Reading Time: 4 minutes

एखाद्या कंपनीच्या शेअर्सचा बाजारभाव किती असू शकतो? सध्या भारतातील प्रमुख शेअरबाजारात नोंदण्यात आलेल्या कंपन्यांची संख्या पाहिली तर मुंबई शेअरबाजारात 5300 कंपन्या असल्या तरी 4000 कंपन्या व्यवहारासाठी उपलब्ध असून  यातील 3700 कंपन्यातच व्यवहार  होतात. राष्ट्रीय शेअरबाजारात 2200 कंपन्या नोंदवलेल्या असून त्यातील 1900 हून कमी कंपन्यामध्ये व्यवहार होतात. याचाच दुसरा अर्थ असा अनेक कंपयाच्या शेअर्सचे कोणतेही व्यवहार होत नाहीत. सध्या नोंदणी केलेले समभाग हे प्रामुख्याने ₹1,2, 5, 10 चे आहेत. ते पूर्णांकी संख्येतच असावेत आणि त्यात खरेदी विक्री व्यवहार करायचा असल्यास तो किमान 1 शेअर्सचा असावा असे सध्याचे नियम आहेत. शेअरबाजारात असलेल्या कंपनीचा बाजारभाव हा बाजार चालू असताना सातत्याने अनेक कारणांनी बदलत असला तरी तो प्रामुख्याने मागणी पुरवठा यावर अर्थशास्त्राच्या मूलभूत तत्वावर ठरून कंपनीच्या कामगिरीमुळे कुठेतरी एका पातळीवर स्थिरावतो. सध्या  बाजारात 4 / 5 अंकी संख्येत बाजारभाव असलेल्या अनेक कंपन्या आहेत. बाजाराचे दिशानिदर्शक सेन्सेक्स आणि निफ्टी त्याच्या उच्चतम स्थानांच्याजवळ असून ते नवा उच्चांक निर्माण करण्याची लवकरच शक्यता आहे.यात प्रथमच 6 अंकी भाव नोंदवून एमआरएफ कंपनीने आज 13 जून 2023 रोजी प्रथमच नवी गरुडझेप घेतली आहे. यापूर्वी 8 मे 2023 रोजी याच कंपनीचा फ्युचरमधील भाव एक लाखाहून अधिक नोंदण्यात आला होता त्याची आज रोख (Cash segments)  बाजारात त्याची अशी पूर्तता होत आहे.

        आपल्यापैकी अनेकांनी त्यांच्या बालपणी टायरचा गाडा बनवून त्यावर काठी मारून तो दूरवर नेला असेल. टायर सोबत पळण्याचा आणि त्याला पळवण्याचा हा खेळ जरी असला आणि तो आता आपण खेळत नसलो तरी अधिकाधिक पैसे कसे मिळतील त्या मागे धावण्याचा एक नवा खेळ खेळू लागलो आहोत. गेली अनेक वर्षे सचिन, विराट याच्या बॅटवरील एमआरएफ लोगोचे स्टिकर्स आणि विविध माध्यमातून दिसणारा एमआरएफचा मसलमॅन आपल्या अंतर्मनात कुठेतरी आहे. आज एमआरएफ टायर हा जगभरात रबर क्षेत्रातला राजा मानला जातो, ते सर्व प्रकारचे अगदीं विमानांचेही टायर बनवतात. आपल्या संरक्षण खात्यास ते त्यांच्या गरजेनुसार खास प्रकारचे टायर्स बनवून देत आहेत. याशिवाय रबरी खेळणी, कन्व्हेअर बेल्ट, क्रीडा उपकरणे, आच्छादने आणि रंगनिर्मितीच्या क्षेत्रातही ते आहेत. तर जाणून घेऊया एमआरएफची यशोगाथा

हेही वाचा- शेअरची खरेदी करण्यापूर्वी या १० प्रमुख गोष्टी जाणून घ्या !

 टायर म्हटलं की आपसूक डोळ्यापुढे एमआरएफ हे नाव येतं. एमआरएफ ही भारतातली सगळ्यात मोठी टायर निर्माण करणारी, विकणारी आणि निर्यात करणारी  कंपनी आहे. या एमआरएफ कंपनीची सुरवात केली के एम मम्मन मप्पिलाई यांनी. सन 1922 साली केरळच्या एका ख्रिश्चन परिवारात त्यांचा जन्म झाला. 9 भावंड असलेला असा त्यांचा मोठा परिवार होता, मद्रासच्या ख्रिश्चन कॉलेजातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं त्यांच्या वडिलांचा न्यूजपेपर आणि बँकेचा व्यवसाय होता पण स्वातंत्र्यकाळातील आंदोलनांमुळे एका वादात ते सापडले आणि हे व्यवसाय कायमचे बंद होऊन त्यांना जेलमध्ये जावं लागलं. मप्पिलाई यांच्यासाठी हा मोठा धक्का होता, वडिलांना अटक झाल्यावर घरची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. आशा बिकट परिस्थितीत आपलं शिक्षण कसबसं पूर्ण करून के एम मम्मन मप्पिलाई पत्नीसोबत एका झोपडपट्टीत राहू लागले. या झोपडपट्टीत राहत असताना नातेवाईकांकडून उधारीवर पैसे घेतलेआणि फुगे बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. या कंपनीचं नाव त्यांनी ठेवलं मद्रास रबर फॅक्टरी. (सन 1946)

     के एम मम्मन मप्पिलाई हे फुगे बनवून स्वतः विकायला जात असे. ते बोलण्यात इतके पटाईत होते कि ग्राहकांना ते रिकाम्या हाताने कधीच जाऊ देत नसत, चांगल्या बोलण्याने ते त्याला मोहित करत असत. सन 1949 पासून त्यांनी रबरी खेळणी विकायला सुरवात केली. एक नवीन ऑफिस सुरु केलं. मप्पिलाई यांनी इथून आपला व्यवसाय विस्तारण्यास सुरवात केली. ते आपल्या एका भावाला भेटले ज्याचा टायरवर रबर चढवण्याचा व्यवसाय होता. सुरुवातीला ते रबर परदेशातून मागवत असत. भावाच्या मदतीने के एम मम्मन मप्पिलाई रबर बनवायचं तंत्र शिकले आणि या क्षेत्रात त्यांनी उडी मारली. एमआरएफने इथून मागे वळून पाहिलंच नाही, ग्राहकांना एमआरएफच्या टायरांची भुरळ पडू लागली. कारण हे टायर टिकावू आणि मजबूत होते. एमआरएफच्या एन्ट्रीने इतर कंपन्यांनी या क्षेत्रातून काढता पाय घेतला. एमआरएफ हा टायर बाजारातला दादा बनला. एमआरएफ टायरला सरकारकडून चांगलं उत्तेजन आणि मदत मिळाली. सन 1967 हे साल महत्वाचं होतं कारण भारताने जगात सर्वाधिक टायर बनवणाऱ्या अमेरिकेलाच एमआरएफचे टायर विकायला सुरवात केली. अनेक कंपन्यांसोबत भागीदारी करून एमआरएफने आपला व्यवसाय वाढवला आणि विदेशातही आपली हवा केली.

भारतीय लोकांची एके काळची स्वप्नातील गाडी मारुतीमध्ये एमआरएफचे टायर होते. आज घडीला भारतात 10 ठिकाणी असलेल्या एमआरएफच्या विविध युनिटमुळे 20  हजार हून अधिक लोकांना रोजगार मिळतोय. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या गेल्या आर्थिक वर्षाअखेर एमआरएफ कंपनीची ओळख अशी सांगता येईल.

*भारतातली सगळ्यात मोठी आणि जगातील दुसरी मोठी टायर उत्पादक आणि निर्यात करणारी कंपनी

*उलाढाल 23008 कोटी

*निव्वळ नफा 738 कोटी

*प्रति समभाग (₹10)उत्पन्न ₹1813/-

*कर्ज भांडवल गुणोत्तर 0.17

*पुस्तकी मूल्य (book value) ₹33085

*शेअरहोल्डिंग प्रमोटर 28% जनता 42% देशी वित्तसंस्था 18% विदेशी वित्तसंस्था 12%

याशिवाय

13 जून 2023 चा

*किमान कमाल भाव ₹ 99150.20 ते ₹ 100439.95

*मागील 52 आठवड्यातील किमान कमाल भाव ₹ 65878.35 ते 100439.95

*बाजारमूल्य ₹ 42408 कोटी

*रोजची सरासरी उलाढाल 7962 शेअर्स

*डिलिव्हरी प्रमाण 33.94%

*बीटा फेक्टर (शेअरच्या बाजारभावात बाजाराच्या निर्देशांकाच्या तुलनेत होणारी हालचाल) 0.75

कंपनीच्या भवितव्याच्या दृष्टीने काही काळजी वाटणाऱ्या बावी

*पुस्तकी मूल्याच्या तुलनेत बाजारभाव अत्यंत कमी

*गेल्या 5 वर्षात उलाढालीत 9% वाढ

*मागील तीन वर्षात निव्वळ नफा 7% हून कमी

*नफ्यातील केवळ 8% वाटा मागील तीन वर्षात शेअरहोल्डर्सना मिळाला.

        सध्या शेअरबाजारात 5 अंकी बाजारभाव असलेले काही शेअर्स आणि त्यांचे 13 जून रोजीचे भाव असे-

हनिवेल आटो ₹ 41234

पेज इंडस्ट्री    ₹ 38387

नेस्ले            ₹ 22393

बॉश            ₹ 19060

लक्ष्मी मशीन  ₹ 12268

      सहा अंकी एमआरएफ शिवाय पाच अंकी भाव असलेल्या मोजक्याच कंपन्या असून या सर्व आघाडीच्या आणि चांगल्याच कंपन्या असल्या तरी त्यांचा भाव 6 आकडी होण्यासाठी अजून बराच कालावधी जावा लागेल.

        बाजारात 4 अंकी भाव असलेल्या उदा. लार्सन, इन्फोसिस, टीसीएस, एचडीएफसी, रिलायन्स या कंपन्या कदाचित यापूर्वीच 6 अंकी भाव दाखवू शकल्या असत्या परंतू त्यांनी वेळोवेळी बक्षीसभाग (बोनस), हक्कभाग (राईट्स), प्राधान्यभाग (प्रेफ्रंशियल), भाग विभागणी (स्प्लिट) केली आणि आपल्या भागधारकांना मालामाल केले आहे. या गोष्टींचा परिणाम म्हणून त्यांचा बाजारभाव समायोजित झाला आहे. तो सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या आवाक्यात आहे, त्यामुळेच या कंपन्यांत सातत्याने मोठी उलाढाल होत असते याउलट एमआरएफ भागधारक फक्त लाभांशच घेत असून त्यांचे भाग भांडवल ₹4.24 कोटी असल्याने वरील कंपन्यांच्या तुलनेत त्यात होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण अत्यंत कमी आहे, तसेच सध्याच्या बाजारभावानुसार मिळणारा लाभांश परतावा 0.2 टक्क्यांहून कमी आहे. अशी वस्तुस्थिती असली तरी दाखवीत असलेला 6 अंकी भाव भांडवल बाजाराशी संबंधित प्रत्येकाने नक्कीच आनंदाने साजरा करायला हवा कारण हा पल्ला गाठणारी ही पहिलीच आणि सध्यातरी एकमेव कंपनी आहे आणि गुंतवणूकदारांच्या  मालमत्तेत झालेली वाढ ही नक्कीच भुरळ पाडणारी असून या ऐतिहासिक घटनेचे आपण सारे साक्षीदार आहोत.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य असून लेखात व्यक्त केलेली  मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत. लेखात उल्लेख असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची कोणतीही शिफारस हा लेख करत नाही)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…