Reading Time: 4 minutes

मागील दोन भागातून एकत्रित उल्लेख होणाऱ्या शब्दयोजना यमक यात साम्य असणाऱ्या काही आर्थिक संकल्पना आपण समजून घेतल्या या अंतिम भागात अजून काही संकल्पना समजून घेऊयात.

  1. चलनवाढ (Inflation) आणि चलनघट (Deflation)
  • चलनवाढ म्हणजे एका विशिष्ट कालावधीत वस्तू आणि सेवांच्या किमती वाढणं परिणामी पैशाची किंमत कमी होणं. उदाहरणार्थ, जर पूर्वी 100 रुपयांत 1 किलो डाळ मिळत असेल आणि आता तीच डाळ 120 रुपयांना मिळत असेल, तर त्याला चलनवाढ म्हणतात. 

जेव्हा अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा वाढतो, पण वस्तू आणि सेवांची उपलब्धता स्थिर राहते, तेव्हा चलनवाढ होते. त्यामुळे लोकांची क्रयशक्ती म्हणजेच वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची क्षमता घटते. चलनवाढीमुळे लोकांना समान पैशात पूर्वीपेक्षा कमी वस्तू आणि सेवा खरेदी करता येतात. कंपन्यांना कच्चा माल आणि इतर खर्चांसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. लोकांच्या उत्पन्नापेक्षा किमती अधिक वेगाने वाढल्यास, लोकांची बचत घटू शकते. पूर्वी पाच रुपयात मिळणाऱ्या बिस्कीट पुड्यात 100 ग्रॅम बिस्किटं असत, ती कमी कमी होत 48 ग्रॅमवर आली आहेत हे चलनवाढीचं उत्तम उदाहरण होऊ शकतं.

  • चलनघट: अर्थव्यवस्थेत वस्तू आणि सेवांच्या किमतींमध्ये घट होणं (चलनवाढीच्या विरुद्ध प्रक्रिया) यालाच चलनघट म्हणतात. या स्थितीमध्ये, लोकांकडे असलेल्या पैशाची किंमत वाढते, कारण त्याच पैशामधून पूर्वीपेक्षा जास्त वस्तू खरेदी करता येतात. उदाहरणार्थ, पूर्वी ज्या आकाराचे दूरदर्शन संच एका विशिष्ट किमतीस मिळत होते त्याच किमतीत त्याहून अधिकाधिक आकाराचे संच आता उपलब्ध होत आहेत. कपड्यांची, मोबाईल फोनची किंमत कमी कमी होत आहे. 

चलनघट होण्याचं महत्त्वाचे कारण म्हणजे पैशाचा पुरवठा कमी होणं. उत्पादन वाढणं पण मागणी कमी असणं. लोकांची खरेदी करण्याची इच्छा कमी होणं. याचा परिणाम उत्पादनात घट होते, बेरोजगारी वाढते, त्यामुळे आर्थिक विकासाचा दर कमी होतो.

  1. कर्ज जोखीम (Credit Risk) आणि बाजार जोखीम (Market Risk): 
  • कर्ज जोखीम : म्हणजे मुद्दल आणि व्याज परत न  मिळण्याचा धोका! त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची शक्यता, जी सावकारासाठी धोक्याची शक्यता असते. समजा, जर तुम्ही तुमच्या मित्राला 1000 रुपये दिले आणि त्यानं ते परत न दिल्यास ते कर्ज धोक्यात येते. 

एखाद्या कंपनीने बँकेकडून व्यवसायासाठी कर्ज घेतले आणि कंपनी परतफेड करू शकली नाही, तर बँकेला कर्ज आणि व्याज न मिळण्याचा धोका असतो. जर कर्जदार कर्जाची परतफेड करू शकला नाही, तर सावकाराला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. या थकीत कर्जांच्या वसुलीसाठी सावकाराला अधिक खर्च करावा लागतो. उदाहरणार्थ, 2008 च्या आर्थिक संकटात, बऱ्याच ग्राहकांनी त्यांच्या सबप्राइम मॉर्टगेज लोनवर डिफॉल्ट केले, ज्यामुळे बँकांना मोठा आर्थिक फटका बसला.

  • बाजार जोखीम (Market Risk): म्हणजे गुंतवणुकीच्या एकूण कार्यक्षमतेवर परिणाम करणाऱ्या घटकांमुळे (उदा. बाजारातील चढउतार, व्याजदर बदल) एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला नुकसान होण्याची शक्यता असते.

 शेअर मार्केटमध्ये अचानक घसरण झाली, तर तुमच्या गुंतवणुकीचं मूल्य कमी होऊ शकतं, बाँड मार्केटमध्ये व्याजदरात वाढ झाल्यास, बाँडच्या किमती कमी होऊ शकतात, ज्यामुळे बाँडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना नुकसान होऊ शकते. 

जर अर्थव्यवस्थेत मंदी आली, तर कंपन्यांच्या नफ्यात घट येऊ शकते, ज्यामुळे शेअरच्या किमती घसरू शकतात आणि गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ शकते. बाजार जोखीम ही गुंतवणुकीत नेहमीच असते आणि त्यामुळे गुंतवणूक करताना सावध असणे आवश्यक आहे.

  1. कर्ज मालकी गुणोत्तर (Leverage Ratio) आणि व्याज परतफेड गुणोत्तर (Interest Coverage Ratio)
  • कर्ज मालकी गुणोत्तर म्हणजे कंपनीच्या कर्जावर अवलंबून असलेल्या मालमत्तेचं प्रमाण दर्शवणारं एक आर्थिक गुणोत्तर आहे. हे गुणोत्तर कंपनीच्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची क्षमता दर्शवते. उदाहरणार्थ, कर्ज-ते-मालमत्ता गुणोत्तर ०.७ असल्यास, कंपनी तिच्या मालमत्तेच्या ७०% वित्तपुरवठा करण्यासाठी कर्ज वापरते, असं याचा अर्थ होतो. कर्ज मालकी गुणोत्तरामुळे कर्ज आणि कंपनीचे मालकत्व यांच्यातील संबंध समजतो. हे  गुणोत्तर कंपनीच्या आर्थिक धोरणाचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाते. ते अधिक असेल तर  कंपनीसाठी अधिक धोकादायक असू शकते, कारण जास्त कर्ज असल्यास भविष्यात कंपनीला आर्थिक अडचणी येऊ शकतात. उदाहरणार्थ, कर्ज-समभाग गुणोत्तर (Debt-to-Equity Ratio): हे गुणोत्तर कंपनीच्या एकूण कर्जाची तिच्या इक्विटीशी तुलना करते. 

कर्ज-मालमत्ता गुणोत्तर (Debt-to-Asset Ratio): हे गुणोत्तर कंपनीच्या एकूण कर्जाची तिच्या एकूण मालमत्तेशी तुलना करते. 

  • व्याज गुणोत्तर (Interest Ratio) कंपनीच्या कमाईस व्याजानं मिळवता येते. हे गुणोत्तर कंपनीच्या व्याज देयकासाठी तिच्या कमाईची तुलना करतं. कंपनीच्या आर्थिक आरोग्याचं मूल्यांकन करण्यासाठी कर्ज मालकी गुणोत्तर उपयुक्त आहे. गुंतवणूकदार आणि कर्ज देणारे, कंपनीच्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची क्षमता तपासण्यासाठी याचा वापर करतात. 
  • परतफेड गुणोत्तर  (Coverage Ratio) म्हणजे कंपनीच्या आर्थिक जबाबदाऱ्या (उदा. कर्ज, व्याज) पूर्ण करण्याची क्षमता मोजण्यासाठी वापरलं जाणारं एक वित्तीय प्रमाण आहे. उच्च गुणोत्तर कंपनीची अधिक परतफेड क्षमता दर्शवते, तर कमी गुणोत्तर कमी परतफेडक्षमता दर्शवते. 
  1. व्याज आच्छादन गुणोत्तर (Interest Coverage Ratio):

कंपनीच्या कर्जावरील व्याज खर्च भरण्याची क्षमता मोजतो. 

उदाहरणार्थ, जर व्याज आच्छादन गुणोत्तर  2.5 असेल, तर कंपनीचे उत्पन्न तिच्या व्याज देयकांपेक्षा 2.5 पट जास्त आहे, याचा अर्थ कंपनीला व्याज देयकं भरण्यास कोणतीही अडचण येणार नाही. 

  • कर्ज सेवा आच्छादन गुणोत्तर (Debt Service Coverage Ratio):

कंपनीच्या कर्जाची परतफेड आणि व्याजाची देयके भरण्याची क्षमता मोजतो. 

उदाहरणार्थ, जर कर्ज सेवा कव्हरेज रेशो 1.2 असेल, तर कंपनीचे उत्पन्न कर्जाच्या परतफेडीसाठी आणि व्याजासाठी 1.2 पट जास्त आहे.

यात उदाहरणादाखल दिलेली गुणोत्तरं विविध व्यवसायात कमी अधिक असतात त्याप्रमाणे ती तपासून घ्यावीत.

  1. अंदाजपत्रक (Budgeting) आणि वित्तीय अंदाज ( Financial Forecasting):
  • अंदाजपत्रक: म्हणजे खर्चाची योजना तयार करणं, म्हणजे तुमच्याकडे किती उत्पन्न आहे आणि ते कशासाठी खर्च करायचे, हे ठरवणं तुमच्या आर्थिक गरजा आणि उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्याकडे असलेल्या उत्पन्नाचं (income) आणि खर्चाचं  (expenses) योग्य नियोजन करणं. त्यामुळे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहता येतं, अनावश्यक खर्च टाळता येतो आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांजवळ लवकर पोहोचता येतं. 

वैयक्तिक अंदाजपत्रक (Personal Budget): स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या गरजा आणि खर्चासाठी बजेट तयार करणं. अंदाजपत्रक बनवल्यामुळे अनावश्यक खर्च टाळता येतो आणि पैशांची बचत होते. कर्जाची परतफेड (repayment) व्यवस्थित करता येते आणि कर्जाचा भार कमी होतो. यामुळेच तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांना, जसे की घर खरेदी करणं किंवा प्रवास करणं, लवकर साध्य करू शकतामहिन्याला किती खर्च करायचा (उदा. घरभाडे, वीज बिल, किराणा, इत्यादी) हे ठरवणं आणि त्यानुसार खर्च करणं. 

व्यवसाय अंदाजपत्रक (Business Budget): व्यवसायाच्या उत्पन्नावर आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी बजेट तयार करणं. व्यवसायात किती खर्च करायचा (उदा. ऑफिस भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन, इत्यादी) हे ठरवणं आणि त्यानुसार खर्च करणं.

  • वित्तीय अंदाजपत्रक  (Financial Forecasting) म्हणजे कंपनीच्या भविष्यातील आर्थिक स्थितीचा अंदाज घेणं, जसं की येणाऱ्या वर्षात कंपनीची विक्री, खर्च, नफा आणि रोख प्रवाह कसा असेल. या अंदाजात, कंपनीच्या भूतकाळातील संदर्भ, आर्थिक अहवाल आणि बाजारातील स्थिती यांसारख्या घटकांचे विश्लेषण केले जाते. वित्तीय अंदाज कंपन्यांना योग्य निर्णय घेण्यास, अंदाजपत्रक तयार करण्यास आणि भविष्यासाठी योजना बनवण्यास मदत करते. 

उदाहरणार्थ, कंपनीला येणाऱ्या वर्षात किती विक्री होईल याचा अंदाज घेण्यासाठी, गेल्या काही वर्षातील विक्री तपशील, बाजाराचा कल आणि इतर घटकांचं विश्लेषण केलं जातं. त्या आधारावर कंपनी येणाऱ्या वर्षात किती विक्री करू शकेल, याचा अंदाज बांधू शकते. त्यानंतर, कंपनी संभाव्य खर्च आणि नफ्याचाही अंदाज बांधू शकते. ज्यामुळे त्यांना अंदाजपत्रक तयार करणं आणि योग्य निर्णय घेणं सोपं जातं. वित्तीय अंदाजपत्रक कंपन्यांसाठी एक महत्त्वाचं साधन आहे, ज्यामुळे त्यांना भविष्यासाठी योग्य योजना बनवता येतात त्या अनुरूप निर्णय घेता येतात.(संपूर्ण)

©उदय पिंगळे 

अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.