गेल्या २५ वर्षांत जग फार वेगाने बदलते आहे. १९९१ साली भारताने आपली बाजारपेठ जगाला खुली केली. त्याला आपण जागतिकीकरण म्हणतो. याचा अर्थ असा की आधी आपल्या देशातील बऱ्यावाईट घटनांचा आपल्या जीवनावर परिणाम होत होता, आता तो जागतिक घटनांचा परिणाम होऊ लागला आहे. अनेकांना हा बदल लक्षात येत नाही, पण गेल्या २५ वर्षांत, असे इतके बदल झाले की आपला समाज सुरवातीला त्यात गोंधळून गेला. पण आता तो सावरू लागला असून हे नवे बदल त्याला कळू लागले आहेत, एवढेच नव्हे तर त्यानुसार तो बदलू लागला आहे.
आपल्याला सर्वाना परिचित असे उदाहरण आपण घेऊया. ते आहे, मोबाईल फोनचे. १९९६ ते १९९९ या तीन वर्षांत आपल्याकडे पेजर नावाचे यंत्र लोकप्रिय झाले होते आणि आपल्यातील काही श्रीमंत लोकच ते वापरत होते. त्यात निरोपाचे एसएमएस येत असत. पण लगेचच मोबाईल फोन आले. ते इतके महाग होते की एक मिनिटांचा कॉल १८ रुपयांना पडत असे! शिवाय वॉकीटॉकीसारखा बोजड फोन घेऊन फिरावे लागत होते. यंत्र आणि सेवा हे दोन्ही महाग असल्याने ते फक्त श्रीमंतांसाठीच आहे, असेच त्याचे स्वरूप होते. पण गेल्या पंधरा वर्षांत त्याचा वापर इतका वाढला की यंत्रही स्वस्त झाले आणि सेवाही स्वस्त झाली. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण आजच्या तारखेला १०१ कोटी भारतीय नागरिक मोबाईल फोन वापरतात! त्यातील ३५ कोटी स्मार्ट फोन वापरतात. स्मार्ट फोन आता स्वस्त होत जातील आणि ही संख्या सतत वाढतच राहील. मोबाईल फोन एक जीवनावश्यक वस्तू झाली आहे. मोबाईलचा वापर किती कारणांसाठी केला जाऊ शकतो, हे जाणून घेतल्यावर तर आपल्याला या यंत्राला जादूचे यंत्रच म्हणावे लागेल.
असाच आणखी एक महत्वाचा बदल गेल्या १५ वर्षांत झाला आहे, ज्यामुळे आपल्या सर्वांच्या जीवनात त्याचे बरेच चांगले परिणाम होणार आहेत. त्याचे नाव आहे, आपल्या देशात वाढलेले बँकिंग. तुमचा विश्वास बसणार नाही, पण १० वर्षांपूर्वी आपल्या देशातील कसेबसे ४० टक्के लोक बँकेशी जोडले गेलेले होते. म्हणजे ६० टक्के लोकांचा आणि बँकिंगचा काही संबंधच नव्हता. त्यामुळे कर्जाची गरज पडली तर त्यांना सावकार किंवा नातेवाइकांशिवाय पर्याय नव्हता. त्यासाठी त्यांना पठाणी व्याज द्यावे लागत होते. एकदा का असे कर्ज घेतले की तो माणूस त्यातून बाहेर येणे कठीण. कारण त्या कर्जाचे व्याजदरच तसे आहेत. १५, १८, २०, २२ असे मनमानी व्याजदर घेतले जातात आणि जो गरजू आहे, तो ते आयुष्यभर फेडत रहातो. आपली आजची गरज भागली, यातच लोक समाधान मानतात. पण आपल्याला पुढे दीर्घकाळ तिप्पट चौपट पैसे परत करायचे आहेत, हे ते विसरून जातात आणि जेव्हा घामाचा पैसा व्याजावर खर्च होऊ लागतो, तेव्हा कर्ज फेडण्याचा प्रचंड मानसिक त्रास होऊ लागतो.
पण काळ बदलला आणि सरकारनेही मनावर घेतले. सर्वांचे बँकेत खाते असावे, अशी मोहीमच हाती घेण्यात आली. स्वाभिमान, जन धन अशा योजना सरकारने राबविल्या आणि बँकेत खाते असण्याचे फायदे सांगण्यास सुरवात केली. त्याचा एवढा परिणाम झाला की गेल्या दोन तीन वर्षांत २६ कोटी नव्या लोकांनी बँकेत खाती उघडली. बँकेत नव्याने आलेल्या या लोकांनी ४५ हजार कोटी रुपयांचा भरणा खात्यात केला. (८ नोव्हेंबर २०१६ पूर्वी) बँकेत व्यवहार केल्याने नेमका काय फायदा होतो, अशी शंका अजूनही काही लोक विचारताना दिसतात किंवा आपल्या एवढ्याश्या व्यवहारांना कशासाठी हवी आहे, बँक?, असाही प्रश्न अनेकांना पडतो. त्यांनी बँकिंगचे पुढील फायदे लक्षात घेतले पाहिजे. ते थोडक्यात असे:
१. बँकिंगमुळे आपण देशाच्या अर्थव्यवस्थेशी जोडले जातो.
२. बँकिंग केल्याने आपली आर्थिक पत तयार होते.
३. पत निर्माण झाल्याने आपण बँकेकडून कमी म्हणजे ९ ते १२ टक्के व्याजदरात घर, मोटार, व्यवसाय आणि शिक्षणासाठी कर्ज घेऊ शकतो. (आता व्याजदर आणखी कमी होतील.)
४. सरकारकडून मिळणाऱ्या सवलती, गॅस सबसिडी, खत सबसिडी, पिकविमा हे सर्व बँकेतूनच मिळणार असल्याने आपण त्याचे लाभधारक होऊ शकतो.
५. मोबाईल, संगणकाचा वापर करून आपले अधिकाधिक व्यवहार डीजीटल केले तर रोख सांभाळणे आणि त्याचे हिशोब सांभाळून ठेवण्याची गरज राहात नाही.
६. इंटरनेट बँकिंगशी जोडून घेतल्यास घरबसल्या रेल्वे, बस, सिनेमांची तिकिटे आपण काढू शकतो.
७. मालमत्ता कर, वीज बिल, फोन बिल, मोबाईल चार्जिंग इंटरनेट बँकिंगने केल्यास वेळ तर वाचतोच पण पैसेही वाचतात.
८. रोखीचे व्यवहारात नेहमीच चोरी आणि हरवण्याची जोखीम असते, ती संपते.
९. बँकिंगमार्फत केलेल्या व्यवहारांत बनावट नोटांचा त्रास होत नाही.
१०. गरजेप्रमाणे पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डच्या मदतीने एटीएम वापरू शकतो. (डेबिट कार्ड म्हणजे आपल्याच खात्यातील पैसे एटीएममधून काढण्याची सोय.) क्रेडीट कार्ड वापरण्याची गरज नाही.
११. आपल्या देशाला सध्या स्वच्छ, पारदर्शी आर्थिक व्यवहार करणारे नागरिक वाढण्याची गरज आहे. तसा व्यवहार बँकिंग केल्याशिवाय होऊ शकत नाही. असे स्वच्छ व्यवहार करणारे स्वाभिमानी नागरिक आपण होऊ शकतो.
१२. आधुनिक जगात महागाईमुळे गुंतवणुकीला अतिशय महत्व आले आहे. बँकेत आपल्या पैशांवर ४ ते ५ टक्के व्याज तर मिळतेच, पण शेअर बाजार, म्युच्युअल फंड, विमा, अशा सर्व प्रकारच्या गुंतवणुकीत आपण बँकिंगमुळेच भाग घेऊ शकतो.
१३. छोटे आर्थिक व्यवहार मोबाईल अॅपवर करण्याची सोय वाढत चालली आहे. ती घेण्यासाठीही बँकिंग करणे आवश्यक आहे.
१४. चलन हे विनिमयाचे माध्यम आहे, ती वस्तू नव्हे. माध्यम प्रवाही असते, जे बँकिंगमुळे शक्य होते. याचा अर्थ ज्याला गरज आहे, त्याला ते वापरण्यास मिळाले पाहिजे. उद्योग व्यवसायासाठी पैसे उभे करणे बँकिंगमुळेच शक्य होते. त्यासाठी आपला पैसा कारणी लागतो आणि आपल्याला हवा असेल तर आपापल्याही मिळतो. आपण कर्ज घेत असतो तेव्हा दुसऱ्याचा पैसा वापरत असतो.
१५. आपल्या देशात बँकेचे व्याजदर आज जगाच्या तुलनेत अधिक आहेत, त्यामुळे आपल्याला महाग भांडवल वापरावे लागते. सर्वांनी बँकिंग केले तर हे व्याजदर प्रगत देशांसारखे २ ते ६ टक्क्यांच्या घरात येवू शकतात. त्यासाठी आपण आपला खारीचा वाटा उचलून तसे कमीतकमी व्याजदर होण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे.
यमाजी मालकर
(सदर लेख “अर्थपूर्ण” मासिकात प्रसिध्द झाला आहे. अर्थपूर्णचा पुढील अंक मिळवण्यासाठी आपण अर्थपूर्ण पब्लिकेशन्स प्रा.ली. ०२०-२५४३०५४० येथे संपर्क साधु शकता.)