अर्थसाक्षर रिलायन्स
Reading Time: 4 minutes

आपण सर्वच रिलायन्सचे ग्राहक का आहोत?

कोरोना साथीमुळे बाजारात मंदी असताना रिलायन्स इंडस्ट्रीज ही आपल्या देशातील सर्वात मोठी कंपनी नवनवे विक्रम प्रस्थापित करते आहे. हा प्रवास या कंपनीला कसा शक्य होतो आहे, याची चुणूक तिच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत पाहायला मिळाली. 

रिलायन्स इंडस्ट्रीज AGM – मुकेश अंबानींच्या जिओ ग्लास, जिओ TV+ अशा महत्वपूर्ण घोषणा !

 • शेअर बाजारातील गुंतवणुकीला चांगला परतावा मिळविण्यासाठी सतराशे साठ गोष्टी जगभर सांगितल्या जातात, पण त्यानुसार शेअर बाजार चालतोच, असे होत नाही. त्याचे कारण येणारा प्रत्येक दिवस नवा असतो आणि तो नवी परिस्थिती घेऊन आलेला असतो. त्याला बदल म्हणतात, जो कोणी रोखू शकत नाही. 
 • या गोष्टींमधील सर्वात सोपी गोष्ट सांगायची तर जी वस्तू किंवा सेवा आपण दैनंदिन जीवनात वापरतो, त्या कंपनीचे शेअर आपण घेतले पाहिजेत. 
 • त्याचे कारण म्हणजे जसे आपण ती वस्तू किंवा सेवा वापरत असतो, तसे या देशात लाखो ग्राहक ती वस्तू किंवा सेवा वापरत असतात. 
 • अशा विक्रीवरच कंपनी चालू असते आणि ती नफा मिळवून शेअरधारकांना परतावा देत असते. 
 • ही गोष्ट सोपी यासाठी आहे की, आपण ग्राहक असलेल्या कंपनीचे आपण शेअरधारक होण्यासाठी कोणत्याही किचकट आकडेमोडीची किंवा अभ्यासाची अजिबात गरज नाही. 
https://bit.ly/39k9GyD

रिलायन्स इंडस्ट्रीचा विस्तार 

 • भारतातील सर्वात मोठी असलेली (बाजारमूल्य १२ लाख ९२ हजार ६६१ कोटी रुपये) कंपनी म्हणजे रिलायन्स इंडस्ट्री, ही असाच आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे. 
 • तुम्ही गाडीत कोठेही पेट्रोल डीझेल, गॅस भरला की त्यातील काही रक्कम या कंपनीच्या खात्यावर जमा होत असते. कारण इंधन शुद्धीकरण ही कंपनी करते आहे. 
 • तुम्ही जिओचा मोबाईल किंवा इंटरनेट सेवा वापरत असाल, तर त्याचीही रक्कम या कंपनीला जात असते. जिओ वापरणाऱ्यांची संख्या आता ३० कोटींवर गेली आहे. 
 • हे दोन्ही तुम्ही करत नसाल, पण घरी टीव्हीवर बातम्या किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम पहात असाल तरी त्या चॅनेलचा टीआरपी वाढविण्यात तुम्ही हातभार लावला आहे. ते चॅनेल रिलायन्स ग्रुपचे असण्याची शक्यता अधिक आहे. कारण त्यांच्या चॅनेलची संख्या आता ५५ इतकी झाली आहे. 
 • तुम्ही ग्रामीण भागात रहात असाल आणि शेती व्यवसाय करत असाल, तर तुमचा माल कदाचित रिलायन्स रिटेल विकत घेत असेल. 
 • शहरात राहात असाल तर त्यातील सहा हजार ६०० शहरात, १० हजार ४१५ रिलायन्स रिटेल मॉलचे जाळेच पसरले आहे. आता तर घरबसल्या किराणा घरी पोचविण्याची व्यवस्था रिलायन्स मार्टने सुरु केली आहे. 
 • तुम्ही म्हणाल की आम्ही तर आमच्या गावातील किराणा दुकानातूनच किराणा भरतो, तरी तुम्ही रिलायन्सचे ग्राहक होणार आहात. कारण देशभरातील किराणा दुकानांना जोडण्याचे काम या कंपनीने सुरु केले आहे. 
 • यातले काहीच तुम्ही करत नाही, असे तुमचे म्हणणे असेल, तरी तुम्ही रिलायन्सचे ग्राहक आहात. कारण तुम्ही फेसबुकवर खूप सक्रीय आहात. 
 • तुम्ही कदाचित फेसबुकवर फक्त व्यक्त होत असाल, पण घरातील तरुण मुले फेसबुकवरील जाहिराती पाहून काही वस्तूंची मागणी करू लागली आहेत. 
 • फेसबुकने जीओमध्ये गुंतवणूक केल्यामुळे भारतात रिलायन्सला ऑनलाईन व्यासपीठ मिळाले आहे. 
 • तरीही तुम्ही रिलायन्सचे ग्राहक आहात की नाही, असा संभ्रम असेल तर आणखी एक हुकमी एक्का रिलायन्सने परवा आपल्या हातात घेतला आहे, त्याचे नाव आहे गुगल! 
 • हो, जगात सर्वव्यापी झालेल्या गुगलने जीओमध्ये गुंतवणूक केली आहे. आता, मी गुगलही वापरत नाही, असे तर तुम्ही म्हणू शकत नाही! 

धीरुभाई अंबानी – रिलायन्स इंडस्ट्रीजचे महान उद्योजक ! 

रिलायन्स  कंपनीची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

 • रिलायन्स कंपनीची एवढी चर्चा आज करण्याचे कारण म्हणजे या कंपनीची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मागच्या आठवड्यात झाली. यासाठी कंपनीचे लाखो शेअरधारक ऑनलाईन उपस्थित होते. 
 • रिलायन्स पुढे काय काय करणार आहे, याची घोषणा कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी यावेळी केली. 
 • आज बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्रमुख असलेल्या फेसबुक, गुगलसारख्या कंपन्यांनी रिलायन्समध्ये गुंतवणूक करून रिलायन्सची ताकद मान्य केली आहे. 
 • भारतात घट्ट पाय रोवण्यासाठी आपल्याला रिलायन्ससोबत जावे लागेल, हे त्यांनी मान्य केले आहे, ही जशी त्या कंपनीच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे तशीच ती भारताच्या दृष्टीनेही तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. 
 • कोरोनामुळे अर्थव्यवहार मंदावले असताना दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक नव्याने मिळविणे, हे विशेष आहे.  
 • सर्वसाधारण सभेत अंबानी यांनी केलेल्या घोषणा केवळ कंपनीच्याच नव्हे, तर भारताच्या अर्थकारणावर दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या ठरणार आहेत. 
 • ज्या ५ जी ची देश वाट पाहतो आहे, ती सेवा पुढील वर्षात देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी आतापर्यंत आपण चीनवर अवलंबून होतो. 
 • रिलायन्सची ५ जी सेवा केवळ भारतच नव्हे तर आफ्रिकन आणि आशियाई देशांना हवी आहे. ती संधी रिलायन्स घेणार आहे. 
 • अमेझान, फ्लिपकार्टसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या भारताची बाजारपेठ काबीज करत आहेत. त्यांच्या स्पर्धेत रिलायन्स रिटेल कंपनी उतरली आहे. या पहेलवानांच्या कुस्तीत ग्राहकांचा फायदा होणार आहे. 
 • पेट्रोल डीझेलचा वापर पुढील काही वर्षात मोठ्या प्रमाणावर कमी करावा लागणार आहे. त्याची दखल घेऊन रिलायन्सने २०३५ पर्यंत झिरो कार्बन कंपनी होण्याचा संकल्प जाहीर केला आहे. याचा अर्थ ग्रीन एनर्जीवर ही कंपनी भर देणार आहे. 
 • कोरोनासारख्या संकटाने ऑनलाईन शिक्षण आणि कार्यालयांचे महत्व वाढविले आहे. या संदर्भात जीओमीटसारखे चांगले पर्याय रिलायन्स देते आहे. 
https://bit.ly/2ZHTHHy

हे सर्व सांगण्याचा उद्देश्य एका कंपनीची भलावण करणे नसून जग कोठे चालले आहे, त्याची दिशा लक्षात आणून देणे आहे. सर्व व्यापार उदीम संघटीत होत आहेत, हे चांगले नाही, हे तर आज प्रत्येक तज्ञ आपल्याला सांगतो. पण त्याला रोखण्याचा काही मार्ग सांगितला जात नाही. याचा अर्थ सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून या प्रवाहात आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने भाग घ्यावा लागणार आहे. तो भाग घेण्यास आपण तयार आहोत का? हा खरा लाखमोलाचा प्रश्न आहे. 

रिलायन्स जिओ -फेसबुक मधील डिलचे परिणाम

 • मोठ्या उद्योजकांची श्रीमंती हा आपल्या देशात अनेकदा कुचेष्टेचा विषय होताना दिसतो आणि त्यावर तावातावाने बोलणे, हे शहाणपणाचे मानले जाते. त्याला भांडवलशाहीचे नाव देऊन त्याचा धिक्कार करण्यात येतो. पण आता तसे करून चालणार नाही. त्याला तेवढाच व्यवहार्य पर्याय समोर ठेवावा लागेल. तो पर्याय जर कोणी देऊ शकले तर नागरिक त्यांचे जरूर ऐकतील. 
 • जागतिकीकरणाच्या गेल्या २७ वर्षात बहुराष्ट्रीय कंपन्यांचा शिरकाव आपल्या घरात झालेलाच आहे. त्याला आज कोणीच रोखू शकत नाही. 
 • अशा या खुल्या स्पर्धेत भाग घेण्याची क्षमता असेल तर तो घेणे, नाहीतर त्यांच्याशी जोडून घेणे, एवढाच मार्ग राहतो. 
 • ती स्पर्धा जर रिलायन्स करताना दिसते आहे, तर त्याचे स्वागत केले पाहिजे. कारण तो पैसा देशातला देशात तरी राहतो. 
 • मुकेश अंबानी यांनी त्या सभेत मुद्दाम जीएसटी आणि इन्कमटॅक्सचेही आकडे सांगितले आणि देशातील सर्वात अधिक टॅक्स भरणारी कंपनी आहे, असा उल्लेख केला. तो या संदर्भाने महत्वाचा आहे. 

तात्पर्य, रिलायन्सचे ग्राहक आपल्याला व्हायचे की नाही, हे आपल्या हातात नाही. ते आपण झालेलोच आहोत. शेअरधारक व्हायचे की नाही, हा ज्याच्या त्याच्या स्वातंत्र्याचा विषय आहे! 

रिलायन्सच्या गुंतवणूकदारांचे पैसे तीन महिन्यात दुप्पट कसे झाले?

यमाजी मालकर 

[email protected] 

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Reliance annual meeting marathi mahiti, Reliance Success Facts & Future Marathi mahiti, Reliance Industries success and future in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…