अर्जुन (काल्पनिक पात्र)- कृष्णा, आयकर विभाग हे करदात्यांना ॲडव्हान्स टॅक्ससंबंधी नोटीस जारी करत आहे. तर ॲडव्हान्स टॅक्सची मूलभूत संकल्पना काय आहे?
कृष्ण (काल्पनिक पात्र)- अर्जुना, जर करदात्याचे आर्थिक वर्षातील आयकर दायित्व हे रू. १०,००० पेक्षा जास्त असेल तर, करदात्याला तो संपूर्ण कर वर्षाच्या शेवटी भरण्याऐवजी पूर्ण वर्षामध्ये विविध हप्त्यांद्वारे भरावा लागेल. पूर्ण वर्षामध्ये देय असलेल्या या करालाच ‘ॲडव्हान्स टॅक्स’ म्हणतात.
अर्जुन- कृष्णा, ॲडव्हान्स टॅक्स भरण्यासाठी कोणकोणत्या देय तारखा आहेत?
कृष्ण- अर्जुना, ॲडव्हान्स टॅक्स हा ४ टप्प्यांमध्ये भरावा लागेल.
- जेवढा ॲडव्हान्स टॅक्स भरायचा आहे, त्याची १५ टक्क्यांपर्यंत रक्कम ही १५ जूनच्या आधी किंवा तोपर्यंत भरावी लागेल.
- ॲडव्हान्स टॅक्सची ४५ टक्क्यांपर्यंत रक्कम ही १५ सप्टेंबरच्या आधी किंवा तोपर्यंत भरावी लागेल.
- नंतर ॲडव्हान्स टॅक्सची ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम ही १५ डिसेंबरच्या आधी किंवा तोपर्यंत भरावी लागेल. आणि,
- ॲडव्हान्स टॅक्सची संपूर्ण १०० टक्के रक्कम ही आर्थिक वर्षाच्या १५ मार्चपूर्वी किंवा तोपर्यंत भरावी लागेल.
जर करदात्याने कलम ४४ए.डी. किंवा ४४ए.डी.ए. अंतर्गत प्रिझम्प्टीव आधारावर उत्पन्न दाखवले असेल, तर त्यांना फक्त शेवटचा हप्ता भरावा लागेल. वरिष्ठ नागरिक ज्यांना व्यवासायातून काही उत्पन्न नाही, त्यांना ॲडव्हान्स टॅक्स भरण्यातून सूट दिलेली हे. पगारदार व्यक्तींसाठी नियोक्त्याद्वारेच उद्गम करकपात(टी.डी.एस.) केली जाईल.
अर्जुन- कृष्णा, १५ मार्चच्या आधी आयकरातील ॲडव्हान्स टॅक्सचा शेवटचा हप्ता भरावयाचा आहे. करदात्याने याबाबत काय दक्षता घ्यावी?
कृष्ण- अर्जुना, अगोदर आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी कम्पॅरेटीव्ह बॅलेन्सशीट आणि प्रॉफिट ॲन्ड लॉस अकाऊंट बनवून घ्यावे. त्यामुळे आर्थिक वर्षामध्ये होणारे अंदाजे उत्पन्न करदात्यास कळेल व त्यानुसार ॲडव्हान्स टॅक्सचा शेवटचा हप्ता भरणे सुलभ होईल.
अर्जुन- कृष्णा, शेवटचा हप्ता भरण्याअगोदर म्हणजेच १५ मार्चपूर्वी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?
कृष्ण- अर्जुना, करदात्याने चालू वर्षाचा अंदाजीत नफा काढून त्या नफ्यावर किती आयकर भरावा लागेल ते काढावे. फॉर्म २६ ए एस नुसार आयकरातून टी.डी.एस. व आधी भरलेला ॲडव्हान्स टॅक्स वजा करावा व उरलेल्या रकमेचा कर भरावा.
दुसरी सोपी पद्धत- मागील वर्षी भरलेल्या आयकरावर चालू वर्षाची अंदाजीत वाढ गृहित धरून ॲडव्हान्स टॅक्स भरावा. उदाः- ढोबळमानाने मागील वर्षी रू. १ लाख आयकर भरल्यास चालू वर्षी व्यापाऱ्याची अंदाजीत वाढ २०% गृहित धरल्यास चालू वर्षीचा एकूण आयकर रू. १,२०,००० होईल व ह्यानुसार ॲडव्हान्स टॅक्सचा भरणा करावा लागेल. प्रत्येक व्यापाऱ्याने आपापल्या व्यापाराची वाढ/घट लक्षात घेऊनच ॲडव्हान्स टॅक्सचे हप्ते भरावे.
अर्जुन- कृष्णा, हा टॅक्स कमी-जास्त भरला गेला तर काय?
कृष्ण- अर्जुना, जसे जास्तीचे सत्कर्म केलेले केव्हाही कामी येतात. तसेच, जास्तीचा ॲडव्हान्स टॅक्स भरल्यास तो ही वाया जात नाही. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपले रिटर्न तपासून जास्तीच्या भरलेल्या टॅक्सची व्याजासोबत परतफेड करते. मात्र, करदात्याने कमी कर भरल्यास जास्तीचे व्याज आणि इन्कम टॅक्स नोटिसांना सामोरे जावे लागते.
अर्जुन- कृष्णा, ॲडव्हान्स टॅक्स न भरल्यास काय होईल?
कृष्ण- अर्जुना, ॲडव्हान्स टॅक्स न भरल्यास प्रतिमहिना १% प्रमाणे व्याज भरावे लागेल. तसेच चौकशीलाही सामोरे जावे लागेल. तसेच, मोठ्या रकमेचा ॲडव्हान्स टॅक्स चुकविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. संगणकीकरण झाल्याने आयकर विभागाला बरीचशी माहिती मिळते, त्याआधारे ते ॲडव्हान्स टॅक्सची नोटीस पाठवून कर भरायला लावू शकतात.
अर्जुन- कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण- अर्जुना, आयकरात मागील वर्षीचा नफा-तोटा पाहून पुढील वर्षाचे निर्णय घ्यावे लागतात. चालू वर्षीच्या उत्पन्नानुसार ॲडव्हान्स टॅक्स भरावे लागतात व भविष्यातील वाढ लक्षात घेऊन ॲडव्हान्स टॅक्स किती भरावा हे सुद्धा ठरवावे लागते. म्हणून कायद्याच्या तरतूदीचे पालन करूनच कर भरावा, नाहीतर करदात्याला भविष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागेल. नंतर उपचार करण्यापेक्षा अगोदरच काळजी घेतलेली बरी.