कोविड 19 किंवा त्याचे भयंकर वारस भारतात आहेत असे वाटत नाही. सन 2020 चा मार्च महिना आठवा. लॉकडाऊन जाहीर झाला त्यानंतर सर्व सुरळीत होईल असं वाटत असताना तो पुन्हा पुन्हा वाढवावा लागला आणि सारे व्यवहार ठप्प झाले मग दुसरी लाट येईल म्हणून अधिक दक्षता बाळगली गेली त्याचा फारसा प्रभाव न झाल्याने येणाऱ्या पुढील लाटेकडे दुर्लक्ष झाले या काळात अनेकांचे प्रचंड नुकसान झाले. बऱ्याच जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. एकंदर घबराट माजली. अनेकांना कधी काळी असे संकट येईल असे स्वप्नातही वाटत नव्हते. आता जनजीवन पूर्वीसारखे सुरळीत झाले आहे. किंबहुना असे काही संकट आलं होतं हेच लोक विसरून गेले आहेत. तरीही आजपर्यंत जगभराचे जे काही नुकसान व्हायचे होते ते झालेच. चीनमध्ये अजून त्याचे अस्तीत्व आहे म्हणतात, खरंखोटं काय ते शी जिनपिंग जाणे! आपल्या दृष्टीने हा एक अत्यंत कसोटीचा काळ होता. सुरुवातीला त्याच्या तीव्रतेचा अंदाज आला नाही त्यावर उपाय योजना काय असावी याबाबत आपण चाचपडत होतो परंतु अत्यंत कमी कालावधीत त्यावर संशोधन करून लस काढली आणि ती विक्रमी कालावधीत सर्वांपर्यंत पोहोचवली. जगभरातील लोकांना उपलब्ध करून दिली.
एक गुंतवणूकदार म्हणून आपण या मोठ्या संकटातून काय शिकलो अशा आशयाची एक पीपीटी व्हॅल्यू रिसर्च कंपनीकडून प्रसिद्ध झाली होती असता त्यातील महत्वाचे मुद्दे मी डायरीत लिहिले होते दोन दिवसांपूर्वी ते सहज वाचनात आले तेच या लेखातून सादर करीत आहे. आज जरी तो इतिहास असला तरी आपण हा विषय शिकण्याचे महत्वाचे एक प्रयोजन हे भूतकाळात घडलेल्या घटना, तेव्हा झालेल्या चुकांचा अभ्यास करून भविष्यात त्याच चुका पुन्हा न करणे हे आहे.
★सुरक्षेसाठी विविध मालमत्ता प्रकारात गुंतवणूक : जागतिक आरोग्य संघटनेने कोविड काळात सुरक्षेसाठी विविध थर असलेले मास्क वापरण्याचा सल्ला दिला होता यात जसे कापडाचे थर असतात त्यामुळे विषाणूपासून संरक्षण मिळते. त्याचप्रमाणे एकाच स्तरात केलेली गुंतवणूक ही अधिक धोकादायक असते. तेव्हा आपली गुंतवणूक ही विविध मालमत्ता प्रकारात विभागलेली हवी त्यामुळे जोखमीची तीव्रता कमी होते.
★एकच प्रकारच्या अनेक योजनांची भाऊगर्दी: ज्याप्रमाणे या संकट कालावधीत अधिकाधिक गर्दी करू नये असे सुचवण्यात आले होते त्याचप्रमाणे एकच प्रकारातील योजना टाळाव्यात विशेषतः म्युच्युअल फंडाच्या एकच प्रकारच्या अनेक योजना असतील तर त्यांचे व्यवस्थापन करणे त्रासदायक होते.
★दूरच्या लक्षाचा विचार: या कालावधीत आपण एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करत होतो. हाच अंतराचा मुद्दा शेअर्स किंवा त्यासंबंधी असलेल्या म्युच्युअल फंड योजना यामधील गुंतवणूक करताना वापरावा. त्या दीर्घ काळासाठीच आहेत याची जाणीव ठेवावी. त्यातून अपेक्षित परतावा मिळण्यासाठी 5 ते 8 वर्षाच्या कालावधी जावा लागतो हे लक्षात ठेवावे.
★फक्त बाजारातच कार्यरत : ज्याप्रमाणे या संकट काळात आपण स्वतःला आपल्या घरात डांबून ठेवले होते त्याचप्रमाणे बाजार तेजीत असो वा मंदीत, आपण त्यामधील गुंतवणूक संधी शोधत राहिलो तरच आणि तरच महागाईवर मात करणारा परतावा मिळू शकतो. त्यामुळे विचलित न होता सातत्याने बाजारात गुंतवणूक करीत राहावे.
★फक्त बाजारात पण कार्यरत: एकच गोष्ट करत असल्याचे काही दुष्परिणाम असतात त्यामुळे संकट काळात घरात राहून ज्याप्रमाणे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली त्याचप्रमाणे समतोल साधून वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करावी.
★मीडियावर अवलंबून न राहणे : घरात बसलेले लोक वेगवेगळ्या समाज माध्यमावर सक्रिय झाले. त्यावर येणारी मतमतांतरे आपले चित्त विचलित करू शकतात तेव्हा येणाऱ्या उलट सुलट बातम्या फार गांभीर्याने घेतल्यास त्याचा तुमच्या गुंतवणूक निर्णयावर विपरीत परिणाम होऊ शकेतो. तेव्हा मीडिया हवा पण त्यावर अवलंबून राहणे टाळावे.
★झटपट निर्णय घेऊ नका: गुंतवणूक अर्थपूर्ण होण्यासाठी पूर्ण विचार करूनच निर्णय घ्यावे लागतात. अशा वेळी अल्पकाळ झटपट परिणामकारक पर्याय तुमच्यासमोर आले तर त्याला भुलून कोणतेही निर्णय घेऊ नका. संशोधन करून लस स्वीकारण्यासाठी काही किमान कालावधी गेलाच हे लक्षात ठेवा.
★अवाजवी अपेक्षा नकोत: कठीण प्रसंगात ज्याप्रमाणे आपण आवश्यक गोष्टींना प्राधान्य दिले आणि कोणत्याही अवाजवी अपेक्षा बाळगल्या नाहीत. त्याचप्रमाणे गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा वाजवी आहे ना एवढेच पहा. त्यापासून अवास्तव अपेक्षा करू नका.
★आपल्या गरजा मर्यादेत ठेवा: आपल्या गरजा वाढवणे म्हणजे अधिक पैसे खर्च करणे. संकटकाळात प्रत्येकाने अनावश्यक खर्च टाळला त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी अधिक रक्कम उपलब्ध झाली. वाजवी दरातील दर्जेदार वस्तूंचा शोध घ्या.
★डिजिटल माध्यमांचा वापर वाढवा: या काळात डिजिटल माध्यमाचा वापर, त्यास पर्याय नसल्याने वाढला. यापासून स्फूर्ती घेऊन,पुरेशी काळजी घेऊन डिजिटल माध्यमांचा वापर करणे हे पैसा आणि वेळ वाचवणारे आहे हे ओळखून त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो याचा अनुभव घ्या.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारणीचे सदस्य असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)