बचत करणे ही एक चांगली सवय आहे आणि लहानपणापासूनच आपल्या बच्चे-कंपनीला ही सवय लावणं आवश्यक आहे. जसं अगदी स्वत:ची कामं स्वत: करणं हे योग्य वयात समजलं की पुढे दुसऱ्यावर अवलंबून न राहण्याची शिकवण मिळते; अगदी तसंच बचत करणं ही सवय सुद्धा योग्य वयात लागली तर आयुष्यात “थेंबे थेंबे तळे साचे” याचा प्रत्यय येतो.
दैनंदिन आर्थिक गरजा आणि हिशोब :
- रोजच्या आर्थिक गरजा आणि त्यावर होणारा खर्च हा न टाळता येणारा विषय आहे. पण असाच विचार जर रोज करत राहिलो, तर येणारा प्रत्येक महिना आणि प्रत्येक वर्ष, येणार आणि निघून जाणार. यावर उपाय म्हणजे बहुतेक वेळा खर्च करणं आपल्या हातात नसतं; मात्र बचत करणं आपल्या हातात असू शकतं ! असा विचार केला तर ?
- यासाठी रोजच्या होणाऱ्या खर्चामधून काही भाग बचत म्हणून बाजूला काढा. अर्थात, यासाठी तुम्हाला तडजोड करावी लागतेय की ही गोष्ट विनासायास होतेय ? हे लक्षात आले तर त्यानुसार रोज काही रक्कम बाजूला काढायचे प्रयत्न करावे लागतील आणि सवय लगायलाही मदत होईल.
- ही खर्चाची रक्कम हळूहळू कमी केल्यास, बचतीची रक्कम आपोआपच वाढत जाईल.
एसआयपी : म्युच्युअल फंडचे पर्याय
मासिक बचतीची सवय :
- आर्थिक नियोजन हा बचतीकडे जाण्याचा मार्ग सोपा करतो यामुळे आर्थिक नियोजन करतांना प्राधान्यक्रम ठरवणं गरजेचं आहे.
- मासिक उत्पन्नाचा आढावा घेऊन त्याप्रमाणे खर्चाचं नियोजन करावं. गृहकर्जाचा हप्ता, मासिक बिलं , पेट्रोल खर्च, खाण्या-पिण्यावरचा खर्च, मुलांच्या शाळेचा खर्च हे सगळं करतांना आपत्कालीन खर्चाकरता सुद्धा पैसे बाजूला काढणं आवश्यक असतं.
- आपत्कालीन गरजेसाठी केलेली बचत तुम्हाला आणीबाणीच्याकाळात आर्थिक आधार देते, अश्यावेळेस आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणं हे तणावाच्या परिस्थितिमधेसुद्धा समाधान देतं.
गुंतवणुकीचे पर्याय:
- बचतीची सवय लागल्यानंतर, त्यात सातत्य असणं हा नियम पाळणंही आर्थिकदृष्ट्या खूप महत्वाचा आहे. यासाठी गुंतवणुकीचे विविध पर्याय गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहेत.
- म्युच्युअल फंड, एसआयपी, फिक्स डिपॉझिट, पोस्ट ऑफिसमधल्या गुंतवणुकीच्या योजना अश्या अनेक गुंतवणुकीच्या पर्यायामधून बचतीची सवय आणि सातत्य राखलं जाऊ शकतं.
- गुंतवणूकदार महिन्याला फक्त शंभर रुपयापासून सुरुवात करून सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन – एसआयपीमधे गुंतवणूक करू शकतो. यामुळे बचत होऊन स्टॉक मार्केटमधून चांगला परतावा मिळण्याची ही शक्यता असते.
- मार्केटमधे गुंतवणुकीच्या संदर्भात चुकीची माहिती देऊन पैसे बुडवणं, तसेच जास्त नफा मिळवण्याच्या आमिषांना लोकांचे पैसे अडकवून त्यांना फसवणं असे अनेक प्रकार सर्वांनाच वर्तमानपत्रातून वाचायला मिळतात. त्यामुळे म्युच्युअल फंड, एसआयपी यासारख्या शेअर मार्केटशी संबंधित कुठल्याही योजनांची माहिती तज्ञ आणि जाणकार व्यक्तीकडून घेतल्याशिवाय गुंतवणूक करणं प्राकर्षाने टाळा.
गुंतवणूक : लार्ज कॅप म्युच्युअल फंड
महागाई आणि बचत:
- मध्यंतरी व्हाट्सअपला एक मेसेज फिरत होता, ज्यामधे काही वर्षांपूर्वीचं वाण्याकडे केलेल्या खरेदीची पावती होती. त्या पावतीनुसार, फक्त Rs.10 मधे, दोन ते तीन धान्यांची पोती, शिवाय महिन्याभराचा इतर किराणा याचा हिशोब लिहिला होता. तेव्हाच्या काळातल्या लोकांना हा अंदाजही नसेल की काही वर्षांनंतर Rs.10 मधे, फक्त छोटा बिस्कीटाचा पुडाच येईल ! धान्याची पोती तर दूरच राहिली !
- अशीच काहीशी परिस्थिती आपल्यासोबत सुद्धा होऊ शकते, नाही का ? यासाठी आपल्याला एकतर खूप बचत करावी लागेल किंवा खूप पैसे मिळवावे लागतील. तेव्हा आत्तापासूनच आपल्यासोबत येणाऱ्या पिढीलाही बचतीचं महत्त्व समजून सांगणं आणि बचतीची सवय लावणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे.
काही सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी पाळणं हे सुद्धा महागाईशी दोन हात करायला आणि बचतीची सवय लावायला मदत करतात. उदाहरणार्थ,
- गरज नसतांना अनावश्यक पैसे खर्च करणं ही गोष्ट टाळली पाहिजे.
- जुने लोक सांगतात त्याप्रमाणे, उत्पन्नापेक्षा खर्च कधीही जास्त असू नये.
- स्वत:च्या आर्थिक मर्यादा आणि जोखीम लक्षात घेऊन कर्ज काढावे.
उच्च आणि परदेशी शिक्षण, घराच्या वाढत्या किंमती, दुर्धर आजार-औषधोपचार, आपत्कालीन परिस्थिती, वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती या सर्व गोष्टींची जुळवून घेतांना बचत करणं ही तारेवरची कसरत असू शकते, मात्र वर्षानुवर्षे केलेली आर्थिक बचत आणि बचतीची सवय या सगळ्यामधून तारून न्यायला मदत करू शकते, यात शंका नाही.