Reading Time: 4 minutes

सन 2023 हे वर्ष शेअरबाजारासाठी आनंदाचे गेले. वाढत असलेल्या शेअरबाजारात आता करेक्शन येणार असे वाटत असताना अभूतपूर्व तेजी येऊन डिसेंबरमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी या लोकप्रिय शेअरबाजार निर्देशांकांनी नवनवे उच्चांक गाठले. वर्षभरात बाजारात खळबळ माजवणाऱ्या अथवा बाजाराची दिशा बदलवणाऱ्या लक्षवेधी घटना.

हिंडेनबर्ग अहवाल- जानेवारी 2023 च्या सुरुवातीस जगातील दुसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून उद्योगपती गौतम अडाणी याचे नाव प्रकर्षाने चर्चिले जात असतानाच हिंडेनबर्ग अहवाल 7 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध झाला. त्यात अडाणी गृपने समूहातील निधीचा गैरवापर करून शेअर्सच्या किंमतीत फेरफार घडवून आणले असल्याचा आरोप करण्यात आला. कंपनीने याचा ताबडतोब इन्कार करून असे आरोप हे भारतविरोधी कट करस्थानाचे षडयंत्र आहे असे म्हटले, त्यानंतर लगेचच आणि नंतर काही महिने या समूहातील शेअर्सची जोरदार विक्री होऊन त्यांची किंमत खूप घसरली आता डिसेंबर मध्ये आलेल्या तेजीमुळे समूहातील शेअर्सच्या किमतीत वाढ होऊन त्या पूर्वपदावर येत आहेत. या आरोपाची सेबीकडून चौकशी सुरू झाली झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी सेबीकडून होणार नाही म्हणून ती एसआयटी किंवा सीबीआयकडे सोपवावी अशी मागणी करण्यात आली.  या याचिकांची सुनावणी पूर्ण झाली असून 24 डिसेंबरला या प्रकरणावरील निकाल राखून ठेवण्यात आला होता. 3 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाला असून न्यायालयाने वृत्तपत्रातील आरोपावरून सेबीकडून चालू चौकशी काढून घेण्यास नकार दिला. याचिकाकर्ते यासंदर्भात कोणताही ठोस पुरावा सादर करू शकले नाहीत. अडाणी गृपसंबंधी 24 प्रकारणांपैकी 22 प्रकरणांची  सेबीची चौकशी पूर्ण झाली असून उरलेल्या दोन प्रकरणांची चौकशी लवकरच पूर्ण होईल असे सेबीने जाहीर केले आहे. ही चौकशी येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या चौकशीचा  निष्कर्ष आणि त्यावरील निर्णय काय होतो ते लवकरच समजेल. बाजाराच्या दृष्टीने सदर निर्णय कदाचित गेम चेंजर ठरू शकतो तूर्तास अडाणी गटाला दिलासा मिळाला असून त्यांचे एकत्रित बाजारमूल्य सर्वोच्य स्थानापासून 80% खाली आले होते ते आता फक्त 20% खाली आहे. 

★एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण- एचडीएफसी ही बिगर बँकिंग क्षेत्रातील गृहकर्जाचा व्यवसाय करणारी सर्वात मोठी जागतिक नावलौकिक असलेली कंपनी. एचडीएफसी बँक ही त्यांनीच प्रवर्तित केलेली खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक. या बँकेत तिच्या मातृकंपनीचे 1 जुलै 2023 रोजी रीतसर विलीनीकरण झाले. कॉर्पोरेट क्षेत्रातील  हे सर्वात मोठे विलीनीकरण. एचडीएफसीच्या भागधारकांना त्यांच्या दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 25 शेअर्सचे बदल्यात एचडीएफसी बँकेचे एक रुपया दर्शनी मूल्य असलेले 42 शेअर्स देण्यात येऊन एचडीएफसीची स्टॉक एक्सचेंज वरील नोंदणी रद्द करण्यात आली. या नंतर 18 जुलै 2023  रोजी बँकेचे बाजारमूल्य प्रथमच 100 बिलीयन झाले आणि असे बाजारमूल्य असलेली ती जगातील सातवी बँक ठरली. 28 डिसेंबर 2023 रोजी बँकेचे बाजारमूल्य 159 बिलियनहून अधिक झाले असून देशातील दुसऱ्या क्रमांकाची नोंदणीकृत कंपनी झाली आहे. विलीनीकरण जाहीर झाल्यावर एचडीएफसी बँकेच्या शेअर्सचा भाव काही काळ झटकन वाढला नंतर तो सर्वोच्च स्थानावर जाऊन तेथून 30% खाली आला आणि बराच काळ खालीच रेंगाळत राहिला अलीकडेच त्याने पुन्हा नवा सर्वोच्च भाव दाखवला आहे.

★गो फर्स्ट विमान कंपनीची दिवाळखोरी- 2 मे 2023 रोजी वाडिया गृपमधील या विमान कंपनीने आपण स्वतःहून  दिवाळखोरीत  असल्याचे सांगितले आणि मोरेटिरियमची मागणी केली. दिवाळखोरी वरील निर्णय राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (NCLT) राखून ठेवला पण मोरेटेरियमची मागणी मान्य केल्याने  कंपनी विरुद्ध कोणतीही कारवाई प्रलंबित नसलेली वसुलीची कारवाई ही रखडलेली कारवाई मानली जाईल. आता कंपनीच्या धनकोना आपले पैसे वसूल करण्यासाठी कोणतीही कारवाई करता येणार नाही. यातून काय मार्ग काढता येईल यावर बँकांनी विचारविनिमय केला आणि कोणताच समाधानकारक मार्ग न सापडल्याने  कंपनीस यापुढे कर्ज न देण्याचा  निर्णय घेतला. दरम्यान राष्ट्रीय लवादाने कंपनीवर तात्पुरता मार्गदर्शक अधिकारी नेमून एकप्रकारे कंपनी पुनरुज्जीवन प्रक्रिया चालू केली आहे. कंपनीने प्रेट अँड व्हिटनी कंपनीच्या सदोष इंजिनांमुळे  दिवाळखोरीत गेल्याचे सांगून त्यांच्याकडून 10000 कोटीच्या नुकसानभरपाईची  मागणी केली आहे. प्रवर्तकांनी 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून ही  कंपनी अधिग्रहित करण्यास स्पाईस जेट कंपनीने स्वारस्य दाखवले असले तरी आजपर्यंत दिवाळखोरी पूर्णपणे मान्य करणे अथवा अधिग्रहण होणे यातील कोणतीही घटना घडली नसून या विमान कंपनीने आपली सर्व उड्डाणे थांबवली आहेत. 

★फॉक्सकॉन वेदांत यांचा सेमिकंडक्टर क्षेत्रातील करार मोडला, मायक्रोन बरोबर नवा करार- भारतात कोविड नंतर सेमिकंडक्टरची टंचाई निर्माण झाल्याने सरकारने या क्षेत्रासाठी उत्पादन निगडित प्रोत्साहन योजना सुरू केली वेदांतने फॉक्सकॉनशी सहकार्य करार करून सेमी कंडक्टर उत्पादन करण्याचे जाहीर केले होते परंतु नंतर या प्रकल्पातून माधार घेतली आणि करार रद्द केला यानंतर वेदांतने मायक्रोन बरोबर  नवीन करार केला असून गुजरात मधील साणंद येथे नवा प्रकल्प चालू केला असून येत्या काही महिन्यात त्यातून उत्पादन चालू होईल.

★आयटीसी कंपनीच्या हॉटेल व्यवसायाचे स्वतंत्र कंपनीत विभाजन- 14 ऑगस्ट 2023 रोजी देशातील सर्वात मोठी सिगारेट उत्पादक आणि एफएमसीजी क्षेत्रातील दादा कंपनी आयटीसीने आपल्या हॉटेल व्यवसायाचे वेगळ्या कंपनीत विभाजन करणार असल्याचे जाहीर केले. त्यास भागधारकांची मंजुरी मिळून विद्यमान भागधारकांना  या नवीन कंपनीचा एक शेअर त्यांच्या दहा शेअर्सच्या बदल्यात विनामूल्य देण्यात आला. शेअरबाजारात त्याची लवकरच स्वतंत्र नोंदणी करण्यात येणार आहे.

★टीसीएस कंपनीतील नोकर भरतीचा घोटाळा- आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी टीसीएसमध्ये नोकरभरती करण्यासाठी लाच दिली जाते या घटनेचा पर्दाफाश मीडिया रिपोर्ट मधून जून 2023 मध्ये करण्यात आला. हा घोटाळा 100 कोटी रुपयांचा आहे असे आरोप करण्यात आल्यावर कंपनीने त्यावर त्वरित चौकशी सुरू केली त्याचा अहवाल आल्याचार भरती प्रमुखांना रजेवर पाठवून संसाधन व्यवस्थापन विभागातील चार अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल 16 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले असून सहा एचआर कंपन्यांना कंपनीबरोबर व्यवसाय करण्यास मनाई केली आहे. 

★टाटा टेक्नॉलॉजी या कंपनीची प्रारंभिक भागविक्री- सन 2004 ला टीसीएस या टाटा गृपमधील कंपनीच्या भागविक्रीनंतर 19 वर्षांनी या गृपमधील शेअर्सची प्रारंभिक भागविक्री झाली त्यास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला 3042 कोटी रुपयांच्या या इशूला  सत्तर पट अधिक मागणी आली. 500 रुपयात दिलेल्या या दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सचे 30 नोव्हेंबर 2023 ला शेअर्सचे पहिले काही व्यवहार 1200 ते 1400 रुपयांनी झाले. 3 जानेवारी 2024 चा या कंपनीच्या शेअर्सचा  बंदभाव ₹ 1170 च्या आसपास  आहे.

★एअर इंडिया आणि इंडिगोकडून व्यवसाय विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावर विमानखरेदी~ 

टाटा गृपने सरकारीकरण झालेल्या आपल्या एअर इंडियाचे जून 2023 मध्ये अधिग्रहण केल्यानंतर आपली ग्राहकसेवा सुधारण्यासाठी विस्तार कार्यक्रमाचा भाग म्हणून 250 एअरबस विमाने आणि 220 बॉईग विमाने खरेदी करण्याची 70 अब्ज डॉलर्सची ऑर्डर दिली आहे इंडिगो नेही 500 एअरबस खरेदीची ऑर्डर दिली असून एकाच वेळी व्यावसायिक विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांचा विमान खरेदीतील हा एकत्रित उच्चांक आहे.

★डिस्ने हॉट स्टार – आयपीएलच्या प्रक्षेपणाचे अधिकार गमावल्यावर आपल्या ग्राहकांना 31 मार्च 2023 नंतर एचबीओ चॅनल दाखवणार नसल्याचे सांगितले. याचा परिणाम म्हणून 30 सप्टेंबर 2023 अखेर संपलेल्या अर्ध्या वर्षात आपले 2.8 दशलक्ष सशुल्क ग्राहक सदस्य गमावले.

★युनिकॉर्न दर्जा मिळवणारे पाहिले स्टार्टअप बायजूस अडचणीत- अभिनेता शाहरुख खान, फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सारख्या व्यापार दूतांनी लोकप्रिय केलेली बायजूस ही शैक्षणिक क्षेत्रातील आधाडीची आणि युनिकॉर्न दर्जा (एक अब्ज बाजारमूल्य असलेली कंपनी) प्राप्त कंपनी कोविड नंतर अडचणीत सापडली असून त्याच्या कॅश फ्लॉवर परिमाण झाल्याने आपली कर्जदायित्वे पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे धनकोनी तीला कोर्टात खेचले लेखा परीक्षकांसह संचालक मंडळातील अनेक सदस्यांनी राजीनामे दिले. सक्तवसुली संचनालयाने संस्थापकाना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता शैक्षणिक क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा वापर करून श्रेष्ठत्व मिळवण्याचे या कंपनीचे स्वप्न विरले आहे. 

       

वर्ष संपताना बाजाराने उच्चांक करून नवा मापदंड निर्माण केला असून आगामी निवडणूक वर्ष लक्षात घेता तो आणखी नवे विक्रम नोंदवण्याची शक्यता आहे. 

 

 

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…