नेट वर्थ म्हणजे काय?
थोडक्यात, एकदम सोप्या भाषेत आपले नेट वर्थ म्हणजे आपली स्वमालकीची खरी संपत्ती वजा आपली खरी कर्जे व देणी. मालमत्तांमध्ये रोख, गुंतवणूकी, स्थावर आणि जंगम मालमत्ता तसेच देण्यांमध्ये आपली विविध प्रकारची कर्जे म्हणजे गृह कर्ज, वाहन कर्ज, आपली इतर कर्जे, हात उसने यांचा समावेश होतो. नेट वर्थ हे आपल्या आर्थिक आरोग्याचे मोजमाप आहे कारण हे मूलत: आपण आपली सर्व देणी फेडण्यासाठी आपल्या सर्व मालमत्तांची बाजारभावाला विक्री केली तर शिल्लक काय असेल हे दर्शवते.
आपला प्रत्येक वित्तीय निर्णय हा आपले नेट वर्थ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून घ्यायला हवा म्हणजे एकतर संपत्ती (Assets) वाढवणे वा देणी (Liabilities) कमी करण्यासाठी प्रयत्न करणे.
नेट वर्थची गणना कशी करावी?
आपल्या नेट वर्थची गणना करणे आजिबात कठीण नाही.
भाग 1: आपली सर्व मालमत्ता आणि त्यांचे अंदाजे मूल्य यांची यादी तयार करा
मालमत्ता |
रक्कम |
बँक जमा खात्यांमध्ये असलेल्या रकमा बचत खाते (Savings),
मुदत ठेवी (Fixed Deposits)
आवर्ती ठेवी (Recurring Deposits)
|
|
गुंतवणुकींचे आजचे बाजारमूल्य समभाग म्हणजे शेअर्स कर्जरोखे (Bonds) यांचा आजचा बाजार भाव |
|
स्थावर मालमत्तांचे बाजारमूल्य घर दुकाने कार्यालये भूखंड (बिगर शेती / रहवासी / आरक्षित इ. प्रकारानुसार बाजारमूल्य बदलते) |
|
वाहन |
|
सोने-चांदी व इतर बहुमूल्य दागिने यांचा आजचा बाजारभाव |
|
एकूण (TOTAL) |
|
आपल्या वाहनाच्या किमतीपेक्षा कमी मूल्यांच्या छोट्या गोष्टी शक्यतो संपत्ती मध्ये घेणे टाळा. यापैकी काही मालमत्ता स्पष्ट मूल्ये दाखवतात. उदा : आपल्या बँक स्टेटमेंटप्रमाणे असणारी सेव्हिंग खात्यातील रक्कम इतर मालमत्ता म्हणजे उदा : १५ वर्षांपूर्वी बांधलेल्या घराच्या बाजारभावाचा आपल्याला अंदाज लावावा लागतो. |
भाग 2: तुमची सर्व देण्यांची यादी तयार करा.
देणी |
रक्कम |
बँकेतून घेतलेले कर्ज रक्कम बाकी गृहकर्ज वाहनकर्ज वैयक्तिक कर्ज |
|
क्रेडीट कार्ड ची देय रक्कम |
|
को-ऑपरेटीव्ह बँक/ पतपेढी घेतलेल्या कर्जाची रक्कम |
|
हातउसने / उधार / तात्पुरते वगैरे घेतलेल्या कर्जांची रक्कम |
|
एकूण (TOTAL) |
|
एकदा आपण आपली सर्व कर्जे आणि देणी सूचीबद्ध केल्यानंतर सर्व कर्जाची संख्या जोडा. ही तुमची सर्व कर्जांची एकूण रक्कम आहे. |
भाग 3 : वजा करणे
शेवटी, केवळ आपल्या एकूण संपत्तीच्या एकूण संख्येतून कर्जाची संख्या कमी करा परिणामी संख्या आपल्या नेट वर्थ आहे.
तपशील |
रक्कम |
एकूण मालमत्ता |
|
(-) वजा |
|
एकूण देणी |
|
नेट वर्थ |
नेट वर्थची गणना कशी करायची: तीन उदाहरणे
उदाहरण 1: महेश
महेश 35 वर्षांचा आहे. त्याचे रु. २२ लाख किमतीचे घर आहे, आणि त्या घराचे गृह कर्ज बाकी रु. १२ लाख आहे. त्याची ३ वर्षांपूर्वी घेतलेल्या दुचाकीची किंमत आता फक्त रु. २०,००० इतकी आहे. त्याचे क्रेडिट कार्डचे देणे रु.६,५००, मामांकडून घेतलेले आईच्या आजारपणासाठी उसने देणे बाकी रु. १लाख बचत खात्यात सुमारे रु. ५५,000 आणि त्याच्याकडे २ तोळे सोने आहे.
मालमत्ता
मालमत्ता |
रक्कम (रु.) |
घर दुचाकी बचत खाते सोने २ तोळे (प्रतितोळा रु. २५,००० प्रमाणे) |
२२,००,००० २०,००० ५५,००० ५०,००० |
एकूण मालमत्ता |
२३,२५,००० |
देणी |
रक्कम (रु.) |
गृहकर्ज देणे बाकी क्रेडीट कार्ड देणे बाकी तात्पुरते उसने कर्ज बाकी |
१२,००,००० ६,५०० ५५,००० |
एकूण देणी |
१२,६१,५०० |
नेट वर्थ (एकूण मालमत्ता (-) एकूण देणी) |
१०,६३,५०० |
उदाहरण 2: नेहा
सौ.नेहा ४२ वर्षांची गृहिणी आहे. तिचे रु. ५२ लाख किमतीचे घर आहे. पण त्या घराची निम्मी मालकी तिच्या नवऱ्याची आहे आणि त्या घराचे गृह कर्ज एकूण बाकी रु. २२ लाख आहे. सौ.नेहाच्या मते, तिच्या ६ वर्षांपूर्वी रु.८ लाखांना घेतलेल्या चार चाकीची किंमत आता रु. २,००,००० इतकी आहे. परंतु अक्सिडेंट नंतर गाडी एका जागी पडून आहे आणि फार तर गाडीचे रु. २५,००० इतकेच येऊ शकतील असे तिच्या नवऱ्यास वाटते. नेहा क्रेडिट कार्ड वापरत नाही. इतर कुठलेही कर्ज व देणी नाहीत. तिच्या बचत खात्यात सुमारे रु. १५,000, शेअर्स मधली गुंतवणूक रु.२.५ लाख (बाजारमूल्य रु. १.८० लाख), म्युच्युअल फंडातील मधली गुंतवणूक रु.१.५ लाख (बाजारमूल्य रु. २.८ लाख) आणि तिच्याकडे ८ तोळे सोने आहे
मालमत्ता
मालमत्ता |
रक्कम (रु.) |
घर (अर्धा भाग) चारचाकी बचत खाते शेअर्स मधली गुंतवणूक रु.२.५ लाख म्युच्युअल फंडातील मधली गुंतवणूक रु.१.५ लाख सोने ८ तोळे (प्रतितोळा रु. २५,००० प्रमाणे) |
२६,००,००० २५,००० १५,००० १,८०,००० २,८०,००० २,००,००० |
एकूण मालमत्ता |
३३,००,००० |
देणी |
रक्कम (रु.) |
गृहकर्ज देणे बाकी (अर्धा भाग) |
११,००,००० |
एकूण देणी |
११,००,००० |
नेट वर्थ (एकूण मालमत्ता (-) एकूण देणी) |
२२,००,००० |
उदाहरण ३: राहुल
राहुल 35 वर्षांचा आहे. तो भाडेकरू म्हणून राहतो. त्याचे हिमालय भ्रमण करण्यासाठी घेतलेले पर्सनल कर्ज बाकी रु. ६ लाख आहे. त्याच्याकडे १ वर्षांपूर्वी घेतलेल्या महागड्या फोनचे कर्ज रु. ५०,००० असून त्या फोनला दुरुस्ती होणे शक्य नसल्याने फोनचे मूल्य शून्य आहे. राहुलचे क्रेडिट कार्डचे देणे रु.४५,०००, मित्रांकडून घेतलेले उधार देणे बाकी रु. २ लाख आणि बचत खात्यात सुमारे रु. २,००० आहेत. इतर कुठलीही मालमत्ता, कर्ज व देणी नाहीत.
मालमत्ता
मालमत्ता |
रक्कम (रु.) |
बचत खाते |
२,००० |
एकूण मालमत्ता |
२,००० |
देणी |
रक्कम (रु.) |
पर्सनल कर्ज देणे बाकी – हिमालयभ्रमण पर्सनल कर्ज देणे बाकी – फोन क्रेडीट कार्ड देणे बाकी तात्पुरते उसने कर्ज बाकी |
६,००,००० ५०,००० ४५,००० २,००,००० |
एकूण देणी |
८,९५,००० |
नेट वर्थ (एकूण मालमत्ता (-) एकूण देणी) |
– ८,९३,००० |
वरील ३ उदाहरणांचा गोषवारा मांडला असता पुढील बाबी समजतात:
व्यक्ती |
नेट वर्थ |
|
महेश (वय ३५ वर्षे ) |
१०,६३,५०० |
मालमत्ता देण्यांपेक्षा जास्त असल्यामुळे पोझीटीव्ह नेट वर्थ आहे. |
नेहा (वय ४२ वर्षे ) |
२२,००,००० |
मालमत्ता देण्यांपेक्षा जास्त असल्यामुळे पोझीटीव्ह नेट वर्थ आहे. |
राहुल (वय ३५ वर्षे ) |
– ८,९३,००० |
मालमत्तेपेक्षा देणी जास्त असल्यामुळे निगेटिव्ह नेट वर्थ आहे. |
निगेटिव्ह नेट वर्थ म्हणजे काय?
काही लोक कधीतरी त्यांच्या नेट वर्थची गणना करतात आणि घाबरून जातात कारण ते निगेटिव्ह असते. निगेटिव्ह नेट वर्थ बऱ्याचवेळा करिअर च्या सुरुवातीला असू शकते किंवा काही चुकीचे निर्णय किंवा काही दुर्दैवी प्रसंग सुद्धा कारणीभूत असतात. आपण मालमत्ता खरेदी करण्यासाठी घेतलेले कर्ज त्या मालमत्तेच्या किमतीपेक्षा जास्त असेल किंवा मालमत्तेच्या बाजारमूल्य वाढीचा दर हा त्या मालमत्तेवरच्या कर्जावरील भरलेल्या व्याजापेक्षा कमी असेल तर नक्कीच नेट वर्थ कमी असणार.
आपल्याकडे म्हण आहे “ऋण काढून सण नको”.तसेच फक्त मजा करण्यासाठी घेतलेलं कर्ज तुमचे नेट वर्थ कमी होण्यास कारणीभूत ठरते.
काळजी करू नका, नेट वर्थ शोधण्याचा प्रयत्न हे एक मोठे पाऊल आहे. आपल्याला कुठे जायचे आहे हे नुसते माहिती असून उपयोग नाही. आज आपण कुठे आहोत हे जास्त महत्वाचे.
- यासाठी तुम्ही आपले खर्च कमी करून काटकसरीने राहून पैसे वाचवले तर कर्जांची परतफेड लवकर करता येईल तसेच गुंतवणुकीसाठीही जास्त पैसे हातात असतील. जर गृहकर्ज घेतले असेल तर बँकेने निर्धारित केलेल्या हफ्त्यांपेक्षाही तुम्ही जास्त रक्कम कर्जात भरू शकता म्हणजे पुढे भरावे लागणारे व्याजही वाचेल व कर्जही कमी होईल.
- दुसरीकडे, जेव्हा तुम्ही महागडे कपडे, हॉटेलिंग, केवळ भपक्यासाठी खरेदी केलेल्या वस्तू यांवर आणि अनावश्यक मजेसाठी घेतलेल्या क्रेडीट कार्ड सारख्या कर्जावरील व्याज यांवर पैसे खर्च करता तेव्हा आपोआपच आपले नेट वर्थ खाली येते.
मी कितीदा माझे नेट वर्थ मोजले पाहिजे?
तुम्ही शक्यतो दरमहा नेट वर्थची गणना करावी. तुमचे ध्येय असे हवे की मागील महिन्याच्या नेट वर्थ पेक्षा या महिन्याच्या नेट वर्थ मध्ये वाढ हवी. याचाच अर्थ असा आहे की महिनाभर माझे खर्च माझ्या उत्पन्नापेक्षा कमी असायला हवेत. या बचतीचा वापर एकतर मी कर्ज फेडण्यासाठी किंवा वैयक्तिक बचती वाढविण्यासाठी करु शकतो.
एकदाच नेट वर्थ काढून विसरण्यापेक्षा तुमच्या स्वतःशी प्रामाणिक राहून तुम्ही दर महिन्याला अथवा त्रैमासिक असा आढावा घेतला तर निश्चितच स्वतःला मदत होईल. स्वतःशी प्रामाणिक राहण्यासाठी शुभेच्छा !