Arthasakshar शेअर बाजार पैसा
https://bit.ly/338O2fR
Reading Time: 4 minutes

शेअर बाजारात पैसा फिरू शकतो, देशात का नाही? 

पैसा फिरू लागला की काय होऊ शकते, याची चुणूक भारतीय शेअर बाजार गेले काही दिवस अनुभवतो आहे. याच तत्वावर देशातील साठून राहिलेला पैसा फिरला, तर कोरोना संकटानंतरच्या आर्थिक संकटातून भारत लवकर बाहेर पडू शकेल. पण त्यासाठी पैसा हे विनिमयाचे माध्यम आहे, ती ताब्यात ठेवण्याची वस्तू नव्हे, हे साधे तत्व एक देश म्हणून मान्य करावे लागेल. 

रिलायन्स : ग्राहक आहोतच, शेअरधारक नसण्याचे स्वातंत्र्य! 

शेअर बाजार-

  • भारतासह सर्व जगातील आर्थिक व्यवहार मंदावले असताना जगातील शेअर बाजारांत मात्र भरती आली आहे. 
  • प्रत्यक्ष काही घडत नसताना शेअर बाजार का वाढत आहेत, याचे सर्वांनाच आश्चर्य वाटते आहे.
  • कोरोना साथीमुळे जगाचे किती आर्थिक नुकसान झाले, जग किती मागे गेले तसेच जग पूर्वपदावर येण्यासाठी किती काळ लागेल, याचे अंदाज जाहीर होत आहेत. ते जाणून घेतल्यास मनात आर्थिक असुरक्षितता निर्माण झाल्याशिवाय रहात नाही. शेअर बाजार मात्र याला अपवाद आहे. 
  • अमेरिका, चीन आणि पाश्चिमात्य देशांत शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण भारतापेक्षा कितीतरी अधिक आहे. त्यामुळे तेथील शेअर बाजारांना या काळात भरती आलेली आपण समजू शकतो, पण जेथे दोन तीन टक्क्यांच्या वर नागरिक शेअर बाजाराचे नाव घेत नाहीत, अशा भारतात ही भरती कशामुळे आली, हा कुतूहलाचा विषय झाला आहे. 
  • २३ मार्चला लॉकडाऊन जाहीर झाले आणि अजूनही ते अनेक शहरांत स्थानिक पातळीवर सुरूच आहे. याचा अर्थ चार महिने आर्थिक व्यवहार थंडावले आहेत. 
  • ही साथ काही लवकर आटोक्यात येत नाही, हे लक्षात येताच २३ मार्चला भारतीय शेअर बाजार सुमारे ४० टक्के कोसळला होता. म्हणजे सेन्सेक्स त्यावेळी ४१ हजारांवरून २६ हजार इतका खाली गेला होता. गेल्या आठवड्यापर्यंत तो ३७ हजार ५०० इतका वर आला आहे! 
  • सर्व व्यवहार चालू असतानाही शेअर बाजार या वेगाने कधी हललेला नाही. त्यामुळेच त्याविषयी अधिक कुतूहल निर्माण होणे साहजिक आहे. 

भारतातील मान्यताप्राप्त शेअर बाजार आणि वस्तुबाजार

लाखो नव्या गुंतवणूकदारांचा पैसा –

  • आकडेवारीशी खेळणाऱ्या संस्था अशावेळी शांत बसतील, तर त्या आर्थिक संस्था कसल्या? त्यांनी त्याची काही कारणे शोधून काढलीच. 
  • त्यातील प्रमुख कारण आहे, या काळात वर्क फ्रॉम होममुळे चांगले पगारदार घरीच बसल्यामुळे त्यांनी शेअर बाजारात पैसे गुंतविण्यास सुरवात केली. 
  • ज्यांना या ना त्या कारणाने घरीच बसावे लागले, त्यांनी वेळ घालविण्यासाठी आणि होत असेल, तर फायदा पदरात पाडून घेण्यासाठी शेअर बाजारात रस घेण्यास सुरवात केली. 
  • त्याचा परिणाम असा झाला की या नव्या छोट्या पण लाखो नव्या गुंतवणूकदारांचा पैसा शेअर बाजारात आला. 
  • असे ५० ते ६० हजार कोटी रुपये शेअर बाजारात दाखल झाले. 
  • भारतीय शेअर बाजारात इतक्या कमी काळात इतका पैसा पूर्वी कदाचित कधीच आला नसेल.
  • आपल्या देशात म्युच्युअल फंडाद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात वाढते आहे. त्यातील बहुतांश गुंतवणूकदार एसआयपीचा मार्ग निवडतात. म्हणजे दर महिन्याला विशिष्ट रक्कम गुंतवितात. असे आठ हजार कोटी रुपये दरमहा शेअर बाजारात येतात.
  • जेव्हा परकीय गुंतवणूकदार भारतातून पैसा काढून घेत होते, तेव्हा त्या आठ हजार कोटी रुपयांनीच भारतीय शेअर बाजाराची सावरले आहे. याचा अर्थ आठ हजार कोटी रुपयांचा एवढा परिणाम होऊ शकतो, तर ५० हजार कोटी रुपयांचा होणारच आणि तो झालाच. कारण मागील तीन महिन्यात शेअर बाजार तब्बल ३५ टक्क्यांनी वर आला आहे. 
  • या बाजारात सध्या सुमारे १५० लाख कोटी रुपये खेळतात, हेही यानिमित्ताने लक्षात ठेवले पाहिजे. 

वॉरेन बफेट यांचा गुरुमंत्र 

पतसंवर्धन हाच खरा मार्ग –

  • अर्थात, शेअर बाजारातील गुंतवणूक हा एक स्वतंत्र विषय आहे. त्याच्या खोलात आपल्याला आज जायचे नाही. 
  • आपल्याला यानिमित्ताने भारतीय नागरिकांची शक्ती जाणून घ्यायची आहे. त्या नागरिकांनी एकत्र येऊन एखादी छोटी गोष्ट केली तरी त्याचा परिणाम किती प्रचंड असू शकतो, याची चुणूक या गुंतवणूकदारांनी दाखवून दिली आहे. अशीच चुणूक गेल्या काही वर्षांत दिसून आली असून त्याचा लाभ आश्चर्यकारक आहे. 
  • उदा. अधिकाधिक नागरिकांनी आता बँकिंग करायला सुरवात केल्यामुळे आपल्या देशातील बँकिंग करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण ४० वरून आता ८० टक्क्यांवर गेले आहे. याचा अर्थ बॅंकांतून अधिक पैसा फिरू लागला आहे. 
  • त्याचाच परिणाम म्हणजे सर्व कर्जाचे व्याजदर सातत्याने कमी होत आहेत. 
  • घरे घेणारे आणि उद्योग व्यवसायातील तरुण आपल्या देशातील चढ्या व्याजदरात भरडून निघतात, त्यांचा भार कमी होत असलेल्या व्याजदरांमुळे काही प्रमाणात हलका झाला आहे. 
  • याचे दुसरे उदाहरण म्हणजे बँकेतील जनधन खाती होय. अशा खात्यांची संख्या सध्या ३८ कोटी इतकी आहे आणि या कमी उत्पन्न गटातील नागरिकांचे तब्बल एक लाख कोटी रुपये बँकांत जमा आहेत. याचा अर्थ जेव्हा गरज असेल तेव्हा त्यातील काही लाख नागरिक आपला पैसा वापरत असतातच. पण त्याच वेळी दुसरे काही लाख नागरिक पैसे बँकेत ठेवत असतात. 
  • एकीकडे ज्यांना गरज असते ते त्यांचा विनिमय करत असतात तर ज्यांना त्यावेळी गरज नसते, ते तो पुरवत असतात. पैसा फिरत राहिल्यामुळे हे शक्य होते. यालाच पतसंवर्धन म्हणतात. त्याच्या जोरावरच विकसित देशांनी आपली भौतिक प्रगती करवून घेतली आहे. 

शेअर्स खरेदीचं सूत्र

लोकसंख्येचा लाभांश घेऊयात –

  • भारताची लोकसंख्या १३० कोटींपेक्षा अधिक आहे. ती अधिक असल्याने अनेक समस्यांचा सामना आपण करत आहोत. पण ज्या देशांची लोकसंख्या कमी आहे, ते युरोपियन देश त्यामुळे त्रस्त आहेत. कारण त्यांच्या अर्थचक्राला त्यामुळे मर्यादा आल्या आहेत. 
  • युरोपियन आणि इतर काही देश बाहेरील देशांतील नागरिकांचे स्वागत करतात, त्याचे कारण हेच आहे. त्यांना नवे ग्राहक हवे आहेत. अशा ग्राहकांची संख्या भारतात मुबलक आहे. 
  • ग्राहकशक्तीचा पुरेपूर फायदा आपण करून घेतला पाहिजे, असा एक विचार मांडला जातो. त्याला लोकसंख्येचा लाभांश असे म्हणतात. 
  • तो लाभांश भारतीय शेअर बाजारात गेले तीन महिने दिसून आला, म्हणून तो वर जातो आहे. त्याचाच दुसरा अर्थ पैसा फिरला. 
  • पैसा फिरत नाही आणि त्यामुळेच तो सर्वांपर्यंत पोचत नाही, हा आपला कळीचा प्रश्न आहे. तो सर्वांपर्यंत पोचला, तर त्यातून चांगली क्रयशक्ती असलेले ग्राहक तयार होतील आणि अर्थचक्राला वेग येईल. 

शेअर ट्रेडिंग ॲप्स – सुरक्षित ट्रेडिंग करण्याचे ५ मार्ग

पैसा विनिमयाचे माध्यम, वस्तू नव्हे ! 

  • शेअर बाजारात जे गेले तीन महिने पाहायला मिळाले, त्याच धर्तीवर लोकसंख्येचा लाभांश घेवून कोरोना संकटानंतरच्या परिस्थितीतून आपला देश बाहेर पडू शकतो. 
  • पैसा फिरला की ग्राहक बाजारात दिसतील आणि त्यामुळे अर्थचक्राला वेग येईल. 
  • आपल्या देशाचा सर्वाधिक पैसा अडकला आहे तो सोन्यात. 
  • देशातील सोन्याचा साठा तब्बल २२ ते २३ हजार टन इतका आहे, यावर सर्वांचे एकमत आहे. 
  • त्याचा आज अनेकांना गुंतवणूक म्हणून फायदा होत असला तरी अर्थचक्र गती घेण्यासाठी त्याचा तेवढा उपयोग होत नाही. 
  • या सोन्यातील पैशाला तरलता कशी येईल, याचा विचार एक देश म्हणून केला गेला, तर अर्थचक्र लवकर वेग घेऊ शकेल. 
  • या संकटाने उद्योग व्यवसायांचे मोठे नुकसान झाले आहे, लाखो रोजगार गेले आहेत. अशांना सामावून घेण्यासाठी लोकसंख्येचा लाभांश घेतलाच पाहिजेत. 

थेंबे थेंबे तळे साचे, अशी एक छान म्हण आहे. पैशांचेही असेच आहे. भारतातील पतसंवर्धन याच मार्गाने होऊ शकते. पण त्यासाठी एवढ्या मोठ्या लोकसंख्येने पैसा हे विनिमयाचे माध्यम आहे, ती वस्तू नव्हे, हे तत्व मनावर घेतले पाहिजे. ते एक देशव्यापी मोहीम म्हणून केले तर या अभूतपूर्व संकटावर नजीकच्या भविष्यात मात करणे सुलभ होईल. 

यमाजी मालकर 

[email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…