Reading Time: 3 minutes
- ‘तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलंय’ हे तर कित्येकदा ऐकलं असेलच. पण या जागतिकीकरणाचा तुम्ही कधी फायदा करून घेतलाय का? नाही? मग आता करा.
- विचार करा, तुम्ही कामा निमित्त एखाद्या नवीन शहरात आहात आणि तुमच्या कडील रोख पैसे ((कॅश)) संपले. काही वेळाने असं लक्षात आला की घाईमध्ये निघताना क्रेडीट, डेबिट कार्ड्स सुद्धा घरीच विसरले आहेत. ज्यांच्याकडून तत्काळ मदत मिळेल असं अनोळखी शहरात तुमचं कोणीही नाही. जेवण, प्रवास, निवास सगळ्या गरजा तुमच्या समोर ठाण मांडून बसल्या आहेत. अशा वेळी काय कराल? तुमचा मोबाइल डिव्हाइस वापरून आपल्या जवळपास असलेल्या किंवा भारतात कोठेही असलेल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबाला पैसे पाठविण्यासाठी विनंती करू शकता तसच तुम्ही बाहेर असताना तुमचे कुटुंबीय संकटात असतील अथवा तुमच्या जवळची एखादी व्यक्ती संकटात असेल तर अशा वेळी त्यांना पैसे पाठवूही शकता.
- कसं? ‘गुगल पे’ चा वापर करून! मोबाईल वर ‘गुगल पे’ डाउनलोड करा आणि आपल्या नातेवाईक किंवा मित्रांना ‘गुगल पे’ वरून पैसे पाठवा अथवा पाठवण्याची विनंती करा.
- काही सोप्या स्टेप्स आणि मिनिटांत आपली किंवा आपल्या जवळच्या लोकांची पैश्याची निकड आपण भागवू शकतो. फक्त यासाठी-
१. इंटरनेट कनेक्शन
२. भारतीय बँक खाते
३. भारतीय फोन नंबर या तीन गोष्टींची आवश्यकता आहे.
गुगल पे च्या माध्यमातून भारतात कोठेही किंवा तुमच्या समोर असणाऱ्या व्यक्तीला पैसे पाठवता येतात अथवा पाठवलेले पैसे आपल्याला मिळू शकतात.
जवळपासच्या एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवणे:
- ज्यांना पैसे पाठवायचे आहेत असे लोक जवळपास असल्यास नाव, फोन नंबर, आयडी (विशेषत: friendname@bankname), बँक खाते आणि IFSC कोड या माहितीच्या आधारे शोधू शकता. (ऑडिओ पेअरींगचा वापर करून जवळपासच्या वापरकर्त्यांशी कनेक्ट होता येते. यासाठी गुगल पे ला तुमचा मायक्रोफोन वापरण्याची अनुमती द्यावी लागेल).
- ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असतील त्यांच्या फोनमध्येही ‘गुगल पे ऍप’ इंस्टॉल केलले असल्याची खात्री करून दोन्ही फोनवर ‘गुगल पे’ उघडा.
- स्क्रीनच्या मध्यभागी “पैसे भरा” वर क्लिक करा. त्याच वेळी दुसर्या व्यक्तीला ऍपमधील ‘वर्तुळ’ खाली ‘पैसे घ्या’ कडे स्लाइड करायला सांगा.
- त्यांचा प्रोफाइल फोटो तपासा आणि त्यावर टॅप करा. फोटो दिसत नसल्यास होम स्क्रीनवर जाऊन QR कोड स्कॅन करावा लागेल.
- रक्कम आणि इतर माहिती भरा आणि पेमेंटचे स्वरूप निवडा.
- पैसे देण्यासाठी ‘पुढे सुरू ठेवा’ (continue) वर टॅप करून तुमचा UPI पिन टाका.
- पैसे पाठवले गेल्यावर, तुम्हाला तसे नोटिफिकेशन मिळेल.
संपूर्ण भारतात कोणालाही पैसे पाठवणे –
- तुमच्या नातेवाईक, मित्रांना पैशाची गरज आहे अशा वेळी, भारतात कुठेही पैसे पाठवायचे असतील तर त्यांना पैसे पाठवता येतात.
- गुगल पे उघडा.स्क्रीनच्या तळापासून वर स्वाइप करा.
- ‘पेमेंट’> ‘संपर्क’ वर टॅप करा. तुम्हाला पैसे पाठवायचे असलेली व्यक्ती दिसत नसल्यास, ‘नवीन’ वर टॅप करा आणि ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांचे नाव, फोन क्रमांक, खाते क्रमांक आणि UPI आयडीने शोधा.
- योग्य तपशील टाकल्याची खात्री करा. कारण तुम्ही एकदा पैसे पाठवल्यानंतर, व्यवहार रद्द करता येणार नाही.
- ‘पैसे द्या’ वर टॅप करा.
- रक्कम आणि वर्णन टाका आणि पेमेंटचे स्वरूप निवडा.
- पैसे देण्यासाठी ‘सुरू ठेवा’ वर टॅप करा.
- तुमचा UPI पिन टाका.
- पैसे पाठवल्यावर डेबिट झालेल्या रकमेचा तुमच्या बँकेतून SMS मिळेल.
- तुमच्या संपर्काच्या बँक खात्याशी चाललेला व्यवहार अयशस्वी झाल्यास बँक कदाचित तुमच्या खात्यामधून पैसे डेबिट करून नंतर ते परत करेल. अशा वेळी, तुम्हाला दोन एसएमएस मिळतील, एक असेल पैसे डेबिट झाल्याचा आणि दुसरा पैसे परत केल्याचा.
पैसे पाठविण्याच्या विनंतीला प्रतिसाद –
- स्वेच्छेने कोणाला पैसे पाठवायचे असतील तर वरील प्रमाणे पाठवता येतात, पण जर कोणी तुम्हाला पैसे पाठवण्याची विनंती करत असेल तर तुम्ही नकारही देऊ शकता?
- सूचनेमधील ‘विनंती’ उघडत असल्यास, पाचव्या पायरी पासून सुरुवात करावी लागते.
विनंतीला नकार देण्यासाठी –
- Google Pay उघडा.
- स्क्रीनच्या तळापासून, वर स्लाइड करा.
- विनंती पाठवलेल्या व्यक्तीचे नाव किंवा फोटो टॅप करा.
- विनंतीवर ‘नकार द्या’ टॅप करा.
गुगल पे मधून पैसे पाठविण्यावर असणाऱ्या वेगवेगळ्या मर्यादा-
- प्रतिदिन मर्यादा:– एका UPI आयडी द्वारे १लाख रुपयांहून जास्त किंवा २० वेळा पेक्षा जास्त पैसे एका दिवसात पाठवता येत नाहीत.
- बँक मर्यादा:– यासंदर्भात प्रत्येक बँकेचे नियम वेगवेगळे आहेत.
- इतर मर्यादा:– सुरक्षेच्या दृष्टीने गुगल पे काही मर्यादा घालू शकते. असे असल्यास Google Pay साहाय्यशी संपर्क साधा. येथे क्लिक करा. एक रुपयापेक्षा कमी रक्कम पाठवली जाऊ शकत नाही.
पैसे पाठवले मात्र ते मिळाले नाहीत?” अशा वेळी काय कराल?
- पैसे पाठवले असूनही ते मिळाले नसल्याचा तुम्हाला संशय असल्यास कोणतीही कारवाई करण्याआधी ४८ तास थांबण्याची विनंती गुगल पे मार्फत केली जाते. काही वेळा बँकांना व्यवहार पूर्ण करण्यास वेळ लागतो त्यामुळे तुमच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी ४८ तासांचा अवधी गुगल पेकडून मागितला जातो.
- ४८ तासांनंतरही पैसे न मिळाल्यास NPCI कडे तक्रार करा. तुम्हाला तक्रार करायची असेल त्या व्यवहारावर जा. वरच्या दिशेला उजवीकडे असलेल्या साइड मेनूवर टॅप करा आणि समस्येची तक्रार नोंदवा वर टॅप करा.
- याने समस्येचे निराकरण होत नसल्यास ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा.
- दिवसाचे २४ तास, आठवड्याचे ७ दिवस इंग्रजी किंवा हिंदी भाषांमध्ये तुम्ही संपर्क साधू शकता. संपर्क साधण्यासाठी पुढील प्रमाणे कृती करा
- ‘गुगल पे’ मध्ये जा सेटिंग्ज > मदत आणि फीडबॅक > ‘चॅट’ किंवा ‘कॉल करा’ निवडून तुम्ही तुमची तक्रार दाखल करू शकता.
झालं तर मग देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात असाल तरी तुम्ही तुमच्या प्रियजनांना पैसे पाठवू शकता अथवा त्यांना पैसे पाठविण्याची विनंती करू शकता. यालाच तर म्हणतात- “जग जवळ आलंय!”
(चित्रसौजन्य: https://bit.ly/2O3uMFl)
Share this article on :