दहा क्रमांक असलेलं पॅन कार्ड हे एक किती महत्त्वाचं कार्ड आहे हे सांगायला नको. एका दिवसात बँकेद्वारे पन्नास हजारावरील आर्थिक व्यवहार करताना धारकाजवळ पॅन कार्डची आवश्यक असते.
- बँकेत सेविंग अकउंट शिवाय इतर अकाउंट उघडण्यासाठी, क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी, पन्नास हजारावरील विम्याचे हप्ते भरण्यासाठी पॅन कार्ड लागतं. हॉटेलचं पन्नास हजारावरील बिल भरताना किंवा म्युच्युअल फंड्स वा एक लाखावरील शेअर्स विकत घेण्यासाठीही पॅन कार्ड लागतंच. हे एक महत्त्वाचं कागदपत्र आहे.
- भारतीय कर विभागाने (Tax Department) पॅन कार्डच्या नियमांसंदर्भात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. हे बदल ५ डिसेंबर २०१८ पासून अमलात आणण्यात आले आहेत. या नियमांची प्रत्येकाला माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बदलण्यात आलेल्या नियमांपैकी चार नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत.
बदलण्यात आलेले महत्वाचे चार नियम
१. आई वडिलांचे नाव ऐच्छिक :
पूर्वी पॅन कार्ड धारकाला नाव लिहिताना स्वतःच्या नावासोबत आई आणि वडिलांचं नाव लिहिणं अपरिहार्य असायचं. हा नियम शिथिल झाला आहे. आता हे ऐच्छिक केलं आहे. आई वडिलांचा घटस्पोट झाला असेल किंवा पालकांशी काहीही संबंध राहिला नसेल तर पालकांचं नाव पॅन कार्डसाठी देणं आता बंधनकारक नाही.
२. दोन पॅन कार्ड आढळल्यास रु. १०,००० चा दंड :
जवळील पॅन कार्ड गहाळ झालं असताना व्यक्ती दुसऱ्या पॅन कार्डसाठी अर्ज करून पॅनकार्ड मिळवतो. पण काही काळानंतर पूर्वीचं पॅनकार्ड प्राप्त झाल्यावर जर ते रद्द केला नाही किंवा पूर्वी केलं नसल्यास एक व्यक्तीकडे त्याच्याच नावाचे दोन पॅन कार्ड आढळल्यास त्या व्यक्तीला दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.
३. क्यू आर कोड :
देशांत बनावट पारपत्र (Passport) तयार केले जातात तिथे खोटे पॅन कार्ड बनवणं फार कठीण नव्हतं. त्यामुळे अनेक खोटे पॅन कार्ड धारक देशात सापडतात. पॅन कार्ड संबंधित भ्रष्टाचारही होतो. लोक खोटे पॅन कार्ड्स तयार करतात. यामुळे केंद्रीय कर संचालन विभागाने यासंदर्भात महत्त्वाचे बदल केले आहे. आता पॅन कार्ड हे “क्यू आर कोड (QR Code)” सहित असणार. क्यू आर कोड म्हणजे बारकोड. या बारकोडमध्ये धारकाचे नाव, वडिलांचे नाव, जन्मदिनांक आणि पॅन कार्ड क्रमांक असणार आहे. लोक खोटे पॅन कार्ड बनवू शकतील पण बारकोड नाही. खोटं बारकोड तयार केलं तरीही क्यू आर कोड स्कॅन केला असता त्यातील खोटेपणा स्पष्टपणे समोर येईल. कारण ते कोड आणि क्रमांक फक्त सरकारकडेच असतील.
४. अडीच लाख किंवा त्याहून जास्त रकमेचा व्यवहार :
चवथा आणि सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे समजा कोणी व्यक्ती कोणत्याही कंपनी, दुकान, शाळेतील वा कसल्याही फर्ममधील कोणत्याही स्तरावरील अधिकारी असो, जर ती व्यक्ती अडीच लाख किंवा त्याहून जास्त रक्कमेचा व्यवहार बघत असेल किंवा तिच्या खालून अडीच लाख रक्कमेहुन जास्त रक्कमेचा व्यवहार होत असेल तर त्या व्यक्तीचंही पॅन कार्ड नंबर त्या व्यवहार संबंधित कागदपत्रांवर नमूद करणं आवश्यक आहे.
- उदाहरणार्थ समजा एका शाळेचे मुख्याध्यापक शाळेसंबंधी अडीच लाखांहून जास्त रक्कमेचा व्यवहार करत असतील. त्यातील रक्कमेशी त्यांचा वैयक्तिक काहीही संबंध नसेल तरीही त्यांना त्यांच्या स्वतःच्या पॅन कार्ड संबंधित माहिती द्यावी लागेल.
- आणखी उदाहरण द्यायचं झाल्यास कोणी व्यक्ती कोण्या डॉक्टर, वकील, कलाकाराचं व्यवहार बघत असेल , त्या व्यक्तीचा त्या व्यवहारातील रक्कमेमेशी काहीही संबंध नसला तरीसुद्धा त्या व्यक्तीलाही अडीच लाखाहून जास्त रकमेचा व्यवहार करताना स्वतःच्या पॅन कार्डची माहिती नमूद करावी लागेल.
पॅन कार्ड हे आर्थिक व्यवहार शिवाय देशाचे रहिवासी म्हणून अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे. यासंबंधी सर्व बदल (updates) माहिती असणं गरजेचं आहे.
(चित्रसौजन्य: https://bit.ly/2E4KD54 )
तुमचंही पॅनकार्ड रद्द झालंय का? लगेच तपासा काही मिनिटांत..
(अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. येथील लेखांचा हेतू हा अर्थसाक्षरते निगडीत विविध माहितीचा प्रसार करणे असून, सदर विषयांसंदर्भातील निर्णय आपल्या नेहमीच्या वकिल/ चार्टर्ड अकाऊंटंट/ सल्लागार यांच्या सल्ल्यानेच घ्यावेत. Please refer https://arthasakshar.com/Disclaimer.aspx )
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.