कर्ज मिळवणे ही बाब मागील काही वर्षात खूप सोपी झाली आहे. कर्ज घेण्यासाठी लागणारे कागदपत्रं डिजिटल पद्धतीने देण्याची सोय झाल्याने बँक आणि अर्थसंस्थांमार्फत कर्ज वितरण होण्याची रक्कम ही आता कितीतरी पटीने वाढली आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, तीन महिन्यांचं बँक खात्याचा तपशील, विडिओ केवायसी सारख्या कमीत कमी गोष्टींची शहानिशा करून कर्जाची रक्कम झटपट अर्जदाराच्या बँक खात्यात जमा करणे ही कर्ज वितरणाची आधुनिक पद्धती आहे. पण, ज्या गतीने कर्ज घेणं हे सोपं होत आहे त्याच गतीने धोका देणारे लोक सुद्धा हुशार होत आहेत. लोकांच्या कागदपत्रांची, सहीची डिजिटल प्रत स्वतःकडे जमा करून ठेवणे, लोकांच्या नावाने खोट्या कर्जाचा अर्ज भरणे आणि लोकांची फसवणूक करणे असे कित्येक प्रकरण मधल्या काळात समोर आली आहेत.
आपल्या नावाने दुसऱ्याच व्यक्तीने कर्ज घेतलं आहे हे काही लोकांच्या त्यावेळी लक्षात येतं जेव्हा समोरची व्यक्ती ते कर्ज फेडत नाही, ईएमआय बाऊन्स होतो आणि उर्वरित कर्ज फेडण्यासाठी जेव्हा तुमच्या मागे लागते.
कोणत्या परिस्थितीत तुमच्या नावाने इतर व्यक्ती कर्ज घेऊ शकते ?
- प्रत्येक कर्ज वितरणाची प्रक्रिया ही अर्जदाराच्या ‘पॅन’कार्डच्या आधारे तपासली जाते. जर एखाद्या अर्थसंस्थेने कर्ज वितरणाआधी ‘पॅन’कार्ड तपासणी केली नाही तर तुमच्या नावाने इतर व्यक्तीला कर्ज मिळण्याची सर्वाधिक शक्यता असते. तुमच्या ‘पॅन’कार्डची सही केलेली सत्यप्रत तुम्ही कोणाला देत आहात ? यावर प्रत्येकाने नेहमीच लक्ष दिलं पाहिजे.
- तुमचं ‘पॅन’कार्ड आपल्या कर्जासोबत जोडून देखील काही व्यक्ती अधिक कर्ज घेऊ शकते. तुम्ही जर एखाद्या कर्जाचे दुय्यम कर्जदार म्हणजेच ‘को-ऍप्लिकेंट’ असाल तेव्हा सुद्धा ही शक्यता सर्वाधिक असते. हे कर्ज तुम्ही न भरल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होण्याची शक्यता देखील असते.
तुमच्या नावावर इतर व्यक्तीने कर्ज घेतलं आहे की नाही ? हे कसं तपासावं ?
- तुमचा क्रेडिट स्कोअर ठराविक अंतराने तपासत राहून आपण ही फसवणूक होण्यापासून रोखू शकतो. आपला क्रेडिट रिपोर्ट दर महिन्यात तपासून आपण तुम्ही काढलेलं कर्ज, त्याची राहिलेले हफ्ते, व्याज यांची शहानिशा केली पाहिजे.
- तुमच्या नावाने जर इतर व्यक्तीने कर्ज मिळवलं असेल किंवा कर्जाचा अर्ज जरी भरला असेल तरीही तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये तुम्हाला ते दिसू शकतं.
फसवणुकीची तक्रार कशी करावी ?
- आपल्या नावावर इतर व्यक्तीने कर्ज घेतल्याची शंका जरी आली तर क्षणाचाही विलंब न करता त्या कर्जाची पूर्ण माहिती काढून घ्यावी. तुम्ही जितका जास्त उशीर कराल, तितकं नुकसान वाढण्याची शक्यता अधिक असते.
- एका व्यक्तीने त्याच्या अकाउंटवर दुसऱ्या व्यक्तीने कर्ज घेतल्याची तक्रार त्वरित बँकेत त्वरित केल्यास ते कर्ज रद्द करण्याचा अधिकार बँकेकडे असतो. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीची माहिती बँकेला दिल्याने एक जागरूक नागरिक म्हणून तुमचा क्रेडिट स्कोअर सुद्धा वाढत असतो.
- तुमच्या नावाने झालेली फसवणूक नोंदवण्यासाठी आपण बँक अधिकारी, ग्राहक मंच न्यायलयात किंवा सायबर क्राईम मध्ये सुद्धा तक्रार करू शकतात. आपल्यासोबत झालेल्या या धोक्याची माहिती सर्वात आधी कर्ज दिलेल्या संबंधित बँकेला द्यावी जेणेकरून तुमचा ‘क्रेडिट अभ्यास’ बँक त्वरित करेल आणि कारवाई करण्यास सुरुवात करेल.
आपल्या नावाने जर इतर व्यक्ती कर्ज घेऊ शकत असेल तर जितकी चूक बँकेची किंवा यंत्रणेची आहे तितकीच ती तुमची देखील असते. कारण, अनावधानाने का होईना पण आपले महत्वाचे कागदपत्र चुकीच्या हातात पडू देऊ नयेत हे बँक आपल्याला नेहमीच सांगत असते. तरीही आपल्याकडून ही चूक झालीच तर संयम बाळगावा आणि बँकेला त्यांच्या चौकशीत पूर्ण सहकार्य करावं.