ESG Funds: शाश्वत गुंतवणूकशैली जोपासणारे ईएसजी फंड

Reading Time: 4 minutes

ESG Funds

आजच्या लेखात आपण ईएसजी फंड्स (ESG Funds) या महत्वपूर्ण संकल्पनेबद्दल माहिती घेणार आहोत. म्युच्युअल फंड म्हणजे काय, हे आपणास माहिती असेलच. भांडवल बाजाराशी संबधित पर्यायांमध्ये, गुंतवणूकदारांच्यावतीने तज्ज्ञांच्या सल्याने केलेली अप्रत्यक्ष गुंतवणूक आहे. यामुळे काही प्रमाणांत जोखीम विभागली जाते चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते. 

आपल्या गरजेनुसार आणि धोका स्विकारण्याच्या क्षमतेनुसार 44 मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांनी (AMC) 31 जुलै 2021 पर्यंत विविध प्रकारच्या 1557 योजना बाजारात आणल्या आहेत. त्यामुळे उत्तम परतावा, तरलता, पारदर्शकता, बऱ्यापैकी सुरक्षितता असे गुंतवणूक करण्याचे निकष बऱ्याच अंशी पूर्ण होतात. आज अजूनही म्युच्युअल फंड योजना अनेक कारणांमुळे तळागाळात पोहोचलेल्या नाहीत. भारताच्या लोकसंख्येतील साधारण 10% गुंतवणूकदारांनी केलेली ही गुंतवणूक जुलै 2021 अखेर 35 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. प्रगत देशात ही टक्केवारी लोकसंख्येच्या 60% पर्यंत आहे. यावरून या व्यवसायाची व्यापकता समजून येते यात अनेक व्यवसायसंधीही उपलब्ध आहेत.

हे नक्की वाचा: म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुक करण्यापूर्वी समजून घ्या या ५ महत्वाच्या संकल्पना 

म्युच्युअल फंडाच्या योजना 

 • गुंतवणूकदारांना योजनेचा निश्चित बोध व्हावा या दृष्टीने सुमारे 4 वर्षांपूर्वी सेबीने निरंतर योजनांचे पाच मुख्य व छत्तीस उपप्रकारात वर्गीकरण केले. पाच मुख्य प्रकार म्हणजे –
  • समभाग निगडित, 
  • रोखे निगडित,
  • समभाग आणि रोखे मिश्रित, 
  • विशेष उद्दिष्ट निगडित, 
  • वरील चारही प्रकारात न बसणाऱ्या योजना
 • एका फंड हाऊसकडून एक प्रकारची एकच योजना असावी असे सांगून अस्तित्वात असलेल्या योजना एकमेकांत विलीन करण्यास अथवा बंद करण्यास सहा महिन्यांची मुदत दिली. 
 • लोकांचा कल हा निरंतर फंडात गुंतवणूक करण्याचा असल्याने वेगवेगळ्या फंड हाउसकडून नवनवीन कल्पनांवर आधारित योजना बाजारात आणल्या जातात.  
 • यातील पहिल्या तीन प्रकारातील 32 उपप्रकारात अस्तित्वात असलेल्या योजनेहून वेगळी योजना आणणे शक्य नाही. ज्याची अशी योजना नसेल तेच नवीन योजना आणू शकतील. 
 • जवळपास सर्वच जणांच्या अशा योजना आहेत. या योजनांत विशेष प्रकारची योजना म्हणून अथवा उरलेल्या दोन प्रकारात अस्तित्वात असलेल्या 4 उपप्रकाराहून वेगळा असा पर्याय देण्याची संधी असल्याने गुंतवणूकदारांना अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतात.

महत्वाचा लेख: नव्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड योग्य पर्याय आहे का ?  

एनवोरमेन्ट सोशल गव्हर्नस फंड्स (ESG Funds) 

 • जगापुढे असलेल्या अनेक समस्यांपैकी- अन्न सुरक्षितता, असमान प्रगती, बेरोजगारी, वातावरणातील बदल, आर्थिक विषमता, लिंग असमानता, महायुद्धाची शक्यता यासारख्या प्रमुख समस्यांची  सोडवणूक शाश्वत जीवनशैली स्वीकारल्यासच होऊ शकेल याबद्दल बहुतेक तज्ज्ञांमध्ये एकमत आहे. 
 • त्यादृष्टीने जागतिक पातळीवरील विविध संघटना आपल्या सदस्यांनी आचरण पद्धतीत कोणते बदल करावे याबाबत मार्गदर्शन करत असतात. 
 • यादृष्टीने म्युच्युअल फंड योजनांत ईएसजी योजनांकडे विशेष योजना म्हणून पाहता येईल. 
 • सध्या सेबीने 1000 प्रमुख कंपन्यांना व्यवसाय उत्तरदायित्व अहवालाचा (BRR) समावेश आपल्या वार्षिक अहवालात करावा असा आदेश दिला आहे. 
 • संयुक्त राष्ट्र संघटनेने पुरस्कृत केलेल्या, Sustainable Stock Exchanges (SSE) या मंचाचे सदस्यत्व डिसेंबर 2015 मध्ये राष्ट्रीय शेअरबाजाराने आणि जानेवारी 2017 मध्ये मुंबई शेअरबाजाराने स्वीकारून बाजारात सुचिबद्ध कंपन्या पर्यावरण स्नेही, सामाजिक जाणिव जोपासतील असे मान्य केले आहे. 
 • बहुतेक गुंतवणूकदारांच्या मनात उच्च नैतिक मूल्य म्हणजे टाटा गृपच्या कंपन्या, इन्फोसिस यासारख्या, हे पक्के कोरले गेले आहे. 
 • आपल्या वागणुकीतून त्यांनी हे वेळोवेळी सिद्ध करून, नैतिकमूल्य जोपासूनही  व्यवसाय उत्तम प्रकारे करता येऊ शकतो हे सिद्ध केले आहे. 
 • अशी बांधिलकी मान्य असणाऱ्या व चांगली कामगिरी असलेल्या कंपन्यांतील गुंतवणूक हा एक नवा गुंतवणूक पर्याय उपलब्ध झाला असून, या प्रकारातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक अधिक वाढल्यास त्यातून इतर कंपन्यांनाही प्रेरणा मिळेल. 
 • जगभरातील अशा कंपन्या आणि त्यातील गुंतवणूक यांचा अभ्यास केला असता अशा कंपन्यांची कामगिरी ही निर्देशांकाहून अधिक सरस असल्याचे आढळून येते. त्यामुळे गुंतवणूकदारांना अशा स्वदेशी कंपन्या, परदेशी कंपन्या किंवा दोन्हीकडील कंपन्या गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत यावर आधारित फंडांना एनवोरमेन्ट सोशल गव्हर्नस फंड्स (ESG Funds) असे म्हणतात. 

ESG Funds: एनवोरमेन्ट सोशल गव्हर्नस फंड्समध्ये  गुंतवणूक करताना-

 • ही गुंतवणूक अशा कंपन्यांच्या समभाग, रोखे किंवा दोन्हींत असू शकते. या प्रकारात येणाऱ्या, विविध फंडाच्या 10 योजना बाजारात उपलब्ध आहेत. यात गुंतवणूक करताना-
  • कंपनीचे उत्पादन किंवा सेवा ही पर्यावरणास हानिकारक नाही हे पहिलं जाईल.
  • त्याच्या उत्पादन आणि सेवेचा समाजावर सकारात्मक परिणाम होईल.
  • सामाजिक जाणिव बाळगून उच्च नैतिक मूल्यांचा पाठपुरावा केला जाईल.
 • अशा कंपन्या शोधण्यात येणाऱ्या अशा व्यावहारिक अडचणी
  • तपशील मिळवणे अवघड,
  • निश्चित लिखित निकष नाहीत, 
  • प्रत्येक फंड हाऊसचे वेगवेगळे निकष,
  • माहिती मिळवण्यात परावलंबित्व त्यातील अपारदर्शकता.
 • कंपनीने जाहीर केलेल्या माहितीच्या आधारावरून आणि रेटिंग एजन्सीजनी त्याच्या सूत्रांकडून मिळवलेल्या माहितीच्या आधारे जगभरातील प्रमुख एजन्सीज ईएसजी रेटिंग देतात.
 • हे रेटिंग प्रत्येक कंपनी कसे करते ते कधीच जाहीर केले जात नाही कारण हेच त्याच्या व्यवसायाचे गुपित असते. 
 • S&P, Moody’s, FTSE, MSCI, Bloomberg, ISS, CDP climate या त्यातील प्रमुख एजन्सीज आहेत. त्यांनी दिलेले रेटिंग हे अंकात असून ते शभंरापैकी गुण दर्शवितात. 
 • यातील 70 हून अधिक गुण मिळवणाऱ्या कंपन्या उत्तम समजल्या जातात तर 50 हून अधिक गुण मिळवणाऱ्या कंपन्या साधारण समजल्या जातात. भारतातील 225 कंपन्यांचे असे मूल्यांकन करण्यात आले असून राष्ट्रीय शेअरबाजाराने निफ्टी 100 ईएसजी इंडेक्स बनवला आहे. 
 • 27 मार्च 2018 रोजी या निर्देशांकाची निर्मिती करण्यात आली असून 1एप्रिल 2011 रोजी तो 1000 होता हे गृहीत धरले आहे. या निर्देशकांनी निफ्टी 50 हून सातत्याने अधिक परतावा दिला आहे हे विशेष उल्लेखनीय आहे.

विशेष लेख: म्युच्युअल फंड बंद होऊ शकतो का?

निफ्टी 100 ईएसजी कंपनीचे गुण ठरवताना –

 • आंतरराष्ट्रीय मापदंड वापरले जातात.
 • कंपनी एनएससी 100 मधीलच असावी.
 • 50 हून कमी गुण मिळवणारी कंपनी विचारात घेतली जात नाही.
 • फ्री फ्लोटिंग शेअर संख्या व बाजारभाव यांचा विचार केला जातो.
 • तंबाखू व्यापार, शस्त्रास्त्रनिर्मिती, मद्यविक्री या सारख्या गोष्टीशी जरासा संबंध असलेल्या कंपन्या यातून वगळल्या आहेत.
 • दर तीन महिन्यांनी यातील कंपन्याचा विचार करून आवश्यक असल्यास बदल करून निर्देशांक समतोल साधला जातो.
 • सध्या या निर्देशांकात 88 कंपन्या आहेत.

यात सुधारणा होण्यास बराच वाव असून नवोदित गुंतवणूकदारात याबाबत जागरूकता निर्माण झाल्यास यातील अडचणी दूर होऊ शकतील. हा लेख केवळ अशा प्रकारचे फंड म्हणजे काय? आणि असे फंड सध्या बाजारात उपलब्ध असल्याची माहिती देण्यासाठी असून अशा योजनामध्ये गुंतवणूक करण्यासाठी Nifty ESG Index चा आधार घेतात. 

लेखात उल्लेख केलेल्या कंपन्या अथवा म्युच्युअल फंड योजना यांची ही शिफारस नाही हे लक्षात ठेवून आपल्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्यावी.

– उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: ESG Funds in Marathi, ESG Funds Marathi Mahiti, ESG Funds Marathi, what is ESG Funds?

Leave a Reply

Your email address will not be published.