आधी कधी फारसं नाव न ऐकलेले अभिजित बॅनर्जी यांना “experimental approach to alleviating poverty” साठी नोबेल मेमोरियल प्राईज इन इकॉनॉमिक सायन्स मिळाल्याने सध्या चर्चेत आले आहेत, त्यावरून हा सारा लेख प्रपंच
कोण आहेत अभिजित बॅनर्जी?
- अभिजित विनायक बॅनर्जी हे भारतात जन्मलेले पण अमेरिकेचे नागरिकत्व घेतलेले अर्थशास्त्रज्ञ आहेत. तसेच, त्यांनी अर्थशास्त्र विषयात “फोर्ड फाउंडेशन इंटरनॅशनल फेलोशिप” घेतली आहे आणि Massachusetts Institute of Technology, Cambridge येथील विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र हा विषय शिकवतात.
लहानपण, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण:-
- अर्थशास्त्राची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या अभिजित यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९६१ रोजी मुंबईत झाला. आई निर्मला बॅनर्जी अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका, तर वडील दीपक बॅनर्जी महाविद्यालयात अर्थशास्त्राचे विभागप्रमुख त्यामुळे अभिजित यांच्या रक्तातच अर्थशास्त्र भिनलेलं होतं, असे म्हणणे देखील वावगे ठरणार नाही.
- अभिजित यांचे शालेय शिक्षण साऊथ पोल हायस्कुल कलकत्ता, येथे झाले. पुढे त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज कलकत्ता येथून अर्थशास्त्रामध्ये बी.एस.सी (ऑनर्स) ही पदवी घेतली.
- पदवी घेतल्यानंतर जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र विषयात एम.ए. आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र ह्या विषयातच पीएचडी घेतली.
अर्थशास्त्रीय प्रवास:-
- Massachusetts Institute of Technology, Cambridge इथे शिकवण्याआधी त्यांनी हार्वर्ड आणि प्रिन्सेटन युनिव्हर्सिटी मध्ये देखील शिकवलं होत.
- २०१२ मध्ये “पुअर इकॉनॉमिक्स” ह्या पुस्तकासाठी “गेराल्ड लोएब” पुरस्कार मिळाला होता.
- २०१३ मध्ये त्यावेळचे “युनायटेड नेशनचे सेक्रेटरी बान की मुन” यांनी “मिलेनिअम डेव्हलपमेंट गोल्स” या उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी असणाऱ्या पॅनलवर नियुक्ती केली होती.
- २०१४ मध्ये “केईल इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड इकॉनॉमी” ह्या संस्थेतर्फे त्यांना प्राईज मिळालं होतं
पार्श्वभूमी:-
- अभिजित व त्यांची पत्नी इष्टर दुफ्लो या दोघांनी मिळून २००३ साली अब्दुल लतीफ जमिल पोव्हर्टि ऍक्शन क्लब (J-PAL) नावाची संघटना केम्ब्रिज येथे स्थापन केली.
- ही संस्था गरिबी कमी करण्यासाठी संपूर्ण जगात काम करत आहे. यामध्ये प्रामुख्याने मुख्यतः गरिबी कमी करण्यासाठी कोणत्या योजना आखल्या गेल्या आहेत, त्यांचं मूल्यमापन करण्यासाठी उभारली गेली आहे.
- ह्या संस्थेमार्फत आफ्रिका, भारत, अमेरिका अशा ७५ देशात जवळपास १८० लोकांनी मूल्यमापन करण्याचं काम केलं आहे.
नोबेल:-
- बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांचं आयुष्य कसे सुधारता येईल, यावर खूप मेहनत घेतली आहे. यामध्ये लोकांसाठी शासनाने आखलेल्या योजना व्यवस्थित चालू आहेत का, त्यांचे उद्दिष्ट सफल होतंय का? यावर खोल अभ्यास करण्यात करण्यात आला.
- त्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यात एक रँडम ट्रायल सुद्धा होती. उदा. त्यांच्या टीमने साधारण दोन तीन वर्षांपूर्वी राजस्थान मध्ये जाऊन तिथल्या ज्या ज्या मातांनी आपल्या लहान मुलांना लसीकरण केलं आहे त्या सर्वांना धान्याची भरलेली बॅग दिली आणि यामुळे अपेक्षित परिणाम दिसत आहेत की त्यात भरपूर फरक आहे, हे पाहिलं गेलं. त्यावर विचार करून वेळोवेळी सुधारणा केल्या गेल्या. याचा परिणाम म्हणजे मुलांची अशक्तता कमी होऊन मुलं सुदृढ दिसू लागली.
- पण असे प्रयोग तर, यापूर्वीही अनेक लोकांनी केले आहेत. मग अभिजित यांना नोबेल का मिळालं? यामध्ये काय वेगळं आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो.
- यामागे दोन कारणं आहेत-
- एक म्हणजे या पद्धतीमध्ये समोर आलेला कोणताही प्रश्न, अगदी छोट्या छोट्या भागांमध्ये विभागला गेला आणि प्रत्येक भागावर विचार करून पर्याय शोधण्यात आला. त्यातून येणारे दिसणारे परिणाम अपेक्षेप्रमाणे आहेत की नाही, जी पॉलिसी आहे त्यासाठी मदत होते की नाही, हे पाहिलं गेलं
- दुसरं म्हणजे अभिजित यांनी वापरलेल्या पद्धतीमुळे गरिबी नाहीशी होण्यासाठी खूप फायदा झाला आहे/ होत आहे.
- नोबेल कमिटीने केलेल्या एका अभ्यासानुसार ह्या पद्धतीचा फायदा भारतातील ५ लाखाहून अधिक मुलांना मिळाला आहे.
थोडक्यात काय, तर त्यांची वेगळी असलेली ही पद्धत आणि त्यातून मिळणारा फायदा यामुळेच त्यांच्या कार्याला नोबेल मिळालं आहे.
– सी.ए. सौरभ भावे
(सी.ए. सौरभ भावे हे पुणेस्थित चार्टर्ड अकाउंटंट असून ते विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करतात.)
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/