15. पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP): म्युच्युअल फंड योजनांत टप्याटप्याने गुंतवणूक करण्यासाठी पद्धतशीर गुंतवणूक योजना हा सुयोग्य पर्याय आहे. एकदाच मोठी रक्कम एकरकमी गुंतवण्याऐवजी ती नियमित अंतराने सर्वसाधारणपणे दरमहा गुंतवली जाते. हे म्हणजे रोवलेल्या बिजाची सातत्याने निगराणी करण्यासारखे आहे त्यामुळे त्याचे डेरेदार वृक्षात रूपांतर होईल.
पद्धतशीर गुंतवणूकीचे महत्व:
●सातत्यता: आपल्या ऐपतीप्रमाणे दरमहा गुंतवणूक करायची असल्याने त्याचा भार न होता सातत्य राहते.
●चक्रवाढ लाभ: दिर्घकाळात ही गुंतवणूक वाढत राहिल्याने त्यातील परताव्यात चक्रवाढ व्याजाने वाढ होते.
●सरासरीचा लाभ: गुंतवणूक नियमीतपणे होत असल्याने बाजार खाली असताना जास्त युनिट मिळतात तर वर असताना तुलनेत कमी युनिट एकूण युनिट सरासरी किमतीत मिळतात.
●आर्थिक शिस्त: नियमितपणे गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारास आर्थिक शिस्त लागते.
पद्धतशीर गुंतवणुकीची उपयुक्तता:
●परवडणारी गुंतवणूक: अत्यल्प गुंतवणूक करावी लागत असल्याने ती सर्वाना परवडू शकते. किमान ₹500/-ची गुंतवणूक करण्याची सोय सर्व फंडांनी उपलब्ध करून दिली आहे. काही फंड याहून कमी रकमेची किमान गुंतवणूक घेतात.
●विशिष्ट उद्देशाने केलेली गुंतवणूक: यातील गुंतवणूक विशिष्ट उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वापरली जाते.
●लवचिकता: याची सुरुवात कधीही करता येते तसेच थांबवताही येते. काही काळासाठीही थांबवता येते किंवा वाढवता अथवा कमी करता येते.
●दीर्घकालीन गुंतवणूक:अशी गुंतवणूक वाढून दिर्घकाळात संपत्ती निर्माण होत असल्याने आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत होते.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे पद्धतशीर गुंतवणूक म्हणजे रोपाची नियमित निगराणी करणे ज्यामुळे त्याचे भरदार वृक्षात रूपांतर होऊन त्याची फळे आपल्यास चाखता येतात.
16. निव्वळ संपत्ती (Net worth) : निव्वळ संपत्ती म्हणजे आपल्याकडे असलेल्या सर्व मालमत्तांच्या बाजारमूल्यातून देणी वजा केली असता शिल्लख राहणारी रक्कम. याचा उपयोग आपला आर्थिक स्तर समजून घेण्यासाठी होतो.
निव्वळ संपत्तीचे महत्व: निव्वळ संपत्ती किती आहे त्यावरून गुंतवणूकदारास त्याचा आर्थिक स्तर समजतो. त्यावरून त्याला किती खर्च करावा, बचत करावी किंवा गुंतवणूक करावी याचा अंदाज बांधता येतो. आपण आर्थिक दृष्ट्या कुठे आहोत आणि कुठे जायला हवे यासंबंधीचा निर्णय घेण्यास त्याचा उपयोग होतो.
गुंतवणूकदार त्याच्या मालमत्तेतून देयता वजा करून निव्वळ संपत्तीचा शोध घेऊ शकतो. असा शोध घेतल्याने,
●गुंतवणूकदारास त्याची आर्थिक प्रगती समजते.
●वाजवी आर्थिक धेय्ये ठरवता येतात.
●भविष्यातील योजनांची आखणी करता येते जसे- घर बांधणे, उच्च शिक्षण घेणे, निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करणे.
असा शोध घेणे,
हे आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने उचललेले पाहिले पाऊल आहे, जे आपल्याला सक्षम बनवेल. ही अतिशय सहज करता येण्यासारखी, उपयुक्त
सवय असून त्यामुळे गुंतवणूकदाराची आर्थिक सजगता वाढते.
17. मालमत्तेचे निव्वळ मूल्य (NAV): म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करताना मालमत्तेचे निव्वळ मूल्य म्हणजे काय? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
कल्पना करा तुम्ही मित्रांबरोबर एकत्र पिझ्झा खायचा प्लॅन करत आहात, तुम्ही तो समान तुकडे करून वाटून खाता त्याचे पैसे सारखी विभागणी करून भरता. प्रत्येकाने मोजलेली पिझ्याची किंमत ही त्यांनी खाल्लेल्या भागाची किंमत असते.
आता या पिझ्याच्या जागी म्युच्युअल फंड योजना असल्याची कल्पना करूया म्हणजे निव्वळ मालमत्ता मूल्य म्हणजे काय त्याचा प्राथमिक अंदाज येईल. एखाद्या योजनेच्या युनिटचे निव्वळ मालमत्ता मूल्य हे त्यातील मालमत्तेच्या मूल्याचे प्रतिबिंब असते. सोप्या भाषेत युनिटचे मालमत्ता मूल्य ही त्यातील मालमत्तेची तेव्हाचे निव्वळ मूल्य असते.
निव्वळ मालमत्ता मूल्य = योजनेतील मालमत्तेचा बाजारभाव – योजनेचे खर्च यास एकंदर युनिटच्या संख्येने भागले असता येणारी संख्या. बाजारभावातील मालमत्तेच्या किमतीत होणाऱ्या फरकामुळे हे मूल्य सतत बदलत असते.
निव्वळ मालमत्ता मूल्याचे महत्व: निव्वळ मालमत्ता मूल्यामुळे योजनेची कामगिरी
समजत असल्याने गुंतवणूकदार त्या योजनेची कामगिरीचा अंदाज बांधत असल्याने योजनेचे निव्वळ मालमत्ता मूल्य माहिती असणे गरजेचे आहे.
●योजनेतील युनिटच्या खरेदी विक्री संबंधित निर्णय घेण्यासाठी: गुंतवणूकदार युनिट खरेदी अथवा विक्री करण्यापूर्वी त्याचे निव्वळ मूल्य पाहतात. त्यानुसारच खरेदी विक्री केली जाते.
●योजनेची कामगिरी तपासण्यासाठी: निव्वळ मालमत्ता मूल्यात विशिष्ट काळात झालेली वाढ यावरून योजनेच्या कामगिरीची पडताळणी करता येते.
●फंडांच्या कामगिरीची तुलना करण्यासाठी: वेगवेगळ्या म्युच्युअल फंड हाऊसच्या एकाच प्रकारच्या योजनेच्या कामगिरीची तुलना निव्वळ मालमत्ता मूल्याच्या वाढीवरून करता येऊन कोणत्या फडांची कामगिरी उजवी आहे त्याची तपासणी करता येते. याचा अर्थ असा नाही की एखाद्या फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य अधिक आहे याचा अर्थ असा नाही की तो चांगला फंड आहे तर त्यातील टक्केवारीतील वाढ किती आहे हे महत्त्वाचं आहे.
●लाभांश वितरण: म्युच्युअल फंडाच्या योजना त्यांच्या युनिट धारकांना लाभांश स्वीकार करण्याचा पर्याय देतात. यामध्ये निव्वळ मालमत्ता मूल्य किती आहे ते महत्वाचे आहे. युनिटवर मिळणारा परतावा यावरूनही गुंतवणुकीचे मूल्यांकन करता येते.
●फी आणि योजनेचा खर्च: निव्वळ मालमत्ता मूल्य काढताना फी आणि योजनेचा खर्च त्यातून वजा करून काढली जाते. हा खर्च जितका कमीतकमी तेवढी ती योजना चांगली असे अनुमान काढता येते.
18 अ. भांडवल बाजाराशी संबंधित तक्रारींचे निवारण:
भांडवल बाजार नियंत्रक सेबीने गुंतवणूकदारांच्या भांडवल बाजाराशी संबंधित तक्रारींचे झटपट निवारण करण्यासाठी स्कोर (SCORES) या नावाचा एक मंच तयार केला आहे. यामुळे गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणूक विषयक तक्रारी त्यावरून सहज सोडवता येतील. हा ऑनलाइन तक्रार निवारण मंच असून त्याद्वारे नोंदणीकृत कंपन्या, गुंतवणूक मध्यस्थ याच्यांविषयी तक्रार दाखल करणे आणि त्यांचा पाठपुरावा करणे सोयीचे आहे. गुंतवणूक ग्राहकांच्या तक्रारी पारदर्शक पद्धतीने, जलद आणि समाधानकारक पद्धतीने सोडवण्यास मदत करणे हे या मंचाचे उद्दिष्ट आहे.
स्कोर या मंचाची ठळक वैशिष्ठ्ये:
●वापरकर्ता स्नेही रचना: या मंचाची रचना ही सोपी असून त्याचा वापर कम्प्युटर आणि मोबाइलवरून सहज करता येतो. कोणत्याही तांत्रिक कौशल्य नसलेल्या व्यक्तीस त्याचा वापर करता येईल.
●वेळोवेळी मागोवा घेणे शक्य: येथे तक्रार दाखल केल्यानंतर एक तक्रार क्रमांक तयार होतो तो तक्रारदारास पाठवला जातो त्याचा उपयोग करून तक्रारीची स्थिती जाणून घेता येते.
●अभिप्रायावर आधारित सुधारणा : सोडवलेल्या तक्रारी, तक्रारदाराचे अनुभव आणि सूचना यांचा विचार करून ह्या मंचावर गुंतवणूकदारांना उपयुक्त होतील अशा सुधारणा केल्या जातात.
स्कोरची सुधारित आवृत्ती: एप्रिल 2024 मध्ये सुधारित स्वरूपात हा मंच कार्यान्वित झाला असून तो भांडवल बाजाराशी संबंधित तक्रारी सोप्या पद्धतीने नोंदवून जलद गतीने सोडावीत आहे. त्यातील महत्वाच्या बाबी अश्या.
●जलद तक्रार निवारण: पूर्वी एका तक्रारीची सोडवणूक सरासरी 30 दिवसात होत असे तो कालावधी 21 दिवसांवर आला आहे.
●योग्य व्यक्तींकडे तक्रारींची पाठवणी: तक्रार दाखल झाल्यावर लगेचच स्वयंचलित पद्धतीने योग्य विभागातील योग्य व्यक्तीकडे जाते.
●योग्य कालावधीत सोडवणूक न झालेल्या तक्रारी वरिष्ठांकडे रवाना: विहित कालावधीत न सुटलेल्या तक्रारी संबंधित वरिष्ठांकडे जात असल्याने जबाबदारी निश्चित होऊन त्वरित हालचाल केली जाते.
●दोन टप्यातील आढावा: तक्रारीवर 15 दिवसात कोणती कारवाई केली गेली याचा आढावा घेऊन ती न सुटल्यास त्यावरील वरिष्ठ पातळीवर पाठवून त्याचा आढावा गुंतवणूकदारास पाठवला जातो. त्यावरही तक्रारदार समाधानी नसल्यास दुसऱ्या टप्यात उच्चपदास्थाकडून त्याचा पुनर्विचार केला जातो.
●तक्रारदाराची ओळख: स्वयंचलित यंत्रणेद्वारे तक्रारदाराचा पॅन आणि मोबाईल वरील ओटीपी याद्वारे ओळख पाठवली जात असल्याने तक्रार दाखल करणे त्याचा मागोवा घेणे आता अधिक सुलभ झाले आहे. (अपूर्ण)
सेबीच्या सारथी या अँपवर उपलब्ध असलेल्या माहितीचा भावानुवाद.
उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत.
लेखातील मते वैयक्तिक असून ती गुंतवणूक शिफारस नाही याची नोंद घ्यावी)
