Reading Time: 3 minutes

भारत देशात सोने ही एक प्रतिष्ठेची बाब आहे. कोणतेही मंगल कार्य सोन्याशिवाय अपूर्ण मानले जाते. सोने खरेदी करणे म्हणजे उत्तम गुंतवणूक हे समीकरण आजही सर्वसामान्य भारतीय माणसाच्या मनात पक्के आहे. अजूनही ग्रामीण भागात शेतमालाचे पैसे आल्यावर सोन्यातच गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले जाते. किंवा घरात मुलीचा जन्म झाल्यास सर्वसाधारण भारतीय माणूस तिच्या लहानपणापासूनच थोडे थोडे सोने खरेदी करायला सुरवात करतो. पण अशा दूरदृष्टीने घेतलेल्या सोन्याचे पुढे काय होते? आणि ही दूरदृष्टी खरोखर दूरदृष्टी असते का? असे सोने घेऊन ठेवताना आपण काय काय विचार करतो, किंबहुना खरंच विचार करतो का? हे आणि असे अनेक प्रश्न जे शंका आणि भीती स्वरूपात आपल्या मनात उपस्थित तर असतात पण ते प्रश्न म्हणून मान्य करून त्यांना तोंड द्यायला आपण घाबरतो. या सगळ्या भीतीवरचा उपाय म्हणजे भारत सरकारद्वारे २०१५-१६ मध्ये उदयास आलेली गोल्ड मोनेटायझेशन स्कीम अर्थातच सुवर्ण संचय योजना.

योजनेचे स्वरूप किंवा कार्यपद्धती- 

सोन्याची गुंतवणूक ३ प्रकारच्या कालावधी साठी करता येते.

१) अल्प कालावधी – १ ते ३ वर्षे

२) मध्यम कालावधी – ५ ते ७ वर्षे

३) दीर्घ कालावधी – १२ ते १५ वर्षे

कालावधी पूर्ण होण्याआधी पैसे काढावयाचे असल्यास एका छोट्या रकमेच्या दंडाची पूर्तता करावी लागते .

योजनेतील व्याजदर-

या योजनेत आकर्षक व्याजदर आहेत.  हे व्याज त्या त्या ठेवीच्या कालावधीनुसार व्याज मिळवता येते. अल्पकालीन मुदतीच्या ठेवींसाठी संबंधित बँक व्याजदर ठरविते आणि मध्यम  व दीर्घ मुदतीच्या ठेवींसाठी व्याजदर केंद्र सरकारमार्फत ठरविले जातात. सध्या खालीलप्रमाणे व्याजदर दिले जातात.

१) अल्प मुदत –

  • १ वर्षासाठी  ०.५ % प्रति वर्ष
  • २ वर्षांसाठी  ०. ५५% प्रति वर्ष
  • ३ वर्षांसाठी ०. ६०% प्रति वर्ष

२) मध्यम मुदत – २. २५%  प्रति वर्ष

३) दीर्घ मुदत – २. ५०% प्रति वर्ष

अल्प मुदतीसाठी व्याजाचा हिशोब पैशाच्या  स्वरूपात  केला जात नाही. त्याऐवजी सोन्याच्याच स्वरूपात व्याज दिले जाते.

उदा. जर व्याजाचा  दर प्रतिवर्ष १ % असेल तर १०० ग्रॅम सोन्यासाठी १ ग्रॅम सोने व्याज म्हणून दिले जाईल.

परंतु मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या ठेवींमध्ये व्याजाची गणना पैशाच्या स्वरूपातच केली जाते. ज्यावेळी गुंतवणूक केली असेल त्यावेळेचे सोन्याचे मूल्य विचारात घेऊन व्याज दिले जाते. उदा. जर आपण १०० ग्रॅम सोने गुंतवले आणि त्यावेळी त्याचे मूल्य रु.३,००,००० असेल आणि व्याजदर २. ५ % असेल तर प्रतिवर्षी तुम्हाला रु. ७५०० /- व्याज मिळेल.

ठेवींची परिपक्वता (Maturity) –

  • आपण ठेव ठेवण्याच्या वेळी आपणास व्याज पैशाच्या स्वरूपात हवे आहे की सोन्याच्या स्वरूपात हवे आहे याची सूचना देऊ शकतो. सोन्याच्या स्वरूपात व्याज हवे असल्यास ९९.५ इतक्या शुद्धतेचे सोने नाणी किंवा बारच्या स्वरूपात मिळेल.

  • जरी आपण गुंतवणुकीच्या वेळी दागिने जमा केले असले तरी आपल्याला परतावा सोन्याची नाणी किंवा बारच्या स्वरूपातच मिळेल. दागिने मिळणार नाहीत, कारण बँक तुमचे सोने साठवून ठेवत नाही. त्याचे रूपांतर नाणी किंवा बार मध्ये करते आणि

  1. ते धातू आणि खनिज नियामक आयोगाला (Metals and Minerals trading Corporation ) पाठवते,
  2. बाजारात आणण्यासाठी सराफांना विकते किंवा
  3. दुसऱ्या बँकेला विकते.
  • योजनेचा मुख्य हेतू घरात आणि बँकांच्या लॉकर मध्ये जे सोने पडून आहे त्याला बाजारात आणणे हाच आहे. म्हणजे आपोआप सोन्याची आयात कमी होईल आणि परकीय चलनाची गंगाजळी वाढेल.

सोन्याच्या शुद्धतेचे निकष किंवा पडताळणी :

  • जे सोने आपण गुंतवणार आहोत त्याची शुद्धता आणि मूल्यमापन ठरवण्यासाठी संपूर्ण देशभरात ३३० पेक्षा जास्त केंद्रे सुरु केलेली आहेत. तिथे आपण आपली सोन्याची शुद्धता तपासून ते सोने किंवा दागिने जमा करू शकता.

  • एकदा आपण बँकेत या योजनेसाठी खाते उघडले की बँक आपल्याला जवळच्या सरकार मान्य सोने मूल्यमापन केंद्रात सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी पाठवते.

  • तिथे सोने जमा केल्यावर आपल्याला सोन्याच्या वजनाची आणि रकमेची पावती देते. ती बँकेत जमा केल्यावर बँक त्याचे रूपांतर योजनेच्या प्रमाणपत्रात करते.

  • ज्याप्रमाणे बँक आपल्याला मुदत ठेवीची पावती देते त्याचप्रमाणे याचे प्रमाणपत्र देते,  जे योजनेची मुदत संपेपर्यंत सांभाळून ठेवणे बंधनकारक आहे.

कर पात्रता-

या योजनेपासून होणारा नफा करमुक्त आहे. यावर कोणत्याही स्वरूपाचा कर भरावा लागणार नाही. म्हणजे आयकर (Income tax ), संपत्ती कर (Property tax ) तसेच इतर कोणतेही कर तुम्हाला भरावे लागणार नाही.

  • ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर सोने घरात किंवा बँकेत पडून आहे , शिवाय त्याच्या सुरक्षेसाठी वेगळा खर्चही करावा लागतो अशा व्यक्ती, संस्था, कंपन्या किंवा सराफ अशांसाठी सुवर्ण संचय योजना खूप मोठी संधी आहे.

  • फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण दागिने जमा करत असाल तर परताव्याच्या वेळी आपले दागिनेच परत न मिळता त्याऐवजी सोन्याची ९९.५ शुद्धतेची नाणी किंवा बार मिळतात. तसेच व्याज म्हणून सोने अथवा पैसे असे दोन्ही पर्याय आपण निवडू शकतो.

  • यामुळे भारतातील सोन्याची आयात कमी होईल, आणि परकीय चलन वाचेल, शिवाय सोने ज्यांच्या मालकीचे आहे त्यांनाही आपले सोने गुंतवून फायदा मिळणार आहे.

यात कोणा एका व्यक्तीचा लाभ न होता त्याचा फायदा पूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे आणि आपसूकच प्रत्येक भारतीय नागरिकालाही होणार आहे.

(चित्र सौजन्य- https://goo.gl/YFKujm )

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…