बदलत्या आधुनिक जगात भारताकडे असलेले प्रचंड मनुष्यबळ आणि त्या माध्यमातून आलेल्या क्षमता, याकडे आपण संधी म्हणून पाहिले तर २०२० आणि त्यानंतरच्या भविष्यात भारताचा विचार न करता जगाला पुढे जाता येणार नाही. पण त्यासाठी भारतीय समाज आणि देशाच्या केवळ उणीवांवर बोट ठेवून त्याला नाउमेद करण्यापेक्षा त्याला त्याने अनेक विसंगतीमध्ये केलेल्या प्रचंड निर्मितीची आणि त्याच्यातील क्षमतांची जाणीव करून दिली पाहिजे. अशा स्वच्छ चष्म्याने आपण आपल्या देशाकडे पाहिले तर काय दिसते पहा.
- भारत नावाच्या या उपखंडावर निसर्गाने भरभरून केलेली उधळण, उज्ज्वल भारतीय संस्कृती, केवळ मानवजातीलाच नव्हे, तर सर्व सजीव – निर्जीव सृष्टीच्या शाश्वत कल्याणाचा आग्रह धरणारे, वसुधैव कुटुंबकम् हा गाभा असलेले भारतीय तत्त्वज्ञान, नियतीने आधुनिक जगाला ज्या धोकादायक टप्प्यावर आणून उभे केले आहे. त्या टप्प्यावर भारतावर येऊन पडलेली नैसर्गिक जबाबदारी आणि या सर्व पाश्वर्भूमीवर वर्तमानात भारतात होत असलेले क्रांतिकारी परिवर्तन… असा योगायोग जुळून येणे, ही नव्या दशकात जगाला मिळालेली देणगीच म्हटली पाहिजे.
- कोणाला ही अतिशयोक्ती वाटू शकेल, पण ज्या संवेदनशील नागरिकांना आजच्या जगातील ताण जाणवतो आहे, ते ज्या दिशेच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी हा योगायोग अतिशय आनंददायी आणि आशादायी आहे, हे निश्चित.
- ज्या भारताला आज भांडवलासाठी जगाकडे मागणी करावी लागते, तो जगाला दिशा देईल, यावर कोणाचा सहजी विश्वास बसण्याचे कारण नाही. पण ज्यांनी गेल्या दशकातील जगाची दमछाक आणि भारतातील बदलांचे महत्व जाणले आहेत, त्यांना आजचे आणि उद्याचे जग आता केवळ प्रगतीच्या मागे पळत सुटणे, अजिबात मान्य होणार नाही. असे नागरिक जेव्हा जगाच्या शाश्वत कल्याणाची दिशा शोधू लागतात, तेव्हा त्यांना भारताच्या सर्व क्षमतांकडे पाहण्याशिवाय पर्याय राहात नाही.
- जगाच्या आजच्या ७७० कोटी लोकसंख्येत, आकाराने सातव्या क्रमांकावर असलेल्या भारताचा वाटा १३६ कोटी म्हणजे जगात दुसऱ्या क्रमांकाचा, इतका प्रचंड आहे. भारताच्या लोकसंख्येची घनता म्हणजे एक चौरस किलोमीटरला असलेली लोकसंख्या. भारताची ती ४२५ आहे आणि जगाची ती केवळ १५ इतकी आहे. या आकडेवारीकडे आपण नकारात्मक दृष्टीनेच पहात आलो आहोत. पण ज्या जीवाने जन्म घेतला आहे, त्याला मानवी प्रतिष्ठेने जगण्याचा शंभर टक्के अधिकार आहे, एवढी माणुसकी जरी मान्य केली तरी ही संख्या संकट म्हणून पाहण्याऐवजी संधी म्हणून पाहण्यास आपण सुरवात करू.
- या प्रचंड संख्येसह हा देश आज जगातील पाचवी – सहावी अर्थसत्ता आहे, त्याच्या आर्थिक विकासाचा वेग जगातील सर्व मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये जगात सर्वाधिक आहे, (जीडीपी २.६१ ट्रीलीयन डॉलर) पर्चेसिंग पॉवर पॅरीटीमध्ये हा देश आज सर्व १९३ देशांत जगात तिसऱ्या (९.४५ ट्रीलीयन डॉलर – जगातील हिस्सा ३.२७ टक्के) क्रमांकावर आहे, जगात ज्या एका संपत्तीला सर्वत्र मान्यता आहे, त्या सोन्याच्या खाणींचा लवलेश नसताना जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा साठा (२३००० टन) हा देश बाळगून आहे, अशी भौतिक श्रीमंतीची शेकडो उदाहरणे देता येतील, पण त्याला जागेची मर्यादा आहे.
- संपत्ती निर्मितीची ही प्रचंड क्षमता जर जाणून घेतली, तर सध्याच्या सर्व विसंगती मान्य करूनही त्याचा सार्थ अभिमान वाटावा, अशीच ही आकडेवारी आहे. भारत हा केवळ मागणारा नव्हे तर जगाशी हस्तांदोलन करणारा देश होतो आहे, त्याचा भारतीय नागरिक म्हणून आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.
- आर्थिक प्रगती किंवा भौतिक प्रगती म्हणजेच सर्वस्व नाही. त्याही पलीकडे जगाकडे आहे ते सर्व भारतीयांकडे आहेच. मिशन शक्तीचे प्रकल्प प्रमुख डॉ. यू. राजाबाबू यांचे पुढील विधान पहा. ‘प्रगत देशांना जे तंत्रज्ञान विकसित करण्यात ३०-४० वर्ष लागली, ते भारताने शून्यातून सुरवात करत सहा आठ वर्षात केले’, असे त्यांनी म्हटले आहे. सात रुपये किलोमीटर खर्चात मंगलयान सोडणारा, चांद्रमोहीम-२ द्वारे चंद्रावर पाउल ठेवण्याचा संकल्प करणारा, सर्वाधिक उपग्रह आकाशात सोडणारा पाचवा देश – अशी तंत्रज्ञान आणि बौद्धिक झेप त्याने घेतलीच आहे. भारताचे सर्वाधिक तरुण अमेरिकेसारख्या आर्थिक महासत्ता असलेल्या देशात बजावत असलेल्या कामगिरीचा अर्थ समजून घेतला पाहिजे.
- आधुनिक जगाच्या प्रगतीच्या निकषांत उत्तीर्ण होण्याच्या स्पर्धेत १३६ कोटी नागरिकांचे पालनपोषण करणे, ही या जगातील अद्भुत गोष्ट असून ती या देशाने बऱ्याच प्रमाणात साध्य केली आहे. या प्रवासात एक मोठी गल्लत मात्र झाली आहे आणि ती आपल्याला निश्चितपणे दुरुस्त केली पाहिजे. ती म्हणजे प्रगती म्हणजे काय, विकास कशाला म्हणावयाचे, याचे जे मापदंड पाश्चिमात्य तज्ञांनी त्यांच्या विशिष्ट नैसर्गिक, भौगोलिक स्थितीमुळे त्यांच्यासाठी घालून घेतले होते, त्यांचे अंधानुकरण सोडून दिले पाहिजे. कारण त्यामुळे भारतीय समाज दु:खी झाला आहे. त्याची कोंडी झाली आहे. त्यामुळे भारतीय मापदंड टाकून त्यावर चालण्याचा पुरुषार्थ आपल्याला निग्रहाने करावा लागणार आहे. त्यासाठी टोकाच्या आत्मवंचनेतून बाहेर पडणे क्रमप्राप्त आहे. केवळ व्यवस्था साथ देत नसल्याने भारतीय समाजाचे आज जे विस्कळीत रूप दिसते आहे, त्याला खरे मानून त्याच्या बदनामीचे सातत्याने जे प्रयत्न केले जात आहेत, ते म्हणूनच निषेधार्ह आहेत.
- भारत हा सर्वार्थाने वेगळा देश आहे आणि त्यामुळे त्याचे अर्थशास्त्र हे सर्वार्थाने भारतीय असणे, ही त्याची गरज आहे. पण भारतातील आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सतत पश्चिमेकडे पहात राहिलो. त्यामुळेच ब्रिटीशांनी आपल्यावर लादलेले पैशीकरण आपण स्वीकारले आणि भारतीयांचे जीवन आनंदी आणि समाधानी होण्याऐवजी केवळ पैशांभोवती फिरू लागले. बरे, त्यातून आपले प्रश्न ७० वर्षांत सुटू शकले असते, तर तेही समजू शकलो असतो. पण त्याविषयी तर समाजात प्रचंड नाराजी आहे. याचाच अर्थ आम्ही आज या तीन पायांच्या शर्यतीत भाग घेवून पुढे जावू शकत नाही, हे मान्य करण्याचे धाडस आम्ही एकवटू शकलो नाहीत.
- भारतीय नागरिक वृत्तीने इतके चांगले आहेत आणि त्यांनी काबाडकष्ट करून इतकी प्रचंड संपत्ती निर्माण केली आहे की ब्रिटीश राजवटीत या देशाची प्रचंड लूट होऊनही हा देश नव्याने उभा राहिला आहे. याचा अर्थ तीन पायांच्या शर्यतीतही आम्ही आमची क्षमता सिद्ध केली आहे. पण त्यातून अनेक विसंगती आणि टोकाच्या विषमतेने जन्म घेतला आहे. त्यातही आम्ही आज जगातील सर्वात मोठी लोकशाही जिवंत ठेवली आणि प्रचंड वैविध्यात देश एकसंघ राहिला.
- जगाने ठरविलेल्या आर्थिक निकषांतही आज तो पुन्हा दखलपात्र झाला, हा त्याच्यातील प्रचंड क्षमतांचा धडधडीत पुरावा आहे. जगातील सर्वात तरुण असलेला देश, ५५ कोटी म्हणजे सर्वाधिक वर्किंग लोकसंख्या आणि सतत वाढत चाललेला मध्यमवर्ग म्हणजे वाढत्या क्रयशक्तीच्या जोरावर जगाच्या आर्थिक विकासात त्याचे महत्व आज कोणीही नाकारू शकत नाही. नव्हे, तोच जगाचे नजीकच्या भविष्यातील ग्रोथ इंजिन मानले जाते आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या महान देशाच्या वर्तमानाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. त्यासाठी डोळ्यावर लावलेले रंगबेरंगी चष्मे काढून ठेवावे लागतील आणि फक्त भारतीय ‘नंबर’चा स्वच्छ असा चष्मा लावावा लागेल.
भारताला झेप घेण्यासाठीची आज उत्तम संधी का आहे?
- २.६१ ट्रीलीयन डॉलर (जीडीपी) – जगात सहावा
- ९.४५ ट्रीलीयन डॉलर (पर्चेसिंग पॉवर पॅरीटी) – जगात तिसरा
- १२० कोटींपेक्षाही अधिक मोबाईलधारक
- १२३ कोटी आधारकार्डधारक
- ३८ कोटी पॅनकार्डधारक
- १७.१० कोटी देशांतर्गत विमान प्रवास करणारे नागरिक
- ५ कोटी – परदेशात सहलीसाठी जाणारे नागरिक
- १० लाख नोंदणीकृत डॉक्टर
- १२ लाख नोंदणीकृत कंपन्या
- २५ कोटी चार चाकी मोटारींचे मालक
- ३ लाख – परदेशात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी
- ७८ अब्ज डॉलर रीमिटन्स (भारतीय मायदेशात पाठवीत असलेली जगातील सर्वाधिक रक्कम)
यमाजी मालकर
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/