१. HRA कोणाला क्लेम करता येतो ?
भाड्याच्या घरात रहाणारी कोणतीही नोकरदार (सॅलरीड इंडीव्हिज्यूअल) व्यक्ती घरभाडे-भत्त्याचा दावा करु शकते. स्वतःच्या मालकीच्या घरात रहाणाऱ्या किंवा व्यवसायिक (सेल्फ एम्प्लॉईड) असणाऱ्या व्यक्ती घरभाडे-भत्त्याचा दावा करु शकत नाहीत.
२. स्वतःच्या मालकीच्या घरात रहाणारी व्यक्ती घरभाडे-भत्त्याचा दावा करु शकते का ?
नाही. स्वतःच्या मालकीच्या घरात रहाणारी व्यक्ती घरभाडे-भत्त्याचा दावा करु शकत नाही.
३. घरभाडेभत्ता आणि गृहकर्ज व्याज (होमलोन इन्टरेस्ट) या दोन्हीसाठी एकाचवेळी वजावट मागता येते का?
हो. जर करदात्याचे स्वतःचे घर असेल आणि ते घर दुसऱ्या शहरात असेल किंवा सदर घर भाड्याने दिलेले असेल आणि करदाता स्वतः भाड्याने रहात असेल तर गृहकर्जाच्या व्याजाबरोबर ( होमलोन इंटरेस्ट) घरभाडे भत्त्यासाठीही एकाच वेळी वजावट मागता येते.
४. घरमालकाच्या पॅनकार्ड संबधीत माहिती कधी द्यावी लागते?
जर घरभाड्याची रक्कम वर्षाला रु. १,००,०००/- पेक्षा जास्त असेल तर घरमालकाचे पॅनकार्ड तपशील असणे आवश्यक आहे. जर घरमालकाचे पॅनकार्ड नसेल तर त्याचे “डिक्लरेशन” आवश्यक आहे.
५. घरभाडे-भत्त्यासाठी दावा करताना भाडेपावती (रेन्ट रिसीप्ट) देणे आवश्यक आहे का?
जर घरभाड्याची रक्कम दर महिन्याला रु.३०००/- पेक्षा जास्त असेल तर भाडेपावती देणे आवश्यक आहे.
६. एकाच वेळी दोन घरांसाठी घरभाडे-भत्ता मागता येतो का?
नाही. घरभाडे-भत्ता फक्त तुम्ही काम करत असलेल्या शहरातील एकाच घरासाठी क्लेम करता येतो.
७. घरभाडे-भत्त्याच्या वजावटीसाठी कुठली कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे?
घरभाडे-भत्त्याच्या वजावटीसाठीसंपूर्ण वर्षाच्या भाडेपावत्या, भाडेकरार आणि जर मासिक भाडे रु. १५,०००/- पेक्षा जास्त असेल तर घरमालकाचे PAN कार्ड डिटेल्स सादर करणे आवश्यक आहे. जर घरमालकाचे पॅनकार्ड नसेल तर त्यासंदर्भातील त्याचे “डिक्लरेशन” आवश्यक आहे.
८. महागाई भत्ता (DA) व घरभाडे भत्ता (HRA) दोन्हीचा अर्थ एकच असतो का?
नाही. महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता हे दोन्ही भत्ते पगाराचे दोन वेगवेगळे भाग आहेत.
९. घरभाडे-भत्त्यामध्ये घराच्या दुरुस्तीचा खर्च (मेनटेनन्स) मागता येतो का?
नाही. घभाडे-भत्त्यात फक्त घरभाड्याच्या रकमेची भरपाई मागता येते. घराचा दुरुस्ती खर्च हा घरमालकाचे उत्पन्न नसल्यामुळे त्यावर कर आकारता येत नाही.
१०. घरभाडे-भत्त्यात वीजबिलाची रक्कम मागता येते का?
नाही. भरणा केलेले वीजबिल हे घरमालकाला दिले जात नसल्यामुळे ते त्याचे उत्पन्न नसते. त्यामुळे त्यावर कर आकारता येत नाही.
११. कलम ८०सी (80C) अंतर्गत घरभाडे-भत्त्यासाठी दावा करता येतो का ?
नाही. घरभाडे भत्त्यासाठीचे आयकर कायद्यातील कलम हे १०(१३अ ) असल्याने फक्त या कलमांतर्गतच असा दावा करता येतो.
१२. आपल्या वैवाहिक जोडीदाराला दिलेल्या घरभाड्यासाठी हा भत्ता मागता येतो का ?
या प्रश्नाचं उत्तर देणं तसं कठीण आहे, कारण उत्तर देताना दोन्ही बाजूंचा विचार करणे आवश्यक आहे. वैवाहिक जोडीदाराला घरभाडे देण्यामध्ये बेकायदेशीर अस काहीच नाही. परंतु पती आणि पत्नी एकाच शहरात रहात असल्यास सामान्यतः एकाच घरात रहातात. त्यांचं दोघांच मिळून एक कुटुंब असतं. अशा प्रकारच्या व्यवहारांची आयकर खात्याकडून कसून चौकशी होवू शकते त्यामुळे अशा प्रकारचा दावा करताना येणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन करदात्याने स्वतःच्या जबाबदारीवर दावा करावा.
काही विशेष मुद्दे
१. घरभाडे भत्ता, गृहकर्जावरील व्याज आणि वजावट
जर करदात्याचे स्वतःचे घर असेल आणि ते घर भाड्याने दिलेले किंवा दुसऱ्या शहरात असेल, तर गृहकर्जाच्या व्याजाबरोबर ( होमलोन इन्टरेस्ट) एच.आर.ए. साठीही वजावट मागता येते.
२. पालकांच्या घरात भाड्याने रहात असल्यास
तुम्ही तुमच्या पालकांच्या घरी भाड्याने राहू शकता किंवा त्यांना घरभाडे देवू शकता. परंतू हा नियम पती पत्नीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही. पालकांच्या घरी भाड्याने रहाताना घ्यायची सगळ्यात महत्वाची काळजी म्हणजे तुम्हाला तुमच्या आर्थिक व्यवहाराचे सर्व पुरावे उदा. बॅंक स्टेटमेंट्स, भाडेपावती ( रेंट रिसिट) इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देणे बंधनकार आहे. अन्यथा तुम्ही करत असलेला वजावटीचा दावा नाकारला जाऊ शकतो.
३. कंपनीकडून घरभाडे-भत्ता मिळत नसल्यास
जर तुमची कंपनी तुम्हाला घरभाडे-भत्ता देत नसेल आणि तुम्ही एकूण उत्पन्नाच्या १०% रकमेक्षा जास्त भाडे भरत असाल, तर तुम्ही आयकर कायद्याच्या कलम ८०जीजी नुसार घरभाड्याची सूट(एच.आर.ए. क्लेम) मागू शकता. परंतु त्यासाठी खालील नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
१. एकूण उत्पन्नाच्या 10% पेक्षा जास्त भाडे दिली असले पाहिजे.
२. करदात्याच्या रहाण्याच्या किंवा कामाच्या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या किंवा त्याच्या पत्नीच्या अथवा अज्ञान (वय वर्षे १८ अपूर्ण) मुलांच्या किंवा हिंदू अविभक्त कुटुंबातील (HUF) इतर व्यक्ती; यांपैकी कोणाच्याही नावावर रहिवासी मालमत्ता नसल्यास कलम ८०-जीजी अंतर्गत सूट मिळते.
परंतु जर वरीलपैकी कोणाचेही इतर ठिकाणी घर असेल, ज्याचा ताबा त्यांच्याकडे आहे आणि ते त्या घरासाठी कलम २३(२) (ए) किंवा २३ (४) (ए) अंतर्गत लाभ घेत असतील, तर या कलम ८०-जीजीचा लाभ घेता येणार नाही.
३. करदात्याला मिळणारी वजावट
- दरमहा रु.५०००/-
- एकूण उत्पन्नाच्या २५%
- या सेक्शनखाली वजावट घेण्यापूर्वी एकूण उत्पन्नाच्या १०% पेक्षा जास्त भरलेले भाडे.
वरीलपैकी कमीतकमी रकमेची वजावट मिळते.