बऱ्याचदा असं होतं की आपण आयकरातल्या अनेक वजावटींसाठी पात्र असतो पण आपल्याला त्याबद्दल माहितीच नसते. किंवा असंही होतं की आपल्याला कोणत्या वजावटी लागू होतात हे माहिती तर असतं पण, काही कारणांनी त्याचे पुरावे द्यायचे राहून जातात. मग आपण आयकर कायद्याच्या वेगवेगळ्या सवलतींसाठी पात्र असूनही आपल्याला अधिक कर भरावा लागतो. साधारण जानेवारी नंतर आपली कंपनी आपल्याला आपल्या गुंतवणुकींचे पुरावे, पावत्या, प्रमाणपत्रं मागायला सुरूवात करते आणि आपण ते वेळेत न दिल्यास आपलंच करपात्र उत्पन्न वाढतं. म्हणजे आपण वजावटीसाठी पात्र असून, कर वाचवू शकत असून आपण ह्या वजावटी घेत नाही किंवा घेऊ शकत नाही.
पण, आपण आयकर रिटर्न दाखल केले नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. आपलं इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करतानाही आपण ह्या वजावटींचा दावा करू शकतो आणि कर वाचवू शकतो. फक्त हे कसं करावं याची योग्य माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे.
1. ८०-सी व ८०-डी मधील वजावटी-
आयकर कायद्याच्या कलम ८०-सी अंतर्गत गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
- प्रॉव्हिडंट फंड(ई.पी.एफ. व व्ही.पी.एफ.)
- पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पी.पी.एफ.)
- सुकन्या समृद्धी योजना खाते
- नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट(एन.एस.सी.)
- सिनीयर सिटिझन्स सेव्हिंग स्कीम(एस.सी.एस.एस.)
- ई.एल.एस.एस.
८० सी अंतर्गत गुंतवणुकीचे पर्याय
आणि कलम ८०-डी अंतर्गत आरोग्य-विम्याच्या वजावटी उपलब्ध आहेत.
ह्या दोन्ही कलमांमध्ये आपली गुंतवणूक असेल किंवा त्याअंतर्गत मिळणाऱ्या एखाद्या वजावटीसाठी आपण पात्र असाल, तर आयकर रिटर्न भरताना अशा वजावटींचा दावा करता येऊ शकतो.
काय करावे-
आयकर रिटर्न भरताना ह्या वजावटींचा उल्लेख करावा.तिथे कोणतेही पुरावे जोडण्याची गरज नाही.परंतु, भविष्यात आयकर अधिकाऱ्यांनी सादर करायला सांगितले तर, हे पुरावे आपल्याजवळ असणे आवश्यक आहे.
2. घरभाडे भत्ता(एच.आर.ए.)-
पगारात मिळणारा घरभाडे भत्ता करमुक्त असतो. परंतु तो करमुक्त होण्यासाठी तुम्हाला घरभाडे-करार, घरभाडे भरल्याच्या पावत्या आणि घरमालकाचे पॅनकार्ड सादर करावे लागते. जर ही कागदपत्रं पुरावे म्हणून वेळेत सादर केले नाहीत, तर तुमची कंपनी घरभाडे भत्त्याची वजावट गृहीत धरणार नाही. इथेही काळजीचं कारणं नाही, कारण आयकर रिटर्न भरताना तुम्ही घरभाडे-भत्त्याचं गणित मांडून वजावट मिळवू शकता.
घरभाडे वजावटीचे मोजमाप (Calculation)
घरभाडे भत्त्यावरील कर-सवलत घेताना पुढीलपैकी जी रक्कम कमीतकमी असेल, ती घरभाडे भत्त्याची वजावट म्हणून ग्राह्य धरली जाते-
१. एका आर्थिक वर्षात प्राप्त झालेला एकूण घरभाडे-भत्ता (HRA)
२. एका आर्थिक वर्षातील एकूण पगाराच्या (बेसिक सॅलरी + महागाई भत्ता) पुढील टक्केवारीतील रक्कम-
-५०% मेट्रोसिटीत रहिवासी असल्यास
-४०% मेट्रोसिटीत रहिवासी नसल्यास
३. भरलेले एकूण घरभाडे वजा पगाराच्या (बेसिक सॅलरी + महागाई भत्ता) १०%
जर करदाता निवृत्तीवेतन (पेन्शन) घेत असेल तर वरील वजावटीसाठी पगारात बेसिक पगार तसेच महागाई भत्त्याचा (DA) समावेश होतो. जर पेन्शनविक्रीच्या निश्चित टक्केवारीवर (फिक्स्ड परसेन्टेज) कमिशन मिळत असेल, तर त्याचाही समावेश पगाराच्या व्याख्येत होतो.
घरभाडे भत्त्यासंबधीत काही महत्वाच्या शंका व त्याची उत्तरे
काय करावे?
घरभाडे भत्त्याचे वर दिल्याप्रमाणे मोजमाप करून तो करपात्र उत्पन्नातून वजा करावा. वजा करून येणारी रक्कम म्हणजे नविन करपात्र उत्पन्न असते. तो गृहित धरून आयकर रिटर्न भरावे.
3. गृहकर्ज आणि शैक्षणिक कर्ज-
गृहकर्ज आणि शैक्षणिक कर्जावरही अनेक वजावटी उपलब्ध आहेत. जर वेळीच यासांबधित काही कागदपत्रं आपण कंपनीकडे दिली नसतील तर तुम्हाला ती वजावट न मिळता त्यावरचा कर कापला गेला असू शकतो.
काय करावे?
आयकर रिटर्न भरताना ह्या कर्जांसंबधित रकमांचे मोजमाप योग्य त्या ठिकाणी भरावे आणि त्या-त्या कलमाअंतर्गत वजावटीचा दावा करावा.
गृहकर्जासाठीचे आवश्यक दस्तऐवज
गृहकर्ज नामंजूर होण्याची ९ संभाव्य कारणे
गृहकर्जाबद्दलचे गैरसमज भाग १
4. एल.टी.ए.-
सोप्या भाषेत एल.टी.ए. म्हणजे तुम्ही सुट्टीवर असताना तुमच्या फिरण्याचा म्हणजे वाहतुकीचा कंपनीने केलेला खर्च. हा पगारात मिळणारा एक प्रकारचा भत्ता आहे, जो करमुक्त असतो. मात्र तो करमुक्त होण्यासाठी योग्य त्या पावत्या सादर करणे गरजेचे आहे. हे पुरावे तुम्ही वेळीच सादर न केल्यास, आयकर रिटर्न भरताना त्यावर वजावट मागता येत नाही.
(चित्र सौजन्य- https://bit.ly/2ujreYt )