“राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा
मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा…”
आज १ मे! आजचा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर आजचा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्र म्हणजे शिवबाचा पराक्रम आणि एकनाथ, तुकोबा, ज्ञानेश्वर
महाराष्ट्र म्हणजे टिळक, सावरकर, आगरकर आणि आंबेडकर.
महाराष्ट्र म्हणजे दऱ्या- खोऱ्या आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा.
महाराष्ट्र म्हणजे समुद्राची गाज आणि साहित्याचा साज.
कितीही वर्णन केलं, तरी कमी पडेल असा सर्व बाजुंनी समृद्ध असणारा महाराष्ट्र.
महाराष्ट्राची मातृभाषा मराठी भाषा नेहमीच समृद्ध होती, आहे आणि राहणार!
पुलंच्या विनोदी साहित्यापासून गदीमांच्या कवितांपर्यंत,
रत्नाकर मतकरींच्या गुढकथा असोत वा बहिणाबाईंच्या कविता,
साहित्याने श्रीमंत असणारा महाराष्ट्र आजच्या आधुनिक डिजिटल युगातही तितक्याच ताकदीने उभा आहे.
साहित्याने समृद्ध आणि श्रीमंत असणाऱ्या मराठी साहित्य जगताच्या चंद्रावरचा एक डाग म्हणजे डिजिटल माध्यमात आर्थिक विषयांची संपूर्ण माहिती देणारी एकही वेबसाईट उपलब्ध नव्हती. इंग्रजीमध्ये यासाठी शेकडो वेबसाईट असणं काही नवीन नाही. हिंदीमध्येही अशा वेबसाइट्सची संख्या लक्षणीय आहे. मग मराठीतच फक्त ‘आर्थिक विषयासाठी’ अशी एकही वेबसाईट का नाही? असा प्रश्न आम्हाला पडला.
ही कमी पूर्ण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून आम्ही आर्थिक विषयांची माहिती संपूर्णपणे मराठीतून देणारी अर्थसाक्षर.कॉम नावाची एक वेबसाईट चालू केली.
या वेबसाईटवर आम्हाला ज्या प्रतिक्रिया मिळाल्या किंवा अमुक एका विषयांवर माहिती द्या असं सांगणारे मेसेजेस आले त्यावरून आमच्या असं लक्षात आलं अनेकांना अर्थशास्त्रातील साध्या साध्या गोष्टींची माहिती नाही.
अगदी चेकवरच्या सहीपासून बँकेचे सगळे व्यवहार मराठीत करता येतात हेच अनेकांना माहिती नसतं.
चेकवर मराठी सही चालेल का?
बँकेत मराठीतून अर्ज दिला तर चालेल का?
चेकवर मराठीतून नाव लिहिलं तर ‘चेक बाउंस’ तर होत नाही ना?
असे अनेक प्रश्न विचारणारे मेसेजेस अगदी सुशिक्षित माणसांकडूनही आम्हाला येत असतात.
गेल्या वर्षभरात आम्हला मिळालेला प्रतिसाद आणि वेबसाईटची लोकप्रियता बघता मराठी भाषेमध्ये आर्थिक घडामोडींवर भाष्य करणाऱ्या, आर्थिक घटकांची माहिती देणाऱ्या वेबसाईटची किती नितांत आवश्यकता होती हे स्पष्ट होतंय.
आपल्या मातृभाषेतून बोललेलं, वाचलेलं अगदी सहज समजतं. पण काही काही इंग्रजी शब्द इतके अंगवळणी पडले आहेत की त्यासाठी मराठी शब्द वापरायचा ठरवलं तरी समोरच्याला पटकन कळेल का नाही, अशी शंका मनात येते. याचं कारण म्हणजे इंग्रजांनी आपल्यावर अनेक वर्ष केलेलं राज्य आणि त्यामुळे आपल्या शिक्षण पद्धतीवर असणारा इंग्रजी भाषेचा जबरदस्त प्रभाव!
याच कारणामुळे आमच्या लेखांमध्ये अनेक वेळा आम्ही मराठी शब्दांसोबत कंसात ‘बोली भाषेतील’ इंग्रजी शब्द आवर्जून लिहितो. त्यामुळे लेख वाचताना वाचकांच्या मनात कुठलाही संभ्रम राहणार नाही..
अर्थसाक्षर.कॉम ला मिळणारं यश पाहता आपल्या महाराष्ट्राच्या माय मराठी जिवंत ठेवण्यासाठी खारीचा का होईना पण काहीतरी वाटा आपण उचलतोय याचं समाधान वाटतं आहे. आणि म्हणूनच की काय आजचा महाराष्ट्र दिन खऱ्या अर्थाने साजरा केल्याचा आनंद आम्हाला आहे.
टीम अर्थसाक्षरतर्फे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer:–https://arthasakshar.com/disclaimer/