Reading Time: 3 minutes

वार्षिक बारा लाख उत्पन्न असणाऱ्या नोकरदार, व्यवसायिक, हिंदू अविभक्त कुटुंब, कायद्याद्वारे निर्मित कृत्रिम व्यक्ती, व्यक्तींचा समूह (भागीदारी संस्था सोडून)  या सर्वांना नवीन आयकर प्रणालीनुसार कर मोजणी केल्यास कोणताही आयकर द्यावा लागणार नाही. अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा करून अर्थमंत्र्यांनी शेवटच्या क्षणी षटकार ठोकला. गेली अनेक वर्षं करदात्यांना दिलेल्या सवलती रद्द करून करवाढ करण्याच्या पार्श्वभूमीवर, दिलेली सूट हा अनेक दिवस सर्वाधिक चर्चेचा मुद्दा आहे. त्यामुळे यासंदर्भात लोकांना पडणारे काही संभाव्य प्रश्न आणि त्यांची उत्तरं इथं मांडण्याचा प्रयत्न करत आहे. 

प्रश्न: आपलं एकूण उत्पन्न म्हणजे काय?

उत्तर: करदात्यांच्या उत्पन्नाचं पाच प्रकारांत वर्गीकरण करता येईल. 

  • पगारातून मिळालेलं उत्पन्न
  • व्यवसायातून मिळालेलं उत्पन्न
  • घरभाडे आकारणीमधून मिळणारं उत्पन्न
  • मालमत्ता विकून मिळालेलं उत्पन्न
  • याशिवाय अन्य उत्पन्न

यातील एक वा अनेक अथवा सर्व प्रकारांमधून एकत्रितपणे मिळणारं उत्पन्न हे आपलं एकूण उत्पन्न समजलं जातं.

प्रश्न: आपलं करपात्र उत्पन्न म्हणजे काय?

उत्तर: एकूण उत्पन्नातून काही सवलती आणि खर्च यांची वजावट घेतली असता बाकी राहणारं उत्पन्न म्हणजे आपलं करपात्र उत्पन्न म्हणता येईल.

प्रश्न: नवीन करप्रणाली म्हणजे काय?

उत्तर: गेली काही वर्षं करदाते दोन पद्धतीने करमोजणी करून योग्य तो करपर्याय निवडू शकत होते. यामधला प्रमुख फरक असा- जुन्या करप्रणालीमधे, काही गुंतवणूक आणि खर्च यावर करसवलत दिली जाते. आणि करपात्र उत्पन्नावर अधिक दराने कर आकारणी केली जाते, तर नवीन पद्धतीमधे करामधे सुट न देता करपात्र उत्पन्नावर कमी दराने कर आकारणी केली जाते.

प्रश्न: नवीन करप्रणालीमधे सध्याचे आणि प्रस्तावित कर टप्पे कोणते?

उत्तर: सध्याचे,                                 

₹ 3 लाख पर्यंत 0% करआकारणी 

₹ 3 लाख ते 6 लाखापर्यंत 5% करआकारणी 

₹ 6 लाखाहून अधिक ते 9 लाखापर्यंत 10% करआकारणी 

₹ 9 लाखाहून अधिक ते 12 लाखापर्यंत 15% करआकारणी 

₹ 12 लाखाहून अधिक ते 15 लाखापर्यंत 20% करआकारणी 

₹ 15 लाखाहून अधिक 30% करआकारणी 

₹ 7 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना 87 ए नुसार अधिकतम  ₹ 25,000/- ची करसुट आहे,  त्यामुळे त्यांना कोणताही कर नाही.

सुधारित प्रास्तावित कर टक्के,

₹ 4 लाख पर्यंत 0% करआकारणी 

₹ 4 लाख ते 8 लाखापर्यंत 5% करआकारणी 

₹ 8 लाखाहून अधिक ते 12 लाखापर्यंत 10% करआकारणी 

₹ 12 लाखाहून अधिक ते 15 लाखापर्यंत 15% करआकारणी 

₹ 15 लाखाहून अधिक ते 20 लाखापर्यंत 20% करआकारणी 

₹ 20 लाखाहून अधिक ते 24 लाखापर्यंत 25% करआकारणी 

₹ 24 लाखाहून अधिक 30% करआकारणी 

₹ 12 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना 87 ए नुसार अधिकतम  ₹ 60000/- ची करसुट आहे, त्यामुळे त्यांना कोणताही कर नाही.

प्रश्न – एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न ₹1150000 असेल, तर त्या व्यक्तीला कर द्यावा लागेल का?

उत्तर:  नाही. ₹1150000/- हजारावर 4 लाखावर बसणारा कर उत्पन्न 12 लाखाहून कमी असल्याने माफ होईल.उत्पन्न 12 लाखाहून अधिक असेल तरच कर द्यावा लागतो अन्यथा नाही.

प्रश्न: जुन्या करप्रणालीत असलेल्या सवलती आणि कररचना यात काही बदल केला आहे का?

उत्तर: नाही.

प्रश्न: मी कोणती कर प्रणाली स्वीकारावी?

उत्तर: आपण कोणतीही कर मोजणी प्रणाली स्वीकारू शकता. असा कोणताही पर्याय आपण स्वीकारला नसेल किंवा आपलं आयकर विवरणपत्र विहित मुदतीत दाखल केलं नसेल तर आपण नवीन करमोजणी पद्धत स्वीकारली, असं गृहीत धरण्यात येईल.

प्रश्न: माझं उत्पन्न ₹ 12 लाखाहून थोडं जास्त असल्यास, मला ₹ 4 लाखाहून अधिक उत्पन्नावर पूर्ण कर द्यावा लागेल का?

उत्तर: आपलं उत्पन्न 12 लाखापेक्षा थोडं अधिक असेल तर आपल्याला द्यावा लागणारा कर हा अधिकच्या रकमेहून कोणत्याही परिस्थितीत अधिक घेतला जाणार नाही, यास किरकोळ कर सवलत (Marginal Tax Adjustment) असे म्हणतात, ती मिळेल. 

प्रश्न: बदलेल्या करप्रस्तावांचा लाभ कोणाला घेता येईल?

उत्तर: गेल्यावर्षी 8.75 कोटी करदात्यांनी आयकर विवरणपत्र दाखल केलं आहे. त्यातील सर्वच करदात्यांना आता पूर्वीपेक्षा कमी कर द्यावा लागणार असल्यामुळे त्याचा फायदा होईल. यात ज्यांचे उत्पन्न ₹ 12 लाखाहून कमी आहे, त्यांना कोणतीही वेगळी गुंतवणूक अथवा खर्च न करताही आपली करदेयता कमी करता येईल.

प्रश्न: प्रमाणित वजावट किती आणि कोणकोणत्या घटकांना मिळेल.

उत्तर: प्रमाणित वजावटीचा लाभ, पगारदार निवृत्तिवेतन धारकांना जास्तीत जास्त ₹ 75000/-  एवढा मिळेल.

प्रश्न: ज्यावर विशेष दराने कर आकारणी केली त्यावर आयकर सूट मिळेल का?

उत्तर: नाही, यात कोणताही बदल नाही. शेअर्स आणि शेअर्सवर आधारित म्युच्युअल फंड योजनांवरील दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील ₹125000/- पर्यंत भांडवली नफा करमुक्त आहे, त्यावरील अधिक रकमेवर 12.5% या विशेष दराने आयकर आकारणी केली जाईल.

प्रश्न: नवीन कररचनेत, करदात्यांना आपलं उत्पन्न कमी करण्यासाठी कोणती गुंतवणूक अथवा खर्च यांचा लाभ घेता येईल.

उत्तर: नवीन कररचनेमधे फारशा करसवलती नाहीत, तरीही उपलब्ध असलेल्या काही सवलती पुढीलप्रमाणे आहे-

  • पगारदार आणि निवृत्तिवेतन धारक-प्रमाणित वजावट (₹75000)
  • 87 ए नुसार मिळणारी करसुट
  • कामावर जाण्यासाठी किंवा कामाचा भाग म्हणून केलेला प्रवास, निवास खर्च अथवा त्यासाठी मिळणारा भत्ता.
  • टूर ट्रान्सफर अलाउंस.
  • मालकाने कर्मचाऱ्यांच्या पगारातून परस्पर कापून एनपीएस योजनेत जमा केलेलं मूळ वेतन आणि महागाई भत्याच्या 14% इतकं अंशदान.
  • स्वेच्छा निवृत्ती अथवा निवृत्तीधारक- स्वेच्छा निवृत्ती भरपाई (₹5 लाख)
  • ग्रॅज्युएटी (₹20 लाख)
  • शिल्लख रजेचे रोखीकरण (₹25 लाख) 
  • घरापासून मिळणारं उत्पन्न- घरभाडं मिळत असल्यास त्यातून घरपट्टी वगळून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30% प्रमाणित वजावट मिळते.
  • भाड्याने दिलेल्या घरासाठी कर्ज घेतलं असेल तर घरापासून मिळालेलं उत्पन्न (घरपट्टी आणि प्रमाणित वजावट घेऊन राहिलेलं ) यातून गृहकर्जावरच्या व्याजाची कोणत्याही मर्यादेशिवाय वजावट घेता येईल. मात्र ही रक्कम मिळत असलेल्या उत्पन्नाहून अधिक असल्यास पुढील वर्षात ओढता येणार नाही.
  • कुटुंब निवृत्ती वेतन मिळत असल्यास, उत्पन्नाच्या 30% (₹25 हजार) अधिकतम मर्यादेत सवलत मिळते.

       व्यवसाय आणि मालमत्ता यावर काही सवलती अथवा विशेष दराने कर आकारणी होते. या सर्वांचा योग्य वापर करून आपली करदेयता निश्चित कमी होऊ शकते. करकायदा हा गुंतागुंतीचा विषय असल्यामुळे यासंदर्भात त्यातील जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणं अधिक उचित ठरेल.

 

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutesअनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutesटॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

नव्या कॅलेंडर वर्षातील महत्वाच्या तारखा (सन 2024)

Reading Time: 4 minutes1 जानेवारी 2024 ला नवे कॅलेंडर वर्ष सुरू होईल. सध्या चालू असलेल्या…

मार्चएंड पूर्वी आयकरासंबंधित करायच्या १५ महत्त्वाच्या गोष्टी

Reading Time: 2 minutesअर्जुन: कृष्णा, हा आर्थिक वर्ष २०१७-१८ चा शेवटचा महिना चालू आहे. सगळीकडे…