शेअर बाजार कामकाजाची वेळ
मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजार हे खऱ्या अर्थाने भारतात सर्वदूर पोहोचलेले शेअर बाजार. आपल्या विविध मध्यस्थामार्फत देशभरात प्रमुख ठिकाणी यातील दलालांच्या फ्रेंचायसीज आहेत. याशिवाय अनेकांनी उपलब्ध करून दिलेली मोबाइल अँप्स आणि डिस्काऊंट ब्रोकर्सनी दिलेल्या सुविधेमुळे, जगभरात कुठूनही येथे व्यवहार करता येणे शक्य आहे.
- सेबीची स्थापना तिला मिळालेले सर्वाधिकार, त्याचा वापर करून बाजारात अनेक सुधारणा होऊन व्यवहार करणे अधिक सुलभ पारदर्शक झाले.
- मेट्रोपोलियन स्टॉक एक्सचेंजने (MSEI) आपल्या कामकाजाची वेळ काही महिन्यांपूर्वी सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 अशी केली.
- या बाजारात व्यवहार योग्य (Permitted Securities) अशा 1800 कंपन्या असल्या तरी नोंदणी (Listed Securities) केलेल्या कंपन्या मोजक्याच असून उलाढाल नगण्य आहे, त्यामुळे या बाजाराची वेळ वाढल्याने फारसा फरक पडलेला नाही तरीही या निमित्ताने बाजार कार्यकाळ वाढवल्याचे / न वाढवल्याचे परिणाम काय होऊ शकतील याच्या चर्चेला जोर आला.
- त्यातच 24 फेब्रुवारी 2021 रोजी राष्ट्रीय शेअरबाजारात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे दोन्ही बाजारांनी संध्याकाळी साडेतीन ते पाच या वेळेत कामकाज चालू ठेवले, ही झाली अपवादात्मक परिस्थिती.
- सन 2010 साली सेबीने सर्व शेअरबाजाराना कामकाजाची वेळ ठरवण्याचे सर्वाधिकार दिले, त्यानुसार शेअरबाजारास, आता कामकाजाची वेळ ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.
- आपल्याला माहिती असेलच की पूर्वी हे बाजार सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी चालू होत असत आणि दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी बंद होत.
- कामकाज वेळ बदलण्याचे सर्वाधिकार मिळाल्यावर लगेचच मुंबई शेअरबाजाराने 9 वाजून 45 मिनिटांनी बाजार चालू होईल असे जाहीर केल्यावर राष्ट्रीय शेअरबाजाराने त्यापूर्वी सकाळी 9 वाजता बाजार सुरू करण्याची घोषणा करून तशी सुरुवातही केली.
- या दोन्ही बाजाराची एकमेकांशी स्पर्धा ही राष्ट्रीय शेअरबाजार अस्तीत्वात आल्यापासून सुरू होऊन एन एस सी ने बाजी मारून आपले स्थान पक्के केल्याने मुंबई शेअरबाजारास आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आपोआपच अनेक बदल नाईलाजानेच करावे लागले.
- हळू हळू दोन्ही बाजारांनी समन्वयाची भूमिका घेतली आपल्या सदस्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सकाळी 9 वाजून 15 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 30 मिनिटे ही कामकाजाची वेळ निश्चित केली आणि गेली 10 हुन अधिक वर्ष हीच कामकाजाची वेळ आहे.
- याशिवाय मॉक ट्रेंडिंग, मुहूर्त ट्रेंडिंग यांच्या दोन्ही बाजाराच्या वेळा आता एकसमान असतात.अशी अनेक कारणे देता येतील की त्यामुळे बाजाराच्या कामकाजाची वेळ वाढवणे का आवश्यक आहे? ते सांगता येईल त्यातील काही प्रमुख कारणे अशी-
कामकाज वेळेत वाढ झाल्याने बाजाराच्या उलाढालीत प्रमाणित वाढ होईल –
- उपलब्ध आकडेवारीमधून असे समजते की वेळ वाढला म्हणून व्यवसाय वृद्धी झाली नाही या दोन्ही बाजारांची उलाढाल सातत्याने वाढत असली तरी वेळेत वाढ झाल्याचा त्याच्याशी संबंध जोडता येणार नाही.
- दोन्ही बाजारात बहुतेक उलाढाल पहिल्या व शेवटच्या तासात होत असल्याने पूर्वी जी उलाढाल सकाळी 10 ते 11 या वेळेत होत असे ती आता 9 वाजून 15 मिनिटे ते 10 वाजून 15 मिनिटे या वेळेस होऊ लागली, म्हणजेच सर्वाधिक बाजार व्यवहार पूर्वीच्या वेळेपेक्षा आधीच्या वेळेकडे ढकलले गेले.
- व्यवसाय वृद्धीची अपेक्षा होती ती साध्य झाली नाही. काही विशेष बातमी असलेल्या शेअर्सची उलाढाल त्याचा परिणाम काय होइल? यावर असून तो कोणत्या वेळी बातमी येईल तेव्हाच होतो.
कामकाज वेळेत वाढ केल्याने हॉंगकाँग/सिंगापूर सारख्या जागतिक बाजाराशी स्पर्धा करता येईल-
- वरवर पटणारा हा खुलासा असला तरी असे व्यवहार अन्य जागतिक बाजारात होण्यास सुरुवात झाल्याने मोठी बाजारपेठ या दोन्ही बाजारांनी यापूर्वीच गमावली आहे.
- यातील मूळ कारणांचा संबंध हा कामकाज वेळेशी नसून येथील व्यवहारावर वस्तू आणि सेवाकर (GST) द्यावा लागतो त्याचप्रमाणे हे व्यवहार भारतीय रुपयात करावे लागतात तर हॉंगकाँग, सिंगापूर शेअरबाजारातील व्यवहार डॉलर्समध्ये होतात. यामुळे मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांचा खर्च वाचतो, शिवाय डॉलर्सशी हेज व्यवहार ते करू शकतात.
कमोडिटी, करन्सी व गिफ्ट सिटीतील आंतराष्ट्रीय शेअरबाजार याच्या कामकाज वेळा जास्त आहेत –
- कमोडिटी, करन्सी यांचे व्यवहार शेअरबाजारातील व्यवहारापेक्षा वेगळे आहेत अनेक आंतरराष्ट्रीय गोष्टींचा त्यावर सतत प्रभाव पडत असतो.
- गिफ्ट सीटीतील व्यवहार रुपयात होत असले तरी तेथे अनेक कर नाहीत. तेथील वाढीव वेळेमुळे खरोखरच उलाढाल वाढली का? ते विविध निकषांवर तपासणे गरजेचे आहे.
वाढीव वेळेने प्रशासन खर्चात होणारी वाढ व्यवसायवृद्धीच्या प्रमाणात न झाल्यास ब्रोकरेज फर्म बंद पडतील. डिस्काउंट ब्रोकर्समुळे इतक्या कमी उत्पन्नावर व्यवसाय करणे शक्य नसल्याने सध्या दलालांना पर्यायी व्यवसाय शोधावे लागत आहेत. सध्या या बाजारातील ब्रोकर्स मार्फत जे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार गुंतवणूक करतात त्यांना त्यांच्या उलढालीचा अहवाल (sell purchase report) मान्यता (consent) मिळवण्यासाठी बाजार बंद झाल्यावर तासाभरात पाठवला जातो त्यामुळे त्यांस मान्यता आणि समायोजन (adjustment) करण्यास पुरेसा कालावधी मिळतो. एफ एन ओ मधील बहुतेक ग्राहक हे हॉगकाँग /सिंगापूर येथील असल्याने आणि त्यांच्या प्रमाणवेळा (slandered time) आपल्या वेळेहून अडीच तास आधी असल्याने या व्यवहारांच्या समायोजनात व्यावहारिक अडचणी येऊ शकतात. तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यात सर्वच व्यवहारांची पूर्तता तात्काळ (Spot) होऊ शकते. आर्थिक सुधारणांच्या 30 वर्षानंतरही आपण समभाग व्यवहारांची पूर्तता T+2 वरून T+1 वर अजूनही आणू शकलो नाही हे आपले अपयश आहे. तेव्हा कामकाजाची वेळ वाढवण्यापूर्वी या सर्वाचा व्यावहारीक दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies