मृत्यूपत्राविषयी सारे काही भाग १
मृत्यूपत्राविषयी सारे काही भाग २
मृत्यूपत्र म्हणजे व्यक्तीने त्याच्या पश्चात त्याच्या मालमत्तेच्या वाटपासंदर्भात केलेला कायदेशीर दस्तऐवज. भारतीय वारसा कायदा, १९२५, सेक्शन २ (ह) अन्वये ‘‘ मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूपत्र करणार्याने त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी यासंबंधीची कायदेशीर रितीने घोषित केलेली इच्छा होय.’’
मृत्यूपत्र कसे असावे? यासाठी कुठल्या कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते?
मृत्यूपत्र हे नेहमीच कायद्यातील तरतुदींचा विचार करुन केलेले असावे. मृत्यूपत्र करताना खाली दिलेल्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे.
-
मृत्यूपत्र करणार्या व्यक्तीची स्वाक्षरी: भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम- ६३ अन्वये: मृत्यूपत्रावर, मृत्यूपत्र करणार्या व्यक्तीने, सही करणे आवश्यक आहे. मृत्यूपत्र करणारी व्यक्ती जर काही कारणांमुळे सही करण्यास असमर्थ असेल तर, इतर कोणतीही व्यक्ती, मृत्यूपत्र करणार्या व्यक्तीच्या निर्देशानुसार, मृत्यूपत्र करणार्या व्यक्तीच्या समक्ष मृत्यूपत्रावर स्वाक्षरी करु शकते.
-
साक्षीदारांची स्वाक्षरी: मृत्यूपत्र झाल्यावर त्यावर दोन किंवा अधिक साक्षीदारांची स्वाक्षरी, नाव, वय, पत्ता तसेच तारीख, वार व ठिकाणाचा उल्लेख केलेले असणे आवश्यक आहे. साक्षीदारांनी मृत्यूपत्रातील मजकूर वाचणे अथवा त्यांना माहिती असणे गरजेच नाही.
-
नोंदणी: मृत्यूपत्राची नोंदणी बंधनकारक नसली तरी आवश्यक आहे. मृत्यूपत्र रजिस्टर करण्यासाठी ते त्या भागातील रजिस्ट्रार किंवा सब रजिस्ट्रार समोर सादर करावे लागते. रजिस्ट्रारकडून सर्व कागदपत्राची तपासणी केल्यानंतर आणि सर्व शंकाचे समाधान झाल्यावर त्याची नोंद तारीख, वार, दिवस, तास इ. सह केली जाते. कोर्टामध्ये रजिस्टर्ड मृत्यूपत्र नेहमीच ग्राह्य धरण्यात येते.
-
स्पष्टता: मृत्यूपत्रात नमूद केलेल्या मिळकतीबाबतचे संपूर्ण वर्णन तसेच त्याची कायदेशीर माहिती याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. तसंच संपूर्ण मालमत्तेचा आणि कायदेशीर वारसांचा व कायदेशीर तरतूदींचा योग्य तो विचार करुनच मृत्यूपत्र बनवावे म्हणजे त्या मृत्यूपत्राला आव्हान देणे सहज शक्य होणार नाही.
-
योग्य अधिकाऱ्याकडे सुपूर्तता: मृत्यूपत्र तयार झाल्यानंतर ते कायदेशीर सल्लागाराकडे किंवा योग्य त्या अधिकाऱ्याकडे सुपूर्द करावे. यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हा ते मृत्यूपत्र सादर केले जाऊ शकते.
-
मृत्यूपत्र करणार्या व्यक्तीचे व डॉक्टरांचे प्रमाणपत्र: मृत्यूपत्रात शेवटी, मृत्यूपत्र स्वतंत्रपणे, शारीरिक व मानसिकरित्या सुदृढ असतांना आणि विचारपूर्वक केलेले असल्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे . तसेच यासंदर्भातील डॉक्टरचे प्रमाणपत्र जोडलेले असावे. यामुळे पुढे कायदेशीर अडचणी येत नाहीत.
-
मालमत्ता: हिंदू व्यक्ती स्वकष्टार्जीत मालमत्तेसोबत वंश-परंपरेने मिळालेल्या संपत्तीतील फक्त स्वत:चा हिस्सा, यासाठी मृत्यूपत्र करू शकते.
-
जुने मृत्यूपत्र व दुरुस्ती :
-
मृत्यूपूर्वी मृत्यूपत्रात बदल करणे, ते रद्द करणे, नष्ट करणे अथवा नवीन मृत्यूपत्र करणे हे सारे अधिकार, मृत्यूपत्र करणार्या व्यक्तीला असतात. मृत्यूपत्र रद्द करुन नवीन मृत्यूपत्र करताना, “आधीचे, दिनांक …रोजी केलेले मृत्यूपत्र रद्द समजावे” असा उल्लेख नवीन मृत्यूपत्रात असणे आवश्यक आहे.
-
तसेच एकाच व्यक्तीने एकापेक्षा जास्त मृत्यूपत्र केलेली असतील तर कायद्यानुसार सर्वात शेवटी केलेले (शेवटची तारीख असलेले) मृत्यूपत्र ग्राह्य धरले जाते.
-
मृत्यूपत्रात बदल करताना मृत्यूपत्राला नवीन पुरवणी (codicil) कधीही जोडता येते. Codicil जोडताना त्यावर मृत्यूपत्राप्रमाणेच साक्षीदारांसमोर सही करावी लागते तसेच त्यावर साक्षीदारांची सही, तारीख , वार , वेळ व स्थळाचा उल्लेख असणेही आवश्यक आहे.
-
-
वैधता : कोणतेही मृत्यूपत्र हे मृत्यूपत्र करणार्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच अंमलात येऊ शकते.
मृत्यूपत्रासंबधीत काही कायदेशीर संज्ञा-
-
मालमत्ता/ संपत्ती: मृत्यूपत्र करताना ते करणाऱ्या व्यक्तीच्या मालकीच्या सर्व मालमत्ता विचारात घेतल्या जातात. परंतु त्याच्या जबाबदारींच्या दायित्वाचा (liabilities) समावेश यामध्ये होत नाही.
-
टेस्टॅटर (Testator): मृत्यूपत्र बनविणारी व्यक्ती
-
मृत्यूपत्राचा व्यवस्थापक (Executor): मृत्यूपत्राचा व्यवस्थापक हा मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीचा कायदेशीर प्रतिनिधी असतो. मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचं मृत्यपत्र सादर करण्याची जबाबदारी याच्यावर असते.
-
वारसदार / लाभार्थी (Legatee/ Beneficiary): वारसदार म्हणजे मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीचा कायदेशीर वारस. मृत्यूपत्र करणारी व्यक्ती त्याच्या इच्छेनुसार आपली मालमत्तेचे वाटप त्याच्या वारसदारांना करु शकते. कोणाला किती भाग (share) द्यायचा हे मृत्यूपत्रात नमूद करता येते.
-
प्रोबेट (Probate): प्रोबेट ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. यामध्ये मृत्यूपत्रासंबधीत उद्भवणाऱ्या दाव्यांची तक्रार निकालात काढून कायद्यानुसार वैध (valid) असणाऱ्या मृत्यूपत्रानुसार मालमत्तेचे वर्गीकरण केले जाते.
मृत्यूपत्राविषयी सारे काही भाग १
मृत्यूपत्राविषयी सारे काही भाग २
(क्रमश:)
(Disclaimer : येथील लेखांचा हेतू हा फक्त अर्थसाक्षरतेचा प्रसार करणे हा असून, कोणतेही आर्थिक मार्गदर्शन व सल्ले देणे हा छुपा अथवा प्रकट हेतू नाही. सदर विषयांसदर्भातील वैयक्तिक आयुष्यातले निर्णय आपल्या नेहमीच्या वकिलांच्या सल्ल्यानेच घ्यावेत. Please refer https://arthasakshar.com/Disclaimer.aspx)