Home Loan Repayment Options
Reading Time: 4 minutes

Home Loan Repayment Options

गृहकर्जाच्या परतफेडीसाठी (ईएमआय (हप्ते) भरण्याचे ६ मुख्य प्रकार आहेत (Home Loan Repayment Options) ते समजून घेतल्यास बँक आणि सुविधानिवड सोपी होऊ शकते. आजच्या लेखात याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. 

‘लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून (खरेदी करून)’ ही म्हण का प्रचलित झाली असेल ते एखाद्या गृहकर्ज घेतलेल्या व्यक्तीला विचारणं म्हणजे साऱ्या विश्वाचं ज्ञान एका तासात मिळविण्याची संधी आहे.

गृहकर्जाची परतफेड करणे म्हणजे दीर्घकालीन बांधिलकी असते. किमान १० ते कमाल ३० वर्षांपर्यंत आपण ईएमआय म्हणजेच हप्त्यांच्या फेऱ्यात अडकून पडलेले असता. याचा परिणाम कर्जदाराच्या एकूणच आर्थिक आणि त्यामुळे मानसिक स्वास्थ्यावर कळत नकळत होत असतो. परंतु बऱ्याचदा गृहकर्जाशिवाय पर्याय देखील नसतो. अशावेळी कर्जाची पद्धत विचारपूर्वक निवडली तर काही परतफेड अधिकाधिक सुसह्य होऊ शकते.

हे नक्की वाचा:  गृहकर्जाची वेळेआधी परतफेड करण्यापूर्वी या ८ गोष्टींचा विचार करा

Home Loan Repayment Options: गृहकर्ज परतफेडीचे ६ पर्याय 

१.‘अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी’मध्ये एक रकमी पेमेंटसह गृहकर्ज:

 • जर तुम्ही ‘अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी’ खरेदी केली, म्हणजेच बांधकाम चालू असतानाच घर खरेदी केले तर तुमच्या बिल्डरकडे कर्जाची रक्कम एकसाथ जात नसते. बांधकामाच्या प्रगतीनुसार टप्पे केले जातात आणि रक्कम पोहोच होते. अशा वेळी जोवर पूर्ण रक्कम बिल्डरला पोहोच होत नाही तोवर आपल्याला त्या रकमेचे व्याज भरावे लागत नाही.
 • परंतु जर तुम्ही तत्काळ मुद्दल परतफेड सुरू करू इच्छित असाल तर, तुम्ही बँकेने बिल्डरला वितरित केलेल्या एकत्रित रकमेवर ईएमआय भरणे सुरू करू शकता.
 • भरलेली रक्कम प्रथम व्याजासाठी समायोजित केली जाईल आणि उर्वरित रक्कम मूळ परतफेडीकडे जाईल.
 • अशाप्रकारच्या कर्जांसाठीदेखील विविध राष्ट्रीयीकृत आणि खाजगी बँक्स उपलब्ध आहेत.
 • बांधकाम कालावधीत भरलेल्या मुद्दल रकमेवर कोणतीही कर सवलत मिळत नाही. परंतु, भरलेल्या व्याजावर घर ताब्यात मिळाल्यानंतर करसवलत मिळते.

२. ईएमआय सवलत देणारं गृहकर्ज:

 • नियमितपणे ईएमआय भरणाऱ्या कर्जदारांना काही बँक्स प्रोत्साहन देतात.
 • जर आपण ईएमआय नियमितपणे भरत असाल तर बँक्स आपले काही ईएमआय माफ करतात.
 • याचे उदाहरण म्हणजे ॲक्सिस बँकचा ‘फास्ट फॉरवर्ड होम लोन्स’ नावाचा परतफेड पर्याय. या प्रकारात आपण सर्व हप्ते नियमितपणे भरल्यास आपले १२ ईएमआय माफ केले जाऊ शकतात.
 • कर्ज रकमेच्या पहिल्या वितरणानंतर १० वर्षे पूर्ण झाल्यावर सहा महिन्यांचा ईएमआय माफ केला जातो आणि १५ वर्षे पूर्ण झाल्यावर आणखी ६ महिन्यांच्या ईएमआयची सवलत दिली जाते.
 • अशा प्रकारच्या ईएमआय सवलती आपणास इतरही बँकांमध्ये मिळू शकतात.
 • हा कर्जप्रकार निवडण्याआधी ‘प्रोसेसिंग फी आणि प्री पेमेंट फी’ यांविषयीच्या नियमावली बारकाईने पाहून घ्यायला हव्यात.

३. विलंबाने ईएमआय सुरू होणारे गृहकर्ज:

 • स्वप्नातले घर ताब्यात मिळताच व्याजाचा फेरा चालू होऊन त्या नव्या घराच्या आनंदात विरजण पडते. अशावेळी ‘फ्लेक्सिपे’ या प्रकारच्या कर्जाचा मोठा फायदा होऊ शकतो.
 • गृहकर्ज घेताना तुम्ही ‘स्टेट बँक ऑफ इंडिया फ्लेक्सीपे होम लोन’ किंवा यासारख्या इतर कुठल्या बँकेच्या कर्जाची निवड करू शकता. ज्यात ईएमआय ठराविक विलंबाने म्हणजेच नंतरच्या तारखेला सुरू होतो. 
 • या गृहकर्जामध्ये ३६ ते ६० महिन्यांच्या दरम्यानचा स्थगिती कालावधी (moratorium period) निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. 
 • या काळात कर्जदाराला ईएमआय भरण्याची आवश्यकता नसते, केवळ ईएमआय पूर्वीचे व्याज भरावे लागते.
 • स्थगिती कालावधी संपल्यानंतर, ईएमआय सुरू होतो आणि पुढील वर्षांमध्ये कराराच्या कागदपत्रांनुसार मान्य केलेल्या दराने व्याज वाढवले ​​जाते.
 • या प्रकारात सामान्य गृहकर्जापेक्षा २० टक्के जास्त कर्जाची रक्कम आपणास मंजूर होऊ शकते. परंतु हे कर्ज केवळ २१ ते ४५ वयोगटातील ‘पगारी नोकरदारास’च मिळते.
 • या कर्जप्रकारात सुरुवातीच्या काळात ईएमआयच्या त्रासातून मुक्ती मिळत असली तरीही पुढे जाऊन काही वर्षांनी वाढत्या ईएमआयचा भार सहन करावाच लागतो.
 • जर आपली नोकरी पक्की असेल, भविष्यात सातत्याने खात्रीशीर पगारवाढ होणार असेल तर हा कर्जप्रकार आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. नसल्यास कर्जाची परतफेड करणे जिकीरीचे ठरू शकते.

विशेष लेख: होम लोन फेडणे कठीण जातंय? मग ‘होम लोन ट्रान्स्फर’ पर्यायाचा विचार करा 

४. वाढत्या ईएमआयसह गृहकर्ज:

 • आपण नोकरदार किंवा व्यावसायिक असाल तर भविष्यात पगारवाढ होणार असते, व्यवसाय मोठा होणार असतो. परंतु, त्यावेळी ईएमआयची रक्कम कमी होत जाते.
 • ऐन तारुण्यात सुरुवातीच्या घडीला पगार किंवा व्यवसायातून दरमहा मिळकत कमी असते, परंतु मोठ्या ईएमआयच्या रकमेमुळे आणि आपल्या इतर वैयक्तिक गरजांमुळे आपला मासिक खर्च मोठा होतो.
 • ‘आमदनी अठ्ठन्नी खर्चा एक रुपय्या’ अशी आपली अवस्था होऊन जाते. यावर उपाय म्हणजे वाढत्या ‘ईएमआयसह गृह कर्ज’.
 • एचडीएफसीची स्टेप अप रिपेमेंट फॅसिलिटी (एसयूआरएफ) किंवा आयसीआयसीआय बँकेच्या स्टेप अप होम लोन्स सारख्या गोष्टींचा आपण विचार करू शकता.
 • अशा कर्जामध्ये, तुम्ही कर्जाची जास्त रक्कम मिळवू शकता आणि सुरुवातीच्या वर्षांमध्ये कमी ईएमआय भरू शकता. त्यानंतर, तुमच्या उत्पन्नात गृहीत धरलेल्या वाढीसह परतफेडीचे प्रमाण वाढते.
 • या कर्जामध्ये ‘फ्लेक्सीपे’ सारखा स्थगिती कालावधी नाही त्यामुळे ईएमआय पहिल्या दिवसापासून सुरू होतो. वाढत्या ईएमआय पद्धतीने व्याजाचा बोजा कमी होण्यास मदत होते आणि कर्जाची लवकरात लवकर परतफेडही होते.
 • परतफेडीचे वेळापत्रक तुमच्या उत्पन्नाच्या अपेक्षित वाढीशी जोडलेले असते. भविष्यात वेतन वाढ कमी झाल्यास परतफेड करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे हा पर्याय निवडताना भविष्यात आपल्या नोकरी किंवा व्यवसायाची स्थिती सकारात्मकच असेल याची खात्री असणे खूप गरजेचे आहे.

५. कमी होणाऱ्या ईएमआयसह गृहकर्ज:

 • ही सर्वात प्रचलित कर्जपद्धती आहे. आपल्या आप्तेष्टांपैकी किंवा आपण स्वतः देखील अशा पद्धतीचे कर्ज घेतले असेल.
 • या योजनेत कर्जाची रचना अशा प्रकारे केली जाते की सुरुवातीच्या वर्षांमध्ये ईएमआय जास्त असतो आणि नंतरच्या वर्षांमध्ये कमी होत जातो.
 • अशा प्रकारचे कर्ज देण्यासाठी एसबीआय, कॅनरा, एलआयसी हाउसिंग फायनान्स यांसारख्या राष्ट्रीयकृत बँक्स आणि एचडीएफसी, ॲक्सिस, आयसीआयसीआय यांसारख्या खाजगी बँक्सच्या विविध सुविधा उपलब्ध आहेत.
 • तरुण रक्तात धडाडी असते, अशावेळी अधिक मेहनतीने कमाई करून आणि गुंतवणुकीचे इतर पर्याय वापरून जर आपण ‘प्री मेमेंट’ करणार असाल तर भविष्यातील ओझे कमी होऊ शकते आणि व्याजाची बरीचशी रक्कम देखील आपण वाचवू शकता.

महत्वाचा लेख: कर्ज घेतलंय? व्याजदर तपासा!

६. करंट अकाऊंटला लिंक असलेले गृहकर्ज:

 • एसबीआय मॅक्सगेन, आयसीआयसीआय बँकेची गृहकर्ज ‘ओव्हरड्राफ्ट सुविधा’ आणि आयडीबीआय बँकेची ‘होम लोन इंटरेस्ट सेव्हर’ यासारख्या काही गृहकर्जाच्या ऑफरमुळे तुम्हाला तुमचे गृहकर्ज खाते तुमच्या चालू खात्याला म्हणजेच करंट अकाऊंटला जोडण्याची परवानगी मिळते.
 • तुम्ही  करंट अकाऊंटमध्ये ठेवलेली रक्कम व्याजाचा बोजा कमी करण्यासाठी तुमच्या फायद्यासाठी काम करते.
 • तुमच्या गृहकर्जाचे व्याज दायित्व तुमच्या करंट अकाऊंटमध्ये जमा केलेल्या अतिरिक्त निधीच्या मर्यादेपर्यंत येते.
 • आपल्याला आवश्यकतेनुसार चालू खात्यातून पैसे काढण्याची किंवा जमा करण्याची मुभा दिली जाते. यासाठी कुठलेही बंधन नाही.
 • गृह कर्जावरील व्याज दर तुमच्या कर्जाची थकबाकी वजा करंट अकाऊंटवरील शिल्लक रक्कम यावर निश्चित होते.
 • उदाहरणार्थ आपण २० वर्षे कालावधीसाठी ८.५ % व्याजदराने ५० लाख रुपये गृहकर्ज घेतले असेल आणि आपली महिना मिळकत रक्कम दीड लाख रुपये असेल तर साध्या गृहकर्जानुसार आपणास ५४,१३,८७५ रुपये एकूण व्याज म्हणून मोजावे लागतात. परंतु जर आपण करंट अकाऊंटला लिंक असलेले गृहकर्ज घेतले असेल तर आपणास ५२,६१,२४२ रुपये व्याजाची रक्कम म्हणून भरावी लागते. म्हणजेच आपण दीड लाखाहून अधिक रक्कम वाचवत आहात.
 • व्याजाचा बोजा बराच कमी झाला असला तरी, बँका तुम्हाला अशा कर्जासाठी ‘अतिरिक्त व्याज दर’ देण्यास सांगतील, ज्यामुळे तुमच्या ईएमआयची रक्कम वाढू शकते.

सुविधा, सवलती, पर्याय कुठलेही असोत बँक कधीही स्वतःचा तोटा करून घेत नाही. म्हणजेच आपण वरीलपैकी कोणत्याही प्रकारावर शिक्कामोर्तब करताना, कुठल्याही करारपत्रावर सही करताना त्यातील नियमावली व्यवस्थित वाचून समजून घेणे गरजेचे आहे. तसेच आपल्या नोकरी किंवा व्यवसायाला कोणता प्रकार जास्त सोयीस्कर आहे हे ठरवण्यासाठी भविष्याचा अचूक अंदाज लागणेही तितकेच महत्वाचे आहे. कर्जफेडीचा कुठलाही प्रकार निवडला तरीही ‘प्री पेमेंट’ करून लवकरात लवकर ईएमआयच्या फेऱ्यातून कसे सुटता येईल आणि अधिकचे व्याज भरणे कसे टाळता येईल याचा विचार प्रामुख्याने करायला हवा.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Home Loan Repayment Options Marathi, Home Loan Repayment Options Marathi Mahiti, Home Loan Repayment Options in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…