Reading Time: 4 minutes

 “मंत्र-तंत्र” म्हटल्यावर अध्यात्मिक, आदीभौतिक संबंधित काहीतरी असेल, असं वाटत असेल तर आपली निराशा होणार आहे. मागच्या लेखात आपण दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे काय? दीर्घकालीन गुंतवणूकीची वैशिष्ट्यं, त्याचबरोबर फायदे/ तोटे देखील समजून घेतले. दीर्घकालीन गुंतवणूक, वाटते तितकी सोपी नसली तरी अशक्य नाही. सर्वच दीर्घकालीन गुंतवणूक, दीर्घकाळात फायदेशीर ठरतील, असं नाही. त्यामुळे काही सिद्ध तंत्रांची माहिती असणं आवश्यक आहे. त्याला अनुभवाची जोड देऊन, आपल्या वृत्तीनुरूप त्यात कल्पक बदलही करावा लागतो. गुंतवणूक अनेक मालमत्ता प्रकारांत करता येत असली, तरी तुलनात्मक दृष्टीनं भांडवल बाजारात गुंतवणूक करणं अधिक लाभदायक आणि सुलभ होऊ शकतं, हे  नव्यानं सांगण्याची गरज नाही. 

       गुंतवणूक करतांना पाळायचे काही मंत्र –

  • गुंतवणूकीची सुरुवात लवकरात लवकर करावी.
  • गुंतवणूक केल्यावर संयम पाळावा.
  • गुंतवणुकीच्या आधी, सखोल अभ्यास करावा.
  • गुंतवणूकीचे विविध मालमत्ता प्रकारात विभाजन करावं.
  • भावनेच्या भरात खरेदी-विक्रीचे निर्णय घेण्याचं टाळावं.
  • गुंतवणुकीचा आढावा घेऊन परिस्थितीप्रमाणे गरज असेल तर पोर्टफोलियोमधे बदल करणं आवश्यक असतं.
  • गुंतवणुक करताना, सदर व्यवहारात द्यावे लागणारे कर लक्षात घेणं आवश्यक आहे.
  • गुंतवणूकीचं निश्चित ध्येय ठरवून गुंतवणूक करावी.

        हे मंत्र लक्षात ठेवून शिस्तीत आणि संयमानं दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली तर फायदेशीर ठरते. अनेक गुंतवणूकदार विविध पद्धतीने गुंतवणूक करत असतात. त्यातील काही पद्धती पुढील प्रमाणे आहेत.

 केवळ खरेदी करत राहणं आणि सांभाळणं : 

  • या पद्धतीत योग्य स्टॉक निवडून तो वाजवी किमतीत (स्वस्त नाही) मिळत असेल तर फक्त खरेदी केला जातो आणि दीर्घकाळासाठी सांभाळला जातो. 
  • या काळात स्टॉकच्या किमतीत पडणाऱ्या फरकाचा कोणताही परिणाम होत नाही.

 रुपयाच्या सरासरी किमतीचा लाभ घेणं

  • आधी ठरवलेली रक्कम, ठरावीक दिवशी निश्चित केलेल्या मालमत्तेत गुंतवणं. यामुळे दीर्घकाळात सरासरीचा लाभ होतो, म्हणजे किंमत कमी असल्यास अधिक मालमत्ता आणि जास्त असल्यास कमी मालमत्ता मिळत असल्यानं एकूण मालमत्तेची सरासरी किंमत कमी होते. अश्या पद्धतीनं  नियमित रक्कम बाजूला केली तर त्याला गुंतवणूक म्हणावं का?
  • कारण अशा पद्धतीनं बचत करता येईल आणि भांडवल निर्माण करण्यासाठी ते योग्यही असेल, पण गुंतवणूक ही आपल्या टप्यात आल्यावरच करायची असते. 
  • परंतु या पद्धतीनं केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरत असल्याचा अनुभव आहे. आणि म्युच्युअल फंड योजनांचा इतिहास तपासता ते सिद्ध झालं आहे. त्यामुळे अनेकजण भांडवल बाजारात या प्रकारे थेट गुंतवणूक करून प्रत्यक्ष तर म्युच्युअल फंड युनिट खरेदी करून अप्रत्यक्ष पद्धतीनं गुंतवणूक करत असतात.

डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यातील गुंतवणूक: 

  • दीर्घ मुदतीत गुंतवणुकीचा लाभ होत असला तरी, केलेल्या गुंतवणुकीतून नियमित काहीतरी उत्पन्न मिळत राहावं, अशी काही लोकांची विशेषतः पेन्शन मिळत नसलेल्या सेवानिवृत्त लोकांची गरज असते. 
  • मध्यम उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्तीला काही अकस्मात खर्च पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी काही रकमेची गरज असते. त्यामुळेच ज्यांचा डिव्हिडंड हा फिक्स डिपॉझिट व्याजाशी मिळताजुळता आहे, अश्या ठिकाणी गुंतवणूक करून डिव्हिडंड आणि भांडवलवृद्धी या दुहेरी हेतूने अशी गुंतवणूक केली जाते.
  • रिटस आणि इनव्हीट निमिर्तीमागे हाच हेतू आहे. याशिवाय  विविध कंपन्या वर्षभर आपल्या धारकांना डिव्हिडंड देण्याचे जाहीर करीत असतात. त्यांनी तसं जाहीर केल्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होऊन त्याचा बाजारभाव वाढतो. ही वाढ जाहीर केलेल्या डिव्हिडंडपेक्षा जास्त असते. याचा फायदा अनेकजण धुर्तपणे करून घेत असतात. 
  • अशीच वाढ कंपनीकडून बोनस शेअर्स देण्याचं, शेअर्सचं विभाजन करण्याचं अथवा प्राधान्य भाग देण्याचं ठरवल्यावर दिसून येते. हे सर्व जाहीर होण्यापासून ते प्रत्यक्षात मिळेपर्यंतच्या कालावधीत किमतीमधे पडणाऱ्या फरकाचा लाभ घेऊन आपले होल्डिंग तसेच ठेवून सरासरी किंमत कमी करता येते.

इंडेक्स फंड अथवा इटीएफमधील गुंतवणूक

  • काही गुंतवणूकदार हे इंडेक्स फंड अथवा इटीएफमधे सातत्यानं गुंतवणूक करत असतात. यात दिर्घकाळात चांगला परतावा मिळत असल्यामुळे जोखीम कमी असते. या दोन्हींचे उद्दिष्ट सारखेच असले, तरी त्यात थोडा फरक आहे.
  • गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंडाचं युनिटस् हे त्याच्या मालमत्ता मूल्यानुसार  (एनएव्ही) फंड हाऊसकडून घ्यावे लागतात. तर इटीएफ हे बाजारमूल्यानुसार  (मार्केट प्राईज) भांडवल बाजारातून घ्यावे लागतात.

हे वाचा : दीर्घकालीन गुंतवणूकीचे फायदे-तोटे जाणून घ्या.

मूल्य ओळखून केलेली गुंतवणूक

  • भांडवली बाजार हा काही काळ वरच्या दिशेनं वाढत जातो किंवा कमी होत खाली येत असतो.  किंवा अनेकदा एका पातळीवर स्थिरावलेला असतो.
  •  गुंतवणूकदाराला शेअरचा बाजारभाव दिसत असतो, पण वेगवेगळ्या मूलभूत आणि तांत्रिक गोष्टींची मदत घेऊन त्याचं वास्तविक मूल्य काढता येतं आणि त्यात आधी गुंतवणूक करता येते. ही गुंतवणूक जेवढी लवकर होईल तेवढी अधिक लाभदायक ठरू शकते. 

वाढणाऱ्या शेअर्समधील गुंतवणूक

  • ज्यांचे भाव सातत्याने वाढत आहेत अश्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स निवडून त्यामधे अनेकजण सातत्याने थोडी थोडी गुंतवणूक वाढवत असतात. त्यांना ट्रेंड फॉलोअर्स असं म्हणतात. 
  • हा सुद्धा दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा एक मार्ग होऊ शकतो. भाव खाली आल्यावर अनेकजण सरासरी करण्यासाठी गुंतवणूक करीत असतात. तरीही त्यांना  स्टॉकची किंमत कमी झाल्यामुळे वैफल्य येऊ शकतं. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात भांडवल अडकून राहतं. त्यापेक्षा ट्रेंड फॉलोअर्स ही पद्धत अधिक उजवी आहे.

भावपातळी समजून केलेली गुंतवणूक – 

  • एका विशिष्ट किमतीला, स्टॉकमधे अर्धी गुंतवणूक करून त्याच्यापेक्षा खाली किंवा  बाजाराच्या भावपातळीखाली किंमत गेली तर, अल्प खरेदी आणि वर गेल्यास किंचित विक्री असं करून उरलेल्या रक्कमेची गुंतवणूक करत गेल्यास भावात पडणाऱ्या मोठ्या फरकाचा गुंतवणूकदारावर ताण पडत नाही.

विशिष्ट प्रकारातील गुंतवणूक : 

  • यापद्धतीमधे गुंतवणूक करणारे केवळ विशिष्ट सेक्टरमधे, बाजारात विविध क्षेत्रांमधे होणारं रोटेशन, इंडेक्समधले स्टॉक, मार्केट लिडर्स यात आपली गुंतवणूक करतात.
  •  हे स्टॉक नेहमी महागच असतात,अंदाज चुकला तर बराच काळ त्यात पैसे अडकून राहू शकतात. किंवा नुकसान स्वीकारावे लागते.

विशिष्ट हेतू मनात ठेवून केलेली गुंतवणूक

  • काही विशिष्ट हेतू निश्चित करून गुंतवणूक केली जाते. जसं सनराईज सेक्टर, इएसजी क्षेत्रात केलेली गुंतवणूक. यातील मुख्य हेतू हा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावं आणि आपलं सामाजिक भान जपावं एवढाच मर्यादित असतो.

 विभागून केलेली गुंतवणूक– 

  • अशी गुंतवणूक भांडवल बाजारातल्या विविध क्षेत्रात विभागून करण्यात येते. दरवेळी काही क्षेत्रं उत्कृष्ट कामगिरी करत असल्यानं त्यातली जोखीमही विभागली जाते.

समतोल साधत केलेली गुंतवणूक

  • आपल्या गुंतवणूकीचं मूल्यमापन करून आवश्यक असल्यास त्यात बदल केला जातो. यात वारंवार बदल करणं अपेक्षित नसून केवळ अत्यावश्यक बदलच अपेक्षित असतात.

कर वाचवण्यासाठी केलेली गुंतवणूक- 

  • ही एक गुंतवणूक पद्धत आहे. भांडवली बाजारात गुंतवणुक केल्यास काही कर सवलती असून केवळ कर वाचवावा, एवढाच त्याचा मुख्य हेतू असतो.

याशिवाय गुंतवणूकतज्ञ अनेक पद्धती सुचवत असतात, स्वतः टिप्स देत असतात.  केवळ त्यावर विश्वास ठेवूनही अनेकजण गुंतवणूक करतात. या पद्धती म्हणजे आपली गुंतवणूक पद्धत अंतिम नसून आपल्याला योग्य वाटणारी गुंतवणूक पद्धत शोधून बँक टेस्टिंगद्वारे तिची व्यवहार्यता तपासून वेळोवेळी त्याचा आढावा घेऊन, आवश्यक तिथं बदल केले तर आपण यशस्वी गुंतवणूकदार होण्याच्या शक्यता वाढतात. गुंतवणूक करताना काही ठिकाणी तोटा होणं स्वाभाविक असलं तरी आपलं भांडवल सुरक्षित राहून आपल्याला सातत्यानं महागाईवर मात करणारा परतावाही मिळायला हवा. तंत्र कोणतंही असो. आपल्याकडची गुंतवणूक योग्य निधी, आर्थिक उद्दिष्ट, जोखीम क्षमता, कामगिरी आणि गुंतवणूक कालावधी यासर्वांचे सदैव भान ठेवूनच केलेली असावी. 

 

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

 

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.