Reading Time: 3 minutes

मागच्या काही भागांत, आपण अल्प, मध्यम आणि दीर्घ कालावधींवर आधारित असणाऱ्या विविध गुंतवणूक पद्धतींची ओळख करून घेत आहोत. गुंतवणुकीच्या या कालमर्यादा व्यक्तीसापेक्ष असल्या तरी शेअर्स, विविध म्युच्युअल फंड योजनांचे युनिटस, इटीएफ,बॉण्ड, सरकारी रोखे, रिटस, इनव्हीट, सोने-चांदी यासारखे मौल्यवान धातू, स्थावर मालमत्ता, दुर्मिळ वस्तू, चित्रं यांपैकी कोणत्याही मालमत्ता प्रकारात गुंतवणूक करता येते. आयकर कायद्यानुसार, कालावधीचा प्रकार आणि मालमत्ता बाजारातल्यस नोंदणी, यानुसार एक ते दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी केलेली  गुंतवणूक दीर्घकालिन मानली जाते. केवळ गुंतवणुकीतून बेंजामिन ग्रॅहम, वॉरेन बफे, चार्ली मुंगेर, पीटर लीच यांनी गुंतवणूकदारांमधे जागृती निर्माण करून प्रचंड संपत्ती आणि साम्राज्य उभं करून आदर्श ठेवला आहे. 

“सब्र का फल मिठा होता है!” याच अर्थानं पहिलं असता, जगभरातल्या गुंतवणूकतज्ञांच्या मते, अश्या पद्धतीनं  गुंतवणूक करणं सर्वश्रेष्ठ मानलं जात असावं.

जाणून घ्या : स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय ?

दीर्घकालीन गुंतवणूकीची वैशिष्ट्यं-

  • मोठा गुंतवणूक कालावधी – गुंतवणूकतज्ञांच्या मते, साधारणतः 5 वर्षांहून अधिक, (शेअर्स,म्युच्युअल फंड युनिट याबाबत हा कालावधी 7 वर्षं आहे.) वर लिहिलेल्या मालमत्ता प्रकारांत गुंतवणूक विभागून ठेवली तर या कालावधीत आकर्षक परतावा मिळण्याची अधिक शक्यता असते.
  • दलाली आणि अन्य खर्च कमी – दीर्घ कालावधीसाठी, गुंतवणूक वारंवार केली जात नसल्यानं, त्यासाठी द्यावी लागणारी दलाली व अन्य शासकीय कर हे तुलनेनं कमी असतात.
  • जोखीम – दीर्घ कालावधीसाठी केलेल्या गुंतवणुकीत गुंतवणूकदारानं घेतलेली जोखीम ही मध्यम ते तीव्र या स्वरूपाची असते.
  • विविध मालमत्ता प्रकारात केलेली गुंतवणूक – जाणीवपूर्वक जोखीम स्वीकारून,अधिक लाभाची अपेक्षा असल्यानं विविध मालमत्ता प्रकारात कमी अधिक प्रमाणात गुंतवणूक विभागली जाते.
  • चक्रवाढ वाढीचा लाभ– गुंतवणूकीचा कालावधी, दीर्घ असल्यामुळे चक्रवाढ वाढीचा लाभ मिळण्याची शक्यता असते. जितका अधिक कालावधी, तेवढा लाभ अधिकाधिक वाढत जातो.
  • संशोधन आणि संयम – दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करताना मालमत्ता प्रकारांचे, मूलभूत आणि तांत्रिक असं संशोधन करून, दीर्घकालीन धोरण ठरवण्यात येते.

दीर्घकालीन गुंतवणूकीचे फायदे-

  • प्रचंड परतावा – चक्रवाढ वेगानं मिळणारा परतावा दीर्घकाळात मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं रकमेत प्रचंड वाढ होते.
  • जोखीम कमी – गुंतवणूक कालावधी मोठा असल्यानं, कोणत्याही मालमत्ता प्रकारातली जोखीम ही कमी-कमी होत जाते. अधिक जोखीम घेतल्यामुळं, अल्पकाळात लाभ अथवा तोटा अधिक होण्याची शक्यता असते, मात्र दीर्घकाळात ही शक्यता कमी होते. 
  • शिस्त – बचत सातत्यानं केली; तर कोणतीही गुंतवणूक ही योग्य संधी साधून करायची असते, याची आपोआपच सवय लागते. त्यादृष्टीनं मनाची तयारी होते.
  • करलाभ– दीर्घकालीन गुंतवणुकीतून मिळणारा लाभ हा भांडवली नफा समजण्यात येतो. आणि तुमचं उत्पन्न कितीही असेल तरी, त्यावर सवलतीच्या एकसमान दरानं कर आकाराला जातो. शेअरबाजार संबंधित अश्या दीर्घकालीन भांडवली लाभावरची कर आकारणी, काही मर्यादेत करमुक्त आहे. तर विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिक लाभावर, कमी दरानं कर आकारणी होत असल्यानं आपोआपच, एकूण करदेयता कमी होते.
  • संपत्ती निर्मिती – दीर्घकाळ गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण होते. त्यामुळे गुंतवणूकदार केवळ श्रीमंत न होता धनवान होतो. (रिच आणि वेल्थ यातील फरक समजून घ्या.)
  • निवृत्ती नियोजन – ज्यांना आपल्या भविष्यातील निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करायचं आहे. त्याच्यासाठी लवकरात लवकर गुंतवणूकीची सुरुवात करण्याची दीर्घकालीन गुंतवणूक ही आदर्श पद्धती आहे.

हे ही वाचा : ट्रेडिंगचे प्रकार आणि स्कँल्पिंग

दीर्घकालीन गुंतवणूकीचे तोटे-

  • कमी रोकडक्षमता – काही मालमत्ता प्रकारात मोठ्या प्रमाणावर लाभ दिसत असला, तरी तो प्रत्यक्षात मिळवण्यात अडचणी असल्यानं, त्यातून अपेक्षित रक्कम योग्य वेळी मिळेल, याची शक्यता कमी असते.
  • बाजार हालचाल – मालमत्ता बाजार सातत्यानं वर-खाली(मार्केटचे चढ-उतार) होत असतो, त्यामधे वर्षभरात पडणारा फरक हा खूप मोठा असतो,त्यामुळे या संधीचा फायदा घेता येत नाही.
  • महागाईमुळे होणारा तोटा – काही मालमत्ता प्रकारात केलेली गुंतवणूक महागाई दरावर मात करणारी नसल्यानं  त्यामुळे त्यातील गुंतवणुकीचं मूल्य कमी होते.
  • बाजार संधी– गुंतवणूक धोरण आधीच ठरवलेलं असल्यामुळे, अन्य उपलब्ध संधीचा लाभ घेता येत नाही.
  • गुंतवणूक प्रकारात सहज बदल अशक्य – विविध मालमत्तेतील गुंतवणूकीचं प्रमाण बदलायचं असेल तर, त्यात सहज बदल करता येत नाहीत.
  • भु-राजकीय हालचाली– देशातील आणि आंतरराष्ट्रीय संबंधामधला ताण-तणाव याचा दीर्घकालीन गुंतवणूकीवर आणि मालमत्तांच्या किंमतीवर, प्रभाव पडण्याची शक्यता अधिक आहे.
  • मानसिक ताण – दीर्घकालीन गुंतवणूकीमधे होणारे बदल हे अनेकांच्या अपेक्षेनुसार नसल्यामुळे, त्या सर्वांचा गुंतवणूकदारांच्या मनावर ताण येऊ शकतो.

दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठीच्या काही विशेष सूचना दिल्या आहे.

  • आपलं निश्चित असं गुंतवणूक ध्येय ठरवावं.
  • जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार विविध मालमत्ता प्रकारात गुंतवणूकीची विभागणी करावी.
  • संधी साधून योग्य वेळीच गुंतवणूक करावी.
  • नियमीत कालावधीनंतर (सर्वसाधारणपणे वर्षातून किमान एकदातरी) गुंतवणुकीचा आढावा घेऊन आवश्यक असल्यास बदल करावेत. वारंवार बदल करू नाही, त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.
  • यासंबंधात माहिती मिळवून, स्वतःला अद्यावत ठेवणं उत्तम ठरत. शिक्षणात केलेली गुंतवणूक कधीही फुकट जात नाही. आज अनेक मंच या संबंधातील उत्तम शिक्षण अल्प खर्चात उपलब्ध करून देत आहेत.
  • आधी सांगितल्याप्रमाणं गुंतवणुकीमधे, श्रध्दा आणि सबुरी ठेवणं अत्यावश्यक आहे.

दीर्घकालीन गुंतवणूक करणं, वाटतं तेवढं सहज सोपं नाही. त्यासाठी निश्चित मनोभूमिका असणं आणि त्याचं तंतोतंत पालन करणं आवश्यक असतं. त्याची काही सिद्ध झालेली अनेक गुंतवणूक धोरणं किंवा पद्धती आहेत; त्यातली कोणती धोरणं, गुंतवणूकदार म्हणून आपल्याला पूरक होऊ शकतात, ते ठरवण्यासाठी व्यावसायिक गुंतवणूक सल्लागाराची मदत होऊ शकते. अनेकांना गुंतवणूक करताना मध्यस्थाकडून आपल्याला काहीतरी कमिशन मिळावं अशी अपेक्षा असते, हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे मध्यस्थही त्याला अधिक कमिशन किंवा अन्य लाभ देणाऱ्या योजना गुंतवणूकदारांच्या गळ्यात मारण्याची शक्यता असते.  म्हणूनच मध्यस्थ निवडण्यासाठी अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन घ्यायचं तर , कोणताही संकोच बाळगू नका. केशवसुतांनी त्यांच्या ‘सतारीचे बोल’ या त्यांच्या दीर्घ कवितेत, 

धीर धरी रे धीरा पोटी

असती मोठी फळे गोमटी

ऐक मनीच्या हरितील गदा

ध्वनि हे ….

दिड दा, दिड दा, दिड दा …

असं आपल्याला सुचवलं आहेच! 

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य असून महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत लेखातील मते वैयक्तिक आहेत)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…