गुंतवणूक करायची ठरल्यावर त्यासोबत जोखीम जाणीवपूर्वक स्वीकारली आहे असा त्याचा अर्थ होतो. गुंतवणूकीत असणाऱ्या धोक्याचे व्यवस्थापन म्हणूनच करावेच लागते.
यामुळे-
★आपण आणि आपले कुटुंब यांना निश्चित आर्थिक संरक्षण मिळते.
★जीवनात संकटे येत राहतीलच पण त्यातून मार्ग कसा काढायचा हे माहीती असेल तर त्यामुळे ताण येत नाही.
★आर्थिक सुरक्षिततेचा आनंद मिळेल.
★मन शांत आणि स्थिर राहील.
★गुंतवणुकीतून एक समृद्ध वारसा निर्माण होईल.
यासाठीचे पाच टप्पे
■पैशांचे व्यवस्थापन करा- पैशांचे व्यवस्थापन जोखीम व्यवस्थापन करण्याची ही पहिली पायरी आहे. आपली सध्याची खरीखुरी आर्थिक स्थितीचे जाणून घ्या.
आपले मासिक उत्पन्न किती, त्यातून बचत किती होते. खर्च किती होतो. घेतलेले कर्ज किती ते फेडण्यासाठी किती मासिक हप्ता द्यावा लागतो. कुटुंबियांच्या अपेक्षा आणि आपल्या किमान गरजा भागवण्यासाठी नक्की किती खर्च येतो ते आपल्याला माहिती असायला हवं. आपण पैसे योग्य रीतीने वापरले तरच त्यातून निव्वळ संपत्ती निर्माण होऊ शकते. प्रत्येकाचे उत्पन्न, गरजा आणि त्यांची प्राथमिकता, जबाबदाऱ्या, गुंतवणूकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न असल्याने त्याचा प्रत्येक व्यक्तीनुसार विचार करावा लागतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे यादी बनवल्यास आपण आपल्या उद्दिष्टांपासून नेमके कुठे आहोत ते समजेल. या गोष्टी म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी रचलेला पायाच आहेत तो भक्कम असेल तर गुंतवणूक करणे अधिक सोपे होईल.
■गंगाजळी तयार करा- आजारी पडणे, अपघात होणे, नोकरी सुटणे यासारखी संकटे सांगून येत नाहीत, अनेकदा छोटी मोठी संकटे व्यक्तीस एकदम सर्व बाजूने घेरतात. सध्या सरकारी नोकऱ्या सोडून बहुतेक नोकऱ्या या अशाश्वत आहेत. समजा नोकरी सुटली तर अपेक्षित अन्य नोकरी मिळण्यात कालावधी जाऊ शकतो. या कालावधीत आपल्या किमान दैनंदिन गरजा भागतील एवढी आपली आर्थिक बाजू भक्कम असायला हवी. यासाठी आपल्याकडे आपल्या मासिक खर्चाच्या 6 ते 12 पट रक्कम आपल्याकडे असायला हवी. सदर रक्कम गरजेनुसार कधीही सहज मोकळी करता येईल यापद्धतीचा आपला संकटमोचन फंड प्रथम निर्माण करावा आणि तो केवळ त्याच कारणासाठी वापरला जावा.
■विविध प्रकारच्या पुरेशा विमा योजना घ्या- विमा कंपन्या तुम्हाला संकट काळात मदतीस येतात. ही मदत आर्थिक भरपाई या स्वरूपात असते. यासाठी करार केला जाऊन त्यातील अटी शर्तींचे पालन केले जाते. प्रचलित व्याजदाराहून थोडा कमी परतावा देणाऱ्या सोबत विमा संरक्षण देणाऱ्या अनेक योजना बाजारात येत असतात. यातून धड उत्पन्नही नाही आणि संरक्षण ही नाही अशी फसगत होण्याची शक्यता असते. त्यांची माहितीपत्रके आकर्षक पद्धतीने छापली जाऊन आक्रमकपणे प्रसार प्रचार केला जातो. अनेकदा आपले मित्र, नातेवाईक अशी योजना घ्यावी म्हणून गळी पडतात. बॅंकेतील रिलेशनशिप मॅनेजर अशा योजना घेण्याचा आग्रह धरतात. बॅंकेतील माणूस सांगतो म्हणून अनेकदा अशा अनावश्यक योजनांना बळी पडतात तेव्हा अशा कोणत्याही योजना घेऊ नका. आजार, मृत्यू, अपंगत्व यांसाठी पुरेशी आर्थिक भरपाई करणाऱ्या योजनांची निवड करा.
जीवनविमा : नोकरी व्यवसाय करण्याच्या कालावधी एवढा असावा शक्यतो लवकरात लवकर घ्यावा. वार्षिक उत्पन्नाच्या 20 पट अधिक घेतलेले कर्ज एवढ्या रकमेचा, ठराविक काळाने त्यास टॉप अप करावे अथवा वेगळी योजना घ्याबी.
आरोग्यविमा: आपण ज्या भागात राहतो तेथील सर्वसाधारण आरोग्य खर्चास अनुरूप असावा. वार्षिक उत्पन्नाच्या 3 ते 5 पट. हप्ता परवडत नसल्यास सर्व कुटूंबासाठी एकच योजना घ्यावी. वापरलेली रक्कम पुनर्स्थापित होईल अशा किंवा थोडी जास्त रक्कम घेऊन भरपूर संरक्षण देणाऱ्या योजना उपलब्ध आहेत त्याचा विचार करावा.
याशिवाय गंभीर आजार, अपघात यासाठी उपलब्ध असलेल्या योजना आपल्या गरजेनुसार घ्याव्या.
■कर्जमुक्ती: अनेकदा आपली गरज आणि हौस यासाठी कर्ज घेतले जाते. अनेकदा यात नाईलाज असतो पण जेव्हा शक्य होईल तेव्हा त्यातून मुक्त होणे कोणालाही आवडेल. कर्ज फेडताना सर्वाधिक व्याजदाराचे कर्ज फेडण्यास प्राधान्य द्यावे. कर्ज फेडण्याची कुवत असेल तरी गृहकर्ज लवकर फेडण्याचा विचार करू नये असे माझे मत आहे. गृहकर्ज हे तुलनेने स्वस्तात मिळणारे कर्ज असून त्याबरोबर आयकरात सवलत असल्याने ते फेडण्याचा विचार करू नये यासाठी उपलब्ध असलेली रक्कम अन्य किफायतशीर गुंतवणूक योजनेत गुंतवावी.
■समृद्ध वारशाची निर्मिती: आपल्या योग्य वर्तनाने /सवयीने गुंतवणुकीचा समृध्द वारसा निर्माण होईल. गुंतवणूक संदर्भात जोडीदाराशी चर्चा करावी त्याला रस वाटत नसेल तरी आवश्यक माहिती द्यावी.
*आपल्या गुंतवणुकीचा वेळोवेळी आढावा घ्यावा, ठराविक कालावधीने त्याची यादी बनवावी.
*गुंतवणूक संबंधित कागदपत्रे तपासावीत यात काही त्रुटी असल्यास दुरुस्ती करावी.
*शक्य तेथे सहधारक जेथे सहधारक उपलब्ध नसेल तेथे वारसांची नोंद करावी.
*आपल्या पक्षात जोडीदार आर्थिकदृष्टीने सक्षम कसा राहील याची पुरेशी काळजी घ्यावी.
*मृत्युपत्र बनवावे.
या सर्वांसाठी तज्ञांची मदत उपलब्ध आहे, आवश्यकता असल्यास त्यांची मदत घ्यावी.
©उदय पिंगळे
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकरणीत असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)