास पर्याय नाही!’

अर्थात पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे मी स्वत:ला गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ वगैरे अजिबातच समजत नाही. मात्र माझ्यापुरत्या आखलेल्या भविष्यदिशा थोडक्यांत पुढीलप्रमाणे सांगता येतील.- (१) Will not invest for short term. Will not save for long term… (२) बाजारांत नियमितपणाने गुंतवणूक करेन (३) शेअरबाजारात गुंतवणुकीची सुरुवात करण्यापूर्वी किमान सहा महिने पुरेल एवढा आणीबाणी निधी बाजूला ठेवेन (४) केवळ पूर्ण माहितीवर आधारित निर्णयच घेईन, भावनावश होऊन वा घाईगडबडीने व्यवहार करणार नाही (५) उपलब्ध पर्यायांची सखोल माहिती घेईन. उदा. फिक्स डिपॉझिट ऐवजी लिक्विड फंड्स वा टॅक्स वाचविण्याकरीता ELSS…

चार्ल्स डार्विनने म्हटले आहे की, “It is NOT the strongest of the species that survives, NOR the most intelligent, but the ones most responsive to change.” तेव्हा बदल घडविणे अपरिहार्य आहे. तर उशीर कशाला? चला, येत्या नव्या संवतापासूनच बदलाला सामोरे जाऊ या!!!

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…