-
आज आपण पाहतो की म्युच्युअल फंडाच्या शेकडो योजना आहेत यामूळे गुंतवणूकदार गोंधळून जातो. अशावेळी गुंतवणूकदारांकडून चुकीची योजना निवडली जाऊ शकते.
-
गुंतवणूकदाराचे हित जपण्यासाठी ऑक्टोबर २०१७ मध्ये सेबी ने नवीन नियमावली तयार केली. त्याप्रमाणे प्रत्येक म्युच्युअल फंडाला प्रत्येक कॅटेगरी मध्ये एकच फंड चालवता येणार आहे.
-
त्यामुळे गुंतवणूकदारांना फंड निवडणे सोपे होईल. हा फरक साधारण एप्रिल -मे २०१८ नंतर दिसून येत आहे. यामध्ये मुख्यत्वे तीन मूळ कॅटेगरी असतील; डेब्ट(Debt), इक्विटी आणि हायब्रीड.
डेब्ट फंडाचे प्रकार-
-
डेब्ट फंड हे त्यात गुंतवणूक असलेल्या पेपर्स च्या मुदतीवर, ज्याला आपण पोर्टफोलिओ ड्युरेशन(कालावधी) म्हणतो, त्यावर त्याची अस्थिरता किंवा चंचलता अवलंबून असते म्हणूनच सेबीने सर्व डेब्ट फंडचे पोर्टफोलिओ ड्युरेशनशी संबंधित वर्गीकरण केले आहे.
-
ओव्हरनाईट डेब्ट फंड– फक्त ओव्हरनाईट मुदतीच्या पेपर्स मध्ये गुंतवणूक करण्यासाठी.
-
लिक्विड फंड– जास्तीतजास्त 91 दिवसाच्या मुदतीच्या पेपर्स मध्ये गुंतवणूक करण्यासाठी.
-
अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड – यामधील पोर्टफोलिओ चे कलावधी ३-६ महिने असेल.
-
लो ड्युरेशन फंड – याच्या पोर्टफोलिओ चे ड्युरेशन ६-१२ महिने असेल.
-
मनी मार्केट फंड– याच्या पोर्टफोलिओ मधील प्रत्येक पपेरची मुदत ही एक वर्षाच्या आतील असेल.
-
-
पहिले जे पाच प्रकार पहिले त्या कॅटेगरीतल्या फंडाचा फायदा हा आपण सेविंग्स बँक अकाउंट ला पर्याय म्हणून करू शकतो. ह्या फंडामध्ये साधारण बँकेच्या सेविंग्स अकाउंट दरापेक्षा जास्त परतावा मिळतो.
-
लिक्विड फंड तर आपल्याला ५०,००० पर्यंत ची रक्कम कोणत्याही वेळी काढण्याची मुभा देतात, अगदी मध्यरात्रीही, ही रक्कम आपल्या अकाउंट मध्ये २ मिनिटात जमा होते. सध्याच्या मार्केट कंडिशन प्रमाणे ह्या फंडामध्ये सेविंग्स अकाउंट पेक्षा साधारण ३-4 टक्के परतावा जास्त मिळतो.
-
शॉर्ट ड्युरेशन फंड – पोर्टफोलिओ ड्युरेशन १-३ वर्षांमध्ये असेल, मिड ड्युरेशन फंडामध्ये पोर्टफोलिओ ड्युरेशन ३-४ वर्षे असेल, मिड टू लॉन्ग ड्युरेशन मध्ये पोर्टफोलिओ डुरेशन हे ४-७ वर्षे असेल. लॉन्ग ड्युरेशन फंडा मध्ये डुरेशन हे ७ वर्ष पेक्षा जास्त असेल.
-
डायनॅमिक बॉण्ड फंड– यामध्ये फंड मॅनेजरला कोणत्याही कालावधीचा पोर्टफोलिओ करण्याची मुभा असेल.
-
कॉर्पोरेट बॉण्ड फंड- यामध्ये किमान ८०% गुंतवणूक ही कॉर्पोरेट पेपर्स मध्येच करावी लागेल.
-
ज्यांना कॅपिटल मार्केट मधील गुंतवणूकीची जोखीम घ्यायची नसते त्यांनी वरील सहा प्रकारच्या फंडा मध्ये गुंतवणूक करावी.
-
फंडाच्या पोर्टफोलिओचे ड्युरेशन(कालावधी) जितके कमी तितकी फंडाची चंचलता कमी असते व ड्युरेशन जेवढे जास्त तेवढा तो फंड जास्त चंचल असतो. फंडाची चंचलता हि मार्केट मध्ये होणाऱ्या इंटरेस्ट रेट (दर) मधील बदलाशी निगडित असते.
-
ह्या फंडाचा फायदा आपण आपल्या ३ ते ५ वर्ष मुदतीच्या टर्म डिपॉजिटस ला पर्याय म्हणून पाहू शकतो. मागील इतिहास पाहिला तर दीर्घ मुदती मध्ये ह्या फंडांनी टर्म डिपॉजिटस पेक्षा ३-४ टक्के जास्त परतावा दिलेला आहे.
-
क्रेडिट रिस्क फंड– यामध्ये किमान ६५% व कमी मानांकन असलेल्या पेपर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. थोडीफार जोखीम घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड उपयुक्त ठरतो.
-
बँक अँड पी एस यू डेट फंड– यामध्ये किमान ८०% इन्व्हेस्टमेंट त्या पेपर्स मध्येच करावी लागेल.
-
गिल्ट फंड- याची किमान ८०% इन्व्हेस्टमेंट ही सरकारी कर्जरोख्यांमध्येच करावी लागेल. १० वर्षे कॉन्स्टन्ट मॅच्युरिटी गिल्ट फंडा मध्ये फंड मॅनेजर ला स्कीम चा पोर्टफोलिओ मॅच्युरिटी १० वर्षे ठेवावी लागेल.
-
-
वरिल तीन कॅटेगरी मधील फंडामध्ये साधारण कंपन्या किंवा जवळपास सर्व बँका गुंतवणुक करतात. सामान्य गुंतवणूकदारांनीं या योजनांचा लाभ घेतला पाहिजे.
-
फ्लोटर फंड- यामध्ये किमान ६५% असे पेपर्स असतील ज्यांचे रिटर्न्स हे फिक्स्ड नसतील व कोणत्यातरी बेंचमार्क रिटर्न्स शी जोडलेले असतील.
-
असे हे डेब्ट कॅटेगरी मधले १६ फंडांचे व्यवस्थित वर्गीकरण केलेले आहे. यामुळे गुंतवणूकदारांची दिशाभूल होणार नाही. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की जेवढा कालावधी दीर्घ मुदतीचे तेवढी फंडाची अस्थिरता जास्त. परंतु कमी कालावधीच्या फंडापेक्षा जास्त कालावधीच्या फंडातून जास्त रिटर्न्स मिळण्याची शक्यता असते व जोखीमही जास्त असते. हे फंड आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार आणि गुंतवणूकीच्या मुदतीनुसार आपण निवडू शकतो.
इक्विटी फंडाचे प्रकार
-
इक्विटी फंडासाठी सेबी ने शेयर मार्केट मधील कंपन्यांचे ग्रुप बनवले आहेत. पहिल्या १०० मोठ्या कंपन्या ‘लार्ज कॅप कंपन्या’ आहेत. १०१ ते २५० मोठ्या कंपन्या मिडकॅप कंपन्या आहेत व त्यापुढील सर्व कंपन्या स्मॉल कॅप कंपन्या आहेत.
-
ह्या वर्गीकरणाप्रमाणे म्युच्युअल फंडाला आपल्या स्कीम्स चालवाव्या लागणार आहेत.
-
लार्ज कॅप कंपन्या कमी अस्थिर असतात तर स्मॉल कॅप कंपन्या जास्त अस्थिर असतात. हे लक्षात ठेवून आपण आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार आपल्या साठी योग्य ती स्कीम निवडली पाहिजे.
-
मल्टिकॅप फंडामध्ये फंड मॅनेजर किमान ६५% इन्व्हेस्टमेंट कोणत्याही इक्विटी शेयर मध्ये करू शकेल.
-
लार्ज कॅप फंडात फंड मॅनेजर ने किमान ८०% इन्व्हेस्टमेंट फक्त लार्ज कॅप कंपनीमध्ये करणं आवश्यक आहे.
-
एक लार्ज व मिडकॅप असा एकत्र फंड असेल जिथे फंड मॅनेजर ला दोन्ही पद्धतीच्या शेयर मधेय किमान ३५-३५ % इन्व्हेस्टमेंट करणं आवश्यक आहे.
-
मिडकॅप फंड तसेच स्मॉल कॅप फंड या दोन्ही फंडामध्ये फंड मॅनेजर ला किमान ६५% रेस्पेक्टिव्ह साईझ च्या शेयर मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल.
-
डिविडेंट यीएल्ड फंड मध्ये किमान इन्व्हेस्टमेंट रेग्युलर डिविडेंड देणाऱ्या शेयर्स मध्ये असेल.
-
व्हॅल्यू फंड किंवा कॉन्ट्रा फंड मध्ये किमान ६५% शेयर हे त्या स्टाईल शी जुळणारे असायला हवेत.
-
फोकस्ड फंड मध्ये फंड मॅनेजर ला जास्तीत जास्त ३० शेयर्स मध्ये गुंतवणूक करता येईल , इक्विटी फंड जर सेक्टर शी संभंदीत सेक्टर फंड असेल किंवा कोणत्या थिम शी संभंदीत असेल तर फंड मॅनेजर ला किमान ८०% इन्व्हेस्टमेंट त्या सेक्टर मध्ये किंवा थिम मध्ये करणं आवश्यक आहे.
-
इ एल एस एस किंवा टॅक्स सेविंग स्कीम यात किमान ८०% गुंतवणूक कोणत्याही शेयर्स मध्ये असेल व यात ३ वर्षाचा ‘लॉक इन’ किंवा ३ वर्ष रक्कम काढता येणार नाही. असे हे फंड आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार आणि गुंतवणूकीच्या मुदतीनुसार आपण निवडू शकतो. ज्यांचा गुंतवणूक कालावधी ३-५ वर्षाचा आहे त्यांनी लार्ज कॅप किंवा मल्टि कॅप फंड निवडावा, ५-७ वर्ष मुदतीसाठी मिडकॅप फंड निवडावा, व त्याहून जास्त कालावधी साठी स्मॉल कॅप फंड निवडावा.
-
प्रत्येक व्यक्तीची जोखीम घेण्याची क्षमता तसेच त्याची आर्थिक उद्दिष्ट्ये निरनिराळी असतात. त्यामुळे वित्तीय सल्लागाराशी चर्चा करून आपल्याला योग्य असा फंड निवडावा. कॅपिटल मार्केट मधील जोखीम कमी करण्या करीता इक्विटी फंडात गुंतवणूक करताना SIP किंवा STP चा मार्ग अवलंबवावा.
हायब्रीड फंडाचे प्रकार-
-
कन्सर्व्हेटिव्ह हायब्रीड फंडामध्ये इक्विटी मधील इन्व्हेस्टमेंट १० ते २५ % असेल व डेब्ट मधील इन्व्हेस्टमेंट ७५ ते ९० % असेल. यात इक्विटीचा भाग कमी असेल व जोखीमही कमी असेल.
-
बॅलन्सड हायब्रीड फंडामध्ये इक्विटी आणि डेब्ट दोन्ही ४० ते ६० % असतील म्हणजेच जर इक्विटीचा भाग ४०% असेल तर डेट ६०% व जेव्हा डेट ४०% असेल तेव्हा इक्विटी ६०%.
-
अग्ग्रेसिव्ह बॅलन्सड हायब्रीड फंडामध्ये इक्विटीचा भाग ६५ ते ८० % असेल व डेट चा भाग २० ते ३५ % असेल म्हणजेच इक्विटीचा भाग जास्त असल्याने जोखीम जास्त असेल.
-
डायनॅमिक ऍसेट ऑलोकेशन किंवा बॅलन्सड अड्वन्टेज. या फंडामध्ये फंड मॅनेजरला पूर्ण मुभा असेल की तो आपला फंड मार्केट कंडिशन प्रमाणे कुठे गुंतवू शकेल म्हणजे इक्विटी मार्केट किंवा डेट मार्केट मध्ये तो गुंतवणूक करू शकेल.
-
मल्टि ऍसेट ऑलोकेशन फंड मध्ये किमान ३ पेक्षा जास्त ऍसेट क्लास असतील उदाहरणार्थ डेट , इक्विटी , आर्बिट्राज वगैरे.
-
आर्बिट्राज फंड या प्रकारचे फंड्स बरेचसे कमी जोखीमवाले असतात. फंड मॅनेजर्स शेयर्स च्या निरनिराळ्या एक्सचंजेस मध्ये असलेल्या किमतीच्या फरकाचा ह्या फंडामध्ये लाभ मिळवून देतात.
-
इक्विटी सेविंग फंड मध्ये फंड मॅनेजर ला किमान ६५% इक्विटी किंवा आर्बिट्राज मध्ये गुंतवावे करावे लागतात व किमान ३५ % डेब्ट मध्ये गुंतवावे करावे लागतात. हायब्रीड फंड हे दीर्घ मुदती मध्ये डेब्ट फंडापेक्षा जास्त परतावा देतात. ज्या गुंतवणूकदाराची थोडीफार जोखीम घेण्याची तयारी असेल त्यांनी हायब्रीड फंड कॅटेगरी चा फायदा करून घेतला पाहिजे. हायब्रीड फंड हे ३ वर्ष किंवा जास्त काळाच्या टर्म डिपॉजिट ला उपयुक्त पर्याय ठरू शकतात. मागील ३ वर्षाचा परतावा पाहिल्यास हायब्रीड फंडांनी १२ ते १७ % परतावा दिलेला आहे.
सेबी ने अजून काही कॅटेगरी बनवल्या आहेत ज्यात खालील फंड येतात.
-
स्पेशल फंड
-
चिल्ड्रेन फंड – यामध्ये किमान ५ वर्षापर्यंत किंवा मूल १८ वर्षाचे होईपर्यंत रक्कम काढता येत नाही.
-
रिटायरमेंट फंड – यामध्ये किमान ५ वर्षापर्यंत किंवा निवृत्त होइपर्यंत रक्कम काढता येत नाही.
-
इंडेक्स फंड– हे असे फंड असतात जे शेयर बाजारात असलेल्या इंडेक्स मध्ये इन्व्हेस्ट करतात.
-
इ टी एफ – हे त्याच पद्धतीचे चे फंड असतात मात्र त्यासाठी डिमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे.
-
फंड ऑफ फंड- हे असे फंड असतात जिथे फंड मॅनेजर दुसऱ्या फंडामध्ये गुंतवणूक करतो. असे हे फंड आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार आणि गुंतवणूकीच्या मुदतीनुसार आपण निवडू शकतो.
-
सेबी ने गुंतवणूकदारांसाठी उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे यासाठी सेबीचे मनापसून अभिनंदन.
(Mutual Fund investments are subject to market risks. Please read all scheme related documents carefully.)
– निलेश तावडे
(चित्रसौजन्यः https://bit.ly/2E3i4Xl)