Investment Strategy
मागील लेखात आपली गुंतवणूक योजना (Investment Strategy) बनवून थेट समभागात गुंतवणूक करून भाववाढीवर मात करणारा परतावा मिळवणे शक्य असल्याचे मी लिहले होते. याचा अर्थ निफ्टी मधील काही कंपन्यांचे शेअर निवडून त्यात रक्कम गुंतवणे असा नाही. यासाठी अभ्यास, चिकाटी आणि शिस्त यांची गरज असून आपण मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. असे असेल तर आपली गुंतवणूक योजना बनवता येणे अगदी सोपे आहे. आपल्या ज्ञानाचा वापर यश मिळण्यासाठी करता आला, तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकता. चुकांतून शिकून पुन्हा पुन्हा त्याच चुका न करणे आवश्यक आहे. यासाठी सदैव सावध वृत्ती असावी परतावा थोडा कमी मिळाला तरी चालेल पण मुद्दलही कमी होता कामा नये. याच हेतूने आपली गुंतवणूक योजना बनवण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचा विचार करूयात.
हे नक्की वाचा: Investment Portfolio: थेट समभाग सोडून अन्य प्रकारातील गुंतवणूक
Investment Plan: गुंतवणूक योजना बनवण्यासाठी मार्गदर्शक सूचना
आपल्या आर्थिक स्थितीचा अंदाज बांधणे:
- योग्य प्रकारे आपल्या दैनंदिन गरजा भागवून, आकस्मित खर्चासाठीची तरतूद करून आपण किती गुंतवणूक करू शकतो.
- काही अनावश्यक खर्चात काटकसर करता येऊन गुंतवणूक योग्य रकमेत वाढ करता येईल का?
- आपल्या गुंतवणुकीतील नेमकी किती रक्कम नजीकच्या काळात तातडीने लागेल याचाही अंदाज घ्यावा. जर तातडीने पैशांची आवश्यकता असेल, तर स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक कामी येत नाही.
- त्यासाठी मुदत ठेव, म्युच्युअल फंड, शेअर्स यांचा विचार करावा लागेल.
आपल्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठरवा:
- गुंतवणूक योजना बनवण्याआधी ही गुंतवणूक नक्की कशासाठी? हे उद्दीष्ट काहीही असू शक. उदा जगपर्यटन करणे, निवृत्त जीवन सुखासमाधानाने घालवणे इ. यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवा.
- ही उद्दिष्ट काहीही असली त्याचे सुरक्षितता, परतावा आणि रोकडसुलभता हे तीन निकष कायम ठेवावे.
- दुर्दैवाने हे तिन्ही निकष पूर्ण करणारी एकमेव योजना नसल्याने आपल्या उद्दिष्टांच्या जवळपास जाणाऱ्या योजनांचा विचार करावा लागतो.
धोका स्वीकारण्याची क्षमता:
- गुंतवणूक ही धोकादायक प्रकारात येत असल्याने आपण आपले किती जास्तीत जास्त किती नुकसान झाल्यास सहन करू शकतो हे ठरवणे आवश्यक आहे.
- सर्वसाधारणपणे तरुण सर्वाधिक जोखीम घेऊ शकतात जसजसे वय वाढेल त्याप्रमाणे जोखीम घेण्याची क्षमता कमी होते या विधानास टोकाचे अपवादही आहेत.
- अधिक धोकादायक गुंतवणुकीतून अधिक परतावा तसेच अधिक नुकसानही होऊ शकते.
- कमी मूल्य (बाजारभाव नव्हे) असलेले शेअर्स शोधण्यात किंवा स्थावर मालमत्ता शोधण्यात आपण यशस्वी झालो तर भरपूर परतावा आपण मिळवू शकतो.
- दिर्घकाळात भांडवलनिर्मिती करताना सावध दृष्टिकोन बाळगण्याची आणि मध्यममार्ग स्वीकारण्याची गरज असते.
महत्वाचा लेख: आपल्या वित्तीय पोर्टफोलिओमध्ये या ५ गोष्टी आहेत का?
गुंतवणूक साधनांची निवड:
- वर उल्लेख केलेल्या तीन गोष्टींबद्दल कोणताही संशय नसेल तर उपलब्ध अनेक गुंतवणूक साधनांतून आपल्याला योग्य साधनांची निवड करणे हेच काम राहते.
- ही साधने चल अचल आशा मालमत्तेच्या प्रकारात असू शकतील. गुंतवणूक म्हणून विचार करताना विविध गुंतवणूक साधनांचा विचार करून त्याची योग्य ती विभागणी केल्यास, एखादे गुंतवणूक साधन अपयशी ठरल्यास अन्य साधनांतून त्याची भरपाई होऊन स्थिर आणि निश्चित दराने परतावा मिळेल.
- विविध गुंतवणूक साधनांबद्दल माहिती मिळवावी लागेल. त्यातील धोके समजून घ्यावे लागतील.
- याशिवाय एका समतोल दृष्टीने त्याकडे पाहावे लागेल. याशिवाय यात होणारी वाढ/ घट यामुळे होणाऱ्या मनाच्या चंचलतेवर मात करावी लागेल.
गुंतवणुकीचे मूल्यांकन:
- अशाप्रकारे आपण गुंतवणूक केली म्हणजे आपली जबाबदारी संपत नसून त्या क्षणापासून जबाबदारीत वाढ होते.
- ठराविक कालखंडाने आपली गुंतवणूक तपासून आवश्यकता असल्यास त्यात बदल करावेत.
- या गुंतवणूक योजनेशिवाय जर अकस्मात मोठी रक्कम हातात आल्यास एकरकमी गुंतवणूक केल्यास आपले उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत करता येईल.
- काही वेळेस आपल्या गुंतवणुकीतून अपवादात्मक दराने परतावा मिळतो. त्यावेळी आपणास गरज नाही असे समजून त्याचा फायदा घेतला जात नाही.
- तो घेऊन मिळालेले उत्पन्न स्थिर परतावा देणाऱ्या सुरक्षित साधनात गुंतवली असता भांडवलवृद्धी होण्यास मदत होते. भरपूर फायदा होत असताना कर भरायला लागू नये या हेतूने गुंतवणूक मोकळी करणे अनेकजण टाळतात.
- लक्षात ठेवा कर हा नेहमी फायद्यावर दिला जातो. फायदा अधिक असेल तर कर देणे कधीही चांगले आपल्याकडचे कराचे दर मध्यम स्वरूपाचे असल्याने कर देऊनही बराच फायदा शिल्लख राहतो.
एक यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी अभ्यास आणि अनुभव यांची गरज असून तुम्ही केलेली पहिली गुंतवणूक ती यशस्वी असो अथवा नसो तुमच्या ज्ञानात भर घालते. आपले अत्यल्प नुकसान होऊन अधिक फायदा होईल याकडे आपले सातत्याने दक्ष राहावे. आपली वृत्ती टिपकागदासारखी ठेऊन ज्ञान आत्मसात करण्याची तयारी हवी.
विशेष लेख: नव्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड योग्य पर्याय आहे का ?
जर आपण नवखे गुंतवणूकदार असाल तर नोंदणीकृत व्यावसायिक गुंतवणूक सल्लागाराची मदत घेऊ शकता आणि अधिक जोखीम घ्यायला शिकून अधिक नफाही मिळवू शकता. मला पैसा नको हे तत्वज्ञान म्हणून ठीक असले तरी व्यवहार्य नाही. तेव्हा आता पारंपरिक गुंतवणूक साधनातील गुंतवणूक कमी करून चौकटी बाहेर विचार करा आणि यशस्वी व्हा. आपण यश कसे मिळवले ते आपल्या मित्र मंडळींना सांगून त्यांनाही आपल्या बरोबर जोडून घ्या. ‘ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते’ हा मंत्र लक्षात ठेवा.
– उदय पिंगळे
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web Search: Investment Strategy in Marathi, Investment Strategy Marathi Mahiti, Investment Strategy in Marathi, Investment Marathi Mahiti, Investment Marathi, Investment in Marathi